
तो इम्रान खान (Imran Khan) यांच्यानंतर ICC च्या 50 ओव्हर्सच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा एकमेव पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे. कुणाचीही अपेक्षा नसताना कट्टर प्रतिस्पर्धी भारताचा फायनलमध्ये पराभव करत त्याच्या टीमनं ही कामगिरी केली. त्याच्या कॅप्टनसीमध्ये पाकिस्तानची टीम T20 क्रिकेटमध्ये नंबर 1 बनली. या उपलब्धीपेक्षा तो नेहमी मैदानाच्या बाहेरच्या कामगिरीमुळे जास्त चर्चेत असतो. सीनियर खेळाडूशी ट्विटरवर भांडण, प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूला रंगावरुन आणि आईवरून शिव्या देणे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तीन्ही फॉरमॅटमध्ये मॅच सुरु असताना जांभई देण्या विक्रम, या गोष्टींमुळे तो सर्वांच्या लक्षात आहे. हा खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा सर्फराज अहमद (Sarfaraz Ahmed). सर्फराजचा आज वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी (22 मे 1987) रोजी त्याचा जन्म झाला.
वर्ल्ड चॅम्पियन टीमचा कॅप्टन
2006 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या पाकिस्तान टीमचा सर्फराज कॅप्टन होता. भारताविरुद्ध झालेल्या त्या फायनलमध्ये पाकिस्तानची टीम 109 रनवर ऑल आऊट झाली होती. रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा या सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या क्रिकेटपटूंचा टीम इंडियात समावेश होता. तरीही टीम इंडियाला 79 रन वर ऑल आऊट करत सर्फराजच्या पाकिस्तान टीमनं विजेतेपद पटकावले होते.
सर्फराजच्या याच कामगिरीमुळे 2007 साली भारताविरुद्ध झालेल्या वन-डे सीरिजमध्ये कमरान अकमलचा कव्हर म्हणून त्याची पहिल्यांदा पाकिस्तानच्या राष्ट्रीय टीममध्ये निवड झाली होती.
आठ वर्षे आत-बाहेर
वयाच्या 20 व्या वर्षी पाकिस्तानच्या टीममध्ये संधी मिळूनही सर्फराज पुढील आठ वर्ष टीमच्या आत-बाहेर होता. तो काळ पाकिस्तानमध्ये कमरान अकमलच्या (Kamran Akmal) वर्चस्वाचा होता. तीन अकमल बंधू खेळत असल्यानं सर्फराजला सातत्याने संधी मिळाली नाही.
कमरान अकमल, पाकिस्तानी क्रिकेटचा अस्सल चेहरा!
2015 साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्येही तो पहिल्या चार मॅच बाहेर होता. मात्र सततच्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पाचव्या मॅचमध्ये त्याला संधी मिळाली. त्या मॅचमध्ये त्यानं 49 बॉलमध्ये 49 रन काढले. त्याचबरोबर विकेट किपर म्हणून 6 कॅच घेत, वन-डे रेकॉर्डची बरोबरी केली. त्यानंतर आयर्लंड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये सर्फराजनं नाबाद 101 रन काढले. पाकिस्ताननं जिंकलेल्या या दोन्ही मॅचमध्ये सर्फराज ‘मॅन ऑफ द मॅच’ होता. या दोन विजयामुळेच पाकिस्तानच्या टीमनं वर्ल्ड कप क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.
कॅप्टन म्हणून भरारी
पाकिस्तानला 2016 चा T20 वर्ल्ड कप जिंकण्यात अपयश आले. त्यानंतर सर्फराजची (Sarfaraz Ahmed) शाहिद आफ्रिदीच्या जागी T20 टीमचा कॅप्टन म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये तो वन-डे टीमचा कॅप्टन बनला. चार महिन्यांनी जून 2017 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचे रँकिंग सर्वात कमी होते. भारताविरुद्ध पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर सर्फराजच्या टीमनं कमबॅक केले. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका,यजमान इंग्लंड आणि फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटाकवले.
सर्फराजची 2019 च्या वर्ल्ड कप नंतर कॅप्टनसी गेली. त्याच्या कॅप्टनसीमध्ये पाकिस्ताननं 37 पैकी 29 T20 मॅच जिंकून नंबर 1 रँकिंग मिळवलं. 50 वन-डेमध्ये पाकिस्ताननं 28 जिंकल्या, तर 20 मध्ये त्यांचा पराभव झाला. वन-डे कॅप्टन म्हणून सर्फराजची विजयाची सरासरी 58.33 इतकी आहे.
तरीही सर्फराजवर टीका का?
सर्फराजच्या (Sarfaraz Ahmed) या कामगिरीनंतरही त्याची प्रतिमा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी मोठी झाली नाही. त्याच्यावर सतत टीका होते. त्याला ट्रोलिंग सहन करावे लागते. याचे कारण त्याच्या मैदानातील आणि मैदानाबाहेरच्या वर्तनात आहे. पाकिस्तानच्या अनेक क्रिकेटपटूंप्रमाणे सर्फराजचे वर्तन देखील नेहमीच वादग्रस्त ठरले आहे.
सर्वात तरुण कॅप्टनच्या करियरचा गेला राजकारणामुळे बळी
माजी कॅप्टनशी वाद
सर्फराज कॅप्टन झाल्यानंतर त्याचे सीनियर खेळाडूंशी नीट जमले नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानचा विकेट किपर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) य़ाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरी झळकावल्यानंतर त्याचं अभिनंदन करताना पाकिस्तानचा माजी कॅप्टन मोहम्मद हाफिजनं (Mohammad Hafeez) सर्फराजला ट्विटरवर टोमणा मारला. त्याला सर्फराजनं ट्विट करत उत्तर दिले. या वादाला हाफिजने सुरुवात केली हे खरे असले तरी त्याचे सर्फाराजशी संबंध नीट नाहीत हे सांगण्यासाठी हे ट्विट पुरेसे आहेत.
वर्णभेदी आणि आईवर शिवीगाळ
हाफिजशी झालेल्या वादात सर्फराजने पहिल्यांदा सुरुवात केली नाही. पण दक्षिण आफ्रिकेच्या फेलुकवायो (Andile Phehlukwayo) याला तो आऊट होत नाही म्हणून पाकिस्तानचा कॅप्टन असलेल्या सर्फराजने त्याला वर्णद्वेषी आणि आईवर शिवीगाळ केली होती. या प्रकरणात आयसीसीने त्याच्यावर चार मॅचच्या बंदीची कारवाई केली होती.
तीन्ही फॉरमॅटमध्ये जांभई
सर्फराज (Sarfaraz Ahmed) सोशल मीडियावर सर्वात जास्त जांभई देण्यामुळे जातो. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2019) झालेल्या हाय व्होल्टेज मॅचमध्ये कॅप्टन सर्फराज विकेट किपिंग करताना जांभई देताना कॅमेऱ्यात सापडला होता. त्या प्रकरणात त्याच्यावर पाकिस्तानातून जोरदार टीका झाली. जगभरातून त्याचे ट्रोलिंग झाले. त्यानंतरही तो सुधारला नाही. वर्षभरानंतर इंग्लंड विरुद्ध झालेल्या T20 मॅच दरम्यान तो डगआऊटमध्ये जांभई देताना (Sarfaraz yawn) कॅमेऱ्यात सापडला. त्यानंतर क्रिकेटच्या तीन्ही फॉरमॅटमध्ये मॅच सुरू जांभई देणारा खेळाडू म्हणजे सर्फराज असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला.
क्रिकेटपटू त्याच्या खेळातून अनेक रेकॉर्ड करतात. पण क्रिकेटच्या तीन्ही फॉरमॅटमध्ये मॅच सुरू असताना जांभाई देण्याचा अनोखा विक्रम सर्फराज अहमदच्या (Sarfaraz Ahmed) नावावर जमा झाला आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.