
एखाद्या क्रिकेटपटूच्या करियरमध्ये तो कोणत्या देशात आणि कोणत्या काळात जन्मला याचं मोठं महत्त्व असत. या दोन गोष्टी अनुकूल असतील तर त्याच्या क्रिकेट करियरला पोषक परिस्थिती असते. काहींना यामुळे एकदम लवकर संधी मिळते. काहींना ती शेवटपर्यंत मिळत नाही. झिम्बाब्वेचा (Zimbabwe) तातेंदा तैबू (Tatenda Taibu) यापैकीच एक दुर्दैवी आहे. ज्याच्या क्रिकेट करियरचा बळी देशातील परिस्थितीमुळे गेला. तैबूचा आज वाढदिवस आहे. आजच्या दिवशी (14 मे 1983) रोजी तैबूचा जन्म झाला.
फर्स्ट क्लासच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट
झिम्बाब्वेचे माजी अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे (Robert Mugabe) यांच्या क्रिकेटमधील हस्तक्षेपामुळे तैबूला वयाच्या 17 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ढकलण्यात आले. एकही फर्स्ट क्लास मॅच न खेळता तैबू थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. तैबू एक सेफ विकेटकिपर आणि पारंपारिक फटकेबाजी करु शकणारा बॅट्समन होता. त्यानं प्रामुख्यानं वन-डे क्रिकेट गाजवलं.
तैबूला त्याच्या करियरमध्ये स्थिर होण्याची संधी फार कमी मिळाली. त्यानं वयाच्या 17 व्या वर्षी वेस्ट इंडिज विरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्या मॅचमध्ये तो दहाव्या क्रमांकावर आला होता. महिनाभरानंतर त्याच टीमविरुद्ध त्यानं टेस्टमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी त्यानं तिसऱ्या क्रमांकावर बॅटींग केली. झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये मुगाबेंची हुकूमशाही सुरु झाल्यानं तो 2004 साली वयाच्या 20 वर्षी कॅप्टन झाला. तैबू त्या काळातील सर्वात तरुण वयात टेस्ट टीमचा कॅप्टन बनला. तैबूचा रेकॉर्ड 2019 साली राशिद खान (Rashid Khan) यानं मोडला.
फिनिशर शब्दाची क्रिकेटला ओळख करुन देणारा मायकल बेव्हन
प्रतिकूल परिस्थितीमध्ये खेळ
तैबूनं 150 वन-डेमध्ये 3393 रन केले. यामध्ये दोन सेंच्युरींचा समावेश आहे. या दोन्ही सेंच्युरी त्यानं दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध झळकाल्या. दोन्ही मॅचमध्ये झिम्बाबेचा पराभव झाला. पण तैबूनं अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये फॅन्सना विजयाच्या आशा दाखवल्या होत्या.
2007 साली हरारेमध्ये 324 रनचा पाठलाग करताना तैबूनं 107 रन केले. त्याच्या झुंजार शतकानंतरही झिम्बाब्वेला विजयासाठी 28 रन कमी पडले. त्यानंतर दोन वर्षांनी बेनोईमध्ये 296 रनचा पाठलाग करताना तैबूनं एकाही झूंज देत 103 रन केले.
आता बोला! भारताबाहेरची टेस्टही दोन दिवसांमध्ये संपली, 132 वर्षांनंतर झाला रेकॉर्ड
करियरमधील हाय पॉईंट
बांगलादेश विरुद्ध ढाकामध्ये 2005 साली झालेली टेस्ट मॅच ही तैबूच्या (Tatenda Taibu) करियरचा हाय पॉईंट ठरली. तैबूनं पहिल्या इनिंगमध्ये जवळपास पाच तास संयमी बॅटींग करत 85 रन केले. झिम्बाब्वेला त्या इनिंगमध्ये 87 रनची लीड मिळाली.
झिम्बाब्वेच्या दुसऱ्या इनिंगला मशरफे मोर्तझा (Mashrafe Mortaza) यानं हादरे दिले. त्याच्या बॉलिंगपुढं झिम्बाब्वेची अवस्था 4 आऊट 37 झाली होती. त्या परिस्थितीत तैबूनं 153 रनची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे ढाका टेस्ट अखेर ड्रॉ झाली.
करियरला राजकीय ब्रेक
झिम्बाब्वेचा 2005 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा पराभव झाला. त्या सीरिजमधील बहुतेक मॅच एकतर्फी झाल्या होत्या. झिम्बाब्वेच्या खराब खेळावर क्रिकेट विश्वातून मोठी टीका झाली. त्यावेळी तैबू आणि काही क्रिकेटपटूंनी देशातील क्रिकेटच्या खराब अवस्थेवर आवाज उठवला.
हा आवाज उठवल्याची शिक्षा म्हणून त्याला आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. त्यामुळे त्यानं 2005 साली वयाच्या 22 व्या वर्षी कॅप्टनसी आणि आंतररष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ‘या निर्णयाचं 80 टक्के कारण हे झिम्बाब्वे क्रिकेटमधील सध्याची परिस्थिती आणि 20 टक्के कारण माझ्या वार्षिक करारातील तरतूदी आहेत,’ असं तैबूनं सांगितलं होतं.
एका पराभवानंतर लाथाळ्या उघड, माजी कॅप्टननं केली आंतरराष्ट्रीय कोचची मागणी
क्रिकेटमध्ये पुनरागमन
तैबूनं त्यानंतरची दोन वर्ष दक्षिण आफ्रिकेकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळते का याची चाचपणी केली. तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. 2007 साली तो पुन्हा झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय टीममध्ये परतला. त्यानंतर 2008 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून आयपीएल खेळण्यास त्यानं प्राधान्य दिलं. त्यामुळे त्याच्यावर झिम्बाब्वेत मोठी टीका झाली. त्यानंतर वर्षभरानी झिम्बाब्वे बोर्डाच्या अधिकाऱ्याशी जाहीर वाद घातल्याबद्दल तैबूवर 10 आंतरराष्ट्रीय मॅचची बंदी घालण्यात आली.
झिम्बाब्वेनं 2011 साली सहा वर्षांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. यावेळी तैबूनं (Tatenda Taibu) पुन्हा एकदा देशातील खराब क्रिकेट व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला. याच वादातून त्यानं 2012 साली म्हणजे वयाच्या 29 व्या वर्षी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर उर्वरित आयुष्य आपण चर्चच्या सेवेत घालवणार असल्याचं तैबूनं जाहीर केलं. पण काही वर्षांपूर्वी तो पुन्हा एकदा झिम्बावे क्रिकेटमध्ये प्रशासक म्हणून परतला आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.