तो आला त्या सीरिजमध्ये त्याच्यातील टॅलेंटचा प्रचंड गवगवा झाला. आता टीमला पुढील 15 वर्ष मिडल ऑर्डरचा बॅट्समन मिळाला असं सांगितलं गेलं. तो विराट कोहली आणि केन विल्यमसनच्या बॅचचा खेळाडू आहे. कोहली आणि विल्यमसन आज क्रिकेटमधील अव्वल बॅट्समन आहेत. हा देखील अव्वल आहे, पण खेळात नाही तर वादात. गेल्या 11 वर्षात त्याच्या नावावर 11 प्रमुख वाद आहेत. तो खेळला की वाद होतो आणि इंग्रजी बोलला की ट्रोल होतो, असा ज्याचा क्रिकेट विश्वात लौकिक आहे, अशा पाकिस्तानच्या उमर अकमलचा आज वाढदिवस (Umar Akmal Birthday) आहे. आजच्याच दिवशी (26 मे 1990) रोजी त्याचा जन्म झाला.  

सुरुवात झोकात पण…

उमरने वयाच्या 19 व्या वर्षी न्यूझीलंडमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्याच टेस्टमध्ये न्यूझीलंडच्या पिचवर त्याने सेंच्युरी झळकावली. विदेशातील टेस्टमध्ये पदार्पण केल्यानंतर सेंच्युरी करणारा तो पाकिस्तानचा दुसराच खेळाडू होता. त्या घटनेला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याची टेस्टमध्ये फक्त ती एकमेव सेंच्युरी आहे. त्यानं तिसऱ्या वन-डेमध्ये श्रीलंकेविरुद्ध आक्रमक सेंच्युरी झळकावली. त्या सेंच्युरीलाही 12 वर्ष झाली आहेत. त्याच्या आजवर वन-डे मध्ये फक्त 2 सेंच्युरी आहेत.

उमर अकमलच्या वादाची XI

2010, खोटी दुखापत : मोठ्या खेळाडूची झलक सुरुवातीच्या काळातच दिसते. तसं उमर अकमलचे वाद वयाच्या 20 व्या वर्षी सुरु झाले. 2010 साली ऑस्ट्रेलियाच्या सीरिजमध्ये त्याचा मोठा भाऊ कमरान अकमलला (Kamran Akmal) खराब कामगिरीमुळे टीममधून वगळण्यात आले होते. टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी उमरने खोटी दुखापत जाहीर करत स्वत:ला पुढील टेस्टसाठी अनफिट जाहीर केले होते. याबद्दल त्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आर्थिक दंड केला. तसेच करार न करता सहा महिने प्रोबेशनवर ठेवले.

वाढदिवस स्पेशल : कमरान अकमल, पाकिस्तानी क्रिकेटचा अस्सल चेहरा!

2011, मला वरचा नंबर हवा:  त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2011 साली उमरला पीसीबीने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याचे कारण म्हणजे त्याने बोर्डाची परवानगी न घेता मीडियाला मुलाखत दिली. तो इतक्यावर थांबला नाही, तर मला वरच्या नंबरवर बॅटींग पाहिजे अशी जाहीर मागणी केली होती. उमरला 2011 सालीच टेस्ट टीममधून वगळण्यात आले. त्यानंतर तो कधीही पुन्हा टेस्ट खेळलेला नाही.

2012, अंपायरकडे दुर्लक्ष:  उमर 2012 साली झालेल्या T20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्य् पुन्हा वादात सापडला. त्याला बॅटींग करताना ग्लोज बदलायचे होते. त्यासाठी मैदानातील अंपायरने त्याला थोडं थांबण्याची सूचना केली होती. तरीही तो थांबला नाही. त्याने ग्लोज बदलले. या प्रकाराबद्दल त्याला सामनाअधिकाऱ्याने लेव्हल दोन अंतर्गत शिक्षा केली होती.

2014, अटक : उमरने (Umar Akmal Birthday) आता क्रिकेटच्या मैदानावर नाही तर बाहेर मस्ती करायचं ठरवले होते. त्याने त्यावर्षी खराब ड्रायव्हिंग बद्दल हटकणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाशी वाद घातला. त्याचा गणवेश फाडला. उमरला याबद्दल अटक झाली. 12 तासानंतर उमरला जामीन मिळाला.

2015 पार्टीची मस्ती : पाकिस्तानमधील देशांतर्गत स्पर्धा सुरू असताना उमरने पीसीबीची परवानगी न घेता हैदराबादमध्ये रात्रभर पार्टी केली. या पार्टीबद्दल उमरची त्या स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली.

2016 लोगोशी लगाव:  पाकिस्तानमधील एका स्थानिक मॅचमध्ये पीसीबीनं परवावनगी न दिलेला लोगो उमरने त्याच्या ड्रेसवर लावला होता. या प्रकरणात त्याला मॅच रेफ्रीनं वॉर्निंग देखील दिली होती, पण उमरने त्यांचं ऐकलं नाही. उमरला याबद्दल न्यूझीलंड विरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये 1 मॅच खेळण्यास बंदी घालण्यात आली.

2016 , थिएटरमध्ये राडा : फैसलाबादमधील एका थिएटरमध्ये उमरने राडा घातला. त्याने सांगितलेला डान्स नंबर थिएटर मालकाने पुन्हा एकदा वाजवला नाही, म्हणून उमरने राडा घातला.

2017 जुनैद खान पळून गेला : पाकिस्तान कप मॅचच्या दरम्यान टॉसच्या वेळी उमरला (Umar Akmal Birthday) टीममध्ये नसलेल्या जुनैद खानबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उमरने जुनैद टीममधून पळून गेला, असे टेलिव्हिजवर जाहीर केले. या प्रकरणात जुनैदने उमरवर टीका केली होती.

त्याचवर्षी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2017) उमरची निवड झाली होती. पण, सलग दोन फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्यानंतर त्याला टीममधून वगळण्यात आले. त्यानंतर त्याचे नाव सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळण्यात आले.

2018, स्पॉट फिक्सिंग प्रकरण:  भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 2015 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये दोन बॉल न खेळता सोडून देण्यासाठी मला बुकीनी ऑफर दिली होती, असे उमरने एका मुलाखतीमध्ये जाहीर केले.

पाकिस्तान क्रिकेटचं इस्लामीकरण करण्यासाठी इंझमामला जबाबदार का धरले जाते?

2019, अकॉनचे गाणे: पाकिस्तान टीम दुबईमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धची सीरिज खेळण्यासाठी गेली होती. उमर त्या सीरिजच्या दरम्यान टीम मॅनेजमेंटने तयार केलेला नियम मोडून रात्री गायक (Akon) अकॉनच्या कार्यक्रमाला गेला होता. या प्रकरणात त्याला आर्थिक दंड झाला.

2020, तीन वर्षांची बंदी:  पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घातली. मॅच फिक्सरने संपर्क साधल्याची माहिती बोर्डाला न कळवल्याबद्दल ही शिक्षा देण्यात आली. उमरने या बंदीला आव्हान दिले. त्यानंतर त्याची बंदी एक वर्षांची करण्यात आली. उमरची ही बंदी आता संपली असून तो पुन्हा एकदा नवा वाद करण्याच्या उत्साहाने पाकिस्तानकडून खेळण्यास सज्ज झाला आहे.

इंग्रजीचा मारेकरी

उमर अकमल त्याच्या इंग्रजीमुळे देखील यापूर्वी ट्रोल झाला आहे. त्यावरील अनेक मीम प्रसिद्ध आहेत.  

उमर तरीही टीममध्ये का?

इतके सारे मोठे वाद झाल्यानंतरही उमर अकमल (Umar Akmal Birthday) इतकी वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट का खेळला? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे कारण तो पाकिस्तानचा खेळाडू आहे, हे आहे. उमर पाकिस्तानी आहे. त्यांच्या टीममध्ये हे वाद अगदी नॉर्मल आहेत.

उमर या सर्व वादानंतरही वारंवार पाकिस्तानकडून खेळला, याचं कारण म्हणजे त्याची पार्श्वभूमी. त्याचा मोठा भाऊ कमरान अकमल आणि सासरे अब्दुल कादीर हे पाकिस्तान क्रिकेटमधील प्रस्थ. पाकिस्तानचा सध्याचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) उमरच्या भावंडापैकी आहे.

उमर अकमल इतरे सारे वाद होऊनही आज 32 वर्ष पूर्ण करतोय. तो आणखी काही वर्ष क्रिकेट खेळेल. त्यामुळे येत्या काळात त्याच्याशी संबंधित वादाची लिस्ट वाढत जाईल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: