फोटो – ट्विटर , विस्डेन इंडिया

इशांत शर्मा (Ishant Sharma) म्हंटलं की 2008 साली झालेली पर्थ टेस्ट (Perth Test) आणि त्या टेस्टमधील रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) टाकलेला भन्नाट स्पेल आठवतो. पर्थ टेस्टच्या आधीच्या सीरिजमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात बंगळुरुमध्ये टेस्ट होती. त्या टेस्टपूर्वी ‘इशांतचा समावेश टेस्ट टीममध्ये लवकर समावेश झाला’ असं मत भारताचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी व्यक्त केलं होतं. इशांतनं त्यांचा अंदाज चुकवत बंगळुरु टेस्टमध्ये पाकिस्तानच्या पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या. तेंव्हापासून त्याच्याबद्दल व्यक्त केलेले अंदाज चुकवणे हे इशांतच्या करियरचे वैशिष्ट्य ठरले आहे. कपिल देवनंतर 100 टेस्टचा टप्पा पूर्ण करणारा दुसरा भारतीय फास्ट बॉलर असलेल्या इशांत शर्माचा आज वाढदिवस (Ishant Sharma Birthday) आहे. आजच्याच दिवशी (2 सप्टेंबर 1988) इशांतचा जन्म झाला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गाठली ‘उंची’

इशांत शर्मा आता विराट कोहली (Virat Kohli) इतकाच म्हणजे 32 वर्षांचा आहे. ते दोघंही दिल्लीच्या 17 वर्षांखालील टीमसाठी एकत्र ट्रायलला होते. विराट अंडर-19 टीमचा कॅप्टन झाला. इशांत तेंव्हा भारताकडून टेस्ट मॅच खेळत होता. ऑस्ट्रेलियात 2008 साली झालेला भारताचा वादग्रस्त असा दौरा (India vs Australia Test Series 2007-08) उंचापुऱ्या इशांतच्या करियरला ‘उंची’ देऊन गेला.

इशांतनं ऑस्ट्रेलियात जाण्यापूर्वी कुकाबुरा बॉलनं (Kookaburra ball) एकदाही बॉलिंग केली नव्हती. त्याला त्यामुळे सीरिजमध्ये सेट होण्यास वेळ लागला. सिडनी टेस्टमध्ये त्यानं सायमंड्सला लवकर आऊट केलं होतं, पण भारत द्वेष्टा अंपायर बकनरनं त्याला आऊट दिलं नाही. सायमंडसनं पुढे 162 रन काढले. भारताचं मानसिक खच्चीकरण करणाऱ्या त्या दौऱ्यातील पर्थ टेस्टमध्ये इशांत शर्मा या नव्या फास्ट बॉलरची जगाला ओळख झाली.

भारतीय बॉलरकालावधीएकूण टेस्ट
अनिल कुंबळे1990 – 2008132
कपिल देव1978 – 1994131
इशांत शर्मा2007 पासून पुढे104*
हरभजन सिंग1998 ते 2015103

पॉन्टिंगला केलं त्रस्त

पर्थ टेस्टमध्ये चौथ्या दिवशी टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार पेक्षा जास्त रन करणारा अनुभवी रिकी पॉन्टिंग मैदानात होता. त्यामुळे मॅचचं पारडं ऑस्ट्रेलियाकडं झुकलं होतं. भारतीय बॅट्समन्सना शेकवण्यासाठी बनवलेल्या पर्थच्या पिचवर त्या दिवशी इशांतनं पॉन्टिंगला त्रस्त केलं. एक भारतीय बॉलर ऑस्ट्रेलियात आपल्या वेगाच्या जोरावर त्यांच्या बेस्ट बॅट्समनला खेळणं अवघड करतोय, हे चित्र खूप वर्षांनी जगानं पाहिलं.

इशांतनं सलग आठ ओव्हर टाकल्यानंतर त्याला विश्रांती देण्यासाठी अनिल कुंबळेनं त्याला थांबवण्याचा निर्णय घेतला होता. वीरेंद्र सेहवागनं त्याला रणजी क्रिकेटमध्ये मोठे स्पेल करताना पाहिलं होतं. त्यामुळे सेहवागनं इशांतला आणखी एक ओव्हर देण्याचा सल्ला कुंबळेला दिला. पुढच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर पॉन्टिंग आऊट झाला. पर्थमध्ये पहिल्यांदाच एखाद्या भारतीय उपखंडातील टीमनं टेस्ट मॅच जिंकली. सिडनीचा बदला भारतानं पर्थमध्ये घेतला.

( वाचा : काय आहे भारत – ऑस्ट्रेलियातील सर्वात वादग्रस्त ‘मंकीगेट’ प्रकरण? )

धोनीच्या काळात बदलली जबाबदारी

ऑस्ट्रेलिया दौरा गाजल्यानंतर इशांत बद्दलच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्या दौऱ्यानंतर महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) भारताचा पूर्णवेळ कॅप्टन बनला. त्याच्या काळात इशांतवरील जबाबदारी (Ishant Sharma Birthday) बदलली. एका बाजूनं सातत्यानं ओव्हर टाकण्याचं काम त्याला धोनीनं सोपवलं. ‘कॅप्टनला जे हवं ते देणं’ हे इशांतच्या करियरचं सूत्र आहे. राहुल द्रविड ते विराट कोहली या काळातील सर्व कॅप्टनच्या काळात त्यानं तेच केलं आहे.

भारतीय उपखंडातील कोरड्या खेळपट्ट्यांवर फास्ट बॉलिंगला कोणतीही मदत न करणाऱ्या पिचवर देखील इशांतनं ती जबाबदारी विनातक्रार सांभाळली. एका बाजूनं बॅट्समनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परदेशातील भारतीय टीमच्या घसरत्या कामगिरीतही जीव तोडून मारा केला. डिसेंबर 2013 जानेवारी 2015 या काळात भारतानं दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे सलग दौरे केले. या काळात इशांतनं भारताकडून सर्वात जास्त 45 विकेट्स घेतल्या. त्याची टेस्टमधील एकूण विकेटची संख्या त्याच्या कामगिरीचं पूर्ण विश्लेषण करत नाही.

( वाचा : Explained : पाकिस्तान फास्ट बॉलर्सची खाण आहे! तर 26 वर्षांपासून ‘हे’ का जमत नाही? )

जिद्दी इशांत!

इशांतनं त्याच्या आजवरच्या करियरमध्ये खेळण्याची जिद्द कधीही सोडली नाही. त्यामुळेच तो सततच्या दुखापतींचा सेटबॅक बसूनही शंभर टेस्टचा टप्पा (Ishant Sharma 100)  पूर्ण करत आहे. मोहालीमध्ये 2013 साली जेम्स फॉकनरनं त्याच्या एका ओव्हरमध्ये 30 रन काढले. त्यापूर्वी त्याला अनियमित कामगिरीमुळे 2011 च्या क्रिकेट वर्ल्ड कप टीममध्ये जागा मिळाली नाही. इशांत तरीही निराश झाला नाही.

मोहालीच्या खराब कामगिरीनंतर लगेच दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग टेस्टमध्ये त्यानं 4 विकेट्स घेतल्या. 2014 साली भारताला लॉर्ड्स टेस्टमध्ये विजय मिळवून देण्यात इशांत आघाडीवर होता.  

 बॉलिंगमध्ये कमालीची सुधारणा

इशांतच्या टेस्ट करियरमधील सरासरीचा विचार केला तर सध्याच्या टप्प्यात तो अधिक भेदक मारा करत असल्याचं लक्षात येतं. पहिल्या 25 टेस्टमध्ये त्याची सरासरी 37.31 होती. 26 ते 50 टेस्टच्या काळात ती 39.59 इतकी झाली. 51 ते 75 काळात 33.13 इतकी कमी झाली. 76 ते 100 या काळात ही सरासरी आता 21.33 इतकी कमालीची सुधारली आहे.

इशांत शर्माची टेस्ट काराकीर्द

टेस्टसरासरी
1-2537.31
26-5039.59
51-7533.13
76-10021.33

‘वो तो है अलबेला’

इशांत शर्माचा घसरलेल्या फॉर्मनंतर त्याचं ट्रोलिंग करणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्याच्या केसावरुन, एखाद्या मॅचमधील एखाद्या प्रसंगावरचे त्याचे काही हावभाव यावरुन त्याला सातत्यानं ट्रोल केलं जातं. 2018 नंतर इशांतची 19. 34 ही सरासरी पॅट कमिन्स किंवा जेम्स अँडरसनपेक्षा चांगली आहे. हे विदेशी बॉलर्सच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या मंडळींच्या गावी देखील नसतं. इशांत त्या सर्वांना आपल्या खेळातून उत्तर देत इथवर पोहचला आहे.  

‘सदा तुने ऐब देखा हुनर को न देखा

वो तो है अलबेला, हजारों मे अकेला’

या गाण्याचं बोल इशांत शर्माला सतत नाव ठेवण्यासाठी निमित्तं शोधणाऱ्या मंडळींना अगदी चपखल लागू आहेत.

झहीर खानच्या रिटायरमेंटनंतर इशांत शर्मा भारतीय टीमच्या फास्ट बॉलिंगचं नेतृत्व (Ishant Sharma Birthday)  करतो. बुमराह, शमी, उमेश यादव हे फास्ट बॉलरचा तो नेता आहे. भारताला ऑस्ट्रेलियात पहिली टेस्ट सीरिज जिंकून देण्यात त्यानं बॉलिंग कॅप्टनसीचा मोठा वाटा होता. गेल्या काही काळात भारतीय फास्ट बॉलर्सचा दबदबा निर्माण झालाय. फास्ट बॉलर्सच्या नव्या पिढीला मैदानातील सर्व परिस्थितीमध्ये मार्गदर्शन करण्याची जबाबदारी इशांतनं सांभाळली आहे.

टीप – * ही खूण नाबाद असे दर्शविते

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: