फोटो – ट्विटर/ICC

मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) 2010 साली रिटायर झाला तेंव्हा श्रीलंकेचा स्पिन बॉलिंगचा वारसा कोण सांभाळणार? श्रीलंकेला टेस्ट क्रिकेटमध्ये जिंकण्यासाठी 20 विकेट्स मिळवण्यात कोण हातभार लावणार? हा प्रश्न पडला होता. याला कारणही तसंच होतं. 800 टेस्ट विकेट घेऊन रिटायर झालेल्या मुरलीधरनच्या देशात त्याच्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या स्पेशालिस्ट स्पिनरच्या फक्त 71 विकेट होत्या.

11 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या आणि तेंव्हा 32 वर्षांच्या असलेल्या त्या स्पिनरकडून फार कुणालाही अपेक्षा नव्हत्या. पण, त्यानंतरच्या आठ वर्षातील 70 टेस्टमध्ये 359 विकेट्स, एका इनिंगमध्ये 5 किंवा त्या पेक्षा जास्त विकेट्स घेण्याची 30 वेळा कामगिरी करणाऱ्या बॉलरचं नाव आहे रंगना हेराथ (Rangana Herath). सावलीतले झाड ते वटवृक्ष असा प्रवास करणाऱ्या हेराथचा आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (19 मार्च 1978) रोजी हेराथचा जन्म झाला.

1999 साली पदार्पण

रंगना हेराथनं (Rangana Herath) वयाच्या 21 व्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो 2018 साली रिटायर झाला. त्यावेळी त्याच्या पहिल्या टेस्टमधील सहकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री, श्रीलंकेच्या पार्लमेंटचे सदस्य, निवड समिती अध्यक्ष, श्रीलंकन बोर्डाचे उपाध्यक्ष, वेगवेगळ्या देशांचे कोच या सर्व जबादाऱ्या सांभळल्या होत्या. अर्जुना रणतुंगा,  अरविंद डिसल्वा, जयसूर्या, अट्टापट्टू, मुरलीधरन, जयवर्धने, चामिंडा वास या सारख्या श्रीलंकेच्या ‘ऑल टाईम ग्रेट’ खेळाडूंसोबत हेराथ पहिली टेस्ट खेळला. कुमार संगकाराने देखील हेराथनंतर वर्षभरानी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

संगकाराचा फोन आणि इंग्लंडहून थेट श्रीलंका

हेराथच्या काळात मुरलीधरन श्रीलंकेचा प्रमुख स्पिनर होता. तो टीममध्ये असल्याने हेराथची टीमला फार गरज भासली नाही. पण 2009 साली पाकिस्तान विरुद्धच्या टेस्टपूर्वी मुरली जखमी झाला. त्यावेळी हेराथ इंग्लंडमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत होता.

श्रीलंकेचा तेंव्हाचा कॅप्टन कुमार संगकाराने हेराथला फोन केला आणि तो थेट इंग्लंडहून श्रीलंकेत दाखल झाला. श्रीलंकेत आल्यानंतर 24 तासांच्या आत तो गॉलमध्ये टेस्ट खेळण्यासाठी उतरला. हेराथ ती टेस्ट नुसती खेळला नाही तर त्यानं ती टेस्ट श्रीलंकेला जिंकून देखील दिली. चौथ्या दिवशी त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद युसूफ आणि सलमान बटला आऊट करत त्याने श्रीलंकेला विजयचा मार्ग दाखवला.

कॅरम बॉलचा जनक ते मर्यांदा आणि अपुऱ्या व्यवस्थेचा बळी!

चौथ्या इनिंगचा राजा

भारताविरुद्ध गॉलमध्ये 2012 साली झालेली टेस्ट श्रीलकेनं पहिल्या इनिंगमध्ये 192 रनने पिछाडीवर असूनही जिंकली होती. दिनेश चंदीमलच्या 162 रनच्या खेळीमुळे ती टेस्ट अनेकांच्या लक्षात आहे. त्यासाठी चंदिमलला ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देखील मिळाला. पण त्याच टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये भारतासमोर विजयासाठी 176 रनचं टार्गेट होते.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या त्या टीमला ते टार्गेट पूर्ण करता आले नाही. भारतीय टीम 112 रनवर ऑल आऊट झाली. भारताला झटपट गुंडाळण्यात हेराथ फॅक्टर कारणीभूत होता. रंगना हेराथनं त्या मॅचमधील चौथ्या इनिंगमध्ये 48 रन देऊन 7 विकेट्स घेतल्या होत्या.

हेराथ 2010 साली श्रीलंकेचा प्रमुख स्पिनर बनल्यानंतर चौथ्या इनिंगमध्ये हुकमी कामगिरी करणे ही त्याची सवय बनली होती. चौथ्या इनिंगमध्ये सर्वात जास्त वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या स्पिनर्सच्या यादीत तो आजही नंबर वन 1 वर आहे. ही कामगिरी त्याने 12 वेळा केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेले मुरलीधरन आणि शेन वॉर्नला हे 7 वेळा जमलंय. या दोन्ही महान बॉलर्सवर चौथ्या इनिंगचा राजा असलेल्या रंगना हेराथची (Rangana Herath) मोठी आघाडी आहे.

मोठ्या स्पर्धेतील मोठा खेळाडू

श्रीलंकेनं 2007 ते 2014 या काळात पाच मोठ्या स्पर्धांची फायनल खेळली. त्यामध्ये फक्त एक 2014 च्या T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये त्यांनी विजय मिळवला. हेच वेगळ्या शब्दात सांगायचं तर हेराथ खेळला त्याच एकमेव फायनलमध्ये श्रीलंकेनं विजय मिळवला.

हेराथ 2012 च्या T20 वर्ल्ड कप मध्य फक्त 2 मॅच खेळला. पाकिस्तान विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये त्याने मोहम्मद हाफीज आणि शाहीद आफ्रिदी यांना सलग दोन बॉलवर आऊट केलं आणि मॅच फिरवली. विशेषत: 140 रनचं टार्गेट वाचवताना त्याने हा खेळ केला होता. तरीही त्याला फायनलमध्ये वगळण्यात आले. हे एक कोडेच होते. पण हेराथच्या करियरमध्ये हे पहिल्यांदा घडलं नव्हतं. अगदी वर्षभरापूर्वी 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्येही हेराथच्या जागी एका नव्या स्पिनरला श्रीलंकेनं खेळवलं होतं. विशेष म्हणजे त्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्येही हेराथनं 9 ओव्हरमध्ये फक्त 31 रन देत ब्रँडन मॅकलमची मोठी विकेट घेतली होती.

चामिंडा वास, श्रीलंकेचा सर्वात यशस्वी फास्ट बॉलर

वेस्ट इंडिजमध्ये 2013 साली झालेल्या ट्राय सीरिज सेमी फायनलमध्ये 4 विकेट्स, ऑस्ट्रेलियात 2012 साली कॉमनवेल्थ बँक सीरिजच्या फायनलमध्ये 3 विकेट्स अशी हेराथची कामगिरी आहे.

 2014 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये तर हेराथनं कमाल केली. न्यूझीलंड विरुद्ध त्याने फक्त 3 रन देऊन त्यापेक्षा जास्त म्हणजे 5 विकेट्स घेतल्या. हेराथच्या त्या स्पेलमुळे श्रीलंकेच्या वर्ल्ड कप जिंकण्याचा आशा जिवंत राहिल्या. 1996 च्या वर्ल्ड़ कप सेमी फायनलमध्ये अरविंद डिसल्वाने काढलेल्या हाफ सेंच्युरी इतकेच या इनिंग इतकेच हेराथच्या त्या स्पेलचे महत्त्व आहे. त्या वर्ल्ड कप फायनलमध्येही त्याने 4 ओव्हरमध्ये 23 रन देत रोहित शर्माची एक विकेट घेतली होती.

हेराथ नावाचा वटवृक्ष

रंगना हेराथने (Rangana Herath) 1999 साली पदार्पण केलं. त्यानंतरची तब्बल 11 वर्षे तो आत -बाहेर होता. मोठ्या स्पर्धेतील मोठ्या मॅचमध्येही त्याला अचानक वगळण्यात आलं. त्याचा त्याने खेळावर परिणाम होऊ दिला नाही. मुरलीधरनच्या रिटायरमेंटनंतर जेंव्हा त्याला संधी मिळाली त्यावेळी हेराथनं त्याचा पूर्ण उपयोग केला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेनं 2011 साली पहिल्यांदा टेस्ट जिंकली. त्या टेस्टचा हेराथ ‘मॅन ऑफ द मॅच’ होता. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या सर्व टॉपच्या टेस्ट टीमना हेराथच्या जीवावर श्रीलंकेनं हरवले आहे. त्या मॅचचा तो तर ‘मॅन ऑफ द मॅच’ होता.

इयान हिली, अर्जुन रणतुंगा पासून सुरु झालेली हेराथची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अगदी राशिद खान आणि कार्लोस ब्रेथवेट पर्यंतच्या खेळाडूंपर्यंतची आहे. 19 वर्षातील 11 वर्ष तो वटवृक्षाच्या सावलीत राहिला. त्यानंतरची आठ वर्ष टीमचा आधारवड बनला. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा तो डाव्या हाताचा स्पिनर आहे.  तो होता तेंव्हा ते जाणवले नाही. तो रिटायर झाल्यानंतर मागच्या दोन वर्षात श्रीलंकेच्या टीमला सातत्याने जे चटके बसले आहेत, त्यावरुन रंगना हेराथ (Rangana Herath) या आधारवडाची किंमत श्रीलंकेच्या खेळाडूंना जाणवत असेल.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: