
‘त्याचं वय झालंय. तो हल्ली क्रिकेट फार खेळत नाही. तो दोन रन्स पळून काढू शकत नाही. त्याची फिल्डिंग मंदावलीय. त्याच्या खेळात सातत्य नाही. T20 हा तरुणांचा खेळ आहे, तिथे 41 वर्षांच्या खेळाडूचं काय काम?’ ख्रिस गेल (Chris Gayle) आयपीएल स्पर्धेतील पहिली मॅच खेळण्यापूर्वी ही चर्चा सर्वत्र सुरु होती. दरवर्षी गेल आयपीएलमध्ये उतरण्यापूर्वी अशीच चर्चा रंगते. गेल दरवर्षी सर्वांचे अंदाज मोडीत काढतो.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच गेलनं त्याच्या करियरबद्दल एक महत्वाची माहिती दिली आहे. ” माझा अजून निवृत्त होण्याचा कोणताही विचार नाही. माझ्याकडं अजून पाच वर्ष आहेत. मी सध्या 41 वर्षांचा आहे. 45 वर्षाचा होईपर्यंत रिटायर होण्याचा प्रश्नच नाही. या काळात दोन वर्ल्ड कप सुद्ध होणार आहेत. ” असं गेलनं ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. भारतामध्ये या वर्षी ऑक्टोबर महिन्यात T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) होणार आहे. तर, ऑस्ट्रेलियात पुढच्या वर्षी आणखी एक T20 वर्ल्ड कप होईल. या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचं गेलचं ध्येय आहे.
( वाचा : टीम इंडियाचे 2021 मध्ये भरगच्च वेळापत्रक, पाच प्रमुख आव्हानांचा करावा लागणार सामना! )
वेस्ट इंडिजच्या (West Indies) या दिग्गज क्रिकेटपटूनं जगभरातील T20 स्पर्धेत खेळून 10 हजार पेक्षा जास्त रन्स काढले आहेत. T20 मध्ये इतके रन्स करणारा तो एकमेव खेळाडू आहे. मागील वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2020) गेल किंग्ज इलेव्हन पंजाब (KIXP) सात मॅच खेळला. यामध्ये त्यानं तीन हाफ सेंच्युरी झळकावल्या. 99 हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर होता.
गेलनं राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध मागील आयपीएलमध्ये 99 रन्सची सर्वोत्तम खेळी केली होती. त्या मॅचमध्ये गेलनं T20 मध्ये एक हजार सिक्सर्स मारण्याचा विक्रम पूर्ण केला. T20 मध्ये सर्वार्धिक सिक्सर मारण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कायरन पोलार्डपेक्षा गेल 310 सिक्सर्सनं पुढे आहे.
( वाचा : श्रीसंतचं 7 वर्षांनंतर क्रिकेटमध्ये कमबॅक, संजू सॅमसनच्या कॅप्टनसीखाली खेळणार स्पर्धा )
ESPNCRICINFO या क्रिकेट वेबसाईटनं काही दिवसांपूर्वी गेलची काही आकडेवारी दिली होती. ती आकडेवारी पाहा म्हणजे गेल T20 क्रिकेटचा ‘युनिव्हर्सल बॉस’ (Universal boss) का आहे हे समजेल.
1001 – ख्रिस गेलचे T20 मधील सिक्सर्स. जमेकाकडून खेळताना 2006 साली त्याने पहिला सिक्सर मारला होता. तेंव्हापासून गेली 14 वर्ष तो हे काम सातत्याने करतोय. त्याने T20 मध्ये एकूण 1041 फोर लगावले आहेत.
349 – ख्रिस गेलनं आयपीएलमधील झळकावलेले सिक्सर्स. आयपीएलमध्ये सर्वार्धिक सिक्सर लगावणारा बॅट्समन गेलच आहे.
243 – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कडून खेळताना गेलनं लगावलेल्या सिक्सर्सची संख्या
135 – 2015 या एका वर्षात T20 क्रिकेटमध्ये गेलनं लगावलेल्या सिक्सर्सची संख्या
18 – बंगालादेश प्रीमियर लीग (बीपीएल) मधील एका मॅचमध्ये रंगपूर रायडर्सकडून खेळताना ढाका डायनामिट्स विरुद्ध त्याने 18 सिक्सर्स लगावले होते.
18 – एकाच T20 मॅचमध्ये दहापेक्षा जास्त वेळा सिक्सर्स लगावण्याचा पराक्रम गेलनं 18 वेळा केला आहे. क्रिकेटविश्वातील अन्य कोणत्याही बॅट्समनला ही कामगिरी आजवर तीनपेक्षा जास्त मॅचमध्ये करता आलेली नाही.
( सर्व आकडेवारी सौजन्स – ESPNCRICINFO)
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.