
दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन आणि भरवशाचा बॅट्समन हाशिम अमलाचा (Hashim Amla) आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (31 मार्च 1983) रोजी अमलाचा जन्म झाला. अमला दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय वंशाचा खेळाडू आहे. त्याचबरोबर टेस्ट क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी झळकावणाराही तो पहिला दक्षिण आफ्रिकन आहे.
टीमचा आधारस्तंभ
टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर तीन ही अत्यंत महत्वाची जागा मानली जाते. आक्रमक हर्षल गिब्ज (Herschelle Gibbs) आणि झुंजार ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) यांच्यानंतर भक्कम क्रिकेट तंत्र असलेला अमला तीन नंबरला येत असे. दक्षिण आफ्रिकेला सलग आठ वर्ष परदेशातील टेस्ट सीरिजमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम करण्यात अमलाचा मोठा वाटा आहे. अमला दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी तीन नंबरचा बॅट्समन होता. टेस्ट क्रिकेटमध्ये तीन नंबरवर सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या बॅट्समन्सच्या यादीत अमलाचा चौथा क्रमांक आहे. कुमार संगकारा, राहुल द्रविड आणि रिकी पॉन्टिंग यांनीच फक्त तीन नंबरवर अमलापेक्षा जास्त रन्स बनवले आहेत.
भारतीय वंशाच्या अमलाचा खेळ भारताविरुद्ध विशेष बहरत असे. 2010 च्या दौऱ्यातील दोन टेस्टमध्ये अमलाने 253*, 114 आणि 123* असे एकूण 490 रन्स बनवले. त्या सीरिजमध्ये तो फक्त एकदाच आऊट झाला. त्यामुळे त्याची सरासरी 490 इतकी होती. एका टेस्ट सीरिजमध्ये 400 पेक्षा जास्त सरासरीने रन्स करणारा तो 1933 नंतरचा पहिलाच बॅट्समन होता. भारतामध्ये 60 पेक्षा जास्त सरारीने 800 पेक्षा जास्त टेस्ट रन्स करणाऱ्या पाच गैर आशियाई बॅट्समनमध्ये अमलाचा समावेश आहे.
( वाचा : वाढदिवस स्पेशल, ग्रॅमी स्मिथ ‘कॅप्टन्स नॉक’ चा राजा )
इंग्लंड विरुद्ध 2012 च्या ओव्हल टेस्टमध्ये अमलाने नाबाद 311 रन्स काढले. टेस्टमध्ये ट्रिपल सेंच्युरी झळकावणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकन खेळाडू आहे. 2010 ते 2014 या काळात अमलाची टेस्ट क्रिकेटमधील सरासरी 65.62 होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये 196 रन्स असो वा वेस्ट इंडिजविरुद्ध डबल सेंच्युरी अमलाची बॅट सर्वच देशांविरुद्ध चालली. टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांविरुद्ध (बांगलादेश, आयर्लंडचा अपवाद) सेंच्युरी करणारा अमला हा चौथा बॅट्समन आहे.
अमलाची टेस्ट काराकीर्द
टेस्ट | 124 |
रन्स | 9282 |
सर्वोच्च | 311* |
सरासरी | 46.64 |
100/50 | 28/41 |
वन-डे क्रिकेटमध्येही यशस्वी
हशिम अमलाच्या ( (Hashim Amla) खेळामुळे त्याच्यावर सुरुवातीला टेस्ट खेळाडू असा शिक्का बसला होता. टेस्ट क्रिकेटमधील सातत्यामुळे अखेर त्याला वन-डे टीममध्ये संधी मिळाली. टेस्टमध्ये नंबर 3 वर येणाऱ्या अमलाला वन-डे मध्ये ओपनिंगला संधी मिळाली. त्यावेळी चांगलं तंत्र असलेल्या खेळाडूला क्रिकेटच्या फॉरमॅटचे बंधन नसते हे अमलाने सिद्ध केले.
अमलाने वन-डे मध्ये ओपनर म्हणून 27 सेंच्युरी झळकावल्या. वन-डेत सर्वाधिक सेंच्युरी झळकवणाऱ्या ओपनर्सच्या यादीमध्ये तो सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. वन-डे क्रिकेटमध्ये दोन हजार ते सात हजार पर्यंत प्रत्येक हजाराचा टप्पा जलद गाठण्याचा अमलाचा विक्रम होता. 2010 ते 2017 या कालावधीत विराट कोहलीपेक्षा जास्त सरासरीने अमलाने वन-डेमध्ये रन्स केले आहेत.
( वाचा : Bowling Machine Rashid Khan : 21 व्या शतकात केला मोठा रेकॉर्ड! )
अमलाची वन-डे काराकीर्द
वन-डे | 181 |
रन्स | 8113 |
सर्वोच्च | 159 |
सरासरी | 49.46 |
100/50 | 27/39 |
T20 क्रिकेटमध्ये देखील अमलाने स्वत:ला सिद्ध केले. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून 44 मॅचमध्ये 132.05 च्या स्ट्राईक रेटने रन्स केले. यामध्ये आठ हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. त्याने 2016 साली कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये ड्वेन ब्राव्होसोबत पाचव्या विकेटसाठी 150 रन्सची पार्टरनरशिप केली, जो एक रेकॉर्ड आहे. अमला आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळला. त्यामध्ये देखील त्याने दोन सेंच्युरी झळकावत किंग्ज इलेव्हनच्या अस्थिर बॅटिंगचा गाडा ओढण्याचा प्रयत्न केला होता.
टीप – * ही खूण नाबाद असल्याचे दर्शविते
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.