फोटो – ट्विटर

मिसबाह उल हक (Misbah-ul-Haq) म्हंटलं की सर्वप्रथम 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमधली जोंगिदर शर्माची शेवटची ओव्हर आठवते. जोगिंदरच्या बॉलवरचा त्याचा शॉट चुकला आणि भारताने पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला. त्या फायनलमध्ये पाकिस्तानला शेवटच्या 50 बॉल्समध्ये 81 रन्स हवे होते. मैदानावर मिसाबाह आणि शेपूट शिल्लक होतं. त्यानं अगदी टिपकल मिसबाह खेळी (37 बॉल्स 43 रन्स, 4 सिक्स, 0 फोर ) खेळत हे समीकरण 4 बॉल 6 रन्सवर आणलं होतं.

पाकिस्तानने हरलेली मॅच जवळपास जिंकली होती. विजयाचा घास हाततोंडाशी आला तेंव्हा मिसबाह आऊट झाला. त्यावेळी पाकिस्तानच्या टीमला कोणत्याही गोष्टीचं खापर फोडण्यासाठी बळीचा बकरा सापडला. पाकिस्तान क्रिकेटच्या कल्चरमध्ये मिस्टर अनफिट असलेल्या मिसबाह-उल-हकचा आज वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी (28 मे 1974) रोजी मिसबाहचा जन्म झाला.

अनपेक्षित उमेदवार

खरं तर या बळीचं बक-याचं वाँडर्सवर खेळणंच अपेक्षित नव्हतं. तो पाकिस्तानच्या टीमची पहिली चॉईसही नव्हता. त्या टीमचा तरुण तुर्क कॅप्टन शोएब मलिक आणि मोहम्मद युसूफ यांचं काही जुळत नव्हतं, म्हणून 33 वर्षाच्या मिसबाहची पाकिस्तानच्या निवड समितीला आठवण झाली. मिसबाहनं त्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध रन्सचा अवघड पाठलाग पूर्ण केला. सेमी फायनलला न्यूझीलंडला हरवण्यात मोलाची भूमिका बजावली. अगदी फायनलमध्येही जमिनीवर पडलेल्या पाकिस्तानच्या टीमला उभं करत टीमच्या घशापर्यंत विजेतेपदाचा घास नेला.

‘2006 चा जबरदस्त फॉर्म हे इस्लाम स्विकारल्याबद्दल अल्लाहने दिलेले बक्षीस’

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या उत्तरेच्या भागात असलेलं मियाँवली हे मिसबाहचं जन्म गाव. 1975 चा त्याचा जन्म. पाकिस्तानच्या क्रिकेट संस्कृतीपासून अगदी दूर. अभ्यासू कुटुंबात जन्मलेला आणि लहानपणी हॉकी आणि फुटबॉल खेळणाऱ्या मिसबाहला आपण कधीच क्रिकेटर होऊ असं वाटलं नव्हतं. 1986 मध्ये जावेद मियादादनं (Javed Miandad) ‘तो’ अजरामर सिक्सर खेचला. तेंव्हा मिसबाह 11 वर्षांचा होता. मिसबाह 17 वर्षांचा असताना इम्रान खानच्या (Imran Khan) नेतृत्वाखाली पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकला. संपूर्ण पाकिस्तानवर क्रिकेटचं गारुड पसरलं. हॉकी आणि फुटबॉलमध्ये रमणा-या मिसबाहची पावलं क्रिकेटच्या मैदानाकडे वळली. आणि ती तिथचं स्थिरावली.

लहरीपणाचा फटका

देशांतर्गत क्रिकेट गाजवल्यानंतर 2001 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध ऑकलंड टेस्टमध्ये मिसबाहनं (Misbah-ul-Haq) पदार्पण केलं. पहिल्या इनिंगमध्ये दोन तास मैदानावर उभं राहून त्यानं संयमी 28 रन्स काढले. त्यानंतरची 10 वर्ष मिसबाहनं पाकिस्तानी क्रिकेटच्या टिपीकलपणाचा अनुभव घेतला. तो टीमच्या आत-बाहेर करत राहिला. 2007 चा टी-20 वर्ल्ड कपमधला खेळ आणि भारताविरुद्ध 2007 साली कोलकातामध्ये झळकावलेली पहिली टेस्ट सेंच्युरी हा त्याच्या या 10 वर्षातला सोनेरी कालखंड. तरीही ‘युवा पिढीकडं बॅटन जाण्यापूर्वीच्या काळातला तात्पुरता माणूस’ याच लेबलखाली तो टीममध्ये राहिला. 2009-10 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर त्याला टीममधून वगळण्यात आलं.

अवघड परिस्थितीमध्ये कॅप्टन

2010 च्या इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानचं क्रिकेट स्पॉट फिक्सिंगनं हादरलं. मिसबाह त्यावेळी टीममध्ये नव्हता. पाकिस्तानच्या क्रिकेटमधल्या सर्वात खडतर काळात पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष इजाज बट यांना एक चांगली गोष्ट सुचली त्यांनी मिसाबहल परत बोलावलं. केवळ परत बोलावलं नाही तर टेस्ट टीमचा कॅप्टन केलं.

अस्सल पाकिस्तानी रिटायरमेंटची आमिर कथा

सर्वात यशस्वी कॅप्टन

पाकिस्तानच्या फॅन्सना आपल्या क्रिकेट टीमचा कॅप्टन हा नेहमी ‘लार्जर दॅन लाईफ’ हवा असतो. कॅप्टन म्हणून जेवढे अधिकार मिळालेत त्यापेक्षा अधिक मिळावे म्हणून भांडणारा असा. पण मिसबाह (Misbah-ul-Haq) त्याच्या वाट्याला जे खेळाडू आले त्यांना घेऊन खेळणारा कॅप्टन होता. इम्रान खानच्या अगदी विरुद्ध. मिसबाह व्यवहारवादी आहे, दुराग्रही नाही. इम्रान खान आणि वासिम अक्रमप्रमाणे नैसर्गिक गुणवत्तेनं ठासून भरलेली टीम त्याला मिळाली नाही. युनूस खान (Younis Khan) आणि सुरुवातीच्या टप्प्यात सईद अजमल (Saeed Ajmal) हे दोनच त्याचे मुख्य आधार होते. देशांतर्गत परिस्थितीमुळे त्याला कधी पाकिस्तानात टेस्ट खेळताही आली नाही. तरीही तो पाकिस्तानचा सर्वात यशस्वी टेस्ट कॅप्टन बनला.

मिसबाह कॅप्टन म्हणून खेळत असलेल्या प्रत्येक सीरिजमध्ये त्याच्या निवृत्तीची चर्चा झाली. प्रत्येक सीरिजमध्ये त्याने कॅप्टन आणि बॅट्समन म्हणून स्वत:ला सिद्ध केले. दक्षिण आफ्रिकेचे स्टेन, मॉर्केल, फिनलँडर आणि इम्रान ताहीर. न्यूझीलंडचे साऊदी आणि बोल्ट, इंग्लंडचे अँडरसन, फिन आणि ब्रॉड किंवा श्रीलंकेचे मलिंगा आणि हेराथ हे टॉपचे बॉलर्स भरात असताना त्यांच्याविरुद्ध त्यानं टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली. इतकंच नाही तर ‘मिस्टर टूक टूक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिसाबहनं तर मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क आणि नॅथन लियॉन या ऑस्ट्रेलियन त्रिकुटाची धुलाई करत केवळ 56 बॉल्समध्ये टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली आहे.

खेळला की नियम मोडतो, बोलला की ट्रोल होतो!

पुन्हा बकरा होणार?

मिसाबह उल हक (Misbah-ul-Haq) सध्या पाकिस्तान टीमचा कोच आहे. मोहम्मद आमिर (Mohammad Amir) ते शोएब मलिक (Shoaib Malik) ही मंडळी सतत त्याच्यावर टीका करत असतात. या परिस्थितीमध्येही तो टीमची सूत्रं हालवतो आहे. आगामी T20 वर्ल्ड कप ही मिसाबहची मोठी परीक्षा आहे. या परीक्षेत त्याची अपयशी ठरली तर, पहिला बळीचा बकरा मिसबाह उल हक बनण्याची सर्वात जास्त शक्यता आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: