फोटो – ट्विटर/ICC

क्रिकेट विश्वातील बेस्ट ऑल राऊंडरची यादी तयार करत असताना गॅरी सोबर्स, कपिल देव, इयान बोथम, इम्रान खान, जॅक कॅलिस ही नावं डोळ्यासमोर येतात. गेल्या 10-15 वर्षांमध्ये क्रिकेट पाहणाऱ्या मंडळींच्या यादीत फ्लिंटॉफ, शेन वॉटसन, बेन स्टोक्स ही नावं असतील. जुन्या आणि नव्या क्रिकेट फॅन्सच्या यादीत एक नाव हमखास मिस असतं….या खेळाडूने बॅटींग आणि बॉलिंगमध्ये टीमसाठी सर्वोच्च योगदान दिलं. तो त्या टीमचा मॅचविनर खेळाडू होता. इतकंच नाही तर त्याच्या टीमला एकमेव आयसीसी विजेतपद याच ऑल राऊंडरच्या सेंच्युरीमुळे मिळालं आहे. क्रिकेट विश्वाने कायम दुर्लक्ष केलेला न्यूझीलंडचा ऑल राऊंडर ख्रिस केर्न्स याचा आज वाढदिवस (Chris Cairns Birthday) आहे. आजच्याच दिवशी (13 जून 1970) केर्न्सचा जन्म झाला.

वडील रिटायर झाल्यानंतर चार वर्षांनी पदार्पण

ख्रिस केर्न्सला क्रिकेटचा वारसा त्याच्या घरातून मिळाला. त्याचे वडील लान्स केर्न्स (Lance Cairns) हे देखील न्यूझीलंडच्या टीममध्ये ऑल राऊंडर होते. ते 1971 ते 85 अशी 14 वर्ष क्रिकेच खेळले. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या एका वन-डेमध्ये त्यांनी सहा सिक्स लगावले होते. ते 1985 साली रिटायर झाले. त्यानंतर चारच वर्षांनी वयाच्या 19 व्या वर्षी ख्रिस केर्न्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे ज्या पर्थमध्ये लान्स शेवटची टेस्ट खेळले. त्याच पर्थमध्ये ख्रिसनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

दुखापतींचा फटका

 केर्न्सला पहिल्याच टेस्टमध्ये पाठ दुखीचा त्रास झाला. त्यानंतर त्याला वारंवार दुखापत झाली. तो 17 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये 62 टेस्ट खेळला. तर 57 टेस्ट त्याला दुखपतीमुळे बाहेर बसावं लागलं. या दुखापतींचा फटका त्याच्या कारकिर्दीला बसला नसता तर आज बोथम, कपिल यांच्या बरोबरीने सर्वांनी त्याचे नाव घेतले असते.

क्रिकेटच्या मैदानातील बॉन्डला दुखापतींचा वेढा

‘हे’ आकडे पाहा

ख्रिस केर्न्स (Chris Cairns Birthday) त्याच्या बहुतेक कारकीर्दीमध्ये लोअर ऑर्डरमध्ये बॅटींग केली. त्याचबरोबर तो टीमचा मुख्य बॉलर नव्हता. अनेक वन-डे मॅचमध्ये त्याने पूर्ण 10 ओव्हर बॉलिंग केली नाही, किंवा त्याला 10-15 ओव्हर्सपेक्षा जास्त बॅटींग मिळाली नाही. पण त्याची बॅटींग पैसा वसूल होती. त्याचे कव्हर ड्राईव्ह खणखणीत असत. त्याने एकदा शेन वॉर्नची (Shane Warne) जोरदार धुलाई केली होती.

केर्न्सनं 58 टेस्टमध्ये 200 विकेट्स आणि 3000 रन्सचा टप्पा पूर्ण केला. त्याच्यापूर्वी फक्त इयान बोथमनं (Ian Botham) याने हा टप्पा केर्न्सपेक्षा 3 टेस्ट कमी खेळून पूर्ण केला आहे. कपिल देव (73),  इम्रान खान (75), गॅरी सोबर्स (80),  रिचर्ड हॅडली (83)  आणि शॉन पोलॉक 87 या सर्वांनी केर्न्सपेक्षा जास्त टेस्ट खेळून हा टप्पा पूर्ण केला आहे.

केर्न्सला वन-डे क्रिकेटमध्ये कधीही मेन बॅट्समन किंवा मेन बॉलर म्हणून जबाबदारी मिळाली नाही. तरीही त्याने 215 वन-डेमध्ये 4950 रन्स आणि 201 विकेट्स अशी कामगिरी केली. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त 87 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर होता. पुढे गिलख्रिस्टने तो रेकॉर्ड मोडला. तर वन-डे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वात जलद 75 बॉलमध्ये त्याने सेंच्युरी झळकावली होती. त्यानंतर कोरे अँडरसनने 36 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावत केर्न्सला मागे टाकले.

… तर लवकरच इंग्लंड टीममध्ये दक्षिण आफ्रिकेतून मोठी भरती करावी लागेल!

मिनी वर्ल्ड कप पूर्वीचे मोठे वादळ

ख्रिस केर्न्स (Chris Cairns Birthday) 2000 साली नैरोबीमध्ये झालेल्या मिनी वर्ल्ड कपमध्ये सेंच्युरी झळकावल्याबद्दल सर्वांच्या लक्षात आहे. त्याआधीच्या वर्षी केर्न्स जबरदस्त फॉर्ममध्ये होता. 1999 साली भारताविरुद्ध हेमिल्टन टेस्टमध्ये त्यानं सेंच्युरी झळकावली. त्यानंतर वन-डे मालिकेत 7 सिक्ससह फक्त 75 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली.

केर्न्सनं 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 60 रनची खेळी करत टीमला विजयी केली. सेमी फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्धही त्याने 44 रनची चमकदार खेळी केली होती. या खेळीनंतरही न्यूझीलंडचा पराभव झाला.

क्रिकेट वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंडची टीम इंग्लंडमध्ये थांबली होती. केर्न्सनं लॉर्ड्स टेस्टमध्ये 77 रन देत 6 विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडच्या विजयात हातभार लावला. त्यानंतर ओव्हलवर झालेल्या टेस्टमध्ये तर केर्न्स न्यूझीलंडचा हिरो ठरला. त्याने सुरुवातीला 31 रन देत 5 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडची दुसऱ्या इनिंगमध्ये न्यूझीलंडची अवस्था 6 आऊट 39 अशी बिकट असताना केर्न्स बॅटींगला आला. त्याने 93 बॉलमध्ये 80 रनची खेळी केली. पुढे न्यूझीलंडने ती टेस्ट 83 रनने जिंकली.

ख्रिस केर्न्सनं इंग्लंड विरुद्धच्या 4 टेस्टच्या सीरिजमध्ये 183 रन्स काढले आणि 19 विकेट्स घेतल्या. 1999 या संपूर्ण वर्षात क्रेन्सनं 548 रन्स आणि 47 विकेट्स घेतल्या. एका इनिंगमध्ये 5 किंवा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने वर्षभरात चार वेळा केली.

जिद्द, संघर्ष आणि गुणवत्तेची कमाल, वर्ल्ड कप व्हिलन बनला देशाचा हिरो!

टीम इंडियाचा मिनी वर्ल्ड कप पळवला

नैरोबीमध्ये 2000 साली झालेल्या ICC Knockout (Mini World Cup) स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड या दोन टीम एकमेकांच्या समोर होत्या. केर्न्स (Chris Cairns Birthday) ती फायनल खेळणार हे देखील नक्की नव्हते. त्यासाठी त्याला फायनलपूर्वी काही तास आधी तो फिटनेस टेस्टमध्ये पास झाला. मॅचमध्ये 5 पेक्षा जास्त ओव्हर्स न टाकण्याचा त्याला डॉक्टरांनी सल्ला दिला होता. केर्न्सनं फायनलमध्ये 10 ओव्हर पूर्ण बॉलिंग केली.

टीम इंडियाच्या 267 रनचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था 5 आऊट 132 अशी झाली होती. त्यावेळी शांत डोक्याचा अनुभवी ऑल राऊंडर ख्रिस हॅरीस (Chirs Harris) सोबत केर्न्सची जोडी जमली. या दोघांनी मॅचचं चित्र बदलणारी 122 रन्सची पार्टरनरशिप केली. झहीर खान, व्यंकटेश प्रसाद, अजित आगरकर आणि अनिल कुंबळे या भारताच्या बॉलिंग अटॅकचा समाचार घेत केर्न्सनं 113 बॉलमध्ये नाबाद 102 ची खेळी करत न्यूझीलंडला विजेतेपद मिळवून दिले. न्यूझीलंडच्या टीमने आयसीसीच्या स्पर्धेत पटकावलेले हे एकमेव विजेतेपद आहे. केर्न्सच्या शतकाच्यापूर्वी आणि त्या शतकाच्या नंतरच्या दोन दशकात न्यूझीलंडला ही कामगिरी करता आलेली नाही.

मॅच फिक्सिंगचा आरोप

ख्रिस केर्न्स 2006 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला. माजी आयपीएल कमिशनर ललित मोदी (Lalit Modi)  यांनी केर्न्सवर मॅच फिक्सिंगचा आरोप केला. केर्न्सने त्यांच्यावर खटला दाखल केला. न्यूझीलंडचा बॅट्समन लू व्हिसेंट आणि माजी कॅप्टन ब्रँडन मॅकलम यांनीही केर्न्सवर आरोप केले. हे आरोप कधीही सिद्ध झाले नाहीत.

या खटल्याच्या दरम्यान त्याची आर्थिक स्थिती खालावली. त्याने नगरपालिकेचा ट्रक चालवणे, बस धुणे, बारमध्ये काम करणे या प्रकारची कामं कुटुंबाची आर्थिक गरज भागवण्यासाठी केली. केर्न्स पुढे ललित मोदींच्या विरोधातील खटला जिंकला. क्रिकेट विश्वात नेहमी दुर्लक्षित राहिलेला हा बेस्ट ऑल राऊंडर (Chris Cairns Birthday) मॅच फिक्सिंगच्या संकटातून तावून-सुलाखून बाहेर पडला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: