
तो रिटायर झाला तेव्हा 400 पेक्षा जास्त टेस्ट विकेट्स घेणारा आफ्रिकेचा एकमेव बॉलर होता. ऑल राऊंडर निर्माण करण्याची परंपरा असलेल्या देशाच्या टीमकडून तो खेळला. त्यामुळे त्याच्या बॅटींगमधील योगदानाकडे नेहमीच दुर्लक्ष झाले. दक्षिण आफ्रिका सोडून अन्य कोणत्याही देशात तो खेळला असता तर तो महान ऑल राऊंडर म्हणून गणला गेला असता. दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन आणि ऑल टाईम ग्रेट खेळाडू शॉन पोलॉकचा आज वाढदिवस (Shaun Pollock Birthday) आहे. आजच्याच दिवशी (16 जुलै 1973) पोलॉकचा जन्म झाला.
पहिल्या क्रिकेट फॅमिलीचा मेंबर
त्याचे वडील चांगले बॉलर होते. तर काका एक दिग्गज बॅट्समन. त्याने वडिलांकडून बॉलिंग आणि काकांकडून बॅटींग शिकली आणि तो देशाचा टॉप ऑल राऊंडर झाला. त्याचे काका आणि वडिल नाही तर आजोबा आणि चुलत भावांडांनीही स्पर्धात्मक क्रिकेट खेळले आहे. तो दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या क्रिकेट फॅमिलीतील खेळाडू आहे.
पोलॉकच्या रक्ताच क्रिकेट होते. त्यामुळे त्याची पावलं आपोआप क्रिकेटच्या मैदानाकडं वळली आणि स्थिरावली. वयाच्या 22 व्या वर्षी इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी त्याची टीममध्ये निवड झाली. त्यावेळी त्याचे काका ग्रॅहम पोलॉक (Graeme Pollock) निवड समितीचे प्रमुख होते. पण त्यावेळी पोलॉकचा फॉर्म असा होता की त्याच्या काकांवर कुणीही घराणेशाहीचा आरोप केला नाही.
4 बॉलमध्ये 4 विकेट्स
शॉन पोलॉकनं 1995 साली इंग्लंड विरुद्ध सेंच्युरीनवर झालेल्या टेस्टमध्ये पदार्पण केले. पावसामुळे ती टेस्ट दीडच दिवस झाली. या टेस्टच्या पहिल्याच दिवशी पोलॉकने इंग्लंचा कॅप्टन माईक अथरटन, ग्रॅहम थोर्पे आणि त्या टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावणारा ग्रॅहम हिक या तिघांना आऊट केले. त्याच सीरिजमधील पाचव्या टेस्टमध्ये पोलॉकनं पहिल्यांदा एका इनिंगमध्ये पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
वाढदिवस स्पेशल : दक्षिण आफ्रिकेचा मिस्टर डिपेंडेबल
पोलॉकचं वन-डे पदार्पण हे आणखी जोरात झाले. 8 व्या क्रमांकावर बॅटींगला येत नाबाद 66 रन काढले. त्यानंतर इंग्लंडच्या 4 बॅट्समनना आऊट करत आफ्रिकेच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. या सीरिजनंतर पोलॉक दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याची टीममधील जागा गेली. त्यानंतर 1996 साली तो कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला.
श्रीलंकेच्या लसिथ मलिंगानं (Lasith Malinga) 4 बॉलवर 4 विकेट्स घेण्याच्या एक दशक आधी पोलॉकनं (Shaun Pollock Birthday) ती कामगिरी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये केली आहे. त्याने इंग्लिंश कौंटी स्पर्धेतील पहिल्याच मॅचमध्ये ही कामगिरी केली. त्यानंतर पुढे 2007 साली मलिंगानं ही कामगिरी केली. त्यावेळी त्याने पोलॉकलाही आऊट केले होते.
बेस्ट कामगिरी आणि कॅप्टनसीची जबाबदारी
शॉन पोलॉकनं 1996 साली दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1998 साली बॅटींगला साथ देणाऱ्या अॅडलेडच्या पिचवर पोलॉकनं एका इनिंगमध्ये 41 ओव्हर्स बॉलिंग केली. त्या 41 ओव्हर्समध्ये 87 रन देत पोलॉकनं 7 विकेट्स घेतल्या. ही पोलॉकची टेस्टमधील एका इनिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी आहे.
2000 साली दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेट मॅच फिक्सिंगनं (Match Fixing) हादरलं. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन हॅन्सी क्रोनिए (Hansie Cronje) याचा फिक्सिंगमधील सहभाग सिद्झ झाला. क्रोनिएच्या हकालपट्टीनंतर पोलॉकची (Shaun Pollock Birthday) कॅप्टन म्हणून निवड झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर पाच वर्षांमध्येच तो दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन बनला.
पोलॉकच्या बॉलिंगचा वेग हा अन्य आफ्रिकन बॉलर्सपेक्षा कमी म्हणजे 130 किमी इतका होता. पण पोलॉक हा डोक्याने बॉलिंग करण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याच्याकडे बॉलला बाऊन्स करण्याची, स्वींग करण्याची आणि मुख्य म्हणजे बॅट्समन आणि परिस्थिती पाहून बॉलिंग करण्याची कला होती. त्यामुळेच सुरुवातीच्या काळात अॅलन डोनाल्ड (Allan Donald) बरोबरची त्याची जोडी गाजली. नंतरच्या काळात डेल स्टेन आणि मखाय एनटीनी या फास्ट बॉलिंग त्रिकूटाचा सदस्य होता.
चुकलेलं गणित आणि देशाची निराशा
क्रिकेट वर्ल्ड कप 2003 (Cricket World Cup 2003) स्पर्धेचा दक्षिण आफ्रिका प्रमुख आयोजक होता. पोलॉकच्या नेतृत्त्वाखाली आफ्रिका चोकर्सचा शिक्का पुसेल आणि मायदेशात वर्ल्ड कप स्पर्धा जिंकेल अशी सर्व देशाची अपेक्षा होती. त्या वर्ल्ड कपमध्ये आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. त्यानंतर काही विजय मिळवत गाडी रूळावर आली. मात्र आफ्रिकेला सुपर सिक्समध्ये प्रवेश करण्यासाठी साखळी फेरीतील शेवटची श्रीलंकेविरुद्धची मॅच जिंकणे आवश्यक होते.
दरबनमध्ये झालेल्या त्या लढतीत श्रीलंकेनं पहिल्यांदा बॅटींग करताना मार्वन अट्टापट्टूच्या सेंच्युरीच्या जोरावर 9 आऊट 268 रन केले. आफ्रिकेची बॅटींग सुरु झाली तेव्हा आकाशात काळे ढग जमा झाले होते. त्यामुळे आफ्रिकेला पाठलाग करताना डकवर्थ लुईस मेथडकडेही लक्ष देणे भाग होते. स्मिथ-गिब्ज जोडीनं चांगली सुरूवात केल्यानंतरही आफ्रिकेची अवस्था 5 आऊट 149 अशी झाली होती.
त्यावेळी कॅप्टन शॉन पोलॉक आणि विकेट किपर मार्क बाऊचर (Mark Boucher) यांची जोडी जमली. या जोडीनं 6 व्या विकेटसाठी 63 रनची पार्टनरशिप केली. पोलॉक 25 रन काढून रन आऊट झाला.
दक्षिण आफ्रिकेला 32 बॉलमध्ये 46 रनची आवश्यकता असताना बाऊचरने सिक्स मारला. त्यावेळी डकवर्थ लुईस मेथडनं पुढे गेल्याचं समजून बाऊचरनं मैदानात जल्लोष केला. त्यानंतर पुढच्या बॉलवर आफ्रिकेनं रन काढण्याचे टाळले. त्यानंतर लगेच पावसाला सुरुवात झाली आणि खेळ थांबला. खेळ थांबला त्यावेळी डकवर्थ – लुईस पद्धतीनं दोन्ही टीम बरोबरीत होत्या. दक्षिण आफ्रिकेचे रनरेट मोजण्याचे गणित चुकले. बाऊचरला ड्रेसिंग रुममधून चुकीचा निरोप मिळाला. त्यामुळे त्याने शेवटच्या बॉलवर रन काढण्याचा प्रयत्न केला नाही. दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कपमधून आऊट झाली. या चुकलेल्या गणिताचं खापर पोलॉकवर (Shaun Pollock Birthday) फोडण्यात आले. त्याची कॅप्टन पदावरुन हकालपट्टी झाली. ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) आफ्रिकेचा कॅप्टन बनला.
कॅप्टनसीनंतरचा पोलॉक
शॉन पॉलॉक कॅप्टनसीनंतरही आफ्रिकेच्या टीमचा महत्त्वाचा सदस्य होता. 2005 साली सौरव गांगुलीला वगळल्यानं संतप्त प्रेक्षकांनी गाजवलेल्या कोलकाता टेस्टमध्ये त्याने टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला झटपट आऊट केले होते. त्यानंतर बंगळुरुमध्ये 2007 साली आफ्रो-आशिया कप स्पर्धेतील वन-डेमध्ये त्याने सातव्या क्रमांकावर बॅटींगला येत 130 रनची खेळी केली. तो वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील सातव्या क्रमांकावरील बॅट्समनचा सर्वोच्च स्कोअर होता. पण पोलॉकचा हा रेकॉर्ड फक्त 4 दिवसच टिकला. महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) चेन्नईमध्ये 139 रनची खेळी करत पोलॉकचा रेकॉर्ड मोडला.
भारताविरुद्ध 2006 साली झालेल्या वन-डे आणि टेस्ट या दोन्ही सीरिजमध्ये तो मालिकावीर होता. त्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या वन-डे सीरिजमध्येही सर्वात जास्त विकेट्स घेत ‘मॅन ऑफ द सीरिज’ चा पुरस्कार पटकावला. 2007 साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये पोलॉक फार प्रभावी ठरला नाही. पण, इंग्लंड विरुद्धच्या निर्णयाक लढतीमध्ये पोलॉकच्या स्पेलमुळेच आफ्रिकेनं सेमी फायनल गाठली.
गॅरी कस्टर्न आणि जॅक कॅलीस यांच्यानंतर 100 टेस्ट खेळणारा शॉन पोलॉक (Shaun Pollock Birthday) हा तिसरा दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू आहे. 108 टेस्टमध्ये 421 आणि 303 वन-डे मध्ये 313 विकेट्स. टेस्टमध्ये 2 सेंच्युरी आणि 16 हाफ सेंच्युरीसह 3781 रन. तर वन-डेमध्ये 1 सेंच्युरी आणि 14 हाफ सेंच्युरीसह 3519 रन अशी कामगिरी करुन पोलॉक 2008 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला.
Explained: क्रिकेटचा नवा प्रकार The Hundred चे नियम आणि काय आहे IPL पेक्षा वेगळेपण?
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन
आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये (IPL 2008) शॉन पोलॉकला मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) करारबद्ध केले. दुखापतीमुळे सचिन तेंडुलकर आणि श्रीशांतची झालेल्या वादानंतर हरभजन सिंग यांच्या अनुपस्थितीमध्ये पोलॉकने मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व केले. कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) 67 रनमध्ये ऑल आऊट करण्यात पोल़ॉकच्या बॉलिंगचे योगदान होते. त्यानंतर पोलॉक (Shaun Pollock Birthday) काही वर्ष मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफचाही सदस्य होता.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.