सोशल मीडियाचा दबदबा असलेल्या सध्याच्या काळात तमाम मीमर्स आणि ट्रोलर्सना सतत खाद्य पुरवणारे टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा आज वाढदिवस (Ravi Shastri Birthday) आहे. आजच्याच दिवशी (27 मे 1962) रोजी शास्त्री यांचा जन्म झाला. गेल्या पाच दशकांपासून रवी शास्त्री हे नाव भारतीय क्रिकेटशी संबंधित आहे. ‘आपण गुणवत्तेमुळे नाही तर कठोर परिश्रमामुळे टीम इंडियात टिकलो’ हे शास्त्री यांनी देखील मान्य करतात. खेळाडू आणि कोच म्हणून अनेकदा टीका सहन करणाऱ्या शास्त्री यांच्या नावावर काही अद्भुत रेकॉर्ड आहेत.

शास्त्रींचे अद्भुत रेकॉर्ड

रवी शास्त्रींवर त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये स्वार्थी क्रिकेटपटू म्हणून अनेकदा टीका झाली. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचे कृपाछत्र होते म्हणून ते टीममध्ये राहिले, अशी चर्चा त्या काळात होत होती. आता विराट कोहलीचा (Virat Kohli) भक्कम पाठिंबा आहे, म्हणून ते कोच आहेत, असे आरोप होत असतात. पण, रवी शास्त्री यांच्या कारकिर्दीमधील काही रेकॉर्ड्स अद्भुत आहेत.

कपिल देव (Kapil Dev) यांच्या नंतर वन-डे आणि टेस्ट या दोन्ही प्रकारात 2000 रन आणि 100 विकेट्स घेणारे शास्त्री हे एकमेव भारतीय आहेत. क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट खेळणाऱ्या बॅट्समनमध्ये फक्त इडी पायन्टर यांची सरासरी (84.42) ही रवी शास्त्रींच्या (77.75) सरासरीपेक्षा जास्त आहे. तळाचा बॅट्समन म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु केलेले शास्त्री पुढे भक्कम ओपनिंग बॅट्समन बनले. ओपनिंग बॅट्समन म्हणून त्यांची सरासरी 44.01 इतकी आहे. इंग्लंड दौऱ्यात 2 सेंच्युरी झळकावणारे ते पहिले भारतीय ओपनर आहेत. इंग्लंड प्रमाणेच ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये त्यांनी सेंच्युरी झळकावली आहे. त्याचबरोबर गॅरी सोबर्स (Gary Sobers) यांच्यानंतर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सहा बॉलवर सलग सहा सिक्स लगावणारे ते दुसरे क्रिकेटपटू आहेत.

वयाच्या 18 व्या वर्षी पदार्पण

मुंबईतील डॉन बॉस्को शाळा आणि पोद्दार कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या रवी शास्त्री यांनी (Ravi Shastri Birthday) देशांतर्गत क्रिकेटमध्ये जम बसवण्यात सुरुवात केली होती. त्यावेळी अचानक 1981 साली वयाच्या 18 व्या वर्षी त्यांची न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये निवड झाली. दिलीप दोषी जखमी झाल्याने त्यांनी वेलिंग्टन टेस्टमध्ये पदार्पण केले. या टेस्टमध्ये शास्त्रींसह किर्ती आझाद आणि योगराज सिंह यांनी देखील पदार्पण केले. पहिल्या टेस्टमध्ये त्यांनी 10 व्या क्रमांकावर बॅटींग करत 3 आणि 17 रन काढले. पण दोन्ही इनिंगमध्ये प्रत्येकी 3 विकेट्स घेत स्पिन बॉलर म्हणून टीमची असलेली अपेक्षा पूर्ण केली. त्या सीरिजमध्ये ऑकलंडमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये शास्त्रींनी पहिल्यांदा एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

ओपनिंग बॅट्समन म्हणून उदय

रवी शास्त्री 1982 साली ओपनिंग बॅट्समन बनले. तोपर्यंत लोअर ऑर्डरमध्ये शास्त्रींनी स्वत:ची बॅट्समन म्हणून उपयुक्तता सिद्ध केली होती. तर टीम इंडियाचे नियमित ओपनिंग बॅट्समन अपयशी ठरत होते. इंग्लंड विरुद्ध ओव्हल टेस्टमध्ये त्यांनी गावसकर सोबत भारतीय इनिंगची सुरुवात केली. पहिल्याच इनिंगमध्ये त्यांनी बोथम आणि कंपनीसमोर इंग्लिश वातावरणात 66 रन काढले.

त्यानंतर टीम इंडियानं पाकिस्तानचा दौरा केला. त्या दौऱ्यात टीमचा 0-3 असा मोठा पराभव झाला. पण कराची टेस्टमध्ये इम्रान खान आणि सर्फराज नवाज यांच्या माऱ्याला तोंड देत शास्त्रींनी 8 तास 8 मिनिटे किल्ला लढवून 128 रन काढले. तर वेस्ट इंडिज दौऱ्यात अँडी रॉबर्ट्स, मायकल होल्डिंग, माल्कम मार्शल या आग ओकणाऱ्या फास्ट बॉलर्सना तोंड देत 6 तास पिचवर ठाण मांडत 102 रनची खेळी केली.

सौरव गांगुलीच्या आधी टेस्टमध्ये 2 हजार रन करणारे एकमेव डावखुरे भारतीय बॅट्समन

गॅरी सोबर्सची बरोबरी

रवी शास्त्रींची (Ravi Shastri Birthday) ओळख संयमी बॅट्समन म्हणून होत असतानाच त्यांनी एक अचाट विक्रम करत जगाचं लक्ष वेधलं. मुंबई विरुद्ध बडोदा मॅचमध्ये तिलक राज याच्या एका ओव्हरमध्ये त्यांनी सलग सहा सिक्स लगावले. क्रिकेटच्या इतिहासात हा पराक्रम त्यापूर्वी फक्त गॅरी सोबर्स यांनी 1968 साली केला होता.

बडोदा विरुद्धच्या मॅचमध्ये त्याने फक्त 113 मिनिटात डबल सेंच्युरी झळकावत वेगवान डबल सेंच्युरीचा विक्रम केला. त्या मॅचमध्ये त्यांनी नाबाद 204 रन काढले.

चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स

भारताने 1983 साली वर्ल्ड कप जिंकला (World Cup 1983) होता. तरीही ऑस्ट्रेलियात 1985 साली झालेल्या ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स’ स्पर्धेसाठी कुणीही विजेतेपदाचा दावेदार मानत नव्हते. त्या स्पर्धेत टीम इंडियानं सर्वच्या सर्व मॅच जिंकत विजेतेपद पटाकवले.

रवी शास्त्रींनी 5 मॅचमध्ये 44.50 च्या सरासरीने 182 रन काढले. यामध्ये पाकिस्तान विरुद्ध फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब करणाऱ्या नाबाद 63 रनचा समावेश होता. त्याचबरोबर 3.32 च्या इकॉनॉमी रेटने 8 विकेट्स घेतल्या. टीम विजेतेपदामध्ये ऑल राऊंड कामगिरीचं योगदान देणाऱ्या रवी शास्त्रींचा ऑडी कार देऊन सन्मान करण्यात आली. शास्त्रींना मिळालेली ऑडी कार ही संपूर्ण देशात चर्चेचा विषय होती.

टीम इंडियाचे कॅप्टन

रवी शास्त्री यांनी सुनील गावसकर, कपिल देव आणि दिलीप वेंगसरकर यांच्या कॅप्टनसीमध्ये व्हाईस कॅप्टन म्हणून जबाबदारी सांभाळली होती. वेस्ट इंडिज विरुद्ध 1988 साली झालेल्या कोलकाता टेस्टमध्ये कॅप्टन दिलीप वेंगसरकर जखमी झाले. त्यानंतर चेन्नई (तेव्हाचे मद्रास) टेस्टमध्ये रवी शास्त्री हे टीम इंडियाचे कॅप्टन बनले.

मद्रास टेस्ट रवी शास्त्रींची (Ravi Shastri Birthday) कॅप्टन म्हणून पहिली टेस्ट होती. त्या टेस्टमध्ये भारताकडून WV रमन, अजय शर्मा आणि नरेंद्र हिरवाणी या तीन खेळाडूंनी पदार्पण केले. रवी शास्त्रींची आक्रमक कॅप्टनसी आणि हिरवाणीने पहिल्या टेस्टमध्ये घेतलेल्या 16 विकेट्स याच्या जोरावर भारताने ती टेस्ट जिंकत सीरिज 1-1 ने बरोबरीत राखली.

क्रिकेट विश्वातील तेव्हाच्या बलाढ्य टीमविरुद्ध मालिकेत पिछाडीवर असताना नव्या खेळाडूंच्या मदतीनं पहिली टेस्ट जिंकण्याची कामगिरी शास्त्रींनी केली. पण, त्यानंतर त्यांना एकदाही कॅप्टन म्हणून संधी मिळाली नाही.

ब्रॅडमन, गावसकर आणि सचिनला जमलं नाही ते वेंगसरकरांनी केलं!

शेन वॉर्नच्या पदार्पणात डबल सेंच्युरी

रवी शास्त्रींनी 1992 साली सिडनी टेस्टमध्ये डबल सेंच्युरी झळकावली. शेन वॉर्नची (Shane Warne) ती पहिली टेस्ट होती. रवी शास्त्री आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) जोडीने वॉर्नची पहिल्या टेस्टमध्ये जोरदार धुलाई केली. वॉर्नला 1 विकेट घेण्यासाठी 150 रन मोजावे लागले.

1992 च्या क्रिकेट वर्ल्ड कप नंतर त्याच वर्षी झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी रवी शास्त्रींनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

VIDEO : सिडनी टेस्टच्या आठवणी, सचिन तेंडुलकर नाबाद 241!

कॉमेंट्रेटर म्हणून यश

रवी शास्त्रींनी रिटायरमेंटनंतर क्रिकेटमधील दुसरी इनिंग कॉमेंट्रेटर म्हणून गाजवली. धीरगंभीर आवाज, इंग्रजीवर उत्तम कौशल्य, खेळाची सखोल समज आणि परखड शैली यामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. 2001-02 च्या दौऱ्यात मॅच रेफ्री माईक डेनीस यांनी सहा भारतीय खेळाडूंवर कारवाई केली होती, त्यावेळी त्यांनी कॉमेंट्रेटर म्हणून जगासमोर भारताची बाजू भक्कम मांडली.

शास्त्रींनी कॉमेंट्रेटर म्हणून BCCI आणि ICC या दोन्ही संस्थांच्या पॅनलवर काम केले आहे. युवराज सिंगचे सहा सिक्स किंवा 2011 मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकलेला प्रसंग अशा अनेक ऐतिहासिक क्षणांना शास्त्रींच्या कॉमेंट्रीने आणखी उंची मिळवून दिली आहे.

कोच शास्त्री

रवी शास्त्री सध्या टीम इंडियाचे हेड कोच आहेत. अनिल कुंबळेला (Anil Kumble) हटवून त्यांना कोच करण्याचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला होता. विराट-शास्त्री जोडीच्या टीम निवडीवर देखील अनेकदा टीका झाली आहे. त्याचा टीमला फटकाही बसला. असं असलं तरी टेस्टमध्ये टीम इंडियाला नंबर 1 कायम राखण्यात शास्त्रींना यश आले आहे.

रवी शास्त्री (Ravi Shastri Birthday) ऑस्ट्रेलियात सलग दोन वेळा टेस्ट सीरिज जिंकणारे एकमेव आशिया खंडातील टीमचे कोच आहेत. यावर्षी तर प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये शास्त्रींनी अगदी नव्या पोरांना हाताशी धरत ऑस्ट्रेलियात सीरिज जिंकली आहे.

IND vs AUS: होय, आपण (तरीही) पुन्हा जिंकलो!

रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षक पदाची कारकिर्दीचा शेवट दुर्दैवी ठरला. T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) साखळी फेरीतच संपुष्टाक आले. टीम इंडियाचा आयसीसी स्पर्धेतील विजेतेपदाचा दुष्काळ शास्त्री यांना संपवता आला नाही. या अपयशी कामगिरीनंतरही टीम इंडियामध्ये उपखंडाच्या बाहेरील टेस्ट सीरिज जिंकण्याचा आत्मविश्वास निर्माण करणारे कोच म्हणून शास्त्रींचे योगदान कधीही नाकारता येणार नाही.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: