फोटो – ट्विटर/BCCI – IPL

शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) हा बांगलादेशचा (Bangladesh)  आजवरचा सर्वोत्तम ऑल राऊंडर आहे. तो 2007 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. मागील 14 वर्षात विकेट किपिंग सोडली तर त्यानं बांगलादेश क्रिकेटमधील सर्व भूमिका पार पाडल्या आहेत. 2019 मधील क्रिकेट वर्ल्ड कपमध्येही तो चांगल्या फॉर्मात होता. बांगलादेशच्या क्रिकेट फॅन्ससाठी तर तो टीमच्या प्रत्येक दुखण्यावरील एकमेव उपाय आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी सिझनसाठी (IPL 2021) खेळाडूंचा लिलाव पार पडला. शाकीब हा आयपीएलमध्ये सर्वात जास्त खेळलेला क्रिकेटपटू आहे. क्रिकेट मॅचबद्दल बुकीनं संपर्क साधल्यानंतर त्याची माहिती ICC ला न दिल्याबद्दल त्याच्यावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ही बंदी आता संपली. त्यामुळे तो लिलावासाठी उपलब्ध होता. शाकीबची कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या त्याच्या जुन्या टीमनं पुन्हा एकदा निवड केली. ही निवड होताच त्यानं एक निर्णय घेतला.

Cricbuzz  नं दिलेल्या वृत्तानुसार शाकीबनं आयपीएल स्पर्धा खेळता यावी म्हणून आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात येणारी श्रीलंका टेस्ट सीरिज न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो श्रीलंकेतील स्पिनला मदत करणाऱ्या पिचवर बांगलादेशला त्याच्या बॅटींग, बॉलिंग आणि 14 वर्षांचा अनुभव याच्या आधारे मदत न करता आयपीएल स्पर्धेत कोलकाताच्या जर्सीत खेळताना दिसेल.

( वाचा : कार्तिक गेला, मॉर्गन आला, केकेआरचा गोंधळ आणखी वाढला! )

‘ज्याला देशासाठी खेळण्यात रस नाही, त्याला बळजबरी करण्यात काय अर्थ आहे?’ असं मत व्यक्त करत बांगलादेश क्रिकेट बोर्डानं शाकीबला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. अर्थात देशापेक्षा आयपीएलला प्राधान्य दिल्याचं शाकीब हे ताजं उदाहरण असलं तरी ते एकमेव उदाहरण नाही. यापूर्वीही या प्रकारच्या घटना घडल्या आहेत.

रबाडानं काय ठरवलं?

शाकीबचा हा निर्णय जगासमोर जाहीर झाला. त्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेतून एक बातमी आली. आयपीएल स्पर्धा एप्रिल महिन्यात सुरु होणार आहे. पाकिस्तानची टीम 2 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान दक्षिण आफ्रिकेत वन-डे आणि T20 सीरिज खेळायला जाणार आहे.

कागिसो रबाडा (Kagiso Rabada) हा दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)  टीमचा प्रमुख खेळाडू आहे. त्यानं मागच्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2020)  सर्वात जास्त 30 विकेट्स घेतल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं मागच्या वर्षीच्या पहिल्यांदाच आयपीएल फायनल गाठली होती. दिल्लीच्या आजवरच्या सर्वोत्तम कामगिरीत रबाडाच्या भेदक माऱ्याचं मोठं योगदान होतं.

मागील वर्षीच्या चांगल्या कामगिरीमुळे दिल्लीबद्दलच्या अपेक्षा यंदा आणखी वाढल्या आहेत. मागच्या वर्षी कमी पडलेलं एक पाऊल पुढं टाकण्यासाठी रबाडा दिल्लीला अगदी पहिल्या मॅचपासून संपूर्ण स्पर्धेत लागणार आहे.

आयपीएल स्पर्धेतून मिळाणारा पैसा, प्रसिद्धी हे सर्व असूनही रबाडा काय म्हणतो ते पाहा, “ माझ्यासाठी देश हा सर्वप्रथम (Country First) आहे. पाकिस्तान सीरिजच्या वेळापत्रकानुसार मी कदाचित आयपीएल स्पर्धेत पहिल्या आठवड्यात खेळू शकणार नाही. दिल्ली हे माझं भारतामधलं घर आहे. पण नॅशनल ड्यूटी हे माझं पहिलं प्राधान्य आहे.’’

( वाचा : डीव्हिलियर्सच्या वाढदिवशीच त्याच्या जिवलग मित्राची अचानक निवृत्ती! )

दोन महिने चालणाऱ्या आयपीएलमधून खेळाडूंची वर्षभराची कमाई होते. वाढत्या स्पर्धेमुळे खेळाडूंचं स्पर्धात्मक वय कमी होत चाललं आहे. याच काळात खेळाडूंनी कमाई केली नाही तर कधी करायची? या स्पर्धेतील अनुभवाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही उपयोग होतो. असे अनेक युक्तीवाद आजवर झालेले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर एकाच दिवशी, एकाच विषयावर शाकीब अल हसन आणि कागिसो रबाडा (Shakib and Rabada) यांची समोर आलेली मतं ‘Cricket मराठी’ तुमच्यासमोर ठेवत आहे. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या दोन क्रिकेट बोर्डाच्या परिस्थितीमध्ये काही फरक नाही. जितकी बांगलादेशला शाकीबची गरज आहे तितकीच दिल्ली कॅपिटल्सला रबाडाची आवश्यकता आहे. ‘देश आधी की IPL?’ या सतत चालत आलेल्या वादावर शाकीब आणि रबाडा ? (Shakib and Rabada) यांचं ठरलं आहे. हा लेख वाचून तुम्ही आपआपली मतं ठरवावी.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: