
क्रिकेटपेक्षा क्रिकेटबाह्य वर्तनामुळेच कायम चर्चेत राहिलेला टीम इंडियाचा फास्ट बॉलर एस. श्रीसंतचा (S. Sreesanth) आज वाढदिवस. आजच्याच दिवशी म्हणजे 6 फेब्रुवारी 1983 रोजी श्रीसंतचा जन्म झाला. अनिल कुंबळे हा श्रीसंताचा आदर्श होता. त्याच्याप्रमाणेच तो सुरुवातीला लेगस्पिन बॉलिंग करत असे. श्रीसंतची यॉर्कर टाकण्याची क्षमता पाहून त्याच्या मोठ्या भावाने त्याला फास्ट बॉलर होण्याची सूचना केली आणि तो फास्ट बॉलर बनला.
पहिल्याच वर्षी छाप!
श्रीसंतची केरळ (Kerala) टीम ही क्रिकेट विश्वातील लहान टीम. श्रीसंतपूर्वी टीनू योहानन (Tinu Yohannan) हा केरळचा फास्ट बॉलर भारतीय टीमकडून खेळला पण केरळच्या खेळाडूंनी टीम इंडियात फारसा ठसा उमटवला नव्हता. श्रीसंतने 2002-03 च्या सीझनमध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. रणजी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक घेणारा तो केरळचा पहिला बॉलर बनला. पहिल्याच रणजी सीझनमध्ये त्याने 22 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याची दुलीप ट्रॉफीसाठी दक्षिण भारताच्या टीममध्ये निवड झाली. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पहिल्याच वर्षी दुलिप ट्रॉफीसाठी विभागीय टीममध्ये निवड होण्याची संधी आजवर खूप कमी जणांना मिळाली आहे. या मोजक्या मंडळीत श्रीसंत आहे.
( वाचा : श्रीसंतचं 7 वर्षांनंतर क्रिकेटमध्ये कमबॅक, संजू सॅमसनच्या कॅप्टनसीखाली खेळणार स्पर्धा )
श्रीसंतने 2005 मधील चॅलेंजर ट्रॉफी गाजवली आणि त्याची त्याच वर्षी टीम इंडियात निवड झाली. तो वन-डे मध्ये महागडा ठरत असला तरी विकेट घेणारा बॉलर होता. त्याने 2006 साली इंदूरमध्ये इंग्लंड विरुद्धच्या वन-डे मध्ये 55 रन्स देऊन सहा विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी त्याची निवड झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत असतानाच तो त्याच्या तापट स्वभावामुळे देखील कायम चर्चेत राहिला.
तापट स्वभावाचा फटका
देशांतर्गत स्पर्धेतील एका मॅचमध्ये त्याने सचिन तेंडुलकरला भंडावून सोडलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या सचिनने ‘त्याला आता तू माझ्याजवळ पुन्हा फिरकू नकोस’ असं सांगितलं होतं, असा एक किस्सा प्रचलित आहे. हा किस्सा खरा की खोटा हे माहिती नाही पण त्याचे वर्तन पाहता यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर आंद्रे सायमंड्सला त्याने एकदा डिवचलं होतं. दक्षिण आफ्रिकेचा बॉलर आंद्रे नेलशी त्याचा मैदानात वाद झाला.नेलला सिक्सर लगावल्यानंतर श्रीसंतने मैदानातच नाचून आनंद व्यक्त केला होता. हरभजन सिंगने (Harbhajan Singh) आयपीएल मॅचनंतर त्याला थोबाडीत लगावल्याची घटना देखील चांगलीच गाजली होती.
( वाचा : भर मैदानात सहकाऱ्याला मारणार होता ‘हा’ बांगलादेशी! पाहा व्हिडीओ )
वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य
हे सर्व सुरु असताना तो बॉलिंगने मैदानही गाजवत होता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हशिम अमलाला (Hashim Amla) सहा वेळा आऊट केलंय. केविन पीटरसन, ग्रॅमी स्मिथ, एबी डीव्हिलियर्स यांना पाच वेळा आऊट केलं. तर ब्रायन लारा दोन वेळा आऊट केलं. त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जॅक कॅलिसला (Jack Kallis) टाकलेला बॉल आजही भारतीय फास्ट बॉलरने टाकलेल्या सर्वोत्तम बॉलपैकी एक मानला जातो. श्रीसंतच्या बॉलिंगमुळेच भारताला दक्षिण आफ्रिकेत पहिली टेस्ट जिंकता आली.
भारतानं 2007 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकला. त्या टीममध्येही श्रीसंत होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये त्याने गिलख्रिस्ट आणि हेडनला आऊट करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. फायनल मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरला मिसबाह-उल-हक (Misbah ul Haq) ची श्रीसंतने घेतलेली कॅच सर्व भारतीय फॅन्सच्या -हदयात कायमची कोरली गेलीय. 2011 च्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचाही तो सदस्य होता.
श्रीसंतच्या (S. Sreesanth) क्रिकेट करियला 2013 मध्ये सर्वात मोठं वळण आलं. राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळताना श्रीसंतचा स्पॉट फिक्सिंगमध्ये (Spot Fixing) सहभाग असल्याचं प्रकरण उघड झालं. यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. श्रीसंतने या बंदीला आव्हान दिलं. अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर तो ही लढाई जिंकला.
श्रीसंतने मागील काही वर्षात हिंदी, मल्याळम आणि कन्नड सिनेमात काम केलं. काही रिएलिटी शो मध्ये देखील तो दिसला. विधानसभा निवडणूक लढवून राजकारणात शिरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आता न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे.
( वाचा : वाढदिवस स्पेशल : मलिंगाला वर्ल्ड कप फायनलमध्ये पाच सिक्स मारणारा बॅट्समन! )
यावर्षी झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy 2021) श्रीसंत केरळकडून खेळला. आता त्यानं आयपीएल स्पर्धेच्या लिलावासाठी (IPL Auction) देखील स्वत:चं नाव नोंदवलं आहे. श्रीसंतचा फॉर्म आणि रेकॉर्ड पाहता त्याला कोणती टीम करारबद्ध करण्याची शक्यता कमी आहे. मात्र आयपीएल फ्रँचायझी खेळाडूंची निवड करताना अनेक गोष्टींचा विचार करतात. त्यामुळे या अनेक कारणांपैकी एका कारणांमुळे श्रीसंतची एखाद्या आयपीएल टीममध्ये निवड देखील होऊ शकते.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.