चार दशकांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या जगातील मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये ज्याचा समावेश होतो त्या पाकिस्तानचा माजी कॅप्टन शोएब मलिकचा (Shoaib Malik) आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (1 फेब्रुवारी 1981) रोजी त्याचा जन्म झाला. शोएबने 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यामुळे 1990-99, 2000-09, 2010-19 आणि आता 2020 पासून पुढे अशी चार दशकं तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. अलिकडच्या काळात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसराच क्रिकेटपटू आहे.

गेल्या 21 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असूनही शोएब मलिकच्या खात्यात जमेच्या बाजू खूप कमी आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्याला ऑल राऊंडर म्हणून ओळखतं. त्याच्या 21 वर्षांच्या कारकीर्दीत तो 35 टेस्ट, 287 वन-डे आणि 116 आंततराष्ट्रीय टी-20 मॅच खेळला आहे. या मॅचमधील एखाद्या संस्मरणीय खेळीपेक्षा प्रत्येक वेळी टीममधून बाहेर गेल्यानंतर पुन्हा कमबॅक करणारा खेळाडू म्हणूनच तो क्रिकेट विश्वात ओळखला जाईल.

एक ना धड…

त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अकरावा नंबर सोडला तर सर्वत्र बॅटिंग केली पण तो कुठेही स्थिरावला नाही. टेस्ट आणि वन-डे मधील ओपनर, बॅटिंग ऑल राऊंडर, ऑफ स्पिनर, मीडल ऑर्डरची जबाबदारी वाहणारा कॅप्टन, लोअर ऑर्डरमध्ये येऊन आक्रमक रन्स करणारा बॅट्समन अशा सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या त्याच्यावर सोपवण्यात आल्या. त्याने ती सर्व प्रकारची कामं केली पण आज एकाही कामासाठी तो लक्षात येत नाही.

‘शोएबला क्रिकेटची उत्तम समज आहे’ असं पाकिस्तानचे दिवंगत कोच बॉब वूल्मर (Bob Woolmer) यांचं मत होतं. 2007 च्या वर्ल्ड कपमधून पाकिस्तानची टीम धक्कादायकपणे साखळी फेरीतच आऊट झाली. वर्ल्ड कप दरम्यान वेस्ट इंडिजच्या हॉटेलमध्येच वूल्मर यांचा संशयास्पद मृत्यू झाला. इंझमाम-उल-हक (Inzamam-ul-Haq) याने पाकिस्तानची कॅप्टनसी सोडली. या सर्व कसोटीच्या क्षणी शोएब मलिक पाकिस्तानच्या टीमचा कॅप्टन बनला.

( वाचा : ON THIS DAY : सौरव गांगुलीचा ‘तो’ कॅच संशयास्पद, इंझमामने दिली तब्बल दोन दशकानंतर कबुली! )

‘एकलकोंडा आणि अलिप्त’

शोएब कॅप्टन झाल्यानंतर पहिल्याच मोठ्या सीरिजमध्ये T20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2007) पाकिस्तानच्या टीम उपविजेती होती. त्यानंतर 18 महिने तो टीमचा कॅप्टन होता. टीमच्या खराब कामगिरीचे खापर मलिकच्या डोक्यावर फुटले. त्याचबरोबर तो ‘अलिप्त आणि सहकारी खेळाडूंशी तूटक वागणारा ‘एकलकोंडा’ कॅप्टन आहे’ असा ठपकाही पाकिस्तानच्या मॅनेजमेंटने त्याच्यावर ठेवला.

श्रीलंकाविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये पाकिस्तानच्या टीमचा पराभव झाला होता. शेवटच्या वन-डे तर पाकिस्तानने 275 रन्सने सपाटून मार खाल्ला. त्या सीरिजनंतर पीसीबीकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात मलिकवर तो तुटक आणि अलिप्त असून टीम मीटिंगमध्ये कॅप्टनने बोलणे आवश्यक आहे अशी पाच मिनिटे सोडून तोंड उघडत नाही, असं मत पीसीबीच्या समितीने व्यक्त केलं होतं.

( वाचा : वाढदिवस स्पेशल : कमरान अकमल, पाकिस्तानी क्रिकेटचा अस्सल चेहरा! )

पीसीबीनं असा ठपका ठेवूनही मलिक अजून पाकिस्तानच्या राष्ट्रीय टीमकडून खेळतोय. तो प्रत्येक वेळी खराब कामगिरी करतो आणि टीमबाहेर जातो. पुन्हा आणखी खराब कामगिरी करण्यासाठी टीममध्ये येतो आणि बाहेर पडतो. अगदी इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये 8,0,0 अशी खेळी केल्यानंतर तो टीमच्या बाहेर गेला आणि पुन्हा काही महिन्यांनी बांगलादेशविरुद्धच्या सीरिजसाठी टीममध्ये परतला.

कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर 2020 मध्ये होणारा T20 वर्ल्ड कप लांबला. शोएब आता टेस्ट आणि वन-डे मधून निवृत्त झाला आहे, पण T20 मध्ये त्याला अजूनही आशा आहे. 2021 चा T20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी त्याने या प्रकारातील निवृत्ती आणखी एक वर्ष पुढे ढकलली आहे. या वर्ल्ड कपमध्ये तो खेळला पाहिजे यासाठी त्याने गेल्या काही महिन्यात फारसे ग्रेट काही केलेले नाही.

अर्थात काहीही न केल्यामुळे तो T20 वर्ल्ड कप खेळणार नाही हे कुणीही खात्रीशीर सांगू शकत नाही. कारण पाकिस्तान हा देश, पाकिस्तानचं क्रिकेट आणि शोएबचं करियर याच्या लहरी आणि अनिश्चित वृत्तीवर कधीही संशय घेता कामा नये.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: