फोटो – ट्विटर

T20 वर्ल्ड कप सुरू (T20 World Cup 2021) होण्यापूर्वी विजेतेपद पटकावlतील अशा टॉप 5 संभाव्य देशांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे नाव नव्हते. ऑस्ट्रेलियन टीम सलग 5 देशांकडून T20 स्पर्धा हरली होती. त्यांचे प्रमुख खेळाडू गेली वर्षभर क्रिकेटपासून दूर होते. तरीही ऑस्ट्रेलियन टीमला एकत्र करत त्यांच्याकडून सर्वोच्च स्पर्धेत सर्वोत्तम खेळ करून घेणारा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंचचा (Aaron Finch) आज वाढदिवस (Aaron Finch Birthday) आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक प्रतीक्षा T20 वर्ल्ड कप विजेतेपदाची केली आहे. ही प्रतीक्षा संपवत T20 वर्ल्ड कप उंचावणारा पहिल्या ऑस्ट्रेलियन कॅप्टनचा आजच्याच दिवशी (17 नोव्हेंबर 1986) रोजी जन्म झाला.

सुरूवातीचा काळ

आरोन फिंचनं विकेट किपर-बॅटर म्हणून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. त्यानंतच्या काळात त्यानं विकेट किपिंग सोडून फक्त बॅटींगवर लक्ष केंद्रीत केलं. 2006 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील (Under 19 World Cup 2006) ऑस्ट्रेलियन टीमचा तो सदस्य होता. त्याचा भविष्यातील ओपनिंग पार्टनर डेव्हिड वॉर्नर (David Warner) या टीमचा सदस्य होता. त्याचबरोबर या टीममधील उस्मान ख्वाजा आणि मोईसेस हेन्रिकेस यांनीही ऑस्ट्रेलियन टीमकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे.

फिंचनं 2007 साली व्हिक्टोरिया टीमकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. तो सुरूवातीच्या काळात मिडल ऑर्डरमध्ये खेळत असे. टीमला गरज असेल तर फ्लोटर म्हणून ओपनिंगलाही त्यानं खेळ केला आहे. 2009 साली ऑस्ट्रेलियन सिझन गाजवल्यानंतर 2010 साली त्याला राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) टीमनं करारबद्ध केलं. त्या आयपीएलमध्ये (IPL 2010) फिंचला राजस्थानकडून एकच मॅच खेळायला मिळाली. त्यावर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेत फिंचनं चांगली कामगिरी केली. त्यामुळे 2011 साली इंग्लंड विरुद्धच्या T20 सीरिजसाठी त्याची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड (Aaron Finch Birthday)  झाली.

आक्रमक, वादग्रस्त आणि टीमसाठी सर्वस्व ओतणारा बेस्ट कॅप्टन

दमदार कामगिरीनंतर वर्षभर प्रतीक्षा

फिंचनं 2011 साली इंग्लंड विरुद्ध T20 इंटरनॅशनलमध्ये पदार्पण केले. त्यानं दुसऱ्याच मॅचमध्ये 35 बॉलनमध्ये नाबाद 53 रनची इनिंग केली. या दमदार कामगिरीनंतरही त्याला ऑस्ट्रेलियन टीममधून वगळण्यात आले. फिंचला पुढील T20 इंटरनॅशनल खेळण्यासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागली. त्याला 2012 साली भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये संधी मिळाली.

फिंचनं त्याच्या कारकिर्दीमधील 7 व्या T20 इंटरनॅशनलमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला. इंग्लंडमध्ये साऊथम्पटनमध्ये इंग्लंड विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये त्यानं 63 बॉलमध्ये 156 रन काढले. तो T20 इंटरनॅशनलमधील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर होता. या इनिंगमध्ये फिंचनं 11 फोर आणि 14 सिक्सचा वर्षावर केला.

रेकॉर्डब्रेकर फिंच

आरोन फिंचची बॅट T20 क्रिकेटमध्ये नेहमीच बहरली आहे. तो जगभरातील T20 लीगमध्ये सर्वाधिक मागणी असणारा प्लेअर आहे. 2013 साली त्यानं 156 रनचा वैयक्तिक रेकॉर्ड केला होता. 2018 साली त्यानं हा रेकॉर्ड मोडला. झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये 76 बॉलमध्ये 16 फोर आणि 10 सिक्सच्या मदतीनं 172 रन काढले. एका T20 इंटरनॅशनल इनिंगमध्ये सर्वाधिक फोर (16) लगावण्याचा रेकॉर्डही फिंचच्या (Aaron Finch Birthday) नावावर आहे.

ऑस्ट्रेलियाकडून T20 इंटरनॅशनलमध्ये सर्वात जास्त रन करणारा बॅटर देखील फिंच आहे. त्यानं आजवर 83 मॅचमध्ये 35.72 च्या सरासरीनं आणि 148.01 च्या स्ट्राईक रेटनं 2608 रन काढले आहेत. यामध्ये 2 सेंच्युरी आणि 15 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये 1000 रनचा टप्पा ओलांडणारा फिंच हा पहिला बॅटर आहे.

अवघड कालखंडात कॅप्टन

आरोन फिंचला जॉर्ज बेलीनंतर सुरूवातीच्या काळात ऑस्ट्रेलियाच्या T20 टीमचा कॅप्टन करण्यात आलं होतं. 2016 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपपूर्वी तो T20 रँकिंगमधील नंबर 1 बॅटर होता. पण वर्ल्ड कपपूर्वी सर्व टीमची कॅप्टनसी एकाच खेळाडूकडे देण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन निवड समितीनं घेतला. त्यामुळे फिंचच्या जागी स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) कॅप्टन करण्यात आले. इतकंच नाही तर वर्ल्ड नंबर 1 बॅटरला ऑस्ट्रेलियन टीमनं वर्ल्ड कपमधील पहिल्या दोन मॅचमध्ये खेळवलंच नाही. फिंच नंतरच्या मॅच खेळला. पण, ऑस्ट्रेलियन टीमला त्या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले.

ऑस्ट्रेलियाला 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2015) फिंचनंच इंग्लंडविरुद्ध सेंच्युरी झळकावत दमदार सुरूवात करून दिली होती. त्यानंतर पुढे ऑस्ट्रेलियानं तो वर्ल्ड कप जिंकला. 2018 साली बॉल टेम्परिंग प्रकारामुळे (2018 Australian Ball Tampering Scandal) ऑस्ट्रेलियन क्रिकेट हादरले. स्मिथ आणि वॉर्नरवर बंदी आली. या कठीण काळात त्याला वन-डे आणि T20 टीमचा कॅप्टन करण्यात आले. स्मिथ, वॉर्नर परतल्यानंतरही फिंचकडं या प्रकारातील टीमची कॅप्टनसी (Aaron Finch Birthday) आहे. फिंचच्या कॅप्टनसीमध्ये ऑस्ट्रेलियानं इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेळला आणि सेमी फायनलमध्ये धडक मारली. वॉर्नरवरील बंदीच्या काळात 2018 साली फिंच टेस्ट क्रिकेटही खेळला. त्याला ओपनिंग बॅटर म्हणून खेळवण्याचा प्रयोग फक्त 5 टेस्ट टिकला.

एकमेव फिंच

ऑस्ट्रेलियन टीममध्ये स्थिरावण्यापूर्वीच फिंच आयपीएल स्पर्धेत खेळला होता. तो एकाही आयपीएल टीममध्ये स्थिरावला नाही. राजस्थान रॉयल्स, दिल्ली डेअर डेव्हिल्स, पुणे वॉरियर्स, मुंबई इंडियन्स, गुजरात लॉयन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स हैदराबाद या 7 टीमकडून फिंच आयपीएल स्पर्धेत खेळला आहे. यापैकी एकाही टीममध्ये तो स्थिरावला नाही. भारतीय उपखंडामध्ये त्याला नेहमीच रन करण्यास संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळेच तो आयपीएलमध्येही फार यशस्वी झाली नाही आणि एकाही टीममध्ये आजवर स्थिरावला नाही.

T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाचा वनवास संपला, न्यूझीलंडला हरवत बनले वर्ल्ड चॅम्पियन

फिंच या T20 वर्ल्ड कपमध्ये बॅटर म्हणून अपयशी ठरला, पण त्यानं कॅप्टन म्हणून इतिहास घडवत ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. आता पुढच्या वर्षी घरच्या मैदानात जिथं फिंचचा बॅटर म्हणून चांगला रेकॉर्ड आहे, तिथं हा वर्ल्ड कप राखण्याचं आव्हान फिंचसमोर (Aaron Finch Birthday) असेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

        

error: