फोटो – ट्विटर/ICC

एखादा क्रिकेटपटू किती खेळतो याच्या इतकंच तो कसं खेळतो यालाही महत्त्व आहे. दीर्घकाळ टीमचा भाग असलेले क्रिकेटपटू रिटायरमेंटनंतर विस्मृतीमध्ये जातात. तर काही जण कमी कालावधीमध्ये मोठा इम्पॅक्ट निर्माण करतात. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर शेन बॉन्ड (Shane Bond) हा एक इम्पॅक्ट प्लेयर होता. तो 18 टेस्ट आणि 82 वन-डे अशा 100 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. पण या कालावधीमध्ये तो शंभर नंबरी सोनं असल्याचं सर्वांचं एकमत होतं. रिचर्ड हॅडलींनतर (Richard Hadlee) न्यूझीलंडला मिळालेला बेस्ट फास्ट बॉलर अशी ओळख असलेल्या शेन बॉन्डचा आज वाढदिवस (Shane Bond Birthday) आहे. आजच्याच दिवशी (7 जून 1975) बॉन्डचा जन्म झाला.

बॉन्डची दाहकता

हॉलिवूड सिनेमात खलनायकांच्या संपूर्ण गँगवर बंदूकीतील गोळ्यांचा वर्षाव करणारा जेम्स बॉन्ड सर्वांना माहिती आहे. हा क्रिकेटच्या मैदानातील बॉन्ड होता. शेन बॉन्ड. त्याच्या हातात बंदूकीच्या जागी बॉल असे. 6 फूट उंचीच्या बॉन्डचे ताशी 145 किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने बॉल बॅट्समनवर आदळत.

त्याच्या अंगठ्याचा वेध घेणाऱ्या यॉर्करची बॅट्समना दहशत असे. त्याचा इनस्विंगर अनेक दिग्गजांचा डिफेन्स भेदून आरपार जात असे. त्याची बॉलिंग अ‍ॅक्शन मोहक होती. तो एकाच वेळी फास्ट, भीतीदायक आणि नाजूक कौशल्य याचा त्रिवेणी संगम वाटे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलियाला त्याने नेहमीच त्रास दिला.

न्यूझीलंड क्रिकेटचा ‘हॅरी पॉटर’

बॉन्ड विरुद्ध ऑस्ट्रेलिया

शेन बॉन्डने (Shane Bond Birthday) 2001 साली स्टीव्ह वॉच्या ऑस्ट्रेलियन टीमविरुद्ध पदार्पण केले. त्यानंतर झालेल्या तिरंगी मालिकेत त्याने 9 मॅचमध्ये 21 विकेट्स घेत, जगाचे लक्ष वेधले. यामध्ये एका इनिंगमध्ये 5 आणि 4 विकेट्स त्याने प्रत्येकी 2 वेळा घेतल्या. त्याने रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) ला पहिल्या सहा मॅचमध्ये सलग आऊट केले. ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, शॉन पोलॉक, अ‍ॅलन डोनाल्ड या दिग्गज बॉलर्सचा समावेश असलेल्या त्या तिरंगी मालिकेत नवोदीत बॉन्डनं सर्वात जास्त विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंडचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉन्डचा खेळ नेहमीच बहरत असे. शेन बॉन्डच्या घातक यॉर्करपासून पायाच्या अंगठ्याचा बचाव करण्यासाठी मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) सारखा बॅट्समन टो गार्ड घालून मैदानात उतरला होता. त्यावरुन त्याच्या बॉलिंगची ऑस्ट्रेलियन टीममध्ये असलेली दहशत लक्षात येईल.

2003 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2003) वासिम अक्रम, शोएब अख्तर, वकार युनूस, शॉन पोलॉक, ब्रेट ली आणि ग्लेन मॅकग्राथ असे अनेक दिग्गज फास्ट बॉलर्स होते. या सर्वांच्या गर्दीमध्ये शेन बॉन्डने लक्ष वेधून घेतले. बॉन्डने त्या वर्ल्ड कपमध्ये 18 च्या सरासरीने 17 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुपर सिक्सच्या मॅचमध्ये त्यानं 23 रन देत 6 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर त्याच्या माऱ्यापूढे कोसळली. ऑस्ट्रेलियाची अवस्था 7 आऊट 84 झाली होती. त्यानंतर बॉन्डच्या ओव्हर्स संपल्या. हुशार आणि चिवट मायकल बेव्हन (Michael Bevan) याने त्याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाला 208 पर्यंत नेले. नंतरचे काम ऑस्ट्रेलियन्स बॉलर्सनी केले. न्यूझीलंडचा 96 रनने पराभव झाला. पराभूत मॅचमधील सर्वोत्तम स्पेल म्हणून शेन बॉन्डच्या त्या स्पेलची क्रिकेट इतिहासात नोंद झाली.  

शेन बॉन्डच्या 147 वन-डे विकेट्सपैकी 44 विकेट्स या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आल्या आहेत. त्याची वन-डे मधील हॅटट्रिक ऑस्ट्रेलिया विरुद्धची आहे. त्याचबरोबर त्यानं 4 वेळा 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या. यापैकी 3 वेळा प्रतिस्पर्धी टीम ऑस्ट्रेलिया होती.

दुखापतींचा वेढा

क्रिकेटच्या मैदानावर उतरण्यापूर्वी क्रिकेटच्या बॉन्डने सिनेमातल्या हिरोसारखी काही काळ पोलीस दलामध्ये नोकरी देखील केली आहे. क्रिकेटमध्ये तो खेळण्यापेक्षा त्याचा जास्त वेळ हा दुखापतीमधून बरा होण्यातच गेला. सुरुवातीला पाठ आणि नंतर त्याच्या शरिराचा प्रत्येक भाग दुखापतग्रस्त झाला.

2003 च्या वर्ल्ड कपनंतर ऐन भरात असताना दोन वर्ष तो क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर 2005 मध्ये बुलावायो वन-डेमध्ये भारताला हादरवणारी बॉलिंग केली आणि पुन्हा जखमी शिपाई झाला. त्याला दुखापतीमुळे 2007 चा वर्ल्ड कप देखील पूर्ण खेळता आला नाही.  

अचूकतेचे दुसरे नाव, ग्लेन मॅकग्रा

ICL ते IPL व्हाया न्यूझीलंड

शेन बॉन्ड 2007 च्या वर्ल्ड कपनंतर काही काळ इंडियन क्रिकेट लीग (ICL) या बंडखोर क्रिकेट लीगचा सदस्य होता. याबाबत न्यूझीलंड बोर्डाला कल्पना दिली होती. बोर्डाने त्यांचा शब्द न पाळता आपल्याला बडतर्फ केले असा आरोप बॉन्डने केला होता.

त्यानंतर 2009 साली तो पाकिस्तान विरुद्ध शेवटची टेस्ट मॅच खेळला. शेवटच्या टेस्टमध्येही बॉन्ड ‘मॅन ऑफ द मॅच’ होता. 18 टेस्टमध्ये 87 आणि 82 टेस्टमध्ये 147 विकेट्स ही आकडेवारी त्याच्या महानतेची साक्ष देतात. तो दुखापतीचा फटका बसल्यानं होऊ न शकलेला जगातील बेस्ट फास्ट बॉलर आहे.

शेन बॉन्ड 2009 साली कोलकाता नाईट रायडरकडून (KKR) आयपीएलचा एक सिझन खेळला. त्यानंतर तो 2015 पासून मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच आहे. 2015 पासून मुंबई इंडियन्सनं चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. या चार विजेतेपदात शेन बॉन्डच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या बॉलिंग युनिटचा मोलाचा वाटा आहे. टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) तर बॉन्डला (Shane Bond Birthday) त्याचा आयडॉल मानतो.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: