फोटो – ट्विटर, सीएसके फॅन्स आर्मी

‘First They ignore you, then they laugh at you, then they fight you, then you win’. ESPN Cricinfo या आघाडीच्या क्रिकेट वेबसाईटवर रवींद्र जडेजाच्या प्रोफाईलची सुरुवात महात्मा गांधींच्या जगप्रसिद्ध वाक्याने होते. जडेजाच्या क्रिकेट कारकिर्दीचं हे सार्थ वर्णन आहे. घराच्या गरिबीनं अनुभवलेलं दुर्लक्ष, सुरुवातीच्या क्रिकेट काळात झालेले ट्रोलिंग, धोनीचा माणूस म्हणून वाद आणि नंतर गेल्या काही वर्षांमधील सातत्यामुळे जगभरात आदराने घेतले जाणारे नाव हा सर्व प्रवास त्यानं अनुभवला आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर, योद्धा क्रिकेटर असलेल्या रवींद्र जडेजाचा आज वाढदिवस (Ravindra Jadeja Birthday) आहे. आजच्याच दिवशी (6 डिसेंबर 1988) रोजी जडेजाचा जन्म झाला.

सुरक्षा रक्षकांचा मुलगा

जडेजाचं घराणं राजघरण्यातील असलं तरी त्याच्या घरात गरिबीच होती. त्याचे वडील जामनगरच्या ‘रॉयल स्पोर्ट्स ऑफ क्रिकेट’ य़ा क्लबचे सुरक्षा रक्षक होते. सौराष्ट्रच्या या क्लबला क्रिकेटची मोठी परंपरा आहे. जडेजाचे वडील त्याला फावल्या वेळात त्या क्लबमध्ये नेत. जडेजासाठी क्रिकेट हा फावल्या वेळात खेळण्याचा उद्योग नव्हता. तर घरातीस परिस्थितीमुळे जे मिळत नाही ते सर्व विसरण्याचे माध्यम होते.

जडेजानं याच क्लबच्या मैदानावर बॅटींग बॉलिंग आणि फिल्डिंग या क्रिकेटच्या सर्व प्रकाराच्या प्रशिक्षणासाठी घाम गाळला आहे. त्यानं आर्मी स्कुलमध्ये जावं अशी वडिलांची इच्छा होती. पण, आईने जडेजाची क्रिकेटची आवड जपली. जडेजा आईच्या अगदी जवळ होता. आईचा वियोग लहान वयात झाल्यानं कोसळून पडला. क्रिकेट सोडण्याचा त्याचा विचार होता. त्यावेळी मोठ्या बहिणीनं आईचं छत्र त्याच्या डोक्यावर धरलं. आधी आई आणि नंतर बहीण खंबीरपणे पाठिशी उभारल्यानंच आपल्याला आजचा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja Birthday) मिळाला.

भारतीय टीमच्या भव्य इमारतीचे घाव सोसणारा पाया!

दोन अंडर 19 वर्ल्ड कप आणि राजस्थान रॉयल्स

दोन अंडर 19 वर्ल्ड कप खेळलेल्या मोजक्या भारतीय क्रिकेटपटूंपैकी जडेजा एक आहे. त्याची 2002 साली सौराष्ट्राच्या अंडर 19 टीममध्ये निवड झाली. महाराष्ट्राविरुद्धच्या पदार्पणातील मॅचमध्ये जडेजानं 87 रन काढले आणि 4 विकेट्स घेतल्या. अंडर 15 गटातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याची लवकरच सौराष्ट्राच्या अंडर 19 टीममध्ये निवड झाली. वयाच्या 16 व्या वर्षीच त्याला अंडर 22 टीममध्ये जागा मिळाली.

रणजी पदार्पणाच्या जवळ गेलेल्या जडेजाची 2006 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली. त्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 तर फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध 16 रन देत 3 विकेट्स घेतल्या. फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. जडेजा त्यानंतरची दोन वर्ष फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत होता.

मलेशियात 2008 साली झालेल्या अंडर 19  वर्ल्ड कपमध्ये त्याची निवड होणे हे स्वाभाविक होते. त्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं 10 विकेट्स घेत टीम इंडियाच्या विजेतेपदामध्ये योगदान दिले विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja Birthday) या दोघांच्याही सुरुवातीच्या कारकिर्दीमधील तो महत्त्वाचा टप्पा होता.

159 रन करुनही विराट कोहलीच्या टीमनं जिंकला होता वर्ल्ड कप

2008 च्या अंडर 19 वर्ल्ड कपनंतर लगेच आयपीएल स्पर्धेला सुरूवात झाली. जडेजाला शेन वॉर्न (Shane Warne)  कॅप्टन असलेल्या राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) खरेदी केलं. वॉर्नच्या टीमनं सर्वांना चकवत आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये (IPL 2008) विजेतेपद पटकावले. राजस्थानच्या यशात जडेजाच्या मिडल ऑर्डरमधील स्मार्ट बॅटींग आणि चपळ फिल्डिंगचा मोठा वाटा होता. शेन वॉर्न जडेजाच्या खेळानं भलताच प्रभावित झाला होता. वॉर्नने त्याला ‘रॉकस्टार’ ही पदवी दिली.

अपयशी कालखंड

जडेजाची 2009 साली टीम इंडियात निवड झाली. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन-डेमध्ये त्याने 60 रन काढले. त्याच वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या T20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये जडेजा निवडला गेला. या वर्ल्ड़ कपपासून त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा खडतर काळ सुरू झाला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये त्याच्या बॉलिंगवर सलग 6 सिक्स लगावण्यात आले.

पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या तीन बॉलवर शेन वॉटसननं तर दुसऱ्या ओव्हर्सच्या पहिल्या तीन बॉलवर डेव्हिड वॉर्नरनं त्याला सलग तीन सिक्स लगावले होते. जडेजासाठी वर्ल्ड कप साधारण जात होता. तरीही कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा जडेजावर विश्वास होता. इंग्लंड विरुद्धच्या टीम इंडियासाठी ‘करो वा मरो’ मॅचमध्ये टीम इंडियाला विजयासाठी 154 रन हवे होते.

शेवटपर्यंत हार न मानलेला ‘जखमी योद्धा’

धोनीने जडेजाला फटकेबाजी करण्यासाठी सिक्सर किंग युवराजच्या आधी पाठवले. फटकेबाजी करण्यासाठी पाठलेला जडेजा लॉर्ड्सवरील त्या मॅचमध्ये बॅटींग करताना अक्षरश: ब्लॉक झाला होता. तो रनही काढत नव्हता आणि आऊटही होत नव्हता. अखेर 35 बॉलमध्ये 25 रन काढून जडेजा परतला. भारताने ती मॅच फक्त 3 रननं गमावली. टीम इंडिया सेमी फायनलच्या आत वर्ल्ड कपच्या बाहेर गेली. भारतीय टीमच्या अपयशी कामगिरीचं बिल जडेजावर (Ravindra Jadeja Birthday) फाटलं.

त्याचवर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध हैदराबादमध्ये वन-डे होती. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करत 351 चं टार्गेट ठेवलं. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) त्या दिवशी भन्नाट टचमध्ये होता. सचिन आणि जडेजा ही जोडी एकत्र आली. त्यानंतर सर्व बॉलर्स असल्यानं जडेजानं फक्त सचिनला साथ देण्याची गरज होती. 16 बॉलमध्ये 23 रन करत जडेजा ते काम चोख करत होता. त्याचवेळी एक रन विनाकारण घेण्याच्या नादात तो रन आऊट झाला.

ऑस्ट्रेलियाला मॅचमध्ये परत येण्याची संधी मिळाली. सचिनच्या 175 रननंतरही भारताने ती मॅच फक्त 3 रनने गमावली. 2010 साली मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) नियमबाह्य वाटाघाटी करताना जडेजा पकडला गेला. त्यामुळे त्याच्यावर आयपीएल खेळण्यास एक वर्षाची बंदी घालण्यात आली.

सर रवींद्र जडेजा, धोनी आणि विराटनंतर खास रेकॉर्ड करणारे तिसरे भारतीय!

3 ट्रिपल सेंच्युरी

जडेजानं 2008 साली ओडिशा विरुद्ध खेळताना नाबाद 232 रनची खेळी केली. त्या मॅचमध्ये त्याने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सोबत पाचव्या विकेट्ससाठी नाबाद 520 रनची पार्टनरशिप केली. चार वर्षांनी गुजरात विरुद्ध सागर जोगयानीसोबत त्याने 539 रनची पार्टनरशिप केली. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दोन वेळा 500 रनचा पार्टनरशिप केलेला जडेजा हा फ्रँक वॉरेलनंतरचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला.

जडेजासाठी 2009 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट निराशाजनक ठरत होते. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याची निवड झाली नाही. त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती कसर भरुन काढली. नोव्हेंबर 2011 मध्ये ओडिशा विरुद्ध 314, नोव्हेंबर 2012 मध्ये गुजरात विरुद्ध 303 आणि डिसेंबर 2012 मध्ये रेल्वे विरुद्ध 312 अशा रणजी क्रिकेटमध्ये तीन ट्रिपल सेंच्युरी जडेजानं झळकावल्या.

ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आहे. डॉन ब्रॅडमन, WG ग्रेस, वॉली हॅमंड, ब्रायन लारा, माईक हसी या दिग्गजांच्या यादीत जडेजानं (Ravindra Jadeja Birthday)  वयाच्या 23 व्या वर्षीच जागा मिळवली. या कामगिरीमुळे त्याचे ट्रोलिंग होत असले तरी टीम इंडियाच्या टेस्ट टीमसाठी त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हे अशक्य बनले होते.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरुवात

जडेजानं इंग्लंड विरुद्ध डिसेंबर 2012 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतरच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यानं स्वत:ला खऱ्या अर्थाने पहिल्यांदा सिद्ध केले. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकल क्लार्कने (Michael Clarke) त्या सीरिजमध्ये सेंच्युरी आणि 91 रन करत दमदार सुरूवात केली होती.

भारतीय टीमविरुद्ध तगडा रेकॉर्ड असलेला क्लार्क पुन्हा एकादा ढिगानं रन काढण्यासाठी सज्ज झाला होता. क्लार्कला त्या सीरिजमध्ये जडेजा नडला. जडेजानं क्लार्कला 3 टेस्टमध्ये 5 वेळा आऊट केले. 4 वर्षांपूर्वी ज्या ऑस्ट्रेलियन टीम विरुद्धच्या मॅचमध्ये सलग 6 सिक्स बसले होते. त्याच टीमविरुद्ध एका सीरिजमध्ये त्यानं 25 विकेट्स घेतल्या.

2013 साली इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यानं आणखी एक चार वर्षांपूर्वीचा हिशेब चुकता केला. जडेजानं (Ravindra Jadeja Birthday) त्या स्पर्धेत टीम इंडियाकडून सर्वात जास्त 12 विकेट्स घेतल्या. इंग्लंड विरुद्ध पावसामुळे 20 ओव्हर्सच्या झालेल्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत नाबाद 33 रन काढले. जोस बटलरला पहिल्याच बॉलवर आऊट करत टीम इंडियाच्या विजेतेपदावर आणि स्वत:च्या ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारावर शिक्कामोर्तब केले.

टीम इंडियाच्या शेवटच्या ICC ट्रॉफी विजेतेपदाचा शिल्पकार

जडेजाचा धडाका

टीम इंडिया 2014 साली इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. त्या सीरिजच्या दुसऱ्या टेस्टच्या दरम्यान जेम्स अँडरसनने त्याला धक्का दिला. धोनीनं या प्रकरणाची तक्रार केली. अँडरसन त्यामध्ये सुटला, पण वाद वाढला होता. त्यानंतरची तिसरी टेस्ट लॉर्ड्सवर होती.

टीम इंडियाची दुसऱ्या इनिंगमध्ये 6 आऊट 179 अशी बिकट अवस्था होती. त्यावेळी जडेजा बॅटींगला आला. त्यावेळी जडेजा बॅटींगला आला. अँडरसनने त्याला प्रत्येक बॉलवर टार्गेट केले. जडेजानं कधी चुकत असे पण बॉल टप्प्यात आला की भिरकावून द्यायलाही तो विसरला नाही. जडेजामधील ‘योद्धा क्रिकेटर’ जागा झाला होता. अँडरसनच्या आव्हानाला भीक न घालता हाफ सेंच्युरी पूर्ण केली. जडेजानं हाफ सेंच्युरीनंतर बॅट तलवारीसारखी फिरवत सेलिब्रेशन केले. त्यानंतरच्या काळात जडेजाचे (Ravindra Jadeja Birthday) हे ट्रेडमार्क सेलिब्रेशन बनले. जडेजाच्या हाफ सेंच्युरीचा लॉर्ड्स टेस्ट जिंकण्यात मोठा वाटा होता.

2015 साली जडेजाचा फॉर्म हरपला होता. त्यामुळे त्यानं टीम इंडियातील जागा गमावली. त्याला पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी सांगण्यात आले. पुढील 4 मॅचमध्ये जडेजानं 91 आणि 11, 72 आणि 58, 13 आणि 126, 13 आणि 135 रन करत उत्तर दिलं. जडेजानं त्याची टेस्ट टीममधील जागा पुन्हा मिळवली. त्यानंतर त्याची ती जागा पक्की झाली. हल्ली विदेशात अश्विनच्या आधी जडेजाची निवड होते.

Bits and Pieces

महेंद्रसिंह धोनीनं कॅप्टनसी सोडल्यानंतर विराट टीमचा कॅप्टन झाला. धोनीचा माणूस म्हणून त्याची होणारी हेटाळणी करणे आता शक्य नव्हते. विराटच्या टीममध्येही त्याची जागा फिक्स बनली. आक्रमक बॅटर, उपयुक्त बॉलर आणि हुशार फिल्डर असलेला जडेजा कोणत्या कॅप्टनसाठी मौल्यवान आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये तो अश्विनचा भक्कम जोडीदार बनला आहे. भारतीय पिचवर टीम इंडियाचा सध्याचा मजबूत किल्ला तयार करण्यात जडेजा-अश्विनचा वाटा आहे.

चॅम्पिन्स ट्रॉफी 2017 मध्ये झालेल्या पराभवानंतर जडेजाची टीम इंडियातील जागा गेली. चहल-कुलदीपचा उदय झाला. संजय मांजेरकरनं 2019 च्या वर्ल्ड कपच्या दरम्यान Bites and Pieces क्रिकेटर म्हणून जडेजाची हेटाळणी केली होती. जडेजानं बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तीन्ही कौशल्याच्या जोरावर टीम इंडियातील जागा मिळवली.

इंग्लंडमध्ये 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये जडेजा सुरुवातील 12 वा खेळाडू म्हणूम खेळला. त्यामुळे त्याची फिल्डिंगमधील कमिटेमेंट कुठेही कमी झाली नाही. वर्ल्ड कप सेमी फायनलपूर्वीच मांजरेकरनं त्याच्या विरुद्ध गरळ ओकली. जडेजानं सेमी फायनलमध्ये सारी टॉप ऑर्डर कोसळली असताना एकाकी झुंज दिली. जडेजाचा धडाका जबरदस्त होता. पण अखेर बॉल आणि रनचं वाढत चालेलं अंतर कमी करण्याच्या दबावात तो आऊट झाला. जडेजानं (Ravindra Jadeja Birthday) झुंजार खेळी करत मांजेरकरला उत्तर दिले होते. त्याचबरोबर त्यानं ट्विटरवरही त्याची धुलाई केली.

योद्धा क्रिकेटर

रवींद्र जडेजा आता तिन्ही प्रकारातील टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. त्यानं बॅटींग देखील अधिक गांभिर्यानं करण्यास सुरुवात केली आहे.  गेल्या 2 वर्षांमध्ये विराट, अजिंक्य आणि पुजारा या मिडल ऑर्डरनं सातत्यानं निराशा केल्यानंतरही जडेजानं टीम इंडियाला अनेकदा संकटातून बाहेर काढले आहे. त्याच्या बॅटींगमुळेच टेस्ट टीममध्ये 5 बॉलर्स खेळवणे शक्य झाले आहे.

आयपीएल स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) भावी कॅप्टन म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. चेन्नईनं यावर्षी आयपीएल स्पर्धा जिंकली.या विजेतेपदात जडेजाचं जबरदस्त योगदान होते. पुढील सिझनसाठी CSK ने त्याला धोनीपेक्षा जास्त किंमत देऊन करारबद्ध केले आहे.

सुरुवातीच्या काळात सातत्याने हेटाळणी झालेल्या जडेजानं त्याच्या खेळातील चुकांवर मात करत स्वत:मध्ये सुधारणा करत स्वत:ला सिद्ध केले आहे. संघर्षातून सुपरस्टार झालेला रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja Birthday) हा टीम इंडियाचा ‘योद्धा क्रिकेटर’ आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

  

error: