
तो वयाच्या 19 व्या वर्षी टीम इंडियात आला. त्याची तुलना ही थेट वर्ल्ड चॅम्पियन टीमचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीशी (MS Dhoni) करण्यात आली. त्याच्या वयात गल्ली क्रिकेटमध्येही खेळण्यासाठी झगडणारी मंडळी त्यानं पहिल्या मॅचपासून संपूर्ण भरातील महेंद्रसिंह धोनीसारखा खेळ करावा अशी अपेक्षा करत. तो भारतामध्ये खेळत असताना धोनी-धोनी अशी घोषणाबाजी देऊन त्याच्यावर दबाव वाढवला. जेमतेम विशी ओलांडलेल्या त्याचं करिअर संपलं अशी दवंडी पिटवण्यात आली. त्यानं रन काढले की ते फ्लूक आहेत किंवा बॉलर्स खराब होते. फिल्डिंग नीट लावली नाही, अशी लंगडी कारणं काहींनी दिली. आज ते सर्व आवाज बंद झाले आहेत. 2021 हे त्याच्यासाठी भलतच यशस्वी वर्ष ठरलं. खेळाची नैसर्गिक शैली न बदलता यशस्वी होता येतं हे त्यानं सिद्ध केलं. सर्व टीकारांचे दात घशाखाली घाणाऱ्या ऋषभ पंतचा (Rishabh Pant Birthday) आज वाढदिवस आहे. आजच्या दिवशी (4 ऑक्टोबर 1997) रोजी पंतचा जन्म झाला.
खेळासाठी भ्रमंती
ऋषभ पंतचा जन्म उत्तराखंडमधील हरिद्वारचा. लहानपणी क्रिकेट खेळण्यासाठी त्यानं आणि त्याच्या कुटुंबीयांनी बरीच भ्रमंती केली. तो रुरकीला गेला. त्यानंतर त्यानं दिल्ली गाठलं. दिल्लीत राहण्याची सोय म्हणजे गुरुद्वार. दिवसभर क्रिकेट खेळणाऱ्या पंतसह रात्री गुरुद्वारात राहता यावं म्हणून त्याची आई तिथं दिवसभर सेवा करत असे.
तारक सिन्हा हे पंतचे कोच राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे संचालक होते. त्यांच्या सल्ल्यानुसार तो राजस्थानत शिफ्ट झाला. तिथं फारसा रमला नाही. त्यामुळे पुन्हा दिल्लीत परतला. क्रिकेटसाठी भ्रमंती करणाऱ्या पंतचा खेळ कमालीचा सुधारत होता. त्यामुळे 2015 साली त्याला बंगाल विरुद्ध रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
सर्वजण म्हणाले, ‘वा पंत!’
गौतम गंभीर आणि मनोज तिवारी या टीम इंडियाकडून खेळलेल्या दोन खेळाडूंच्या वादामुळे गाजलेल्या रणजी मॅचमध्ये पंतनं प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या मॅचमधील दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं 57 रनची आक्रमक खेळी केली. त्यानंतर 2016 साली झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपसाठी त्याची टीममध्ये निवड झाली.
बांगलादेशमध्ये 2016 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं नेपाळ विरुद्ध 24 बॉलमध्ये 75 रनची खेळी केली. या वर्ल्ड कपच्या इतिहासातील ही सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी होती. त्यापाठोपाठ नामिबिया विरुद्ध सेंच्युरी झळकावली. संपूर्ण स्पर्धेत पंतनं 44. 50 च्या सरासरीनं 267 रन केले. बांगलादेशमधील स्लो पिचवरही त्याचा स्ट्राईक रेट हा 104.29 होता.
टीम इंडियाच्या त्या वर्ल्ड कपमधील फायनलमध्ये पराभव झाला. मात्र या स्पर्धेचा भारतीय क्रिकेटवर बराच सकारात्मक परिणाम झाला. याच वर्ल्ड कपमधून टीम इंडियाला ऋषभ पंत (Rishabh Pant Birthday) मिळाला. त्यानंतर झालेल्या आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) पंतला त्याच्या बेस प्राईसपेक्षा 19 पट जास्त रक्कम देऊन खरेदी केलं. आक्रमक बॅटींग आणि विकेट किपिंग यामुळे त्याची थेट महेंद्रसिंह धोनीशी तुलना होऊ लागली.
धोनीनं तरूणांना If he can, then I also can ही प्रेरणा दिली !
रणजी, IPL आणि टीम इंडिया
ऋषभ पंतला 2016 साली आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळाले. त्याच्यासाठी 2016 चा सिझन साधारण गेला. पण, त्या सिझनमध्ये त्यानं गुजरात लॉयन्स विरुद्ध 25 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. त्यानंतर महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी क्रिकेटच्या मॅचमध्ये 326 बॉलमध्ये 308 रनची आक्रमक खेळी त्यानं केली. त्यापाठोपाठ झारखंड विरुद्ध फक्त 48 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली.
आक्रमक बॅटींगनं देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या पंतनं 2017 साली इंग्लंड विरुद्ध T20 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. त्याच्याकडं पहिल्या मॅचपासूनच धोनीचा वारसदार म्हणून पाहण्यात आलं. त्यानं धोनीसारखीच सफाईदार विकेट किंपीग करावी. तसंच मैदानात शांत राहावं, तोंड उघडू नये असे बोधामृत त्याला पाजले जात होते.
पंतला (Rishabh Pant Birthday) पहिल्या T20 सीरिजमध्ये फार काही करण्याची संधी मिळाली नाही. पण, त्यानं 2017 ची आयपीएल गाजवली. त्यानं 14 मॅचमध्ये 165.61 च्या स्ट्राईक रेटनं 366 रन काढले. गुजरात लॉयन्सविरुद्ध 47 बॉलमध्ये 97 रनची झंझावती खेळी केली. आयपीएलच्या दहा सिझनमध्ये मी पाहिलेल्या सर्वोत्तम इनिंगपैकी एक, असं त्या इनिंगचं सचिन तेंडुलकरनं (Sachin Tedulkar) वर्णन केलं होतं.
दिल्लीचा कॅप्टन, टेस्ट टीममध्ये पदार्पण
नोव्हेंबर 2017 मध्ये ऋषभ पंतकडं फक्त 2 आंतरराष्ट्रीय T20 मॅचचा अनुभव होता. त्यावेळी अचानक दिल्ली या देशांतर्गत क्रिकेटमधील एका बड्या टीमचा त्याला कॅप्टन करण्यात आले. पाच फर्स्ट क्लास मॅचमध्ये त्यानं फक्त एक हाफ सेंच्युरी मारली. ‘पंतच शॉट सिलेक्शन खराब आहे.’ ही टीका त्याच्यावर या काळात सुरू झाली. त्याला सल्ला देणारे कोच सोशल मीडियावर तयार झाले होते. रणजी सिझन संपल्यानंतर दोन महिन्यांनीच पंतनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये फक्त 32 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली. तसंच चार सलग हाफ सेंच्युरी लगावल्या. त्यामुळे 2018 साली झालेल्या निदहास ट्रॉफी स्पर्धेत त्याची निवड झाली.
दिल्ली कॅपिटल्ससाठी 2018 चा आयपीएल सिझन निराशाजनक ठरला. त्यामध्येही ऋषभ पंत (Rishabh Pant Birthday) एकटा सर्व टीमविरुद्ध लढला. त्या सिझनमध्ये त्यानं आयपीएलमधील पहिली सेंच्युरी झळकावली. राशिद खान (Rashid Khan) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) या आयपीएलमधील दोन बेस्ट बॉलर्सची धुलाई करत 24 बॉलमध्ये 70 रन काढले. पंतनं 2018 च्या आयपीएलमध्ये 52.16 च्या सरासरीनं आणि 173.60 च्या स्ट्राईक रेटनं 684 रन काढले. तरीही इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियामध्ये एकाही प्रकारच्या टीममध्ये त्याची निवड झाली नाही.
टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याच्या काळात पंत इंडिया A च्या टीममधून इंग्लंडमध्ये गेला. त्या दौऱ्यात पंतनं सर्वांना प्रभावित केले. वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) जखमी झाल्यानंतर त्याला नॉटिंघम टेस्टमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्यानं टेस्ट क्रिकेटमधील खातं आदिल रशिदला सिक्स लगावत उघडलं.
इंग्लंड, ऑस्ट्रेलियात सेंच्युरी
ऋषभ पंतनं कारकिर्दीमधील कारकीर्दीतील तिसऱ्याच टेस्टमध्ये इंग्लंड विरुद्ध सेंच्युरी झळकावली. ओव्हलवर पाचव्या दिवशी 464 रनचा पाठलाग करताना त्यानं ही सेंच्युरी लगावली. केएल राहुलसोबत (KL Rahul) सहाव्या विकेटसाठी 204 रनची पार्टनरशिप केली. टेस्ट क्रिकेटमध्येही आपण यशस्वी होऊ शकतो, हे त्यानं दाखवून दिलं.
महेंद्रसिंह धोनीला कधीही जमलं नाही, ते ऋषभ पंतनं करुन दाखवलं!
इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी टेस्टमध्ये पंतनं नाबाद 159 रन काढले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशात टेस्ट क्रिकेटमध्ये सेंच्युरी झळकावणारा ऋषभ पंत (Rishabh Pant Birthday) हा पहिला (आणि आजवर एकमेव) भारतीय विकेट किपर बनला. या रेकॉर्डनंतरही टीम इंडियाच्या वन-डे टीममध्ये पंतला जागा नव्हती. 2019 च्या वर्ल्ड कप टीममध्ये (Cricket World Cup 2019) त्याची निवड झाली नाही.
चुका, टीका आणि टिंगल
ऋषभ पंत 2019 च्या वर्ल्ड कप टीममध्ये सुरुवातीला नव्हता. शिखर धवन जखमी झाल्यानंतर टीममध्ये आला. त्यापाठोपाठ विजय शंकर जखमी झाल्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये अंतिम 11 मध्ये आला. भारताची स्थिती 2 आऊट 5 अशी नाजूक असताना तो मैदानात आला. पुढे ती 4 आऊट 24 अशी बिकट बनली. पंत तरीही एका बाजूनं संयमी प्रतिकार करत होता. अखेर मिचेल स्टॅनरला मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाऊंड्री लाईनवर कॅच आऊट झाला. उतावीळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंतनं वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये आऊट होण्यापूर्वी 56 बॉलमध्ये 32 रन काढले होते.
महेंद्रसिंह धोनीनं वर्ल्ड कपनंतर क्रिकेट खेळणे थांबवले. त्यामुळे धोनीच्या जागी त्याची टीममध्ये निवड झाली. पंतच्या प्रत्येक कृतीची धोनीशी तुलना सुरू झाली. वेस्ट इंडिज विरुद्धच्या दौऱ्यात तो अपयशी ठरला. सात आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये त्यानं फक्त एक हाफ सेंच्युरी झळकावली.
टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) त्याच्या खेळावर जाहीर नाराजी व्यक्त केली. स्टंपच्या पुढे बॉल अडवण्याची चूक त्यानं केली. स्टंपिगच्या संधी दवडल्या. तो मैदानात खेळत असताना भारतीय प्रेक्षकांनीच ‘धोनी-धोनी’ हा गजर केला.
ऋषभ पंतसाठी 2019 हे साल निराशाजनक ठरले. 2020 च्या सुरुवातीला झालेल्या न्यूझीलंडच्या दौऱ्यातही तो अपयशी ठरला. टेस्ट आणि लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटच्या टीममधील जागा त्यानं गमावली. त्यातच कोरोना महामारी आली. सर्वच प्रकारचे क्रिकेट थांबले.
आयपीएल स्पर्धेनं (IPL 2020) स्पर्धात्मक क्रिकेट सुरू झाले. ऋषभ पंतवर वजन वाढल्याची टीका सुरू झाली. दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) यानं त्याच्यावर वेगळी जबाबदारी दिली. त्यामुळे त्यानं आक्रमक खेळाला मुरड घातली. त्याचा स्ट्राईक रेट कमी झाला. रन फारसे होत नव्हते. ‘पंत संपला, पंत वाया गेला’ अशी टीका करणाऱ्यांचे आवाज वाढले. आयपीएलनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला गेली. त्या दौऱ्यात पंतला लिमिटेड ओव्हर्सच्या टीममध्ये जागा मिळाली नाही. टेस्ट टीममध्येही तो राखीव विकेट किपर होता.
पंत फॉर्मात
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऋषभ पंतकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. त्यानं प्रॅक्टीस मॅचमध्ये एक सेंच्युरी झळकावली. तरीही टीम मॅनेजमेंटचा त्याच्यावर फारसा विश्वास नव्हता. अॅडलेड टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय टीम 36 रनवर ऑल आऊट झाली. त्यामुळे टीममध्ये बदल करताना मॅनेजमेंटला एकाच सेशनमध्ये खेळाचं चित्र बदलण्याची क्षमता असलेल्या पंतची आठवण झाली.
मेलबर्न टेस्टमध्ये त्यानं एक छोटीशी इनिंग खेळली. अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) सेंच्युरीमुळे भारतानं ती टेस्ट जिंकली. पंतला सिडनी टेस्टसाठी खेळण्याची संधी मिळाली. सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी कॅप्टन रहाणे आऊट झाल्यानंतर पंत बॅटींगला आला. त्यावेळी मॅच पूर्णपणे ऑस्ट्रेलियाकडं झुकली होती.
एकाच सेशनमध्ये टेस्ट मॅच कशी बदलते हे पंतनं त्यावेळी दाखवून दिलं. त्यानं ऑस्ट्रेलियन बॉलर्सवर प्रतिहल्ला चढवला. त्यामुळे ते बॅकफुटवर ढकलले गेले. पंतच्या 97 रनच्या खेळीचा ती टेस्ट ड्रॉ करण्यात महत्त्वाचा वाटा होता. भारतीय टीमला अडचणीतून त्यानं बाहेर काढलं. त्यानंतर ब्रिस्बेन या ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करताना पंतचा (Rishabh Pant Birthday) आत्मविश्वास वाढला होता. त्यानं ब्रिस्बेन टेस्टमध्ये शेवटच्या दिवशी नाबाद 89 रनची खेळी करत भारताच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केलं.
मायदेशात कमाल
ऑस्ट्रेलियातील फॉर्म घेऊनच पंत भारतामध्ये आला. इंग्लंड विरुद्ध चेन्नईत झालेली पहिली टेस्ट टीम इंडियानं गमावली होती. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सेंच्युरीमुळे दुसरी टेस्ट जिंकली. अहमदाबादमध्ये झालेली तिसरी टेस्ट पंतनं गाजवली. जेम्स अँडरसनचा समाचार घेत त्या टेस्टमध्ये पंतनं भारतामधील पहिली सेंच्युरी झळकावली. टीम इंडियाला सीरिजमध्ये आघाडी मिळवून दिली.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर लिमिटेड ओव्हर टीममध्ये पंत परतला. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या वन-डे मध्ये त्यानं पुन्हा एकदा पंत स्टाईल प्रतिहल्ला चढवत विजयात मोलाचा वाटा उचलला.
पंतच्या खेळात सुधारणा कशी झाली, कोच शास्त्रींनी सांगितले रहस्य
IPL कॅप्टन
दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल सीरिज (IPL 2021) सुरू होण्यापूर्वी धक्का बसला. त्यांचा कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये जखमी झाल्यानं आयपीएलमधून बाहेर पडला. टीम मॅनेजमेंटनं अनेक सिनिअर खेळाडूंना बाजूला करत पंतकडं कॅप्टनसी सोपवली.
भारतामध्ये झालेल्या पहिल्या आयपीएल सिझनमध्ये पंतनं शांतपणे कॅप्टनसीचं प्रेशर हातळलं. बॉलिंगमध्ये चांगले बदल करत दिल्लीच्या टीमला पॉईंट टेबलमध्ये टॉपवर ठेवलं. कोरोना ब्रेकनंतर चार महिन्यांनी आयपीएलचा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरू झाला. यावेळी श्रेयस अय्यर बरा होऊन टीममध्ये परतला होता. तरीही पंतकडेच कॅप्टनसी कायम ठेवण्यात आली. पहिल्या हाफमध्ये त्यानं केलेल्या चांगल्या कामाची ती पावती होती.
IPL 2021: ऋषभ पंतला टीम इंडियाच्या कॅप्टनसीच्या जवळ नेणारी स्पर्धा
ऋषभ पंत यूएईमध्ये सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्येही त्याच सहजतेनं कॅप्टनसीचं प्रेशर हाताळत आहे. त्याच्या बॅटींगमधील सकारात्मकता आणि आक्रमकता ही कॅप्टनसीमध्येही उतरली आहे. त्यामुळे तो विकेट कधी पडेल याची वाट बघत नाही. तर त्या संधी निर्माण करतो. बॉलर्सचा हुशारीनं वापरत करतो. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या मॅचमध्ये इयन मॉर्गनसाठी त्यानं अश्विनची एक ओव्हर शिल्लक ठेवली होती. मॉर्गन येताच त्यानं अश्विनच्या हातामध्ये बॉल दिला. अश्विननं फक्त 2 बॉलमध्ये मॉर्गनला दूर केलं.
दिल्ली कॅपिटल्सला आजवर एकदाही न मिळालेले आयपीएल विजेतेपद जिंकून देण्याची जबाबदारी कॅप्टन पंतच्या खांद्यावर आहे. त्यानंतर होणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्येही सध्या फॉर्मात नसलेल्या मिडल ऑर्डरला चालवण्याची पंतवर मोठी जबाबदारी आहे. क्रिकेटमध्ये इतके सारे चढ-उतार पाहिलेल्या पंतनं (Rishabh Pant Birthday) अजूनही वयाची पंचविशी गाठलेली नाही. तो भविष्यात टीम इंडियाचा कॅप्टन होईल असं मत अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. T20 वर्ल्ड कपनंतर तो या प्रकारात टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन होऊ शकतो. टीम इंडियाच्या जनरेशन नेक्स्टच्या सुपरस्टारला भविष्यात कॅप्टन करण्यासाठी टीम मॅनेजमेंटनं उचलेलं हे पहिलं पाऊल असेल.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.