फोटो – ट्विटर, ICC

ते क्रिकेटमधील एक आकर्षक आणि आक्रमक बॅट्समन होते. त्यांचा खेळ बघण्यासाठी प्रेक्षक मैदानात गर्दी करत. Cool हा शब्द एखाद्या व्यक्तीचा गुणधर्म म्हणून ओळख सांगण्याच्या आधीच्या काळातील ते Cool क्रिकेटर होते. जाहिरात, मॉडेलिंग आणि अगदी सिनेमातही त्यांनी काम केले. क्रिकेटपटू म्हणून सक्रीय असताना आत्मचरित्र लिहलं. क्रिकेटवरील मराठी पाक्षिकाचे देखील ते संपादक होते. या सर्व ओळखीनंतरही ऑस्ट्रेलियातील झुंजार खेळी, एका ओव्हरमध्ये 6 फोर, वर्ल्ड कप विजयातील हिरो, चांगले कोच आणि खमके प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. टेस्ट क्रिकेटच्या काळातील T20 स्टार असलेले भारताचे बॅट्समन संदीप पाटील यांचा आज वाढदिवस (Sandeep Patil Birthday) आहे. आजच्याच दिवशी (18 ऑगस्ट 1956) रोजी त्यांचा जन्म झाला.

सुरुवातीचे करिअर

संदीप पाटील यांनी क्रिकेट खेळण्यास खूप लवकर सुरुवात केली. मुंबई विद्यापीठाकडून तीन वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर त्यांना 1975-76 च्या रणजी सिझनमध्ये मुंबईकडून पदार्पणाची संधी मिळाली. असं असलं तरी, 1979 च्या रणजी सेमी फायनलमध्ये सेंच्युरी करेपर्यंत त्यांचं टीममधील स्थान पक्के नव्हते.

दिल्ली विरुद्ध झालेल्या त्या सेमी फायनलमध्ये मुंबईची अवस्था 4 आऊट 72 होती. त्यावेळी पाटील यांनी 145 रनची खेळी केली. त्यानंतर भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या टीमविरुद्ध प्रॅक्टीस मॅचमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर पाटील यांनी 1980 साली पाकिस्तानविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पाटील यांनी दुसऱ्या टेस्टमध्ये पहिली हाफ सेंच्युरी झळकावली. या खेळीमुळे 1981 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय टीममध्ये त्यांची निवड झाली.  

ऑस्ट्रेलियातील झुंजार खेळ

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी टेस्टमध्ये सुरुवातीला पाटील यांच्या तोंडाला लागला. त्यानंतरही ते टिच्चून खेळत होते. पाटील 65 वर असताना आणखी एक बाऊन्सर त्यांच्या कानाला लागला. त्यांना काही काळ ऐकू येणे बंद झाले. पाटील यांना अखेर मैदान सोडून थेट हॉस्पिटल गाठावे लागले. हॉस्पिटलमध्ये उपचार करुन दुसऱ्या इनिंगमध्ये ते पुन्हा एकदा आठव्या क्रमांकावर मैदानात उतरले.

सिडनीनंतरची पुढची टेस्ट अ‍ॅडलेडमध्ये होती. ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 528 रनचा डोंगर उभा केला. त्याला उत्तर देताना भारताची अवस्था 4 आऊट 130 अशी झाली होती. टीमवर फॉलोऑनचं संकट होतं. त्यावेळी संदीप पाटील (Sandeep Patil Birthday)  यांनी टेस्टमधील पहिली सेंच्युरी झळकावली. डेनिस लिली आणि कंपनीवर त्यांनी प्रतिहल्ला केला. त्यांच्या 174 रनच्या इनिंगनं भारताचा फॉलो ऑन टळला. पुढे ती टेस्टही ड्रॉ झाली.

एका ओव्हरमध्ये 6 फोर

संदीप पाटील यांना अ‍ॅडलेडमधील खेळीनं मोठी प्रसिद्धी मिळाली. सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातीमध्येही ते झळकले. यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूमध्ये तो मान फक्त सुनील गावसकरांना (Sunil Gavaskar) मिळाला होता. त्यानंतरच्या 14 इनिंगमध्ये त्यांची कामगिरी साधारण होती. त्यांना या काळात फक्त 2 वेळा हाफ सेंच्युरी करता आली. त्यामुळे त्यांना काही काळ टीममधून वगळण्यात आले.

इंग्लंड विरुद्ध 1982 साली ओल्ड ट्रॅफर्डवर झालेल्या टेस्टमध्ये पाटील यांनी टीममध्ये कमबॅक केले. त्या टेस्टमध्ये त्यांनी इंग्लंडच्या बॉलर्सवर जोरदार हल्ला केला. कपिल देव (Kapil Dev) यांच्या मदतीनं त्यांनी एका तासात 96 रन काढले. बॉब विलिसच्या (Bob Willlis) एका ओव्हरमध्ये त्यांनी (4,4, 4 (no ball), 0, 4,4,4) असे सहा फोर लगावले. त्यांनी 80 ते 100 रनचं अंतर फक्त 5 बॉलमध्ये पूर्ण केलं. टेस्ट क्रिकेटचं प्राबल्य असलेल्या त्या काळात एखाद्या भारतीय क्रिकेटरनं हा पराक्रम करणे अघटित होते. पाटील यांनी (Sandeep Patil Birthday) त्या इनिंगमध्ये नाबाद 129 रनची खेळी केली.

वर्ल्ड कप विजयात योगदान

ओल्ड ट्रॅफर्डनंतर त्यांनी श्रीलंकेविरुद्ध चेन्नईत एक सेंच्युरी झळकावली. पण या सेंच्युरीचा अपवाद वगळता त्यांची कामगिरी साधारण सुरू होती. 1983 साली झालेल्या वर्ल्ड कप टीममध्ये (Cricket World Cup 1983) त्यांची निवड झाली.

वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये यजमान इंग्लंडला पाटील यांनी हिसका दाखवला. त्यांनी इंग्लंड विरुद्ध 32 बॉलमध्ये नाबाद 51 रनची खेळी करत भारताला पहिल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचलण्यात निर्णायक भूमिका बजावली. वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान विरुद्ध फैजाबादमध्ये त्यांनी टेस्ट क्रिकेटमधील चौथी आणि शेवटची सेंच्युरी झळकावली.

फिल्मी करिअर

1983 च्या वर्ल्ड कपमधील कामगिरीनंतर संदीप पाटील (Sandeep Patil Birthday) यांना बॉलिवूडमधून ऑफर येऊ लागल्या. पूनम धिल्लन आणि देबश्री रॉय या अभिनेत्रींसोबत ‘कभी अजनबी थे’ (Kabhie Ajnabi The) या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका केली. या चित्रपटात आणखी एक वर्ल्ड कप टीममधील क्रिकेटपटू सय्यद किरमाणी यांची छोटी भूमिका होती.  पाटील आणि किरमाणी यांच्या फायटिंग सिनमुळे या चित्रपटाची पूर्वीप्रसिद्ध चांगलीच झाली. त्याचबरोबर या चित्रपटातील ‘गीत मेरे होठों पर दे गया कोई…’ हे गाणं देखील गाजलं. चांगल्या पूर्वप्रसिद्धीनंतही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही.

संदीप पाटील यांनी क्रिकेटमध्ये सक्रीय असतानाच 1984 साली सँडी स्ट्रॉम (Sandy Strom) हे आत्मचरित्र लिहलं. त्यानंतर 1990 च्या दशकात ते षटकार या क्रिकेटला वाहिलेल्या मराठी पाक्षिकाचे संपादक देखील होते.

एका शॉटचा फटका

संदीप पाटील यांचं ऑफ फिल्ड करिअर जोरात सुरू असलं तरी त्यांची ऑन फिल्ड कामगिरी साधारण होत होती. इंग्लंडची टीम 1984 साली भारत दौऱ्यावर आली होती. त्या सीरिजमधील दिल्ली टेस्टमध्ये शेवटच्या दिवशी पाटील 41 रनवर खेळत होते. त्यावेळी एक आक्रमक फटका मारण्याच्या नादात पाटील लाँग ऑनला कॅच देऊन आऊट झाले. त्या टेस्टमध्ये कपिल देव देखील याच पद्धतीनं आऊट झाले. याचा फटका टीम इंडियाला बसला. भारतीय बॅटींग ऑर्डर गडगडली आणि टीम इंडियानं दिल्ली टेस्ट गमावली.

संदीप पाटील आणि कपिल देव यांच्यावर बेजाबदार फटका मारल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांना त्यानंतर होणाऱ्या कोलकाता टेस्टमधून वगळण्यात आले. कोलकातानंतच्या टेस्टमध्ये कपिल टीममध्ये परतले. पण, संदीप पाटीलला पुन्हा कधीही टेस्ट क्रिकेट खेळण्यास मिळाले नाही. त्यांची जागा मोहम्मद अझहरुद्दीननं (Mohammad Azharuddin) घेतली. अझरनं पहिल्या तीन टेस्टमध्ये सलग तीन सेंच्युरी झळकावत त्याची टीममधील जागा पक्की केली.

महंमद अझहरुद्दीन सोनेरी स्वप्न ते दु:स्वप्न!

कोच संदीप पाटील

संदीप पाटीलची 1986 साली इंग्लंड दौऱ्यावर निवड झाली होती. पण त्या दौऱ्यात त्यांना फक्त 2 वन-डेमध्ये संधी मिळाली. त्याचवर्षी त्यांनी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली. पुढे पाटील यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कमबॅक केले. ते मध्य प्रदेशच्या रणजी टीमचे कॅप्टन बनले. मध्य प्रदेशकडून ते पाच रणजी सिझन खेळले. त्यांच्या कॅप्टनसीमध्ये त्यांनी चांगले यश मिळवले.

संदीप पाटील त्यानंतर टीम इंडियाचे कोच बनले. पाकिस्तान विरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये भारतीय टीममध्ये सौरव गांगुलीच्या ऐवजी विनोद कांबळीला खेळवण्याचा त्यांचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला. त्यामुळे त्यांची टीम इंडियाचे कोच म्हणून कारकीर्द अल्पजीवी ठरली.

संदीप पाटील (Sandeep Patil Birthday) त्यानंतर केनिया टीमचे कोच झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केनियानं 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलपर्यंत धडक मारत इतिहास घडवला. क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सहयोगी टीमनं केलेली ही आजवरची सर्वोच्च कामगिरी आहे.

सचिनबाबतच्या निर्णयानं खळबळ

केनियानंतर संदीप पाटील काही काळ ओमामच्या टीमचे कोच होते. त्यानंतर पुन्हा भारतीय क्रिकेटमध्ये परतले. बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचे (NCA) ते अध्यक्ष होते. त्यानंतर 2012 साली ते राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष झाले. निवड समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर नव्या खेळाडूंना संधी देण्यासाठी थेट सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) वगळण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. सचिनलाही त्याबाबत कल्पना दिली.त्यांच्या या निर्णयावरील बातमीनं तेव्हा चांगलीच खळबळ उडाली होती.

निवड समिती आणि कॅप्टनमध्ये यापूर्वीही झालाय वाद, वाचा कोण ठरलं तेव्हा सरस

सचिनला रिटायर होण्याचा तो एक प्रकारे सल्ला होता. ते धाडसी काम बीसीसीआयमधील पाटील (Sandeep Patil Birthday) यांनी केले. पुढे 2013 साली सचिन रिटायर झाला. निवड समिती अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर आपण सचिनला तो सल्ला दिल्याचं त्यांनी मान्य केले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: