विकेट घेतल्यावर संपूर्ण मैदानाला पळत चक्कर माराणारा खेळाडू म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या इम्रान ताहीरचा (Imran Tahir) आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (27 मार्च 1979) रोजी त्याचा पाकिस्तानतल्या लाहोरमध्ये जन्म झाला. पाकिस्तानात वाढलेला, पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा सदस्य असलेला इम्रान दक्षिण आफ्रिकन कसा झाला याची गोष्ट मोठी मनोरंजक आहे.

लाहोरमध्ये जन्मलेला इम्रान पाकिस्तानच्या U19 टीमचा सदस्य होता. पाकिस्तानची U19 टीम 1998 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली तेंव्हा इम्रानच्या डोळ्यात राष्ट्रीय टीमकडून खेळण्याची स्वप्न होती. त्याच्या क्रिकेट करियरसाठी तो दौरा फारसा यशस्वी झाला नाही. मैदानावर बॅट्समन्सची दांडी उडवणे हे त्याचे मुख्य काम होते. प्रत्यक्षात इम्रान मूळ भारतीय वंशाची दक्षिण आफ्रिकन मॉडेल सुमैय्या दिलदारच्या प्रेमात ‘क्लीन बोल्ड’ झाला.

इम्रान पाकिस्तानात परतला तरी त्यांचे प्रेम प्रकरण सुरु होते. सुमैय्याला पाकिस्तानात यायचे नव्हते. त्यामुळे इम्रानने सुमैय्याच्या प्रेमासाठी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. तो सुरुवातीला काही वर्ष इंग्लंडमध्ये होता. तिथे त्याने कौंटी क्रिकेट खेळून स्थिरावण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न यशस्वी झाला नाही त्यामुळे तो 2005 साली दक्षिण आफ्रिकन नागरिक झाला. त्याने सुमैय्याशी लग्न केले. आफ्रिकेतील देशांतर्गत क्रिकेट खेळला अखेर 2011 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे इम्रानचे स्वप्न पूर्ण झाले.

( वाचा : कॅरम बॉलचा जनक ते मर्यादा आणि अपुऱ्या व्यवस्थेचा बळी! )

टीममध्ये निवड आणि त्याच दिवशी बाहेर!

इम्रानच्या दक्षिण आफ्रिकेतल्या टीममधील निवडीची गोष्ट देखील भारी आहे. त्याची सुरुवातीला 2010 साली इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली. त्याच दिवशी निवड समितीने त्याला टीममधून वगळल्याचं जाहीर केलं.

वास्तविक दुसऱ्या देशाच्या वंशाच्या खेळाडूने दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यापूर्वी सहा वर्षे त्या देशात घालवणे आवश्यक होते. इम्रानला आफ्रिकेत अजून सहा वर्ष बाकी आहेत, ही बाब निवड समितीच्या लक्षात आलीच नाही इम्रानची राष्ट्रीय टीममध्ये निवड केल्यानंतर निवड समितीला हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी इम्रानला टीममधून वगळले.

विकेट घेतल्यावर पळत सुटतो कारण…

सहा वर्षांची मुदत संपल्यानंतर 2011 साली इम्रानची दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये निवड झाली. त्याने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर विकेट घेतल्यावर इम्रानचे मैदानभर पळणे हा अनेकांच्या चर्चेचा आणि मीमचा विषय बनले. इम्रानने (Imran Tahir) स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळलेला पाकिस्तानचा माजी कॅप्टन सलमान बटला मुलाखत देताना त्याचे कारण सांगितले होते.

“मी विकेट घेतल्यावर पळत का सुटतो हे मला अजूनही समजलेले नाही. मी इथवर येण्यासाठी मोठा संघर्ष केलाय. त्यामुळे मला मिळणारी प्रत्येक विकेट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे’’,  असं इम्रानने त्या मुलाखतीमध्ये सांगितले होते.

दक्षिण आफ्रिकेकडून इम्रानने 20 टेस्टमध्ये 57 विकेट्स घेतल्यात. मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये त्याला जास्त संधी मिळाली. त्याने 107 वन-डे मध्ये 173 तर 38 आंतरराष्ट्रीय T 20 मध्ये 63 विकेट्स घेतल्या आहेत.

इम्रानने जगभरच्या T20 लीग खेळल्या आहेत. आयपीएलमध्ये तो पुणे आणि चेन्नईच्या टीमकडून खेळला आहे. इम्रानने 2019 च्या आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेतल्या होत्या.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा

error: