फोटो – ट्विटर/ICC

T20 क्रिकेट आणि आयपीएलमधून अनेक क्रिकेटपटू देशात उदयाला आले आहेत. तो देखील याच माध्यमातून टीम इंडियामध्ये आला. क्रिकेटच्या 22 यार्डामध्ये कॅप्टनचा मुख्य सैनिक असलेल्या त्यानं खरं तर 64 घरांचा राजा होण्यासाठी म्हणजेच चेस खेळण्यासाठी सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर तो क्रिकेटकडे वळला आणि तिथेच स्थिरावला. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधील एका मॅचमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणाऱ्या युजवेंद्र चहलचा आज वाढदिवस (Yuzvendra Chahal Birthday) आहे. आजच्याच दिवशी (23 जुलै 1990) चहलचा जन्म झाला.

चेस ते क्रिकेट

चहलनं चेस आणि क्रिकेट या दोन खेळामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तो 12 वर्षांच्या वयोगटातील राष्ट्रीय चॅम्पियन आहे. त्यानं ग्रीसमध्ये झालेल्या वर्ल्ड युथ चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तो वर्ल्ड चेस फेडरेशनचाही नोंदणीकृत सदस्य आहे. चेस खेळण्यासाठी पुढे स्पॉनसर मिळाले नाहीत म्हणून त्यानं या खेळात करिअर केले नाही. तो क्रिकेटकडं वळाला. आता फक्त एक छंद म्हणून चेस खेळतो.

मुंबई इंडियन्समध्ये सुरूवात

2009 साली झालेल्या कुचबिहार ट्रॉफी अंडर 19 स्पर्धेतून चहल पहिल्यांदा प्रसिद्धीस आला. त्या स्पर्धेत त्यानं 34  विकेट्स घेतल्या. त्याच वर्षी त्याने हरयाणाकडू फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. चहल आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीमचा मुख्य स्पिनर आहे. पण, त्याने त्याच्या आयपीएल करिअरची सुरुवात मुंबई इंडियन्समधून (MI) केली आहे. त्याला 2011 साली मुंबई इंडियन्सनं करारबद्ध केले होते.

चहल 2011 ते 2013 या काळात मुंबई इंडियन्सचा सदस्य होता. या तीन वर्षांमध्ये त्याला फक्त एक आयपीएल मॅच खेळण्याची संधी मिळाली. 2011 साली झालेल्या चॅम्पिन्स लीग स्पर्धेत मात्र तो नियमित खेळला. आरसीबी विरुद्ध झालेल्या त्या स्पर्धेच्या फायनलमध्ये चहलनं 9 रनमध्ये 2 विकेट्स घेत मुंबई इंडियन्सच्या विजेतेपदामध्ये योगदान दिले.

आरसीबीमध्ये प्रवेश आणि उत्कर्ष

आयपीएल 2014 मध्ये त्याला आरसीबीनं करारबद्ध केले. त्या आयपीएलचा सुरूवातीचा टप्पा युएईमध्ये झाला होता. युएईच्या पिचवर चहलनं (Yuzvendra Chahal Birthday) कमाल केली. त्यानंतर भारतीय पिचवर त्याची कामगिरी घसरली. मात्र तो पहिल्यांदाच आयपीएलचं संपूर्ण सिझन खेळला. विशेष म्हणजे त्याच आयपीएलमध्ये तो आरसीबी आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) नजरेत भरला.

आयपीएल 2014 (IPL 2014) मध्ये 12 विकेट्स घेणाऱ्या चहलनं पुढील आयपीएल सिझममध्ये (IPL 2015) आणखी चांगली कामगिरी करत 23 विकेट्स घेतल्या. बंगळुरुच्या बॅटींग पिचवर अर्ध्या मॅच खेळूनही चहलनं बॅट्समनला वारंवार जाळ्यात अडकवलं. आयपीएल 2016  मध्येही त्यानं 21 विकेट्स घेत या कामगिरीमध्ये सातत्य राखलं. या आयपीएलनंतर झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात त्याची पहिल्यांदा टीम इंडियामध्ये निवड झाली.

‘RCB मध्ये गेल्यानंतर काय जादू झाली?’ मॅक्सवेलनं सांगितलं रहस्य

चहलची भरभराट

झिम्बाब्वे दौऱ्यावर चहलनं दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार मिळवला. या दौऱ्यातील यशस्वी कामगिरीनंतर तो टीम इंडियाच्या लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधील सदस्य बनला. त्यानंतर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या चायनामन बॉलर बरोबर चहलची जोडी बनली. कुलदीप आणि चहल ही जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुलचा म्हणून प्रसिद्ध आहे.

चहलसाठी (Yuzvendra Chahal Birthday) 2017 हे वर्ष भरभराटीचं ठरलं. त्याच वर्षी इंग्लंड विरुद्ध झालेल्या T20 मॅचमध्ये त्यानं 6 विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय बॉलर आणि क्रिकेट विश्वातील पहिला लेग स्पिनर बनला. त्यावर्षी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर अश्विन-जडेजा या अनुभवी बॉलर्सची जागा कुलदीप-चहल जोडीनं घेतली. चहलनं 2017 साली आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेतल्या.

मुख्य स्पिनर

चहल मुळचा चेस प्लेयर असल्यानं त्याच्या डोक्यात बॉलिंग करताना योजना तयार असतात. तो प्रयोग करायला घाबरत नाही. एखादा सिक्सर पडल्यानंतरही खांदे न पाडता तो त्याच्या योजनेववर काम करतो. त्याच कारणामुळे तो वन-डे आणि टी20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा मुख्य स्पिनर बनला.

लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये मधल्या ओव्हर्समध्ये विकेट मिळवून देण्याचं तसंच जमलेली पार्टनरशिप तोडण्याचं काम चहलनं अनेकदा केलं आहे. वाढत्या T20 क्रिकेटमुळे लेग स्पिनर्सना अच्छे दिन आले. त्यांचं क्रिकेटमधील महत्त्व आणखी वाढलं. चहल देखील याच काळात टीम इंडियात आला, यशस्वी झाला आणि स्थिरावला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न वन-डेमध्ये त्यानं 6 विकेट्स घेतल्या मागील वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2019)  चहल टीम इंडियाचा नियमित सदस्य होता. त्याने 8 मॅचमध्ये 12 विकेट्स घेतल्या.

चहलची घसरण

कुलदीप यादव आणि चहल या जोडीची घसरण एकाच काळात सुरू झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhobi) स्टंपच्या मागून मिळणारं मार्गदर्शन बंद झालं आणि त्यांची कामगिरी घसरली असं मानलं जातं. याबाबतचे आकडे देखील तेच सांगतात.

फोटो – सोनी स्पोर्ट्स

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 18 जुलै 2021 रोजी झालेल्या मॅचमध्ये दाखवण्यात आलेलं हे ग्राफिक्स आहे. या ग्राफिक्सनुसार चहलनं धोनीसह खेळताना 46 वन-डेमध्ये 81 विकेट्स घेतल्या आहेत. धोनीशिवाय 9 वन-डेमध्ये त्याला फक्त 12 विकेट्स घेता आल्या आहेत. चहलची सरासरी आणि इकॉनॉमी रेट देखील धोनी नंतरच्या काळात घसरला आहे.

2 वर्षांपासून विचारत नाही कुणी, टीम इंडियाच्या बॉलरला आठवला महेंद्रसिंह धोनी!

चहलला खराब कामगिरीमुळे इंग्लंड विरुद्ध काही मॅचसाठी वगळण्यात आले होते. या आयपीएल स्पर्धेच्या पूर्वार्धातही (IPL 2021) चहलची कामगिरी निराशाजनक होती. श्रीलंका दौऱ्यात मुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये त्याला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. टीम इंडियातील जागेसाठी असलेली वाढती स्पर्धा पाहाता श्रीलंका दौरा आणि या नंतर होणारा आयपीएल सिझन चहलच्या करिअरसाठी (Yuzvendra Chahal Birthday) महत्त्वाचा आहे.   

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

    

error: