फोटो – ट्विटर/ICC

1987 च्या वर्ल्ड कपची फायनल. 1999 वर्ल्ड कप मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची करो वा मरो मॅच. जमेकामध्ये 1995 ची जमेका टेस्ट. 2000 सालातील वेलिंग्टन टेस्ट किंवा क्रिकेट कारकर्दीमधील अगदी शेवटची 2004 मधील सिडनी टेस्ट. या आणि अशा अनेक महत्त्वाच्या क्षणी टीमला सर्वात गरज असताना खेळणारा आणि प्रतिस्पर्धी टीमला मॅच जिंकण्यापासून रोखणारा खेळाडू म्हणजे स्टीव्ह वॉ (Steve Waugh). स्टीव्ह वॉचा आज वाढदिवस (Steve Waugh Birthday). आजच्याच दिवशी (2 जून 1965) स्टीव्ह वॉ याचा जन्म झाला.

लढवय्या टीमचा नेता

ऑस्ट्रेलियन टीम 1990 आणि 2000 च्या दशकात शेवटपर्यंत लढण्यासाठी प्रसिद्ध होती. कितीही अवघड परिस्थिती असली तरी ऑस्ट्रेलियन टीम मॅच वाचवण्याचा नाही तर जिंकण्याचा प्रयत्न करत असे. ऑस्ट्रेलियाच्या त्या लढवय्या टीमचा स्टीव्ह वॉ हा नेता होता.

सांघिक खेळामध्ये लढवय्ये खेळाडू हे स्पेशल असतात. स्टीव्ह वॉ या स्पेशल गटातील व्हेरी स्पेशल खेळाडू होता. तो शेवटची विकेट पडेपर्यंत किंवा अगदी शेवटचा बॉल पडेपर्यंत झुंज देत असे. त्याच्या याच वृत्तीचा 1999 साली  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये (World Cup 1999). लान्स क्लुसनरने शेवटच्या ओव्हरमध्ये दोन फोर मारल्यानंतरही त्याने आशा सोडली नाही, टीमला लढण्यासाठी प्रेरित केले आणि पुढे काय झाले हा इतिहास सर्वांना माहिती आहे.

पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये Iceman

स्टीव्ह वॉने (Steve Waugh Birthday) वयाच्या 20 व्या वर्षी 1985 साली बॉक्सिंग डे टेस्टमध्ये पदार्पण केले. त्याची 1987 च्या वर्ल्ड कपपर्यंत टीममधील वाटचाल साधारण होती. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1987 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 1987) ऑस्ट्रेलियाला विजेतेपद पटकावेल असं फार कमी जणांना वाटलं होतं. भारतीय उपखंडात तुलनेनं नव्या खेळाडूंना घेऊन आलेल्या अ‍ॅलन बॉर्डरच्या (Allan Border) टीमने वर्ल्ड कप विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाचे ते पहिले वर्ल्ड कप विजेतेपद. त्या विजेतेपदात स्टीव्ह वॉचा मोठा वाटा होता.

भारताविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये त्याने डेथ ओव्हर्समध्ये बॅटींग करत नाबाद 19 रन काढले. शेवटच्या ओव्हरमध्ये मोहिंदर अमरनाथला आऊट केलं. ऑस्ट्रेलियाने ती मॅच 1 रनने जिंकली. न्यूझीलंडला मॅच जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 7 रन हवे होते. वॉने फक्त 3 रन देत 2 विकेट्स घेत न्यूझीलंडला पराभूत केलं. लाहोरमध्ये यजमान पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सेमी फायनलमध्ये वॉ ने शेवटच्या ओव्हरमध्ये 16 रन काढले. ऑस्ट्रेलियाने ती मॅच 18 रनने जिंकली.

इंग्लंड विरुद्धच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये बॉर्डरने त्याला 47 वी आणि 49 वी ओव्हर दिली. वर्ल्ड कप फायनलच्या दबावात त्याने त्या दोन ओव्हरमध्ये इंग्लंडचे दोन बॅट्समन आऊट करत ऑस्ट्रेलियाने फक्त 7 रनच्या अंतराने मिळवलेल्या विजयात मोलाची भूमिका बजावली. वॉने त्या वर्ल्ड कपमध्ये 55.66 च्या सरासरीने 167 रन काढले आणि 11 विकेट्स घेतल्या. ही सर्व कामगिरी त्याने डेथ ओव्हर्समध्ये दबावात केली होती. सर्वोच्च दबावात शांतपणे खेळ करण्याच्या स्टीव्ह वॉच्या सवयीने त्याला ‘Iceman’ हे टोपण नाव मिळाले.

खेळाडू आणि कोच म्हणून ऑस्ट्रेलियातील ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स’

Iceman ची ऑस्ट्रेलियन खडूस वृत्ती

स्टीव्ह वॉ मैदानातील वावर शांत आणि थंड असे, पण तरी तो सज्जन गटातील नव्हता. ऑस्ट्रेलियन टीम ज्या काळात स्लेजिंगमध्येही वर्ल्ड नंबर 1 होती त्या काळात तो त्या टीमचा कॅप्टन होता. ऑस्ट्रेलियाने अनेक शिवराळ खेळाडू त्याच्याच तालमीत तयार झाले आहेत.

1995 साली झाली वेस्ट इंडिजमध्ये झालेली टेस्ट सीरिज (Australia vs West Indies Test Series 1995) हे त्याचं मुख्य उदाहरण. वेस्ट इंडिज 1980 नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही टेस्ट सीरिज हरले नव्हते. मायदेशात टेस्ट सीरिज जिंकण्याचा त्यांचा रेकॉर्ड हा 1973 पासून होता. चार टेस्टच्या त्या सीरिजमध्ये स्टीव्ह वॉ (Steve Waugh Birthday) ने 107.25 च्या सरासरीने 429 रन काढले. त्याचबरोबर तो या सीरिजमधील वादाचा (controversy) केंद्रबिंदू होता.

त्या सीरिजमधील पहिल्याच टेस्टमध्ये वॉने ब्रायन लाराचा (Brian Lara) एक वादग्रस्त लो कॅच पकडला. लारा आऊट असल्याचा ठोस पुरावा नव्हता. तरी वॉने ती कॅच घेतल्याचा दावा केला. वॉच्या ठाम दाव्यामुळे लारा परत गेला. ऑस्ट्रेलियाने पहिली टेस्ट 10 विकेट्सने जिंकली. पण, स्टीव्ह वॉच्या अखिलाडू वृत्तीवर बरीच टीका झाली.

पहिल्या टेस्टमधील पराभवानंतर लाराच्या दोन सेंच्युरीमुळे वेस्ट इंडिजने पुढील दोन्ही टेस्ट जिंकल्या आणि एक टेस्ट ड्रॉ केली. यापैकी एका टेस्टमध्ये त्याचा वेस्ट इंडिजचा आग ओकणारा फास्ट बॉलर कर्टली अ‍ॅम्ब्रोजशी ( Curtly Ambrose)  वाद झाला. वॉने त्याला ‘जा आणि बॉलिंग कर’ असं सुनावलं. त्यावेळी भडकलेला अ‍ॅम्ब्रोज वॉला अक्षरश: मारायला धावला होता. वेस्ट इंडिजच्या खेळाडूने त्याला अक्षरश: ओढत मागे नेले होते.

या वादग्रस्त प्रकरणानंतरही जमेकामध्ये झालेल्या शेवटच्या आणि निर्णयाक टेस्टमध्ये स्टीव्ह वॉने 200 रनची खेळी केली. तो त्या टेस्टमध्ये एका वेगळ्याच लेव्हलवर होता. वेस्ट इंडिजच्या फास्ट बॉलर्सनी त्याच्या शरिरावर बॉल टाकले. त्या जखमांचाही त्याला परिणाम झाला नाही वॉ ने अगदी शेवटच्या विकेटपर्यंत किल्ला लढवला. 555 मिनिटांची खेळी करत 200 रन काढले. ऑस्ट्रेलियाने ती सीरिज जिंकत सीरिज बरोबरीत रोखली.

1999 चा वर्ल्ड कप

इंग्लंडमध्ये झालेल्या त्या वर्ल्ड कपमध्ये स्टीव्ह वॉ ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होता. ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळती झाली. न्यूझीलंड आणि पाकिस्तान विरुद्ध मॅच गमावल्याने त्यांचे सेमी फायनलमध्ये पोहचण्याचे गणित अवघड झाले होते. या ठिकाणी वॉची शेवटच्या क्षणापर्यंत हार न स्वीकारण्याची वृत्ती कामी आली. त्याचबरोबर त्याने न्यूझीलंडला वर्ल्ड कपमधून बाहेर काढण्यासाठी त्याने वाकडे डोके देखील चालवले.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने जाणीवपूर्वक संथ बॅटींग केली. 111 रनचं लक्ष्य गाठण्यासाठी 40.4 ओव्हर घेतले. त्या मॅचमध्ये स्टीव्ह वॉ ने 19 रन काढण्यासाठी 73 बॉल खर्च केले. तर मायकल बेव्हन (Michael Bevan) याने 69 बॉलमध्ये 20 रन काढले. एकवेळ तर अशी होती की ऑस्ट्रेलियन बॅट्समननं 10 ओव्हरमध्ये फक्त 12 रन काढले होते. स्टीव्ह वॉच्या अखिलाडू वृत्तीवर जोरदार टीका झाली. त्यावेळी ‘इथं आम्ही मित्र बनवण्यासाठी आलो नाहीत.’ असे खडूस उत्तर वॉने दिले.

या वादग्रस्त प्रकाराचा वॉच्या खेळावर (Steve Waugh Birthday) परिणाम झाला नाही. उलट त्याने त्या वर्ल्ड कपमधील बेस्ट टीम असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याचा सर्वोत्तम खेळ राखून ठेवला होता. ज्या लीड्सवर वॉने टेस्टमधील पहिली सेंच्युरी झळकावली. त्याच लीड्समध्ये 272 रनचा पाठलाग करताना वॉने नाबाद 120 ही वन-डे मधील सर्वोच्च खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाला विजयासह सेमी फायनलमध्ये पोहचवलं. त्यानंतर पुन्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या झालेल्या सेमी फायनलमध्ये वॉने 56 रन काढले.

भारताविरुद्धचे अपयश

स्टीव्ह वॉ ने कॅप्टन झाल्यानंतर बलाढ्य ऑस्ट्रेलियन टीम उभी केली. त्या टीमने 1999 चा वर्ल्ड कप जिंकला. सलग 15 टेस्ट जिंकून 2001 साली ती टीम भारतामध्ये आली. ऑस्ट्रेलियाला 1969-70 नंतर भारतामध्ये टेस्ट सीरिज जिंकता आली नव्हती. स्टीव्ह वॉ ने त्या सीरिजचं वर्णन ‘Final Frontier’ असे केले होते. न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडिजमध्ये जिंकलेल्या स्टीव्ह वॉला भारतामध्ये टेस्ट सीरिज जिंकता आली नाही.

मुंबई टेस्ट त्यांनी सहज जिंकली. पण त्यानंतर कोलकातामध्ये द्रविड-लक्ष्मणची ऐतिहासिक पार्टरनरशिप आणि हरभजनची स्पिन यामुळे भारताने बरोबरी फॉलो ऑन मिळाल्यानंतरही स्टीव्ह वॉच्या टीमचा पराभव केला. प्रतिकुल परिस्थितीमध्ये मिळालेल्या विजयाने प्रेरित होऊन सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) टीमने चेन्नई टेस्टमध्येही विजय मिळवत स्टीव्ह वॉ ला रिकाम्या हाताने परत पाठवले.

द्रविड – लक्ष्मण दिवसभर खेळले आणि ऑस्ट्रेलियाची XX XX ली!

स्टीव्ह वॉला भारतीय टीमने त्याच्या शेवटच्या सीरिजमध्येही त्रास दिला. ऑस्ट्रेलियात झालेली ती सीरिज जिंकून टीम इंडिया इतिहास निर्माण करण्याची शक्यता होती. त्यावेळी सिडनीमध्ये स्टीव्ह वॉने त्याच्या कारकिर्दीमधील शेवटच्या टेस्टमध्ये हाफ सेंच्युरी झळकावत ऑस्ट्रेलियाचा पराभव टाळला.

स्टीव्ह वॉ चे वेगळेपण

मॅचमध्ये सर्व काही संपलंय असं वाटत असतानाही ‘हार न मानता’ लढण्याची स्टीव्ह वॉची वृत्ती होती. त्याने हीच ‘Never Say Die’ वृत्ती ऑस्ट्रेलियन टीममध्ये रुजवली. ऑस्ट्रेलियन टीमने एक दशक क्रिकेट विश्वावर अक्षरश: राज्य केलं. त्या वैभवशाही राजवटीचा ‘Never Say Die’ वृत्ती हाच विजयी मंत्र होता.

मॅचविनर खेळाडू, असमान्य खेळाडू अनेक टीमनं क्रिकेटला दिले. पण त्यापैकी कोणत्याही टीममधील सर्व खेळाडूंमध्ये ही ‘Never Say Die’ वृत्ती नव्हती. जी स्टीव्ह वॉ ने ऑस्ट्रेलियात रुजवली. त्यामुळे प्रत्येक टीममध्ये असामान्य खेळाडू आहेत, पण स्टीव्ह वॉ सारखे लढवय्ये खूप कमी आहेत. स्टीव्ह वॉ याच कारणामुळे ‘स्पेशल’ गटातील ‘अती स्पेशल’ क्रिकेटपटू आहे. हेच स्टीव्ह वॉ (Steve Waugh Birthday) चे इतरांपेक्षा असलेले वेगळेपण आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading