
श्रीलंकेत 2018 साली निदहास ट्रॉफीची फायनलमध्ये (Nidahas Trophy Final) फायनलमध्ये बांगलादेशच्या अक्षरश: तोंडात विजेतेपदाचा घास गेला होता. शेवटच्या बॉलवर टीम इंडियाला विजयासाठी 5 रनची आवश्यकता होती. विकेट किपर-बॅट्समन स्ट्राईकवर होता. तो चुकला असता तर बांगलादेशला विजेतेपद मिळाले असते. त्यांनी त्या सीरिजमध्ये पूर्वी नागिन डान्स केला होता. फायनलमध्ये ते देखील टीम इंडियाला हरवून त्यांनी विजेतेपद जिंकले असते तर कदाचित नागडा डान्स केला असता. त्या विकेट किपर बॅट्समननं सरळ सिक्स मारला. बांगलादेशचं पोट फाडून मॅच जिंकली. टीम इंडियाला सिक्स मारुन मॅच जिंकून देणारा तो विकेट-किपर बॅट्समन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) नव्हता. तर तो होता दिनेश कार्तिक (Dinesh Karthik). कार्तिकचा आज वाढदिवस (Dinesh Karthik Birthday) आहे. आजच्या दिवशी (1 जून 1985 ) रोजी कार्तिकचा जन्म झाला.
19 व्या वर्षी पदार्पण
दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) 2004 साली लॉर्ड्सवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नयन मोंगियाच्या नंतर टीम इंडियाची विकेट किपर शोध मोहीम सुरु होती. त्यावेळी पार्थिव पटेलचा (Parthiv Patel) फॉर्म घसरला होता. त्यामुळे कार्तिकला वयाच्या 19 व्या वर्षीच टीम इंडियाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली.
अवघड करतो सोपे आणि सोपे होते अवघड
कार्तिकनं पहिल्या मॅचमध्ये विकेट किपिंग करताना अनिल कुंबळेच्या बॉलिंगवर मायकल वॉनचा सोपा कॅच सोडला. त्यानंतर त्यानेच हरभजनच्या बॉलिंगवर वॉनला अफलातून स्टंपिंग केले. गेली 17 वर्ष भारतीय क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात असलेल्या कार्तिकच्या विकेट किंपींगचे एक वैशिष्ट्य आहे.
कार्तिकने (Dinesh Karthik Birthday अनेकदा अतिशय फास्ट बॉलवर कॅच घेतला आहे. त्याचवेळी जो बॉल त्यावर कार्तिकचं नाव लिहलंय असं वाटावं इतका त्याच्या हातात येण्यासाठी धडपडत येणाऱ्या बॉलवर कॅच सोडला आहे. त्याने काही वेळा अगदी अफलातून स्टंपिंग केलंय. त्याचवेळी भारताकडून टेस्ट मॅचच्या एका इनिंगमध्ये सर्वात जास्त 35 बाय देण्याचा लाजीरवाणा रेकॉर्डही त्याच्या नावावर आहे.
त्याच्या या अविश्वसनीय विकेट किपिंग कौशल्यामुळे धोनीनं त्याची जागा घेतली. धोनी 2014 साली टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झाला. तरीही केवळ विकेट किपिंग कौशल्यामुळे कार्तिकच्या जागी वृद्धीमान साहाला (Wriddhiman Saha) निवड समितीनं प्राधान्य दिले.
बॅट्समन म्हणूनही ओळख
दिनश कार्तिकनं (Dinesh Karthik Birthday) 2004 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध मुंबईत टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ज्या मैदानात 2 दिवसात 40 विकेट्स गेल्या, त्या फिरत्या पिचवर त्याने विकेट किपर म्हणून चांगली कामगिरी केली. त्याचवेळी त्याच्यातील आक्रमक बॅट्समननं तेव्हाचे टीम इंडियाचे कोच ग्रेग चॅपेल (Greg Chappel) यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी कार्तिकला वन-डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये नियमित संधी दिली.
अगदी कार्तिकपेक्षा आक्रमक असा विकेट किपर बॅट्समन महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) उदय झाल्यानंतरही कार्तिक स्पेशालिस्ट बॅट्समन म्हणून खेळला. 2007 साली इंग्लंड दौऱ्यावर तो संपूर्ण टेस्ट सीरिज स्पेशालिस्ट बॅट्समन म्हणून खेळला. त्याने वासिम जाफरसोबत टीम इंडियाचा ओपनर म्हणून इंग्लंडच्या स्वींग वातावरणात किल्ला लढवला आणि तो उभा केला. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे सर्व दिग्गज बॅट्समन असूनही त्याने त्याने त्या सीरिजमध्ये भारताकडून सर्वात जास्त रन केले. मात्र त्याच्या करियरमधील सततच्या चढ-उतारामुळे कार्तिकने टीम इंडियातील जागा गमावली.
In-Out चं चक्र
त्यानंतरची 10 वर्ष कार्तिकच्या करियरमध्ये चांगली कामगिरी- टीममध्ये निवड- टीममधून आऊट, पुन्हा चांगली कामगिरी-टीममध्ये निवड आणि टीममधून आऊट हे चक्र सुरु होते. 2004 पासून ते अगदी 2019 साली वर्ल्ड कपची टीम निवडणाऱ्या प्रत्येक निवड समितीने कार्तिकला टीममध्ये निवडले आहे.
कार्तिक टीम इंडियाकडून तो भारतासाठी एक ते आठ अशा सर्व नंबरवर खेळलाय. इंग्लंडमध्ये टीम इंडियाकडून टेस्ट मॅच ओपन करताना नांगर टाकण्यापासून ते निदहास ट्रॉफीत शेवटच्या ओव्हरमध्ये सर्वोच्च गियरमध्ये बॅटींग करण्यापर्यंतची सर्व कामे त्याने केली आहेत. परस्पर भिन्न रोल करताना अपयशी झाला तर टीमच्या बाहेर जाण्याची शिक्षा ठरलेली. हे सर्व असूनही मागच्या 17 वर्षात एकदाही हा माणूस मैदानात किंवा मैदानाबाहेर एक शब्द वावगं बोललेला नाही. निवड समितीला, संघातील सहका-यांना त्याने ट्विट करुन डिवचलेलं नाही.
विजय शंकरला हवं सोशल मीडियावर हवं तितकं Troll करण्यापूर्वी हे नक्की वाचा
चेन्नईच्या पोराला CSK मध्ये जागा नाही
कार्तिकचं आयपीएल करियर देखील याच पद्धतीचं आहे. चेन्नईचा पोरगा. तामिळनाडूचा अनेक वर्ष कॅप्टन असलेल्या कार्तिकला महेंद्रसिंह धोनीमुळे आजवर कधीही चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) जागा मिळालेली नाही. दिल्ली डेयर डेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात लॉयन्स असा प्रवास करत तो सध्या कोलकाता नाईट रायडर्समध्ये (KKR) आहे.
मुंबई इंडियन्सने 2013 साली पहिल्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकली त्या टीममध्ये तो होता. त्याने त्या स्पर्धेत 510 रन्स काढले होते. सचिनला खांद्यावर घेऊन जाणे आणि रोहित शर्माचा कॅप्टन म्हणून उदय या दोन हाय प्रोफाईल घटनांमध्ये त्याचे योगदान दुर्लक्षित राहिले. मुंबई इंडियन्सनेही पुढे त्याच्यावर विश्वास दाखवला नाही.
KKR चा कॅप्टन
कार्तिकला (Dinesh Karthik Birthday) 2018 साली केकेआरनं कॅप्टन केले. लिमिटेड रिसोर्समध्ये अनेक नव्या पोरांना हाताशी धरत त्याने टीम चांगली हातळली.2018 च्या सिझनमध्ये तो टीमचा संकटमोचक होता. तो प्रत्येक मॅचमध्ये परिस्थितीनुसार खेळत होता. बॅटिंगचा गियर झटकन बदलत होता.
त्या सिझनमध्ये (IPL 2018) राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या एका मॅचमध्ये दहाव्या ओव्हरनंतर तो 10 बॉल 3 असं खेळत होता. विसावी ओव्हर संपली तेंव्हा 50 बॉल्समध्ये 97 रन्स काढून नाबाद राहिला. नरीन, रसेल, ब्रेथवेट आणि रिंकू सिंग सोबत त्याने छोट्या – छोट्या पार्टनरशिप केल्या. पार्टनर बदलले. कार्तिकचा खेळण्याचा फ्लो कायम होता. मॅकलमनं आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये केलेल्या शतकानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंची ही आजवरची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. ख्रिस गेल ते ख्रिस लीन, गौतम गंभीर ते रॉबीन उथप्पा या सातत्याने ओपन करणा-या खेळाडूंना जे जमले नाही ते कार्तिकने केले.
कॅप्टनसी सोडली
दिनेश कार्तिकनं बॅटींगवर लक्ष देण्यासाठी मागील आयपीएलमध्ये कॅप्टनसी स्वत:हून सोडली, असे सांगण्यात आले. त्याने कॅप्टन म्हणून आणि कॅप्टन नसतानाही केकेआरच्या तरुण पोरांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं आहे.
कार्तिक गेला, मॉर्गन आला, केकेआरचा गोंधळ आणखी वाढला!
प्रसिद्ध कृष्णा, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, शुभमन गिल आणि वरुण चक्रवर्ती या केकेआरच्या तरुण आणि नव्या खेळाडूंना कार्तिकनं सतत धीर दिला. कृष्णा, नागरकोटी, मावी हे दुखापतग्रस्त होऊनही दुर्लक्षिले जाणार नाहीत याची काळजी घेतली. वरुण चक्रवर्ती बॉलिंगला आल्यावर त्याला स्टंपच्या मागून तामिळमध्ये मार्गदर्शन करणारा कार्तिक आपल्याला आयपीएलमध्ये नेहमी दिसतो. तामिळनाडूच्या टीममध्येही तो सर्व तरुण खेळाडूंचा मार्गदर्शक आहे.
टीमचा विचार करणारा खेळाडू
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची बॅटींग ऑर्डर कोसळली. त्या मॅचमध्ये शांतपणे खाली मान घालून खेळणाऱ्या कार्तिकला एका चांगल्या कॅचमुळे परत जावे लागले. टीम इंडियाचे वर्ल्डकपमधील आव्हान सेमी फायनलमध्ये संपले. त्यानंतर कार्तिकला पुन्हा आंतररष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही.
दिनेश कार्तिकच्या करियरमधील चढ-उताराची गोष्ट!
सध्या निवड समितीसमोर अनेक तरुण विकेट किपर बॅट्समनचा पर्याय आहे. त्यामुळे पुन्हा कार्तिकला संधी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे तो यापुढे तामिळनाडूकडून आणि आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. आज जरी कार्तिक (Dinesh Karthik Birthday) निदहास ट्रॉफीतील फायनलमधील खेळीमुळे अनेकांच्या लक्षात असला तरी भविष्यात स्वत:च्या खेळापेक्षा टीमचा पहिल्यांदा विचार करणारा खेळाडू म्हणून कार्तिक जास्त लक्षात राहणार आहे. टीम इंडियात सतत In- Out, In-Out राहिलेल्या कार्तिकच्या गोलाकार करिअरच्या गोष्टीचं हाच तर सारांश आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.