फोटो – सोशल मीडिया

सुरेश रैना (Suresh Raina) हा लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधील टीम इंडियाचा निर्विवाद स्टार आहे. वयाच्या 18 व्या वर्षी टीम इंडियात पदार्पण करणाऱ्या रैनानं वन-डे आणि T20 या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये स्वत:चा ठसा उमटवला आहे. आयपीएल स्पर्धेतील त्याच्या सातत्यामुळे ‘मिस्टर आयपीएल’ ही पदवी देखील त्याला देण्यात आली. टीममधील प्रत्येक खेळाडूचं यश हे आपलं वैयक्तिक यश आहे, या थाटात नेहमी सेलिब्रेशन करणाऱ्या रैनाचा मैदानातील वावर क्रिकेट फॅन कधीही विसरणार नाही. क्रिकेटमधील ‘यारों का यार’ असलेल्या रैनानं त्याच्या जिवलग मित्रासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. सुरेश रैनाचा आज वाढदिवस (Suresh Raina Birthday) आहे. आजच्याच दिवशी (27 नोव्हेंबर 1986) रोजी रैनाचा जन्म झाला.

लवकर पदार्पण

सुरेश रैना उत्तर प्रदेशातील हॉस्टेलमध्ये शिकला. हॉस्टेलमधील सिनिअर खेळाडूंचे कपडे धुणे, त्यांची सर्व काम करणे, टोकाचे रॅगिंग सहन करणे या सर्व गोष्टी त्यानं बालपणी अनुभवल्या आहेत. त्याचवेळी त्याच्या क्रिकेट कौशल्याचा विकास देखील झपाट्यानं झाला.

रैनाची वयाच्या 16 व्या वर्षी टीम इंडियाच्या अंडर 19 टीममध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली. अंबाती रायुडू (Ambati Rayudu) आणि इराफान पठाण (Irfan Pathan) हे त्याचे टीम इंडियातील भविष्यातील सहकारी त्या टीमचे सदस्य होते. 16 व्या वर्षी इंग्लंडच्या अंडर 19 टीमविरुद्ध खेळलेल्या पहिल्याच टेस्टमध्ये त्यानं 72 रनची खेळी केली.

अंडर 19 टीमकडून जोरदार स्ट्राईक रेटसह सातत्यानं रन काढणाऱ्या सुरेश रैनाची वयाच्या 18 व्या वर्षीच टीम इंडियात निवड झाली. राहुल द्रविड (Rahul Dravid) हा तेव्हा टीम इंडियाचा कॅप्टन होता, तर ग्रेग चॅपेल (Greg Chappell) हे तेंव्हा टीम इंडियाचे हेड कोच होते. द्रविड-चॅपेल यांच्या भविष्यकालीन योजनेतील रैना मुख्य़ खेळाडू (Suresh Raina Birthday) होता.

राहुल द्रविडच्या 48 अद्भुत गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

सुरुवातीला सेटबॅक

सुरेश रैनाचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण निराशाजनक झाले. श्रीलंकेविरुद्धच्या वन-डेमध्ये मुरलीधरननं त्याला पहिल्या बॉलवर आऊट (Golden Duck) केले. सुरेश रैनाच्या पहिल्या काही वन-डे बॅटर म्हणून साधारण गेल्या. पण तो फिल्डिंगमध्ये योगदान देत होता. पण तितकं ते पुरेसं नव्हतं. अखेर 2006 साली फरिदाबादमध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या वन-डेमध्ये रैनाला ती संधी मिळाली.

इंग्लंडनं दिलेल्या 227 रनचा पाठलाग करण्यासाठी 19 वर्षांचा रैना मैदानात उतरला त्यावेळी टीम इंडियाची अवस्था 4 आऊट 80 होती. रैनाची ती आठवी वन-डे इनिंग होती. रैना मैदानात स्थिरावण्यापूर्वीच युवराज सिंग देखील आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था 5 आऊट 92 अशी नाजूक झाली. त्यावेळी रैनानं 89 बॉलमध्ये नाबाद 81 रन काढत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रैनाचा जिवलग मित्र आणि भविष्यात कॅप्टन झालेल्या महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni)  त्या मॅचमध्ये 38 रन करत त्याला भक्कम साथ दिली होती.

धोनीनं तरूणांना If he can, then I also can ही प्रेरणा दिली!

रैनाला या खेळीनंतर पुढील काळात सातत्य राखता आले नाही. त्याचबरोबर 2007 साली झालेल्या दुखापतीमुळे त्याची टीममधील जागा देखील गेली. रैनाच्या करिअरसाठी तो सेटबॅक होता.

गोल्डन जनरेशन प्लेयर

सुरेश रैनाला (Suresh Raina Birthday) 2008 साली आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीममध्ये निवड झाली. तोपर्यंत टीम इंडियाचा कॅप्टन झालेला धोनीच CSK टीमचा कॅप्टन होता. रैनानं पहिल्या आयपीएल सिझनमध्ये चेन्नईकडून सर्वात जास्त 421 रन काढले. या खेळामुळे त्यानं टीम इंडियात पुनरागमन केले. रैनाच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात चांगल्या काळाला त्यावेळी सुरुवात झाली.

वन-डे क्रिकेटमध्ये त्यावेळी टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमध्ये दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. पण वन-डे टीममधील अगदी मोक्याची अशी 6 नंबरची जागा रैनाची होती. त्या नंबरवर बॅटींग करत फिनिशरचं काम त्यानं सातत्यानं पार पाडलं. तो चपळ फिल्डर तर होताच. विशेषत: 30 यार्ड सर्कलमध्ये त्याची फिल्डिंग अधिक भेदक आहे. त्याचबरोबर कॅप्टन धोनीनं त्याच्या स्पिन बॉलिंगचाही हुशारीनं वापर केला. 2008 ते 2011 या काळात टीम इंडियानं वन-डे क्रिकेटमध्ये अनेक संस्मरणीय विजय मिळवले. 2011 साली मिळवलेलं वर्ल्ड़ कप विजेतेपद (Cricket World Cup 2011) हे या यशस्वी कामगिरीचे शिखर होते. या सर्व वाटचालीत रैनाचा वाटा अत्यंत महत्त्वाचा होता.

वर्ल्ड कप विजयाचा हिरो

2011 च्या वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीच्या काळात धोनीनं रैनाच्या ऐवजी युसूफ पठाणला पसंती दिली. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मॅचमध्ये सेहवाग अनफिट असल्यानं रैनाला पहिल्यांदा संधी मिळाली. टीम इंडियाची क्वार्टर फायनलमध्ये लढत ऑस्ट्रेलियाशी होती. या मॅचमध्ये धोनीनं रणनीतीमध्ये बदल करत पठाणच्या जागी रैनाची प्लेईंग 11 मध्ये निवड केली. धोनीचा हा निर्णय टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयासाठी उपयुक्त ठरला.

2011 पूर्वीचे 3 वर्ल्ड कप सलग जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया टीमविरुद्धची भारताची क्वार्टर फायनल चांगलीच रंगतदार झाली. टीम इंडियासमोर 261 रनचं आव्हानात्मक टार्गेट होतं. ठराविक अंतरानं विकेट्स पडत असल्यानं टीमची अवस्था 5 आऊट 187 अशी झाली होती. त्यावेळी त्या वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या युवराजला साथ देण्यासाठी रैना आला. रैनानं 28 बॉलमध्ये 34 रनची मॅचचं चित्र पालटणारी खेळी केली. त्यानं युवराजच्या मदतीनं विजयावर शिक्कामोर्तब करत टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहचवंलं.

वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडियाची लढत पाकिस्तान (India vs Pakistan 2011 World Cup Semi Final) विरुद्ध होती. हाय प्रेशर सेमी फायनलमध्ये रैनानं शेवटपर्यंत नाबाद राहात 36 रनची उपयुक्त खेळी केली. रैनाच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 260 रन करता आले. भारतानं सेमी फायनल 29 रननं जिंकली त्यावरुन रैनाच्या 36 रनच्या खेळीचे महत्त्व (Suresh Raina Birthday) लक्षात येते.

टेस्टमध्ये मर्यादा

सुरेश रैनाला 98 वन-डे खेळल्यानंतर जुलै 2010 मध्ये श्रीलंकेत टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. रैनानं पहिल्याच टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली. रैनाच्या सेंच्युरीमुळेच टीम इंडियाला श्रीलंकेचा 642 रनचा विशाल स्कोअर पार करता आला. त्याचबरोबर वन-डे, T20 आणि टेस्ट या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सेंच्युरी करणारा रैना हा पहिला भारतीय बनला.  

रैनाचे टेस्ट करिअर हे अन्य दोन करिअर इतके बहरले नाही. त्याला संपूर्ण करिअरमध्ये शॉर्ट बॉल फोबियाचा सामना करावा लागला. इंग्लंडमधील टेस्ट सीरिजमध्ये रैनाच्या बॅटींगमधील मर्यादा उघड्या पडल्या. त्यामुळे त्याची टेस्ट कारकिर्दही मर्यादीत ठरली.

कॅप्टन रैना

रैनाच्या ‘क्रिकेट ब्रेन’ ला नेहमीच सर्वांनी दाद दिली आहे. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धीपेक्षा एक पाऊल पुढे विचार करण्याचे रैनाचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे त्याला वयाच्या 23 व्या वर्षीच टीम इंडियाच्या वन-डे टीमची कॅप्टनसी करण्याची संधी मिळाली. झिम्बाब्वे दौऱ्यावर 2010 साली गेलेल्या टीम इंडियाच्या यंगिस्तानचा तो कॅप्टन होता. रैनाच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं ती सीरिज जिंकली.

2011 साली वेस्ट इंडिज दौऱ्यातील वन-डे आणि टी20 सीरिजसाठी कॅप्टन धोनीला विश्रांती देण्यात आली होती. व्हाईस कॅप्टन सेहवाग जखमी होता. नियोजित कॅप्टन गौतम गंभीरही दौऱ्यापूर्वी जखमी झाल्यानं रैनानं टीमची कॅप्टनसी सांभळत (Suresh Raina Birthday)  टीमला विजय मिळवून दिला. त्या दौऱ्यात त्यानं वेस्ट इंडिज क्रिकेटमधील अनेक दिग्गजांना कॅप्टनसीनं प्रभावित केले होते. 2014 साली बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या तरुण टीमचाही रैना कॅप्टन होता. गुजरात लायन्स (Gujrat Lions) या आयपीएल टीमचं रैनानं 2 वर्ष नेतृत्त्व केलं. त्यापैकी एकदा गुजरातच्या टीमनं ‘प्ले ऑफ’ मध्ये धडक मारली होती.

रैनाची घसरण

सुरेश रैना 2015 साली झालेल्या वर्ल्ड कप टीमचा सदस्य होता. त्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं झिम्बाब्वे विरुद्ध सेंच्युरी झळकावत टीम इंडियाला संकाटातून बाहेर काढलं आणि विजय मिळवून दिला. त्यानंतरच्या काही वन-डे सीरिजमध्ये त्याला फार रन करता आले नाहीत. त्यामुळे त्यानं टीम इंडियातील जागा गमावली.

तो T20 क्रिकेटमध्ये काही काळ खेळला. पण 2016-17 च्या काळात केदार जाधव, मनिष पांडे, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या या तरुण खेळाडूंचा उदय झाल्यानं रैनाला T20 मधील जागाही गमावावी लागली. त्यातच फर्स्ट क्लास मॅच न खेळत असल्याचा फटकाही त्याला बसला. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतरही 2018 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या T20 सीरिजमध्ये त्याची निवड झाली. त्या स्पर्धेत समाधानकारक कामगिरीमुळे निदहास ट्रॉफी आणि इंग्लंड दौऱ्यातही रैना खेळला.

या सीरिजमध्ये त्याला त्याच्या दर्जाला साजेशी कामगिरी करता आली नाही. फिटनेसची समस्या आणि वाढलेलं वजन या गोष्टी रैनासाठी डोकेदुखी होत्या. त्यामुळे त्याला पुन्हा टीममधून वगळण्यात आले. 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपसाठी त्याचा विचार करण्यात आला नाही. त्यानंतर वर्षभराने 15 ऑगस्ट 2020 या दिवशी त्यानं महेंद्रसिंह धोनीपाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली.

Cricket World Cup 2011: वर्ल्ड चॅम्पियन सध्या काय करतात?

मिस्टर आयपीएल

सुरेश रैनाची क्रिकेट कारकिर्द आयपीएल क्रिकेटमधील त्याच्या योगदानाचा आढावा घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. कित्येत वर्ष कॅलेंडरमधील एप्रिल आणि मे हे दोन आयपीएलचे महिने हे रैनाचे होते. त्यानं कित्येक सिझन सातत्यानं 400 पेक्षा जास्त रन आयपीएल स्पर्धेत केले. आयपीएलमधील त्याच्या या योगदानामुळे त्याची मिस्टर आयपीएल अशी ओळख (Suresh Raina Birthday) आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) यशस्वी वाटचालीत त्याचं योगदान मोठं आहे. चेन्नईच्या फॅन्सनी रैनावर मनापासून प्रेम केलं. त्याला ‘चिन्ना थाला’ ही पदवी दिली. चेन्नईच्या पहिल्या आयपीएल विजेतेपदात 2010 साली मुंबई इंडियन्स विरुद्ध फायनलमध्ये रैनाचे मोठे योगदान होते. त्यानं चेन्नईकडून तिसऱ्या क्रमांकावर सातत्यानं एकाहून एक सरस अशा मॅच विनिंग खेळी केल्या.

किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध 2014 साली 227 रनचा पाठलाग करताना रैनानं त्याच्या आयपीएल कारकिर्दीमधील सर्वात संस्मरणीय इनिंग खेळली. त्यानं फक्त 25 बॉलमध्ये 87 रन काढले. यामध्ये 12 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. रैनाच्या या आक्रमक खेळीमुळे CSK नं सहाव्या ओव्हरमध्येच 100 रनचा टप्पा पूर्ण केला होता. रैनाला त्या मॅचमध्ये आऊट करणे पंजाबच्या एकाही बॉलरला जमत नव्हते. अखेर तो दुर्दैवी रित्या रन आऊट झाला.

सुरेश रैनानं आयपीएल स्पर्धेत 5 हजार पेक्षा जास्त रन केले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये रैनाच्या आयपीएल कारकिर्दीलाही ग्रहण लागले आहे. IPL 2020 मध्ये त्यानं शेवटच्या टप्प्यात घेतलेली माघार चांगलीच गाजली. या आयपीएलमध्ये रैना परतला पण त्याला नेहमीचा सूर सापडलाच नाही. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात त्याला टीममधून वगळण्यात आले. सीएसकेच्या टीममधून रैनाला वगळण्याची कल्पनाही काही वर्षांपूर्वी कुणी केली नसेल, पण हे प्रत्यक्षात घडलं. अगदी सेमी फायनल आणि फायनलमध्येही रैना बेंचवर होता.

सुरेश रैनानं सांगितलं IPL मधील माघारीचं कारण, पबमधील रात्रीबाबतही दिलं स्पष्टीकरण!

आता पुढील सिझनपूर्वी (IPL 2022) मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे सर्व टीमची रचना बदलणार आहे. रैनाला CSK रिटेन करण्याची शक्यता अगदीच नाममात्र आहे. त्यामुळे रैना आता पहिल्यांदाच त्याच्या आवडत्या CSK विरुद्ध आयपीएलमध्ये खेळणार की त्यापूर्वी IPL मधून रिटायर होणार हे काही दिवसांमध्ये (Suresh Raina Birthday) स्पष्ट होणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: