‘द वॉल’ राहुल द्रविडचा (Rahul Dravid) आज वाढदिवस. भारतीय क्रिकेटसाठी वाट्टेल ते करणारा खेळाडू म्हणजे द्रविड. आजच्याच दिवशी 48 वर्षांपूर्वी (11 जानेवारी 1973) राहुल द्रविडचा जन्म झाला. त्या निमित्ताने राहुल द्रविडच्या आयुष्यातील अद्भुत अशा 48 गोष्टींचा आढावा घेऊया.

  1. राहुल द्रविड हा कर्नाटकातील बंगळुरुचा आहे हे सर्वांनाच माहिती आहे, पण त्याचा जन्म हा मराठी कुटुंबात इंदूरमध्ये झाला. त्याची आई पुष्पा, वडिल शरद हे मराठी आहेत. त्याची बायको विजेता पेंढारकर देखील नागपूरच्या आहेत. त्याचे पूर्वज हे तामिळ होते. जे पुढे महाराष्ट्रात स्थायिक झाले.

2) राहुल द्रविडचे वडील किसान जॅम कंपनीत कामाला होते. त्यामुळे त्याचे टोपननाव ‘जॅमी’ असे पडले. पुढे द्रविडने वडिलांच्या किसान जॅम कंपनीसाठी जाहिरात देखील केली.

3) राहुल द्रविडच्या याच टोपननावारुन बंगळुरुमध्ये ‘जॅमी कप’ ही शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट स्पर्धा घेण्यात येते. त्या मॅचमधील ‘मॅन ऑफ द मॅच’ खेळाडूला ‘जॅमी ऑफ द डे’ हा पुरस्कार देण्यात येतो

4) सौरव गांगुली आणि महेंद्रसिंह धोनीप्रमाणे फुटबॉल हा त्याचा पहिला आवडता खेळ होता. तो क्रिकेटकडे वळण्यापूर्वी हॉकी टीमचा सदस्य होता.

5) राहुल द्रविडचा क्रिकेटमधील आदर्श सुनील गावस्कर आहेत. द्रविडने वयाच्या पाचव्या वर्षी 1978-79 साली गावस्कर यांना बंगळुरुत खेळताना पाहिले. त्या मॅचमध्ये दुर्दैवाने गावस्कर शून्यावर आऊट झाले होते. पुढे 1986 साली बंगळुरुत गावस्कर यांची पाकिस्तानविरुद्धची झुंजार खेळी प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य देखील द्रविडला लाभले.

6) राहुल द्रविडनं वयाच्या बाराव्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तो शालेय टीममध्ये विकेट किपरही होता. शालेय क्रिकेटमधील या कौशल्याचा त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा उपयोग झाला. कर्नाटकच्या अंडर 15, अंडर 17 आणि अंडर 19 टीमचा द्रविड सदस्य होता.

7) द्रविडने वयाच्या अठराव्या वर्षी 1991 साली पुण्यात महाराष्ट्राविरुद्ध रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पहिल्या मॅचमध्ये 80 रन्स काढले होते.

8) राहुल द्रविड कॉमर्स शाखेचा पदवीधर आहे.

( वाचा : चेतेश्वर पुजाराचा ‘भक्कम’ खेळ आहे टीम इंडियाचा आधार! )

9) इंग्लंड A विरुद्ध 1994-95 साली केलेल्या कामगिरीमुळे द्रविडची राष्ट्रीय टीममध्ये निवड झाली.

10) राहुल द्रविडची राष्ट्रीय टीममध्ये निवड झाली त्यावेळी तो MBA करत होता.

11) राहुल द्रविडने सौरव गांगुलीसोबत लॉर्ड्सवर टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. गांगुलीने पहिल्याच टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली तर द्रविडची सेंच्युरी मात्र फक्त 5 रन्सने हुकली.

12) राहुल द्रविडला लॉर्ड्सवर पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावण्यासाठी तब्बल 16 वर्ष वाट पाहावी लागली. त्याने 2011 साली लॉर्ड्सवर पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावली.

13) राहुल द्रविडने 1997 साली जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावली.

फोटो – सोशल मीडिया

14) कोलकातामध्ये 2001 साली फॉलो ऑन मिळालेला असताना राहुल द्रविडने व्हीएसएस लक्ष्मणसोबत 376 रन्सची पार्टनरशिप केली होती. या जोडीनं चौथा दिवस पूर्ण खेळला होता. त्यांच्या या अविस्मरणीय खेळीमुळेच भारताने ती मॅच जिंकली आणि सलग 16 टेस्ट जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच पराभूत झाली.

15) द्रविडने 2002 साली सलग चार टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली होती. ती कामगिरी करणारा तो पहिला भारतीय होता.

16) द्रविडने 1999 साली इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त 461 रन्स काढले होते.

17) राहुल द्रविडने 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये टीमची गरज ओळखून विकेट किपिंग केली. त्यामुळे भारताला एक अतिरिक्त बॅट्समन खेळवता आला.

( वाचा : IND vs AUS: रहाणेच्या सेंच्युरीमुळे टीम इंडिया मेलबर्न टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ‘अजिंक्य’ )

18) न्यूझीलंड विरुद्ध 2003 साली झालेल्या वन-डे मॅचमध्ये द्रविडने 22 बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी झळकावली होती. भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये झळकावण्यात आलेली ही दुसऱ्या क्रमांकाची जलद हाफ सेंच्युरी आहे.

19) राहुल द्रविडच्या डबल सेंच्युरीमुळेच भारताने 2003 साली तब्बल 22 वर्षांनी ऑस्ट्रेलियात टेस्ट मॅच जिंकली.

फोटो – सोशल मीडिया

20) राहुल द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 88 सेंच्युरी पार्टरनरशिपमध्ये सहभाग आहे. यापैकी 20 पार्टनरशिप त्याने सचिन तेंडुलकरसोबत केल्या आहेत.

21) द्रविडने टेस्ट क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळायला येऊन 10 हजारपेक्षा जास्त रन्स केले आहेत.

22) टेस्ट क्रिकेटमध्ये विकेट किपर सोडून सर्वात जास्त (210) कॅचेस घेण्याचा रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावावर आहे.

23) टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त 31258 बॉल्स खेळण्याचा रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावावर आहे.

24)  टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त 44,152 मिनिटे खेळण्याचा रेकॉर्ड राहुल द्रविडच्याच नावावर आहे.

25) डॉन ब्रॅडमन ओरिएंटेशन सत्रातमध्ये भाषण देण्याचे निमंत्रण मिळालेला राहुल द्रविड पहिला गैर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आहे.

( वाचा : वाढदिवस स्पेशल : कपिल देव @ 175*; एका इनिंगनं बदलला संपूर्ण देश! )

26) राहुल द्रविडने लाहोर टेस्टमध्ये 2004 साली 270 रन्सची खेळी केली होती. त्याच्या डबल सेंच्युरीमुळेच भारताला ती टेस्ट सीरिज जिंकता आली.

27) 270 हा राहुल द्रविडचा टेस्ट क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर आहे

28) आयसीसी पुरस्काराची सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच वर्षी म्हणजे 2004 साली ‘आयसीसी टेस्ट प्लेयर ऑफ द इयर’ आणि ‘आयसीसी प्लेयर ऑफ द इयर’ या दोन पुरस्काराचा मान द्रविडला मिळाला होता.

29) द्रविडने 2006 साली पाकिस्तान विरुद्ध वीरेंद्र सेहवागसोबत 410 रन्सची ओपनिंग पार्टरनरशिप केली होती. ही टेस्ट क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाची ओपनिंग पार्टनरशिप आहे.

30) द्रविडने वर्ल्ड कपमध्ये 61.42 च्या सरासरीने 860 रन्स काढले आहेत.

31) राहुल द्रविड खेळत असताना टेस्ट क्रिकेटचा दर्जा मिळालेल्या सर्व देशांविरुद्ध सेंच्युरी झळकावणारा तो पहिला क्रिकेटपटू होता.

32) द्रविडने 2005 साली सौरव गांगुलीकडून भारतीय टीमची कॅप्टनसी स्विकारली.

33) द्रविडने 25 टेस्टमध्ये कॅप्टनसी केली त्यापैकी 8 टेस्ट भारताने जिंकल्या. 6 टेस्टमध्ये पराभव झाला, तर उर्वरित 11 टेस्ट ड्रॉ झाल्या.

34)  द्रविडच्या कॅप्टनसीखाली भारताने बांग्लादेश, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली.

35) भारताने 1986 नंतर 21 वर्षांनी 2007 साली इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली होती.

36) द्रविडने 79 वन-डेमध्ये टीम इंडियाची कॅप्टनसी केली. त्यापैकी 42 वन-डे मध्ये टीमला विजय मिळाला.

37) द्रविडच्या कॅप्टनसीखाली 2007 च्या वर्ल्ड़ कपमध्ये भारताचे आव्हान धक्कादायकपणे साखळी फेरीतच संपुष्टात आले.

38) 2007 साली झालेल्या पहिल्या T20 वर्ल्ड कपमध्ये तरुणांना संधी मिळावी म्हणून राहुल द्रविडने सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरसह T20 टीममध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.

39) द्रविडने 2011 साली ओपनिंगला येऊन इनिंगच्या शेवटापर्यंत नाबाद राहण्याचा ‘कॅरी द बॅट’चा विक्रम केला होता.

40) द्रविडने 2011 साली त्याच्या शेवटच्या इंग्लंड दौऱ्यात 4 टेस्टमध्ये 76.83 च्या सरासरीने 461 रन्स केले. त्यामध्ये तीन सेंच्युरींचा समावेश आहे.

41) द्रविडने शेवटच्या इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाच्या एकूण धावसंख्येच्या 26 टक्के रन्स केले होते.

42) टेस्ट क्रिकेटमधील जबरदस्त फॉर्ममुळेच द्रविडचा वन-डे टीममध्ये दोन वर्षांनी तर T-20 टीममध्ये पहिल्यांदाच समावेश करण्यात आला.

43) एकच मॅच खेळून आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला राहुल द्रविड हा एकमेव खेळाडू आहे.  

44) राहुल द्रविडने निवृत्तीनंतर U19 टीमचा मार्गदर्शक म्हणून, मुख्य कोच म्हणून सातत्याने काम केले असून अनेक तरुण खेळाडूंना त्याने घडवले आहे.

45) राहुल द्रविड सध्या बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे.

( वाचा : राहुल द्रविडच्या शिकवणीत घडत असलेला ‘हा’ खेळाडू पुढच्या वर्षी करणार धमाका! )

46) राहुल द्रविडला 1998 साली अर्जुन, 2004 साली पद्मश्री तर 2013 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

47) राहुल द्रविडने बंगळुरु विद्यापीठाचा मानद पीएचडीचा प्रस्ताव नाकारला होता. क्रिकेटमधील संशोधन निबंध सादर केल्यानंतरच आपला पीएचडीसाठी विचार व्हावा अशी नम्र विनंती द्रविडने केली होती.

48) राहुल द्रविडला दोन मुलं असून त्यांची नावं समीत आणि अन्वय आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: