
त्याला काय हवं आहे, हे त्याच्या डोक्यात नेहमी स्पष्ट होते. तो आयर्लंडमध्ये जन्मला. त्याला इंग्लडकडून क्रिकेट खेळायचं होतं. त्यामध्ये कोणतीही अपराधीपणाची भावना त्याच्या मनात नव्हती. त्यामुळे तो इंग्लिश क्रिकेटमध्ये पटकन समरस झाला. टेस्ट क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न होतं. ते आपल्यासाठी नाही, हो त्याच्या लवकर लक्षात आलं. त्यात वेळ न घालवता लिमिटेड ओव्हर क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं. त्यामध्ये तो टीमचा कॅप्टन झाला. वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर टीमनं बदललं पाहिजे, याबाबत तो आग्रही होता. त्यानं टीमला बदललं. पुस्तकी, बचावात्मक, नीरस असलेलं इंग्लंड क्रिकेट आक्रमक बनवलं. आयपीएलमुळे खेळाडूंचा फायदा होतो हे लक्षात येताच बोर्डाला धोरण बदलण्यास लावलं. जगभरातील खेळाडू गोळा करत इंग्लंड टीम तयार केली. त्यांना खेळवण्यासाठी नियम बदलण्याचा आग्रह केला. त्यामुळेच तो वन-डे वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावणारा इंग्लंडचा पहिला कॅप्टन बनला. इंग्लंड क्रिकेटमधील निर्विवाद कॅप्टन नंबर 1 असलेल्या इऑन मॉर्गनचा आज वाढदिवस (Eoin Morgan Birthday) आहे. आजच्याच दिवशी (10 सप्टेंबर 1986) रोजी मॉर्गनचा जन्म झाला.
आयर्लंडकडून यशस्वी
सध्या इंग्लंडच्या लिमिटेड ओव्हर टीमचा कॅप्टन असलेला मॉर्गन मुळचा आयर्लंडचा. तो आयर्लंड क्रिकेटमध्येही यशस्वी होता. तो वयाच्या 17 व्या वर्षी 2004 साली आयर्लंडकडून अंडर 19 वर्ल्ड कप खेळला. त्यानंतर दोन वर्षांनी झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये तो आयर्लंडचा कॅप्टन होता. त्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅट्समनच्या यादीमध्ये मॉर्गन दुसऱ्या क्रमांकावर होता.
मॉर्गननं 2006 साली आयर्लंडकडून स्कॉटलंड विरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या मॅचचमध्ये तो 99 रनवर आऊट झाला. पदार्पणातील वन-डेमध्ये 99 रनवर आऊट झालेला मॉर्गन हा पहिला क्रिकेटपटू आहे. आयर्लंडकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पहिली डबल सेंच्युरी झळकावण्याचा रेकॉर्डही मॉर्गनच्या नावावर आहे. 2007 साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2007) तो आयर्लंड टीमचा सदस्य होता.
इंग्लंडकडून पदार्पण
मॉर्गन 2009 साली इंग्लंडकडून पहिली मॅच खेळला. त्यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन-डे मध्ये त्यानं चांगली कामगिरी केली. 2009 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं 62 रन करत टीमला विजय मिळवून दिला. त्यानंतर यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विकेट किपर मॅट प्रायर जखमी झाल्यानं मॉर्गननं पहिल्यांदाच व्यासायिक क्रिकेटमध्ये विकेट किपिंग (Eoin Morgan Birthday) केले. मॉर्गननं ती जबाबदारी 34 बॉलमध्ये 67 रन करत साजरी केली. त्याच्या या आक्रमक खेळामुळेच पुढील वर्षी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये मॉर्गनची निवड झाली.
वेस्ट इंडिजमध्ये 2010 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2010) मॉर्गनची बॅट चांगलीच चालली. ग्रुप स्टेजमध्ये यजमान वेस्ट इंडिज आणि त्याचा मूळ देश असलेल्या आयर्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं सर्वाधिक रन केले. सुपर 8 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याची पुनरावृत्ती केली. सेमी फायनल आणि फायनलमध्ये नॉट आऊट राहत इंग्लंडच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मॉर्गनच्या रुपानं इंग्लंडला एक चांगला फिनिशर या वर्ल्ड कपमध्ये सापडला.
मॉर्गनची टेस्ट कारकिर्द
मॉर्गनची 2010 साली बांगलादेश विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजसाठी पहिल्यांदा टीममध्ये निवड झाली. त्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या सीरिजमध्ये इयन बेल जखमी झाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली. नॉटिंघमध्ये झालेल्या टेस्टमध्ये मॉर्गननं टेस्ट क्रिकेटमधील पहिली सेंच्युरी झळकावली.
टीम इंडिया 2011 साली इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी तो टेस्ट टीमचा सदस्य होता. पहिल्या तीन इनिंगमध्ये अपयशी ठरल्यानंतर त्यानं ट्रेंट ब्रिज टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली. त्यानंतर पुढील वर्षी दुबईमध्ये पाकिस्तान विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडचा 3-0 नं पराभव झाला. या सीरिजमध्ये मॉर्गन देखील फेल गेला होता. त्यामुळे त्याला टेस्ट टीममधून काढण्यात आले. 2012 नंतर आजवर मॉर्गन (Eoin Morgan Birthday) इंग्लंडकडून एकही टेस्ट मॅच खेळलेला नाही.
आयपीएल स्टार
इंग्लंड क्रिकेट बोर्डाची दारं उघडण्यापूर्वीच मॉर्गन आयपीएलमध्ये दाखल झाला. आयपीएल 2010 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) त्याला करारबद्ध केले. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स (KKR), किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद या टीमचा प्रवास करत तो पुन्हा केकेआरमध्ये दाखल झाला.
मॉर्गनच्या कॅप्टनसीवर आणि खेळावर ज्याचा प्रभाव आहे, तो ब्रँडन मॅकलम सध्या केकेआरचा कोच आहे. मॉर्गनला केकेआरमध्ये परत आणण्यात मॅकलमचा वाटा मोठा होता. आयपीएल 2020 चा सिझन सुरू असतानाच मॅकलमननं दिनेश कार्तिकला हटवून मॉर्गनला केकेआरचा कॅप्टन केलं. पण, मॉर्गनला अजून तरी या विश्वासाला पात्र होता आलेलं नाही. एक बॅट्समन म्हणून तो अपयशी ठरला. तसंच कॅप्टन म्हणूनही त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आयपीएलचा हा सिझन (IPL 2021) कोरोनामुळे स्थगित होण्यापूर्वी केकेआरची टीम पॉईंट टेबलमध्ये तळाशी होती.
IPL 2021: पॉन्टिंग, गंभीरला जमलं ते करण्याची हिंमत मॉर्गन दाखवणार का?
कॅप्टन मॉर्गन!
मॉर्गन (Eoin Morgan Birthday) आयपीएल कॅप्टन म्हणून अयशस्वी ठरला असला तरी इंग्लंडचा कॅप्टन म्हणून त्यानं आजवर कुणालाही न मिळालेलं यश मिळवलं आहे. 2015 च्या वर्ल्ड कपपूर्वी दोन महिने आधी त्याची कॅप्टन म्हणून नियुक्ती झाली. ऑस्ट्रेलियात झालेल्या त्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडची टीम साखळी फेरीतच आऊट झाली. इंग्लिश क्रिकेटसाठी तो मोठा धक्का होता. याच वर्ल्ड कपमध्ये मॉर्गनच्या कॅप्टनसीवर ब्रँडन मॅकलमचा प्रभाव पडला. इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मॅकलमप्रमाणेच आक्रमक क्रिकेट खेळलं पाहिजे, हे मॉर्गनच्या लक्षात आले. विशेष म्हणजे हे इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या गळी उतरवण्यात तो यशस्वी झाला.
जोस बटलर, जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, अॅलेक्स हेल्स, बेन स्टोक्स हे सारे आक्रमक खेळाडू मॉर्गनच्या कॅप्टनसीमध्येच उदयाला आले. मॉर्गननं त्यांना खेळण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं. ख्रिस वोक्स आणि ख्रिस जॉर्डन हे फास्ट बॉलर्स टीममध्ये स्थिरावले. आदिल रशिद, मोईन अली यांचा मॉर्गननं चांगला वापर केला. सर्वात विशेष म्हणजे जोफ्रा आर्चरचं महत्त्व ओळखून त्याला इंग्लंड टीममध्ये घेण्यासाठी इंग्लंड बोर्डाला नियम बदलण्यास भाग पाडले.
साहेबांना वर्ल्ड कप जिंकून देणारा कामगार!
या सर्व काळात मॉर्गनची बॅट्समन म्हणून देखील कामगिरी चांगली होत होती. टीमला आवश्यक असलेल्या फिनिशरचं आणि भक्कम मिडल ऑर्डर बॅट्समनचं काम मॉर्गननमं चोख बजावलं. त्याच्या कॅप्टनसीमध्ये 2015 ते 2019 या कालावधीमध्ये 10 पैकी फक्त 1 वन-डे सीरिज इंग्लंडनं गमावली.
वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन
इंग्लंडमध्ये 2019 साली होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2019) इंग्लंडची टीम विजेतेपदाची प्रबळ दावेदार होती. या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडची सुरूवात खराब झाली. पण त्यानंतर टीमला सावरण्यात मॉर्गनचा वाटा होता. अफगाणिस्तान विरुद्धच्या वन-डेमध्ये त्यानं 71 बॉलमध्ये 148 रन काढले. राशिद खान (Rashid Khan) या जगातील अव्वल लेग स्पिनरची त्यानं जोरदार धुलाई करत त्या मॅचमध्ये 17 सिक्स लगावले.
मॉर्गनच्या (Eoin Morgan Birthday) त्या खेळीनं इंग्लंडला वर्ल्ड कपमध्ये पुन्हा लढण्याची प्रेरणा मिळाली. इंग्लंडनं साखळी फेरीतील शेवटच्या काही लढती जिंकत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला सहज हरवलं. न्यूझीलंड विरुद्ध झालेली फायनल बरोबरीत सोडवली. नियमांच्या आधारावर इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन म्हणून घोषित करण्यात आले. वन-डे वर्ल्ड कप जिंकणारा मॉर्गन हा इंग्लंडचा पहिला कॅप्टन बनला. आजवर एकाही इंग्लिश कॅप्टनला जे जमलं नाही, ते इऑन मॉर्गन (Eoin Morgan Birthday) या मुळच्या आयरिश खेळाडूनं इंग्लंडसाठी करुन दाखवले.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.