फोटो – ट्विटर

इंग्लंडच्या क्रिकेट टीममध्ये 2015 च्या वर्ल्ड कप नंतर मोठा बदल झाला आहे. वन-डे क्रिकेटमध्ये 50 ओव्हर्समध्ये 250 च्या आसपास स्कोअर करणारी टीम आता 350 सहज पूर्ण करते. त्यांचे खेळाडू पूर्वी वन-डे क्रिकेट पुस्तकी पद्धतीनं खेळत असत. आता पहिल्या बॉलपासून आक्रमण करतात. जगभरातील T20 क्रिकेट लीगमध्ये आता इंग्लिश क्रिकेटपटूंचा बोलबाला आहे. इंग्लंडची ही नवी टीम घडवण्यात ज्याचा महत्त्वाचा वाटा आहे असा विकेटकिपर-बॅट्समन जोस बटलरचा आज वाढदिवस (Jos Buttler Birthday) आहे. आजच्याच दिवशी (8 सप्टेंबर 1990) रोजी बटलचा जन्म झाला. सहजपणे गॅप शोधणे आणि मैदानाच्या सर्व बाजूला कल्पक फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला बटलर इंग्लंड क्रिकेटमध्ये मिस्टर 360 (MR. 360 of England) नावानंही ओळखला जातो.

गांगुली-द्रविडचा प्रभाव

जोस बटलर हा इंग्लंडमधील सॉमरसेटचा. 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 1999) सॉमरसेटच्या होम ग्राऊंडमध्ये टाँटनवर झालेली भारत विरुद्ध श्रीलंका मॅचला तो स्टेडियममधील प्रेक्षकांमध्ये उपस्थित होता. जगातील अव्वल स्पिनर असलेल्या मुरलीधरनची त्या मॅचमध्ये सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी केलेली धुलाई पाहून त्याचा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. ती फटकेबाजी पाहूनच त्याच्यात आक्रमक बॅट्समन होण्याचे बीज रोवले गेले.

बटलर सॉमसरसेटच्या अंडर 13, अंडर 15, अंडर 17 या टीमचा नियमित सदस्य होता. या स्तरावर त्यानं सातत्यपूर्ण खेळ केला आहे. त्यामुळेच वयाच्या 19 व्या वर्षी कौंटी क्रिकेटमध्ये सॉमरसेटचा तेव्हाचा मुख्य बॅट्समन आणि सध्याचा ऑस्ट्रेलियन कोच जस्टीन लँगर (Justin Langer) जखमी झाल्यावर त्याच्या जागी बटलरने पदार्पण केले. स्थानिक क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीमुळे त्याची 2011 साली इंग्लंडच्या T20 टीममध्ये निवड झाली.

‘साहेबी’ क्रिकेट संस्कृती बदलणारा ‘परदेसी बाबू’

वेगवान सेंच्युरींचा धडाका

जोस बटलरला पहिल्या T20 सीरिजमध्ये फार संधी मिळाली नाही. 2012 साली पाकिस्तान विरुद्ध दुबईमध्ये त्यानं वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या मॅचमध्ये तो शून्यावर आऊट झाला. त्यानंतर पुढील वन-डे खेळण्यासाठी त्याला एक वर्ष वाट पाहावी लागली. काही हाफ सेंच्युरी वगळता या आक्रमक बॅट्समनची लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधील कारकिर्द 2014 पर्यंत सामान्य होती.

इंग्लंडची टीम 2014  साली वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली होती. त्या दौऱ्यातील तिसऱ्या वन-डेमध्ये बटलरनं 6 व्या क्रमांकावर येत 84 बॉलमध्ये 99 रनची खेळी केली. त्या खेळीनं बटलरच्या करिअरला ब्रेक मिळाला.  त्यानंतर दोन महिन्यांनीच त्यानं श्रीलंकेविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या वन-डेमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय सेंच्युरी फक्त 61 बॉलमध्ये पूर्ण केली. ती इंग्लंडकडून वन-डे क्रिकेटमध्ये झळकावलेली सर्वात फास्ट सेंच्युरी (Jos Buttler Birthday) होती.

बटलरनं श्रीलंका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या चार देशांविरुद्ध पहिल्या चार वन-डे सेंच्युरी झळकावल्या. यामधील सर्वात स्लो सेंच्युरी ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 71 बॉलमध्ये काढली होती. ऐकेकाळी इंग्लंडकडून वन-डे क्रिकेटमध्ये पहिल्या 3 वेगवान सेंच्युरी बटलरच्या नावावर होत्या. (पहिल्या दोन आजही आहेत.)

पाकिस्तान विरुद्ध 2015 साली दुबईत झालेल्या वन-डेमध्ये बटलर 35 व्या ओव्हरमध्ये बॅटींगला आला होता. त्यावेळी इंग्लंडची स्थिती 2 आऊट 194 अशी होती. त्याला फक्त शेवटच्या 15 ओव्हर्स खेळायला मिळणार होत्या. त्यावेळी त्यानं फक्त 46 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली. ही वन-डे क्रिकेटमध्ये इंग्लिश बॅट्समननं झळकावलेली सर्वात फास्ट सेंच्युरी आहे.

टेस्टमध्ये झोकात पदार्पण

टीम इंडियाविरुद्ध 2014 साली झालेल्या लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडचा पराभव झाला. त्यानंतर विकेट किपर मॅट प्रायरला टीममधून वगळण्यात आले. साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या पुढील टेस्टमध्ये बटलरला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. बटलरनं पदार्पणातील टेस्टमध्ये 85 रनची खेळी केली. पहिल्या आठ टेस्टमध्ये पाच सेंच्युरी झळकावलेल्या बटलरचा टेस्ट क्रिकेटमधील फॉर्म नंतरच्या काळात हरपला.

जॉनी बेअरस्टोनं (Jonny Bairstow) बटलरची टीममधील जागा घेतली. बटलरला 2016 साली टेस्ट टीममधून वगळण्यात आले. त्यानंतर 2018 साली त्याचा पुन्हा टीममध्ये समावेश झाला. पाकिस्तान विरुद्धच्या सीरिजमध्ये काही हाफ सेंच्युरी झळकावल्यानंतर त्यानं अखेर भारताविरुद्ध नॉटिंघममध्ये पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावली.

बटलरनं त्यानंतर दोन वर्षांनी पाकिस्तान विरुद्ध 152 रनची खेळी केली. पहिल्या दिवशी अडचणीत सापडलेल्या टीमला संकटातून बाहेर काढत त्यानं जवळपास साडेसात तास बॅटींग केली. त्यामुळे इंग्लंडला 500 रनचा टप्पा ओलांडता आला. अखेर उशीरा का होईना बटलरनं (Jos Buttler Birthday) टेस्ट टीममधील त्याची जागा निश्चित केली आहे.

आयपीएल कारकिर्द

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या आयपीएलबाबतच्या धोरणामुळे बटलरला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी 2016 पर्यंत वाट पाहवी लागली. त्याला सर्वप्रथम मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) करारबद्ध केले. 2016 आणि 17 चा आयपीएल सिझन तो मुंबईकडून खेळला. मुंबईनं त्याचा मिडल ऑर्डरमध्ये फ्लोटर म्हणून वापर केला. 17 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कमिटमेंटमुळे त्याला आयपीएल प्ले ऑफमध्ये खेळता आले नव्हते. त्यावेळी मुंबई इंडियन्सनं फायनल जिंकल्यानंतर बटलरनं इंग्लंडमध्ये केलेल्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ चांगलाच गाजला होता.

बटलर 2018 साली राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सदस्य बनला. पहिल्या 5 मॅचमध्ये तो मिडल ऑर्डरमध्ये खेळला. त्यामध्ये त्याची कामगिरी साधारण होती. त्यानंतर त्याला ओपनिंगला खेळवण्यात आले. राजस्थानचा निर्णय यशस्वी ठरला. त्यानं सलग पाच मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकावत आयपीएल रेकॉर्डची बरोबरी केली. तेव्हापासून 2020 मधील काही मॅचचा अपवाद वगळता तो राजस्थान रॉयल्सचा नियमित ओपनर बनला आहे. त्यानं या आयपीएल सिझनममध्ये (IPL 2021) T20 क्रिकेटमधील पहिली सेंच्युरी देखील झळकावली आहे.

एकदा नाही, दोनदा रन आऊट!

बटलरच्या (Jos Buttler Birthday) आयपीएल कारकिर्दीचा उल्लेख त्याच्या एका रन आऊट शिवाय पूर्ण होत नाही.  2019 च्या आयपीएलमध्ये (IPL 2019) किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या लढतीत आर. अश्विननं (R. Ashwin) बॉल टाकण्यापूर्वीच बटलरनं क्रिझ सोडले होते. अश्विननं त्याला तात्काळ रन आऊट केले. जे क्रिकेटच्या नियमानुसार योग्य होते. बटलरला हे रन आऊट आवडले नाही. त्याने आणि त्याला साध देणारे गोरे खेळाडू आणि मीडियानं यावर बरीच आदळाआपट केली. क्रिकेटच्या नियमाप्रमाणे आऊट करुनही अश्विनला त्यांनी व्हिलन ठरवले. बटलरला चूक केल्यानंतरही पूर्ण पाठिंबा दिला.

बटलरची या पद्धतीनं आऊट होण्याची ती पहिली वेळ नव्हती. त्यापूर्वी देखील 2014 साली श्रीलंका विरुद्धच्या वन-डेमध्ये सचित्र सेनानायकेनंही त्याला अशाच पद्धतीनं रन आऊट केले होते. त्यामधून कोणताही शहणपणा त्यानं न घेतल्यानं तो पुन्हा एकदा पाच वर्षांनी रन आऊट झाला.

काहीही झालं तरी ‘Spirit of Cricket’ जपलं पाहिजे!

वर्ल्ड चॅम्पियन!

जोस बटलरचे इंग्लंड क्रिकेटसाठीचे सर्वात मोठे योगदान हे त्यांना क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup 2019) जिंकून देण्यात आहे. तो 2015 साली झालेल्या वर्ल्ड कप टीमचाही (Cricket World Cup 2015) सदस्य होता. त्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश विरुद्ध झालेल्या शेवटच्या वन-डे मध्ये बटलरनं 65 रनची खेळी केली होती. इंग्लंडला जिंकून देण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली होती. तो आऊट झाला आणि त्यानंतर इंग्लंड टीम त्या मॅचमध्ये पराभूत होऊन वर्ल्ड कप स्पर्धेतून आऊट झाली.

त्यानंतर चार वर्षांनी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये तो व्हाईस कॅप्टन होता. त्याच्यावर फिनिशरची जबाबदारी होती. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पराभवात त्यानं 76 बॉलमध्ये 103 रनची खेळी केली. त्यानंतर बांगलादेश विरुद्ध हाफ सेंच्युरी झळकावली. पण बटलरचं सर्वोच्च योगदान हे फायनलमध्ये होते.

न्यूझीलंडविरुद्ध 242 रनचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था 4 आऊट 86 अशी झाली होती. इंग्लंडसमोर आणखी एका वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाचं संकट होतं. त्यावेळी त्यानं बेन स्टोक्ससोबत 110 रनची पार्टनरशिप केली. बटलरच्या 59 रनचं ती मॅच टाय करण्यात महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये त्यानं 3 बॉलमध्ये 7 रन काढले आणि सर्वात शेवटी मार्टीन गुप्टीलनं रन आऊट करत इंग्लंडच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब करणारा बॉल बटलरनंच स्टंपवर लावला होता.

जिद्द, संघर्ष, गुणवत्तेची कमाल, वर्ल्ड कप व्हिलन बनला देशाचा हिरो!

दुसऱ्या वर्ल्ड कपसाठी भिस्त

जोस बटलरची या वर्षातील कामगिरी त्याच्या लौकिकाच्या तुलनेत साधारण झाली आहे. कोरोनामुळे बदललेल्या परिस्थितीचा आपल्यावर परिणाम झाल्याचं त्यानं मान्य केलं आहे. यासाठी त्यानं आता आयपीएल स्पर्धेच्या उत्तरार्धातूनही माघार घेतली आहे.

आयपीएलनंतर लगेच होणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) बटलरवर इंग्लंडची मोठी भिस्त असणार आहे. वन-डे वर्ल्ड कपनंतर होणारा T20 वर्ल्ड कपही इंग्लंडला जिंकायचा असेल तर बटलरला (Jos Buttler Birthday) पुन्हा एकदा त्याचा सर्वोत्तम खेळ करणे आवश्यक आहे.     

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: