फोटो – BCCI

ऑस्ट्रेलियातील टेस्ट सीरिज (IND vs AUS) जिंकून परतलेल्या टीम इंडियाला आता घरच्या मैदानात इंग्लिश पेपर द्यायचा आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील टेस्ट सीरिजला 5 फेब्रुवारीपासून चेन्नईत सुरुवात होत आहे. या सीरिजबद्दल भारतीय फॅन्स कमालीचे उत्सुक आहेत.

सोशल मीडियावर क्रिकेटबद्दल नेहमीच बहरदार लेखन करणारे लोकप्रिय लेखक आशुतोष रत्नपारखी (Ashutosh Ratnaparkhi) यांच्याशी आम्ही या सीरिजच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. 2020 या कॅलेंडर वर्षात एकही टेस्ट सेंच्युरी न झळकावू शकलेला टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) या सीरिजमध्ये रन्सचा रतीब घालेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. इतकच नाही तर विराट या सीरिजमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जो रुटपेक्षा (Joe Root) जास्त रन काढेल असं भाकितही त्यांनी व्यक्त केलं आहे.

आशुतोष रत्नपारखी यांच्याशी ‘Cricket मराठी’ ने साधलेल्या संवादाचा हा सारांश

प्रश्न : आशुतोष, क्रिकेट या खेळाबद्दलची तुमची पहिली आठवण काय?, तुम्हाला हा खेळ कधीपासून आवडू लागला?

आशुतोष : क्रिकेट हा खेळ लहान असल्यापासूनच बघत आहे. जेव्हा जेव्हा एखादा सामना असे तेव्हा तेव्हा हमखास बघत असे. अगदी सुरुवातीला कपिल देव यांना खेळताना पाहिल्याचे स्मरते. तेव्हा क्रिकेटमध्ये नुकतेच रंगीत कपडे आलेले. त्यानंतर १९९६ साली भारतात झालेला विश्वचषक टीव्हीवर पहिला होता, त्याचदरम्यान क्रिकेटची आवड वाढली.

प्रश्न : सर्वच क्रिकेट फॅन्ससाठी 2020 हे अवघड वर्ष होतं. 2020 मध्ये मोठा काळ क्रिकेट बंद होतं. याकाळात तुम्ही क्रिकेटला नक्कीच मिस केलं असेल, क्रिकेटच्या जवळ राहण्यासाठी तुम्ही या काळात काही विशेष प्रयत्न, एखादा उपक्रम केला का?

आशुतोष : 2020 मध्ये अर्थातच आपण सर्वांनी क्रिकेट मिस केले. वर्षभर कोणत्या न कोणत्या क्रिकेट स्पर्धा, लीग चालू असतातच. त्यात 2020 मध्ये अचानक आलेला व्यत्यय दिर्घकालीन होता. या कालखंडात क्रिकेटचे जुने व्हिडीओ बघणे, क्रिकेट संबंधित लेख, ब्लॉग यांचे वाचन करणे तसेच आवडत्या क्रिकेटपटूच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काही पोस्ट समाजमाध्यमांवर लिहिणे या गोष्टी केल्या.

प्रश्न : कोरोना व्हायरसमुळे मिळालेल्या सक्तीच्या ब्रेकनंतर नंतर भारतामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सीरिज होतीय. इंग्लंड सारखी बडी आंतरराष्ट्रीय टीम मोठ्या दौऱ्यासाठी आली आहे, या दौऱ्याबाबत तुम्ही किती उत्सुक आहात? या मॅच पाहण्याचं तुम्ही कसं प्लॅनिंग केलं आहे?

आशुतोष : आंतरराष्ट्रीय क्रिकेटची गोष्टच वेगळी असते. भारताचा नुकताच झालेला ऑस्ट्रेलिया दौरा देखील अतिशय चुरशीचा आणि यशस्वी झाला. यावेळी इंग्लंड संघ भारतात येत आहे, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक उत्कृष्ट संघ आहे. त्याचबरोबर सध्याचा भारतीय संघ कसोटी मानांकनात प्रथम स्थानी आहे. दोन तुल्यबळ संघांमधील हा सामना चुरशीचा होईल. यामुळे या संपूर्ण काळात उत्कृष्ट क्रिकेट पाहायला मिळणार आहे याची मला खात्री आहे. या सिरीज मधील सगळेच सामने बघण्यास मी उत्सुक आहे. ऑफिसची वेळ सांभाळून सामने बघणे, विशेषतः रविवारी तर निश्चितपणे सामना बघणे हे ठरवले आहे. त्याशिवाय रोज संध्याकाळी हायलाईट्स देखील बघण्याचा प्लॅन आहे.

( वाचा : IND vs ENG: स्वातंत्र्य, सन्मान आणि स्वामित्वाची 89 वर्षांची लढाई! )

प्रश्न : 2011 साली भारतामध्ये जिंकलेली इंग्लिश टीम आणि 2021 मध्ये भारतामध्ये आलेली इंग्लिश टीम यात तुम्हाला काय साम्य आणि फरक जाणवतो?

आशुतोष : गेल्या दहा वर्षात जर कोणत्या संघाने भारतात कसोटी मालिका जिंकली असेल तर इंग्लंडने. तो संघ अनेक गुणवान खेळाडूंनी भरलेला एक परिपूर्ण संघ होता. अँड्र्यू स्ट्रॉस सारखा कर्णधार त्या संघाकडे होता. अ‍ॅलिस्टर कुक, केव्हिन पीटरसन, ओईन मोर्गन, मॅट प्रायर यांसारखे फलंदाज आणि जेम्स अँडरसन, ग्रीम स्वॉन यांसारखे गोलंदाज या संघात होते. मुख्य म्हणजे कागदावर जेवढा हा संघ वाटत असे त्याहून अधिक बलवान संघ होता.

असे जरी असले तरीही तुलनेने मला सध्याचा इंग्लंड संघ अधिक मजबूत वाटतो. कर्णधार जो रूट, जॉस बट्लर, बेन स्टोक्स हे फलंदाज आज क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज फळी मानली जाते, जेम्स अँडरसन याच्याकडे प्रदीर्घ आणि त्यातही उपखंडात खेळण्याचा अनुभव आहे, जोफ्रा आर्चर स्विंग आणि त्याचवेळी वेगवान गोलंदाजी करू शकतो. त्यात श्रीलंकेला त्यांच्याच देशात हरवण्याचा विक्रम या संघाने नुकताच केला आहे त्यामुळे इंग्लंड संघाचा आत्मविश्वास वाढलेला असेल. यामुळे मला सध्याचा इंग्लंड संघ एक प्रबळ प्रतिस्पर्धी वाटतो.

अर्थात भारतीय संघात विराट कोहली, अजिंक्य राहणे, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह यांसारखे खेळाडू असल्याने भारतीय संघ तुल्यबळ आहे.

प्रश्न : केव्हिन पीटरसननं भारतीय स्पिनर्सशी कसं खेळावं याबाबत राहुल द्रविडच्या नोट्स इंग्लंडच्या बॅट्समन्सशी शेअर केल्या आहेत त्याचा त्यांना किती फायदा होईल?

आशुतोष : केव्हिन पीटरसन यांनी इंग्लिश खेळाडूंशी शेअर केलेल्या राहुल द्रविड यांच्या नोट्स पहिल्या. त्यात फिरकी गोलंदाजाचा सामना कसा करावा हि तांत्रिक माहिती अतिशय सोपी शब्दांत मांडली आहे. जी अर्थातच त्यांच्या अनुभवावर आधारित आहे. विशेषतः पायाची हालचाल कशी असावी या बाबतीत त्यांनी दिलेला सल्ला बहुमोल आहे असे मला वाटते. याचा उपयोग इंग्लिशच नाही तर भारतीय फलंदाजांनी देखील केला तर त्यांना फायदेशीर ठरेल.

( वाचा : जेंव्हा, वीरेंद्र सेहवागच्या आक्रमक प्रतिहल्ल्यानंतर भारतानं चेन्नई टेस्ट जिंकली होती! )

प्रश्न : गेल्या 10 वर्षात भारताला फक्त एकाच टीमनं टेस्ट सीरिज जिंकली आहे. भारताला भारतामध्ये हरवणं इतकं अवघड का आहे, असं तुम्हाला वाटतं?

आशुतोष : 2012 मध्ये भारतात कसोटी मालिका इंग्लंड संघाने जिंकली होती. त्यानंतर कोणत्याही संघाला भारतात कसोटी मालिका जिंकणे हे स्वप्नच राहिले आहे. भारतातील हवामान हे मुख्यत्वे नॉन-एशियन संघांसाठी आव्हानात्मक असते. विशेषतः उन्हाळ्यात भारतात खेळणे, शारीरिक कसोटी पाहणारे असते. त्याशिवाय फिरकीला पोषक खेळपट्ट्या आणि फिरकीला सामोरे जाताना कमकुवत असलेले तंत्र हे देखील एखाद्या नॉन-एशियन संघाच्या त्रासात भर घालते. त्याशिवाय भारतीय संघाच्या मागे असलेले चाहत्यांचे प्रचंड पाठबळ ही बाब समोरच्या संघाला दडपण येण्यास पुरेशी आहे. या सगळ्यामुळे भारतात भारताला हरवणे हे अतिशय अवघड आहे.

प्रश्न : भारत – इंग्लंड यांच्यातील पहिली टेस्ट चेन्नईमध्ये होत आहे, चेन्नईमध्ये भारतीय बॅट्समन्सच्या अनेक संस्मरणीय इनिंग आहेत यापैकी तुमची आवडती इनिंग कोणती?

आशुतोष : सचिन तेंडुलकरची पाकिस्तान विरुद्ध केलेली 136 धावांची खेळी ही आवडती इनिंग आहे. चौथ्या इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करताना प्रचंड दबावाखाली खेळलेली इनिंग असे मी त्याचे वर्णन करेन. चौथ्या इनिंग मध्ये खेळपट्टी पूर्णपणे खराब झालेली असते, अनियमित बाउंस असतो आणि प्रचंड दमट हवामान यामुळे फलंदाजी करणे म्हणजे एक दिव्यच असते!

अशा परिस्थितीत सचिनणे “लीड फ्रॉम फ्रंट” चे उदाहरण सादर करत केलेली ती एक महान खेळी होती. समोर वसीम अक्रम, सकलेन मुश्ताक आणि शाहीद आफ्रिदी यांसारखे गोलंदाज होते. त्या माऱ्याला निष्प्रभ करताना पूल, कट, कव्हर ड्राईव्ह, फ्लिक या फटक्यांचे सुरेख प्रदर्शन सचिनने मांडले होते. जरी हा सामना भारताने गमावला असला तरीही ती खेळी एक अजरामर इनिंग आहे.

( वाचा : ON THIS DAY : क्रिकेट फॅन्सच्या आजही डोळ्यात पाणी आणणारी सचिनची चेन्नई टेस्टमधील सेंच्युरी! )

प्रश्न : या सीरिजमध्ये अहमदाबादच्या नव्या ग्राऊंडवर एक डे-नाईट टेस्ट होतीय. नव्या पिचवर थेट डे-नाईट वातावरणात पिंक बॉलनं खेळणं किती आव्हानात्मक आहे?

आशुतोष : यापूर्वी भारतीय संघाने काही दिवसरात्र कसोटी सामने खेळले असले तरी संपूर्ण नव्या मैदानावर प्रथमच एखादा दिवसरात्र कसोटी सामना होतोय. त्यामुळे खेळपट्टी, आउटफिल्ड आणि हवामानातील दमटपणा या गोष्टींचा अंदाज कोणालाही नाही. त्यामुळे दोन्ही संघाना अधिक जोर लावावा लागणार हे नक्की.

प्रश्न : विराट कोहली आणि जो रुट या दोन बॅट्समनमध्ये कोण जास्त रन्स काढणार याची अनेकांना उत्सुकता आहे, याबाबतचा तुमचा अंदाज काय आहे?

आशुतोष : विराट कोहली आणि जो रूट हे दोघेही सध्याचे सर्वोत्तम फलंदाज आहेत. विराटला कौतुकाने “रनमशीन” म्हटले जाते. खोऱ्याने धावा काढताना तो तितकाच रेखीव फलंदाजी करतो, त्यामुळे त्याला खेळताना पहाणे हे आनंददायी असते. अर्थात सध्या तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाहीये परंतु या मालिकेत तो धावांचा रतीब घालेल असे मला वाटते.

कोहली, स्मिथ आणि विल्यम्सन यांच्याबरोबरच सर्वोत्तम फलंदाजांमध्ये जो रूटचे नाव घेतले जाते. इंग्लिश चाहत्यांना त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील, परंतु माझ्यामते विराट कोहलीच या दोघांत जास्त रन्स काढेल असे वाटते.

प्रश्न :  भारत – इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये विराट कोहली आणि जो रूट शिवाय आणखी कोणकोणत्या खेळाडूंच्या कामगिरीकडं तुमचं विशेष लक्ष असेल, त्याबद्दल आम्हाला सांगा?

आशुतोष : चेतेश्वर पुजारा- याने सध्या ऑस्ट्रेलियामध्ये केलेला पराक्रम आपण सर्वांनी पहिलाच आहे. त्याला आउट करणे हे सध्या कदाचित सर्वात कठीण काम आहे.

ऋषभ पंत- ऑस्ट्रेलिया विजयातील शेवटच्या कसोटीचा हिरो. याच्या फलंदाजीत बराच फरक पडलाय, यष्टीरक्षणात देखील सुधारणा आहे.

जसप्रीत बुमराह- सध्याचा सर्वोत्तम गोलंदाज, याला सामोरे जाणे हे फलंदाजांसाठी दुःस्वप्न.

बेन स्टोक्स- सध्याचा निःसंशय उत्तम अष्टपैलू, कोणत्याही क्षणी कसोटीचा देखील रंग पालटू शकणारा क्रिकेटपटू.

या सर्व खेळाडूंच्या कामगिरीकडे माझ्याप्रमाणे अनेक क्रिकेटप्रेमी डोळे लावून बसले असतील.

( वाचा : Fan Corner : ऑस्ट्रेलियन बॅट्समनचा दबदबा नाहीसा झाला – केदार ओक )

प्रश्न : तुम्ही सोशल मीडियावर क्रिकेटवर सातत्यामं लेखन केलं आहे, जे खूप लोकप्रिय आहे. यासाठी तुम्ही कशी तयारी करता?

आशुतोष : क्रिकेट हा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आपसूकच सुचते. अर्थात क्रिकेटविषयक लिखाण करताना आकडेवारी अचूक असावी लागते. त्याशिवाय एखादा विशिष्ट किस्सा खेळाच्या आठवणीशी निगडीत असेल तर त्याचाही उल्लेख करतो. त्याशिवाय क्रिकेटविषयक लेख, समीक्षण वाचतो.

प्रश्न : मराठी वाचकांची क्रिकेटबद्दल जाणून घेण्याची भूक मिटवण्यासाठी ‘Cricket मराठी’ ही फक्त क्रिकेटवरील वेबसाईट सुरु झाली आहे. या साईटबद्दलचा तुमचा अभिप्राय जाणून घ्यायला आम्हाला आवडेल

आशुतोष : यापूर्वी मराठीमध्ये जरी क्रीडाविषयक माहिती देणारी वेबसाईट उपलब्ध असल्या तरीही केवळ क्रिकेटवर लिखाण आणि माहिती देणारी अशी वेबसाईट नव्हती. ती कमतरता ‘Cricket मराठी’ ने भरून काढली असे म्हणता येईल. या वरील लेख हे आकर्षक पद्धतीने संपादित केलेले असतात, त्याचबरोबर सखोल माहिती देखील पुरवतात. यामुळे ‘Cricket मराठी’ समस्त मराठी क्रिकेटप्रेमींच्या हक्काचे व्यासपीठ झाले आहे असे म्हणू शकतो. पुढील वाटचालीसाठी ‘Cricket मराठी’ ला मी शुभेच्छा देतो.

( आशुतोष रत्नपारखी हे उत्तम क्रिकेट लेखक आहेत. तुम्ही त्यांच्याशी ashutoshr1707@gmail.com या ईमेलवर संपर्क करु शकता. तसेच त्यांच्या फेसबुकवर संपर्क करण्यासाठी इथे क्लिक करा

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: