फोटो – ट्विटर/ICC

T20 क्रिकेट हा मुळातच मारधाड प्रकारातील खेळ आहे. या प्रकारात 7 पेक्षा कमी इकॉनॉमी रेट असलेला बॉलर हा अगदी दुर्मिळ गटातील मानला जातो. 355 T20 मॅचनंतर त्याचा इकॉनॉमी रेट हा 6.07 इतका आहे. T20 क्रिकेटमध्ये मॅच टाय झाल्यानंतर खेळली जाणारी सुपर ओव्हर (Super Over) टाकणे हे सर्वात कौशल्याचे काम आहे. ही सुपर ओव्हर मेडन टाकावी हे प्रत्येक बॉलरचे स्वप्न असते. आजवरच्या T20 च्या इतिहासात ही कामगिरी करणे फक्त एका बॉलरला जमले आहे. त्या बॉलरचा म्हणजेच सुनील नरीनचा आज वाढदिवस (Sunile Narine Birthday) आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 26 मे 1988 साली त्याचा जन्म झाला.

चॅम्पियन्स लीगमधून ओळख

T20 क्रिकेटला कायरन पोलार्ड (Kieron Pollard), ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) हे दोन चॅम्पियन खेळाडू देणाऱ्या त्रिनिदाद आणि टोबॅगो (Trinidad and Tobago) याच टीमचा नरीन हा सदस्य आहे. 2011 साली झालेल्या चॅम्पियन्स लीग T20 स्पर्धेत (Champions League T20 2011) नरीनच्या मिस्ट्री बॉलिंगने बॅट्समन्सना गोंधळात टाकले. त्याने त्या स्पर्धेत 6 मॅचमध्ये 4.37 च्या इकॉनॉमी रेट्सने 10 विकेट्स घेतल्या.

नरीनच्या या मिस्ट्री स्पिनने प्रभावित होऊन कोलकाता नाईट रायडर्सने (KKR)  त्याला 2012 साली विक्रमी करारबद्ध केले. आजही तो याच टीमचा सदस्य आहे. नरीनने कोलकाताकडून आयपीएल स्पर्धा तर गाजवलीच. पण, आज बंद झालेल्या चॅम्पियन्स लीग T20 स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जास्त 39 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड देखील नरीनच्याच नावावर आहे.

गुन्हेगारी दलदलीतून तयार झाला चॅम्पियन पोलार्ड

नरीनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

सुनील नरीन जगभर T20 क्रिकेटसाठी ओळखला जातो. नरीनच्या T20 मधील ग्लॅमरमुळे त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द विस्मृतीमध्ये गेली आहे. त्याने 2011 साली भारताविरुद्धच्या वन-डे मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विराट कोहली (Virat Kohli) ही त्याची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट. नरीननं 65 वन-डेमध्ये 4.92 च्या इकॉनॉमी रेटनं 92 विकेट्स घेतल्या आहेत. तो 2016 नंतर एकही वन-डे खेळलेला नाही.

नरीनची टेस्ट कारकिर्द ही जेमतेम 6 टेस्टची आहे. 2012-2013 या काळात तो या टेस्ट खेळला आहे. नरीननं 6 टेस्टमध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत. या छोट्या कारकिर्दीमधील दुसऱ्या टेस्टमध्ये नरीनने न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्टमध्ये 8 विकेट्स घेत वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला होता.

वेस्ट इंडिजने 1979 नंतर 2012 साली वर्ल्ड कप जिंकला होता. 2012 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजकडून सर्वात जास्त विकेट्स नरीननेच घेतल्या होत्या. नरीनने 51 आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 6.01 च्या इकॉनॉमी रेटनं 52 विकेट्स घेतल्या आहेत. तो ड्वेन ब्राव्हो (62) आणि सॅम्युएल बद्री (54) यांच्यानंतरचा तिसरा यशस्वी वेस्ट इंडिज बॉलर आहे.

मलिंगाला वर्ल्ड कप फायनलमध्ये पाच सिक्स मारणारा बॅट्समन

सुपर ओव्हर मेडन

सुनील नरीननं (Sunile Narine Birthday) आजवर कोणत्याही बॉलरला न जमलेला रेकॉर्ड 2014 साली झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL 2014)  मध्ये केला आहे. गयानाकडून खेळणाऱ्या नरीनवर सुपर ओव्हरमध्ये 11 रन वाचवण्याची जबाबदारी होती. त्रिनिदादची निकोलस पूरन (Nicholas Pooran) आणि रॉस टेलर (Ross Taylor) ही स्पिन बॉलिंग सहज खेळू शकणारी जोडी नरीनसमोर सुपर ओव्हरमध्ये होती.

पूरनने यापूर्वी त्या मॅचमध्ये 17 बॉलमध्ये 37 रनची खेळी केली होती. त्यात त्याने स्पिनरविरुद्ध 4 बॉलमध्येच 11 रन काढले होते. नरीननं पूरनला एक नाही दोन नाही तर तब्बल 4 बॉल चकवलं. त्या चार बॉलमध्ये एकही रन निघाला नाही. पाचवा बॉल पूरननं लाँग ऑनच्या दिशेने मारला खरा पण त्यावेळी तो कॅच आऊट झाला. त्यानंतर रॉस टेलरला सहावा आणि ओव्हरमधील शेवटचा बॉलवरही एकही रन न देत नरीननं मेडन सुपर ओव्हर पूर्ण केली.

कोलकाताचा वाघ

सुनील नरीन (Sunile Narine Birthday)  हे कोलकाता नाईट रायडर्सच्या बॉलिंग अटॅकमधील 2012 पासूनचे मुख्य अस्त्र आहे. केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये जिंकलेल्या आयपीएल विजेतेपदामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा होता. त्याने 2012 साली 24 तर 2014 साली 21 विकेट्स घेतल्या होत्या. नरीनने केकेआरकडून सर्वात जास्त 148 विकेट्स घेतल्या आहेत. 132 आयपीएल इनिंगमध्ये बॉलिंग केल्यानंतरही त्याचा इकॉनॉमी रेट 6.68 इतकाच आहे.

नरीननं फक्त बॉलिंगमध्ये नाही तर बॅटींगमध्ये केकेआरला आक्रमक सुरुवात करुन देण्याचे काम अनेकदा केले आहे. त्याने 2017 साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध फक्त 15 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली होती. ही आयपीएलच्या आजवरच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची जलद हाफ सेंच्युरी आहे. केएल राहुलचा (KL Rahul) अपवाद वगळता आयपीएल इतिहासातील एकाही दिग्गज बॅट्सनमनला नरीनपेक्षा फास्ट हाफ सेंच्युरी करणे जमलेले नाही.

एकाच वर्षी 5 T20 विजेतेपद पटकावणारा चॅम्पियन

बॉलिंग अ‍ॅक्शनचा वाद

नरीनच्या आजवरच्या कारकिर्दीला वादग्रस्त बॉलिंग अ‍ॅक्शनचा वाद आहे. त्याला 2014 साली झालेल्या चॅम्पिन्स लीगमध्ये याच कारणामुळे बॉलिंग करण्यापासून रोखले होते. ही शैली नीट करण्यासाठी त्याने 2015 साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमधून (Cricket World Cup 2015) माघार घेतली. त्यानंतर त्याचवर्षी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वन-डे मॅचमध्ये नरीनवर आक्षेप घेण्यात आली. 2018 साली झालेली पाकिस्तान सुपर लीग आणि मागील वर्षी झालेली आयपीएल (IPL 2020) स्पर्धेतही नरीनच्या बॉलिंग अ‍ॅक्शनवर आक्षेप नोंदवण्यात आले होते.

बॉलिंग अ‍ॅक्शनवर वारंवार आक्षेप नोंदवण्याचा परिणाम नरिनच्या फॉर्मवर झाला आहे. मागील दोन आयपीएलमध्ये त्याची कामगिरी साधारण झाली. केकेआरला याचा फटका बसला. या सिझनमध्ये (IPL 2021) सुरुवातीच्या काही मॅच नरीनला बेंचवर बसवण्यात आले होते. सुनील नरीन (Sunile Narine Birthday) पुन्हा एकदा जुन्या फॉर्मात येणे हे आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात कोलकातासाठी आवश्यक आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: