फोटो – ट्विटर

1990 च्या दशकात भारतामध्ये क्रिकेट हा धर्म होण्यास सुरूवात झाली. सचिन तेंडुलकरचा उदय याच दशकात झाला. उदारीकरणानंतर घरोघरी टीव्ही आणि केबलचं जाळं वाढलं. यामुळे वन-डे क्रिकेट लोकप्रिय झालं. हिरो कपची सेमी फायनल आणि फायनल, टोरंटोमधील सौरव गांगुली शो, ढाकामधील इंडिपेंडन्स कप आणि सचिनचा शारजामधील डेझर्ट स्ट्रॉम या सर्व भारतीय क्रिकेट फॅन्सच्या न विसरता येणाऱ्या आठवणी आहेत. याच दशकात टीम इंडियाच्या वन-डे टीममध्ये बॅटींग, बॉलिंग आणि चपळ फिल्डिंग याच्या जोरावर स्वत:ची जागा निर्माण केलेला ऑल राऊंडर रॉबिन सिंहचा आज वाढदिवस (Robin Singh Birthday) आहे. आजच्याच दिवशी (14 सप्टेंबर 1963) रॉबिन सिंहचा जन्म झाला. अलिकडच्या काळात Bits and Pieces Player या संकल्पनेबाबत सातत्यानं चर्चा होते. रॉबिन सिंह हा 90 च्या दशकातील Bits and Pieces Player होता.

डावखुऱे बॅट्समन हे त्यांच्या आकर्षक फटकेबाजीसाठी ओळखले जात. पण रॉबिनची फटकेबाजी आकर्षक नव्हती. तो बॅटींग करताना बॉटम हँडचा वापर प्रामुख्यानं करत असे. लेग साईडला स्वीप शॉट मारणारा रॉबिन आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्याचे रनिंग बिटविन द विकेट उत्तम होते. सिंगल आणि डबल रन काढण्यात त्याचा हातखंडा होता. तो काही वेगवान बॉलर नव्हता. पण कटर्सचा योग्य वापर आणि अचूकता याच्या जोरावर त्यानं श्रीनाथ आणि कुंबळेच्या साथीदाराची भूमिका वन-डे क्रिकेटमध्ये बजावली. 4.79 च्या इकॉनॉमी रेटनं वन-डे क्रिकेटमधील दोन वेळा इनिंगमध्ये 5 विकेट्सची कामगिरी त्यानं केली आहे.

 ज्या काळात भारतीय क्रिकेटर्ससाठी फिटनेस हा बोनस समजला जायचा, यो-यो टेस्टचं नावही कुणी ऐकलं नव्हतं, त्या काळात तो टीम इंडियातील सर्वात फिट खेळाडू होता. अझर आणि अजय जडेजाच्या बरोबरीनं चपळ फिल्डर होता.

त्रिनिदाद ते टीम इंडिया

रॉबिन सिंहचा जन्म (Robin Singh Birthday) वेस्ट इंडिजच्या बेटावरील त्रिनिदादमध्ये झाला. आज तो त्याची बायको आणि मुलासह भारतामध्ये स्थायिक झाला असला तरी त्याची भावंड अजूनही तिथंच आहेत. मुळचा राजस्थानचा असलेला रॉबिन अगदी लहान वयात चेन्नईत आला. चेन्नईत आल्यानंतर क्लब क्रिकेटच्या माध्यमातून त्यानं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

1987-88 च्या रणजी सिझनमध्ये रॉबिन सिंहनं जोरदार कामगिरी केली. केरळ विरुद्धच्या मॅचमध्ये 72 रन देत 11 विकेट्स घेतल्या. त्यानंतर गोवा आणि हैदराबाद विरुद्ध सेंच्युरी झळकावली. सेमी फायनलमध्ये पंजाबला पराभूत करण्यात त्याच्या 152 रनच्या खेळीचा निर्णायक वाटा होता. रणजी फायनलमध्ये रेल्वे विरुद्ध 131 रन केले. त्याच्या या शतकामुळे तामिळनाडूनं 1954-55 नंतर पहिल्यांदाच त्या सिझनमध्ये रणजी ट्रॉफी जिंकली.

रॉबिन सिंहनं त्या सिझनमध्ये 8 मॅचमध्ये 69.37 च्या सरासरीनं 4 सेंच्युरीसह 555 रन केले. तसंच 17 विकेट्स घेतल्या. त्यानं तो फॉर्म पुढील सिझनमध्येही कायम ठेवत सलग तीन सेंच्युरी झळकावल्या. त्यामध्ये दोन मॅचमध्ये त्यानं एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या. या सर्व कामगिरीच्या जोरावर 1989 मध्ये त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली.

टीम इंडियाचा पहिला अस्सल ‘फास्ट’ बॉलर!

जन्मगावी पदार्पण

रॉबिन सिंहनं 1989 साली त्रिनिदादमध्ये त्याच्या जन्मगावी पदार्पण केले. वेस्ट इंडिज विरुद्धच्या त्या सिझनमध्ये त्याला 2 वन-डे खेळायला मिळाल्या. त्या दोन्ही वन-डेमध्ये बॅट आणि बॉलनं त्याला प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले.

टीम इंडियातून वगळल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये रॉबिन सिंहनं सातत्यानं रन केले. त्यानं पुढील 4 सिझनमध्ये 2 हजार पेक्षा जास्त रन केले. 1995-96 सिझनच्या रणजी क्वार्टर फायनलमध्ये 7 विकेट्स घेत मुंबईला 147 रन वर ऑल आऊट करण्याची एकहाती कामगिरी त्यानं पार पाडली.

7 वर्षानंतर कमबॅक

1996 साली टायटन कप तिरंगी मालिकेत नेट प्रॅक्टीसच्या वेळी सौरव गांगुली (Sourav Ganguly) जखमी झाला. त्यामुळे निवड समितीला रॉबिन सिंहची आठवण झाली. 7 वर्षानंतर वयाच्या 33 व्या वर्षी टीम इंडियामध्ये त्यानं कमबॅक केले.

मोहालीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कमबॅक मॅचमध्ये त्यानं 6 रन काढले. पण नंतर बॉलिंगमध्ये मार्क वॉ आणि स्टुअर्ट लॉ यांना सलग दोन बॉलवर आऊट करत टीम इंडियाच्या निसटत्या विजयात योगदान दिले. त्यानंतर फायनलमध्येही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानं 2 विकेट्स घेतल्या. त्या काळात टीम इंडियासाठी 5 व्या बॉलरची जबाबदारी सचिन तेंडुलकर आणि अजय जडेजा सांभाळत. 7 बॅट्समनसह खेळणाऱ्या टीम इंडियात रॉबिन सिंहमुळे संतुलन आले. तो टीममध्ये स्थिरावला.

टीम प्लेयर

रॉबिन सिंहनं त्यानंतरची पुढची 5 वर्ष वन-डे टीममध्ये सर्व प्रकारच्या भूमिका पार पाडल्या. 6 किंवा 7 व्या क्रमांकावर येत तळाच्या बॅट्समनसह किल्ला लढवणे किंवा कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त रन काढणे या दोन्ही जबाबदाऱ्या त्यानं पेलल्या. गरज पडली तेव्हा टीम मॅनेजमेंटनं फ्लोटर म्हणून तिसऱ्या क्रमांकावरही रॉबिनचा वापर केला.

झिम्बाब्वे विरुद्ध पर्ल वन-डेमध्ये 31 बॉलमध्ये 48 रनची खेळी करत (Robin Singh Birthday) अशक्य वाटणारा विजय खेचून आणला होता. शेवटच्या ओव्हरमधील 5 बॉलवर तो रन आऊट झाल्यानं ती मॅच टाय झाली. त्याच सीरिजमध्ये पुन्हा झिम्बाविरुद्ध 29 बॉलमध्ये 38 रन करत टीम इंडियाला त्यानं फायनलमध्ये पोहचवले.

झिम्बाब्वे प्रमाणेच श्रीलंकेविरुद्धही रॉबिन सिंहनं नेहमीच चांगला खेळ केला. त्याची वन-डे क्रिकेटमधील पहिली हाफ सेंच्युरी, एकमेव सेंच्युरी आणि एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याचा दोन वेळा केलेला पराक्रम या सर्व गोष्टी त्यानं श्रीलंकेविरुद्ध केल्या आहेत.

ऐतिहासिक विजयात योगदान

1998 साला ढाकामध्ये झालेल्या इंडिपेंडन्स कप स्पर्धेतील फायनलमधील खेळीसाठी रॉबिन सिंह (Robin Singh Birthday) नेहमी लक्षात राहणार आहे. पाकिस्तान विरुद्ध भारताला विजयासाठी 48 ओव्हरमध्ये 315 रनची गरज होती. सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) 26 बॉलमध्ये 41 रन करत भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. सचिन आऊट झाल्यानंततर अझरनं तो स्वत:, सिद्धू आणि जडेजा या तिघांना बाजूला करत रॉबिन सिंहला तिसऱ्या क्रमांकावर प्रमोशन दिले.

सौरव गांगुली दुसऱ्या बाजूनं फटकेबाजी करत असताना रॉबिन सिंहनं स्कोरबोर्ड सतत हलता राहिल याची खबरदारी घेतली. गांगुली – रॉबिन सिंह जोडीनं दुसऱ्या विकेट्ससाठी 179 रनची पार्टनरशिप केली. सौरव गांगुलीची सेंच्युरी आणि ऋषिकेष कानिटकरनं शेवटच्या क्षणी लगावलेल्या फोर इतकेच रॉबिन सिंहनं काढलेले 83 बॉलमध्ये 82 रन भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाचे ठरले. याच खेळीमुळे रॉबिन सिंहची त्या वर्षा पहिल्यांदाच टेस्ट टीममध्ये निवड झाली.

एकमेव टेस्ट

रॉबिन सिंहनं 55 वन-डे खेळल्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो तेव्हा रेकॉर्ड होता. पहिल्या इनिंगमध्ये त्यानं 6 ओव्हर बॉलिंग केली त्यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. तर 42 बॉलमध्ये 15 रन काढले. दुसऱ्या इनिंगमध्ये तर त्याला फक्त 4 ओव्हर बॉलिंग मिळाली.

टीम इंडियाला विजयासाठी 235 रनचं टार्गेट होतं. ते टार्गेट टीमला पेलवलं नाही. भारतीय टीम 173 रनवर ऑल आऊट झाली. रॉबिन सिंहनं त्या इनिंगमध्ये 12 रन काढले. हेन्री ओलोंगाच्या (Henry Olonga) बॉलिंगनं गाजलेल्या त्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. या पराभवानंतर रॉबिन सिंहला टेस्ट टीममधून वगळलं. त्यानंतर तो पुन्हा कधीही टेस्ट मॅच खेळला नाही.

सर्वशक्तीमान व्यक्तीला आव्हान देणारा धाडसी क्रिकेटपटू

1999 चा वर्ल्ड कप

रॉबिन सिंह त्याच्या कारकिर्दीमधील एकमेव वर्ल्ड कप 1999 साली (Cricket World Cup 1999) इंग्लंडमध्ये खेळला. झिम्बाब्वे विरुद्धच्या वन-डे पूर्वी सचिनच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे त्याला तातडीनं मुंबईला जावं लागलं. त्या मॅचमध्ये अडचणीच्या प्रसंगी रॉबिन सिंहनंच चांगली बॅटींग करत टीमला विजयाच्या जवळ आणले. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये विजयासाठी 7 रन हवे होता. रॉबिन सिंह आणि श्रीनाथ ही जोडी मैदानात होती. पण हेन्री ओलोंगानं त्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेत टीम इंडियाचा धक्कादायक पराभव केला.

त्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्धची मॅच गांगुली-द्रविडची विक्रमी पार्टनरशिप आणि दोघांच्याही सेंच्युरीमुळे गाजली. रॉबिन सिंहनं त्या मॅचमध्ये 31 रन देत 5 विकेट्स घेतल्या. 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 1983) कपिल देवनं एका मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर रॉबिन सिंह (Robin Singh Birthday) हा दुसरा बॉलर बनला. भारतीय बॉलरची वर्ल्ड कपमधील एका मॅचमध्ये केलेली ती सर्वोत्तम कामगिरी होती. तो रेकॉर्ड पुढील वर्ल्ड कपमध्ये आशिष नेहरानं मोडला.

त्याच वर्ल्ड कपमधील ‘सुपर सिक्स’ मधील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियासमोर विजयासाठी 283 रनचं टार्गेट होतं. ग्लेन मॅकग्राच्या भेदक बॉलिंगमुळे भारताची अवस्था 4 आऊट 17 अशी झाली होती. त्यानंतर अजय जडेजा (Ajay Jadeja) आणि रॉबिन सिंह जोडीनं ऑस्ट्रेलियावर प्रतिहल्ला केला. जडेजानं सेंच्युरी झळकावली. तर रॉबिन सिंहनं 75 रन काढले. पण अन्य एकाही बॅट्समनला 8 पेक्षा जास्त रन काढता न आल्यानं भारताचा 77 रननं पराभव झाला.

त्या वर्ल्ड कपनंतर रॉबिन सिंहच्या कामगिरीत घसरण झाली. त्यानं काही उपयुक्त इनिंग खेळल्या. पण, सातत्य कमी झाले होते. अखेर युवराज सिंहचा उदय झाल्यानंतर त्याला टीममधून वगळण्यात आले. त्यानंतर 2001 साली तो क्रिकेटमधून रिटायर झाला.

बिझी कोच

रॉबिन सिंह रिटायर झाल्यानंतरही कोच म्हणून सतत कार्यरत आहे. तो सर्वप्रथम हाँगकाँगचा कोच बनला.  त्याच्या मार्गदर्शनाखाली हाँगकाँगची टीम 2004 च्या आशिया कपसाठी पात्र ठरली. त्यानंतर तो टीम इंडिया A टीमचा कोच बनला. 2007 ते 2009 या काळात तो टीम इंडियाचा फिल्डिंग कोच होता. कोणतंही कारण न देता त्याची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली.

रवी शास्त्री सोडणार टीम इंडियाचं प्रशिक्षकपद! 5 दिग्गज प्रमुख दावेदार

आयपीएल सुरु झाल्यानंतर पहिल्या सिझनमध्ये (IPL 2008) रॉबिन सिंह डेक्कन चार्जर्सचा कोच होता. त्यानंतर 2010 साली तो बॅटींग कोच म्हणून मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कॅम्पमध्ये दाखल झाला. रॉबिन सिंह मुंबई इंडियन्ससोबत असताना 2013, 15 आणि 17 साली टीमनं आयपीएल विजेतेपद पटकावले. कॅरेबियन प्रीमियर लीग, बांगलादेश प्रीमियर लीग, श्रीलंका क्रिकेट लीगमध्येही त्यानं कोच म्हणून काम केलं आहे. उत्तर अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार व्हावा यासाठी त्यानं रॉबिन सिंह क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून प्रयत्न केले. सध्या तो (Robin Singh Birthday) यूएई क्रिकेटचा संचालक आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

  

error: