फोटो – ट्विटर

नयन मोंगिया (Nayan Mongia) टीममधून आऊट झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) येईपर्यंतचा काळ टीम इंडियाच्या (Team India) विकेटकिपरसाठी मोठा विचित्र होता. या काळात भारतीय टीममधले विकेट किपर सातत्याने बदलले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये थोडा बरा खेळला किंवा अगदी थोडा जरी खेळला तरी त्याला टीम इंडियाची कॅप देण्यात येत असे. या काळात वयाच्या 17 व्या वर्षीच ज्याला टीम इंडियाकडून खेळण्याची लॉटरी लागली तो क्रिकेटपटू म्हणजे पार्थिव पटेल. (Parthiv Patel). पार्थिव पटेलचा आज वाढदिवस. आजच्याच दिवशी 1985 साली पार्थिवचा जन्म झाला.

पार्थिव थेट इंग्लंडमधील नॉटींगहॅममध्ये पहिली टेस्ट खेळला. शाळेत प्रवेश करताच थेट दहावीची परीक्षा देण्याचा तो प्रकार होता. आपल्या विरुद्ध खेळणाऱ्या इंग्लंडच्या टीमचा अ‍ॅलेक स्टुअर्ट (Alec Stewart) विकेट किपर होता . इंग्लंडचा अनुभवी खेळाडू, माजी कॅप्टन. स्टुअर्ट तेंव्हा 39 वर्षांचा  वर्षांचा होता. त्याच्यासमोर 17 वर्ष आणि 153 दिवसांच्या पार्थिवने भारतीय टीम इंडियाकडून विकेट किपर म्हणून पदार्पण केलं. तो टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेला सर्वात तरुण विकेट किपर होता.

कायमस्वरुपी लहान पोरगा

पार्थिव पटेलचा (Parthiv Patel) चेहरा अगदी लहान मुलासारखा होता. त्यानंतर काही वर्षांनी तो क्रिकेटमध्ये स्थिरावला. त्याच्यापेक्षा लहान वयाचे क्रिकेटपटू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टीममध्ये आले. पार्थिव त्यांच्यासमोरही लहान दिसत असे. त्याचा मुलासारखा चेहरा आणि कमी उंची याबद्दल अनेक मीम प्रसिद्ध झाले. पार्थिवनंही स्वत:चा दोसासोबतचा फोटो ट्विट करत त्याच्या होत असलेल्या थट्टेची खिलाडूवृत्तीनं दखल घेतली होती.

छोटा पार्थिव टीममध्ये आला तो काळ मोठ्या संघर्षाचा होता. मॅच फिक्सिंगच्या (Match Fixing Scandal)  वादळातून टीम इंडिया (Team India) बाहेर पडत होती. सौरव गांगुली (Sourav Ganguly) च्या कॅप्टनसीखाली नवी टीम इंडिया आकारात येत होती. या नव्या टीम इंडियाचं स्टंपच्या पाठीमागे संरक्षण करण्याचं काम कोवळ्या पार्थिवच्या खांद्यावर होते.

(वाचा – पार्थिव पटेलसह भारतीय क्रिकेटमधील ‘धोनी पर्वा’चा फटका बसलेले क्रिकेटपटू)

देशांतर्गत क्रिकेटचा अभ्यास न होताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्याचा फटका त्याला बसला. त्याच्यात खेळण्याची जिगर होती. जी बॅटिंगमध्ये सातत्याने दिसत असे. मात्र विकेट किपिंगमध्ये त्याचं तंत्र वारंवार उघडं पडलं. इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांच्या आव्हानात्मक पिचवर त्याला विकेट किपिंग करावी लागली. सिडनीमधील 2003-04 मध्ये झालेल्या टेस्टमध्ये स्टीव्ह वॉ, डेमियन मार्टीन आणि रिकी पॉन्टिंग यांच् स्टंपिंग सोडण्याची संधी त्याने गमावली. त्या टेस्टच्या निकालात पार्थिवची खराब किपिंग निर्णायक ठरली. त्याच्या विकेट किपिंग कौशल्यावर विश्वास नसल्यानेच कदाचित 2003 च्या वर्ल्ड कप टीममध्ये (Cricket World Cup 2003) पार्थिव असूनही राहुल द्रविडकडे किपिंगचं काम सोपवण्यात आलं होती.

पार्थिव पटेलची टेस्ट कारकीर्द

टेस्ट25
रन्स934
सरासरी31.13
सर्वोच्च71
100/500/6

स्टीव्ह वॉ विरुद्ध स्लेजिंग

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जगभर स्लेजिंगसाठी प्रसिद्ध होते.स्टीव्ह वॉ (Steve Waugh) म्हणजे टिपीकल ऑस्ट्रेलियन टीमचा खडूस कॅप्टन. पार्थिव त्याच्या पहिल्याच दौऱ्यात थेट स्टीव्ह वॉ ला भिडला. क्रिकेट कारकीर्दीमधील शेवटची टेस्ट खेळणाऱ्या स्टीव्ह  वॉ ला त्याने स्लॉग फटका खेळण्याचं आव्हान दिलं होतं. त्यावेळी “तू लंगोटी आणि दुपट्यात होतास तेंव्हापासून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय’’ असं त्याला उत्तर स्टीव्ह वॉ ने दिलं होतं.

सेंच्युरीची हुलकावणी

पार्थिव पटेलला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही सेंच्युरी झळकावता आली नाही. पाकिस्तान विरुद्ध 2004 साली रावळपिंडी टेस्टमध्ये आग ओकणाऱ्या शोएब अख्तरसमोर (Shoaib Akhtar) पार्थिव उभा राहिला होता. त्याने झुंजार 69 रन्स काढले. भारताच्या ऐतिहासिक टेस्ट मालिका विजयात पार्थिवच्या या खेळीचे देखील विशेष स्थान आहे. मैदानावर उभं राहण्याच्या त्याच्या सवयीमुळे  टेस्ट क्रिकेटमध्ये त्याला ओपनिंगची जबाबदारी देखील देण्यात आली होती.

आठ वर्षांनी कमबॅक, आठ तासांचा प्रवास

दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंह धोनी प्रकाशात आल्यानंतर पार्थिव आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या बाहेर फेकला गेला. त्याची 2008 नंतर थेट 2016 साली निवड समितीला आठवण आली. इंग्लंडविरुद्ध मोहालीमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टेस्टमध्ये पार्थिवची अगदी अचानक निवड झाली. पार्थिव त्यावेळी हुबळीमध्ये सुरु असलेल्या रणजी मॅचमध्ये गुजरातची कॅप्टनसी करत होता. हुबळी ते गोवा असा आठ तासांचा गाडीने प्रवास करुन त्याने गोव्यातून दिल्लीला जाणारे विमान पकडले. त्यानंतर दिल्लीतून तो पुढे मोहालीला गेला. मोहाली टेस्टनंतर तो पुन्हा बाहेर फेकला गेला. त्यानंतर जोहान्सबर्गमध्ये 2018 साली दक्षिण आफ्रिकेला हरवणाऱ्या टीमचा तो सदस्य होता. पार्थिवच्या करियरमधली ती शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच ठरली.

पार्थिव पटेलची वन-डे कारकीर्द

वन-डे38
रन्स736
सरासरी23.74
सर्वोच्च95
100/500/4

आयपीएल टीमचा प्रवासी

सर्वाधिक आयपीएल टीमकडून खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पार्थिवचं (Parthiv Patel) स्थान वरचं आहे. तो सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जचा सदस्य होता. अनुभवी मॅथ्यू हेडनसह चेन्नईची सुरुवात करत असे. चेन्नईला अनेकदा जलद ओपनिंग त्याने करुन दिली. त्यानंतर तो डेक्कन चार्जर्स आणि कोची टस्कर्स केरला या टीमकडून खेळला.

दिनेश कार्तिकच्या करियरमधील चढ-उताराची गोष्ट!

मुंबई इंडियन्सने देखील त्याला करारबद्ध केले होते. मुंबई इंडियन्सने 2017 साली तिसरे विजेतेपद पटकावले. त्या आयपीएल चॅम्पियन टीमकडून सर्वात जास्त रन्स पार्थिवने काढले होते. या चांगल्या कामगिरीनंतरही त्याला मुंबई इंडियन्सने कायम ठेवलं नाही. तो विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे (RCB) गेला. आरसीबीसाठी 2018 आणि 19 ही वर्ष खराब गेली. पार्थिवला 2018 साली फक्त सहा मॅचमध्ये संधी मिळाली. त्यानंतर पुढच्या वर्षी तो टीमचा व्हाईस कॅप्टन होता. त्याने विराट आणि डीव्हिलियर्सनंतर सर्वात जास्त रन्स केले. या कामगिरीनंतरही 2020 साली त्या आयपीएलमध्ये एकही मॅच खेळायला मिळाली नाही. आयपीएल स्पर्धेनंतर त्याने विराटच्या कॅप्टनसीवरही प्रश्न उपस्थित केले होते. विराट कोहलीवर प्रश्न उपस्थित करणारा तो अलिकडच्या काळातील एकमेव आजी क्रिकेटपटू असावा.

पार्थिव पटेलची आयपीएल कारकीर्द

आयपीएल मॅच139
रन्स2848
सरासरी22.60
सर्वोच्च81
100/500/13

गुजरातचा गौरव

पार्थिव पटेलच्या क्रिकेट कारकीर्दीमधील बहुतेक चांगले क्षण हे तो गुजरातकडून खेळताना आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही सेंच्युरी न झळकावणाऱ्या पार्थिवने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 27 सेंच्युरी झळकावल्या.

पार्थिव पटेलची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील कारकीर्द

फर्स्ट क्लास मॅच194
रन्स11240
सरासरी43.39
सर्वोच्च206
100/5027/62

विजय हजारे ट्रॉफी 2015 च्या फायनलमध्ये त्याने सेंच्युरी झळकावत टीमला विजेतेपद मिळवून दिले होते. त्यानंतर दोन वर्षांनी बलाढ्य मुंबई विरुद्ध झालेल्या रणजी फायनलमध्ये तो कॅप्टन्स इनिंग खेळला. पहिल्या इनिंगमध्ये त्याची सेंच्युरी 10 रन्सने हुकली. चौथ्या इनिंगमध्ये गुजरातसमोर (Gujrat) विजयासाठी 312 रन्सचं टार्गेट होतं. रणजी फायनलमध्ये आजवर कोणत्याही टीमनं इतकं मोठं टार्गेट यशस्वीपणे पार केलं नव्हतं. संपूर्ण सीझन गुजरातचं नेतृत्व करणाऱ्या पार्थिवनं (Parthiv Patel) फायनलमधील शेवटच्या इनिंगमध्ये विजेतेपदाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. त्यानं 143 रन्सची खेळी करत गुजरातला ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिलं. सतराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा कोवळा पोरगा वयाच्या 31 व्या वर्षी गुजरातचा गौरव बनला होता.

युवराज सिंहसारखी कामगिरी दोनदा करणारा पुणेरी पोरगा!

लहाण चणीचा पण मोठ्या काळजाचा खेळाडू म्हणून पार्थिव सर्वांच्या लक्षात राहिल. हेडन, वॉ, कूक कुणासमोरही तो दबला नाही. त्यानं गुजरातचं सक्षम नेतृत्व करत देशांतर्गत क्रिकेटमध्ये टीमला चॅम्पियन बनवलं. इतकं सारं करुन वयाच्या 35 व्या वर्षी तो क्रिकेटच्या सर्व प्रकारातून रिटायर झाला आहे. भविष्यात कोच म्हणून खूप काही कामं कारण्याची क्षमता पार्थिवमध्ये आहे. मुंबई इंडियन्सनं तातडीनं त्याची कोचिंग स्टाफमध्ये निवड करत त्याच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: