फोटो – ट्विटर, आयसीसी

टीम इंडियाचे माजी कोच जॉन राईट (John Wright) यांनी त्याला पहिल्यांदा नेटमध्ये पाहिले तेव्हा तो त्यांना आघाडीचा बॅटर वाटला होता. त्याचं कारण म्हणजे त्याच्या खेळातील टायमिंग हे प्रमुख बॅटरसारखं होतं. तो टीम इंडियात आला तेव्हा कपिल देवचा (Kapil Dev) वारसदार म्हणून पाहिलं गेलं. T20 क्रिकेटच्या सध्याच्या काळात तो असता तर टीम इंडियाची खूप मोठी अडचण त्यानं सोडवली असती. आयपीएल फ्रँचायझींनी त्याच्यासाठी तिजोरी रिकामी केली असती. अफाट गुणवत्ता, टोकाचं यश आणि तितकंच अपयश अनुभवणाऱ्या अजित आगरकरचा आज वाढदिवस (Ajit Agarkar Birthday) आहे. आजच्या दिवशी (4 डिसेंबर 1977) रोजी त्याचा जन्म झाला.

सचिनमुळे मिळाली पहिली संधी

सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) घडवणारे गुरू रमांकात आचरेकर यांचाच अजित आगरकर हा विद्यार्थी. मुंबईतील तेव्हाच्या ट्रेंड प्रमाणे त्यालाही बॅटर व्हायचं होतं. पण, मुंबईच्या मिडल ऑर्डरमध्ये जागा मिळवायची असेल तर स्पर्धा मोठी आहे, हे त्यानं ओळखलं आणि बॉलिंगवर फोकस करण्यास सुरुवात केले.

टीम इंडियाची 17 वर्षांखालील टीम इंग्लंडमध्ये गेली होती, त्या टीममध्ये आगरकरची बॅटर म्हणूनच निवड झाली होती. तेव्हा तो नैमित्तिक बॉलिंग करत असे. त्या दौऱ्यातील एका मॅचमध्ये स्विंग बॉलिंगला मदत करणाऱ्या वातावरणात त्यानं चांगली बॉलिंग केली. आगरकरने या अनुभवानंतर बॉलर म्हणून त्याचा आत्मविश्वास वाढला.

आगरकरने इंग्लंडहून परतल्यानंतर आगरकरने मुंबई क्रिकेटमध्ये बॉलिंगवर भर देण्यास सुरात केली. कांगा लीगमधील एका मॅचमध्ये त्याला सचिनने पाहिले. सचिन त्याच्या बॉलिंगनं प्रभावित झाला. त्यानं मुंबईच्या निवड समितीला आगरकरवर गांभीर्यानं विचार करण्याचा सल्ला दिला. सचिनचा सल्ला आणि त्या वर्षातील कामगिरी यामुळे आगरकरची त्यावर्षी मुंबईच्या टीममध्ये निवड झाली. पुढे काही वर्षांनी म्हणजे 1998 साली त्याच्यासाठी (Ajit Agarkar Birthday) टीम इंडियाचे दरवाजे उघडले.

1990 च्या दशकातील Bits and Pieces Player

‘हे’ रेकॉर्ड माहिती आहेत का?

अजित आगरकरनं वन-डे क्रिकेटमध्ये धडाकेबाज एन्ट्री केली. त्यानं 23 मॅचमध्ये 50 विकेट्स घेतल्या. तो तेंव्हा वर्ल्ड रेकॉर्ड होता. श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने तो रेकॉर्ड मोडला. आजही या गटातील भारतीय रेकॉर्ड हा आगरकरच्याच नावावर आहे. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात फास्ट 150 विकेट्स, सर्वात फास्ट 200  विकेट्स आणि सर्वात फास्ट 250 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आजही आगरकरच्या नावावर आहे.

अजित आगरकरनं 191 वन-डेमध्ये 288 विकेट्स घेतल्या आहेत. तो भारतीय बॉलर्सच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताकडून अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांनीच त्याच्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. आगकरनं या विकेट्स 27. 85 नं घेतल्या आहेत. टॉप 10 भारतीय बॉलर्समध्ये फक्त कपिल देवची सरासरी यापेक्षा थोडी बरी (27.45) आहे. तर टॉप 10 भारतीय बॉलर्समध्ये आगरकरचा स्ट्राईक रेट (Ajit Agarkar Birthday) हा सर्वात चांगला (32.9) आहे.

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 रन आणि 200 विकेट्स घेणारा भारतीय देखील आगरकरच आहे. आगरकरचा इकोनॉमी रेट (5.07) हा जास्त आहे. त्यामुळेच सतत महागडा ठरणारा बॉलर ही त्याची प्रतिमा अनेकांच्या मनात आहे. त्यामुळेच त्या या रेकॉर्डकडे दुर्लक्ष केले जाते.

Bombay Duck ते 21 बॉल 50

श्रीलंकेविरुद्ध 1998 साली शारजामध्ये झालेल्या वन-डेमध्ये टीम इंडियाला जिंकण्यासाठी 22 बॉलमध्ये 31 रनची गरज होती. आगरकर बॅटींगला आला तेव्हा शेवटच्या 3 विकेट्स शिल्लक होत्या. तो T20 क्रिकेटची कल्पनाही नसलेला काळ होता. आगरकरने त्या मॅचमध्ये 12 बॉलमध्ये 26 रन काढत टीम इंडियाला 5 बॉल राखून विजय मिळवून दिला होता. त्यापूर्वी तो बॉलिंगमध्ये महागडा ठरला होता. जबरदस्त कामगिरी आणि खराब कामगिरी हे दोन्ही प्रवास त्यानं त्याच्या कारकिर्दीमध्ये सातत्यानं केले आहेत.

वन-डे क्रिकेटमध्ये फास्ट 50 विकेट्सचा रेकॉर्ड केल्यानंतर तो ऑस्ट्रेलियात गेला होता. त्या सीरिजमधील पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्यानं 19 रन काढले. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये तो पहिल्या बॉलवर शून्यावर आऊट झाला. त्यानंतर तो शून्यातच अडकला. मेलबर्न टेस्टच्या दोन्ही इनिंग आणि सिडनी टेस्टची पहिली इनिंग अशा सलग 4 इनिंगमध्ये त्याला गोल्डन डक (Golden Duck) मिळाला होता. सिडनी टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आगरकर पहिल्या बॉलवर वाचला, पण दुसऱ्या बॉलवर शून्यावरच आऊट झाला. त्यामुळे त्याला बॉम्बे डक (Bombay Duck) हे नाव मिळाले.

आगकरचा शून्याचा हा फेरा इथंच थांबला नाही. ऑस्ट्रेलियाची टीम त्यानंतर भारत दौऱ्यावर आली तेव्हा मुंबई टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये तो पुन्हा शून्यावरच आऊट झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग 7 इनिंगमध्ये शून्यावर आऊट होण्याचा कोणत्याही क्रिकेटरला कधी आवडणार नाही, असा रेकॉर्ड आगरकरच्या नावावर (Ajit Agarkar Birthday) आहे.

अजित आगरकरनं त्यानंतर तो सर्व राग झिम्बाब्वे विरुद्ध काढला. राजकोटमध्ये झालेल्या वन-डेमध्ये त्यानं फक्त 21 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी झळकावत भारतीय रेकॉर्ड केला. गेल्या 21 वर्षांमध्ये एकाही इंडियन बॅटरला हा रेकॉर्ड मोडता आलेला नाही. विशेष म्हणजे आगरकनं हा रेकॉर्ड टॉप ऑर्डरमध्ये प्रमोशन मिळालं त्याचा फायदा घेत केलेला नाही. तर 8 व्या क्रमांकावर बॅटींगला येऊन केला आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या त्या वन-डेमध्ये आगरकरनं 7 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं फक्त 25 बॉलमध्ये नाबाद 67 रन काढले.

लॉर्ड्सवर सेंच्युरी आणि ऑस्ट्रेलियाचा बदला

झिम्बाब्वे विरुद्धची त्याची ही इनिंग कमकुवत देशाविरुद्ध आहे म्हणून अनेकांनी दुर्लक्षित केली. त्या सर्वांना आगरकरनं लॉर्डस टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावत उत्तर दिलं. 2002 साली झालेल्या त्या टेस्टमध्ये आगरकरनं चौथ्या इनिंगमध्ये अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आठव्या क्रमांकावर येत सेंच्युरी झळकावली. सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि रिकी पॉन्टिंग या त्याच्या काळातील सर्वश्रेष्ठ बॅटर्सना जमला नाही, तो रेकॉर्ड आगरकरनं (Ajit Agarkar Birthday) केला आहे.

टीम इंडिया 2003 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली त्यावेळी आगरकरनं ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला. त्यानं त्या दौऱ्यातील अ‍ॅडलेड टेस्टमध्ये 41 रन देत 6 विकेट्स घेतल्या आणि तब्बल दोन दशकांनी टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात जिंकलेल्या टेस्टमध्ये मोलाचे योगदान दिले. त्यानंतर त्याच दौऱ्यात मेलबर्नमध्ये झालेल्या वन-डेमध्येही आगरकरनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध 42 बॉलमध्ये 6 विकेट्स घेत वन-डे कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

सचिन, लारा आणि पॉन्टिंगला जे जमलं नाही ते अजित आगरकरनं केलं!

उतरता काळ

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आगरकरच्या कारकिर्दीला दुखापतींचं ग्रहण लागलं. त्यामुळे तो टीम इंडियाच्या आत-बाहेर होता. 2007 साली झालेल्या वर्ल्ड कपमधील अपयशानंतर त्यानंतरच्या बांगलादेश दौऱ्यातून त्याला वगळण्यात आले. त्या वर्षी इंग्लंडमध्ये गेलेल्या टीमचा तो सदस्य होता. पण तिथे त्याला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्या सीरिजमधील पराभवानंतर त्याला वगळण्यात आले. 2007 साली दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियानं जिंकलेल्या T20 वर्ल्ड कप टीमचा तो सदस्य होता. पण, त्या वर्ल्ड कपनंतर त्याला नॅशनल T20 टीममध्येही कधी जागा मिळाली नाही.

अजित आगरकरनं कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या 2 आयपीएल टीमचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात आयपीएल स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत त्यानं क्वचितच त्याच्या क्षमतेला न्याय दिला. पण, तो मुंबईच्या रणजी टीमचा नियमित सदस्य होता. अजित आगरकर खेळलेली एकही रणजी फायनल मुंबईची टीम हरली नाही. कर्नाटक विरुद्ध 2010 साली म्हैसूरमध्ये झालेल्या थरारक रणजी फायनलमध्ये आगरकरच्या खेळामुळेच मुंबईला विजय मिळवता आला. 2012-13 च्या सिझनमध्ये आगरकरच्या कॅप्टनसीमध्ये मुंबईनं 40 व्यांदा रणजी स्पर्धेचं विजेतेपद जिंकले. त्यानंतर त्यानं (Ajit Agarkar Birthday) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली.

मुंबईकर अजित आगरकरच्या भन्नाट स्पेलपुढे कांगारुंनी पत्कारली होती शरणागती!

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: