फोटो – सोशल मीडिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS) सीरिज संपून आता आठवडा उलटला आहे. या आठभरानंतरही या सीरिजच्या आठवणी ताज्या आहेत. या मालिकेत भारतानं ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाबद्दल प्रत्येक भारतीय फॅन आपआपल्या भावना व्यक्त करत आहे.

‘लॉर्ड्स ते वानखेडे व्हाया डेझर्ट स्ट्रॉम’ या पुस्तकाचे लेखक ‘केदार ओक’ (Kedar Oak) यांच्याशी आम्ही या सीरिजबद्दल संवाद साधला. भारताचा हा विजय अनपेक्षित होता, अशी अनेकांची भावना आहे. केदार यांना तसं वाटत नाही. ‘ऑस्ट्रेलियन बॅटिंगचा दबदबा गेल्या शतकात नाहीसा झाला आहे, त्यामुळे आपण ही सीरिज जिंकू किंवा बरोबरीत सोडवू असा विश्वास होता,’’ असं मत त्यांनी ‘Cricket मराठी’ शी बोलताना व्यक्त केलं आहे.

केदर ओक यांच्याशी ‘Cricket मराठी’ ने साधलेल्या संवादाचा हा सारांश

प्रश्न : क्रिकेट या खेळाशी संबंधित तुमची पहिली आठवण काय आहे?

केदार : क्रिकेट खेळण्याचं म्हणाल तर खेडेगावात लहानपण गेल्याने खेळण्यासाठी मुबलक मोकळी जागा मिळाली. आमच्या शाळेभोवतीच तीन मोठी ग्राऊंड्स होती. शिवाय गावभरात खेळण्यायोग्य अशी अजून आठदहा ठिकाणं तरी नक्की असतील. लोकसंख्या बेताचीच त्यामुळे मनात येईल तेव्हा आणि मनात येईल तिकडे खेळण्याची मुभा होती. आम्ही मित्र सगळे सिझनल खेळ खेळायचो तरी मुख्य खेळ क्रिकेटच होता. क्रिकेट बघण्याची आवडही आमच्या घरात वंशपरंपरेने आलेली आहे. मला १९९२ साली मी दुसरीत असताना ऑस्ट्रेलिया -न्यूझीलंडमध्ये झालेला वर्ल्डकप अगदी पुसटसा आठवतोय. १९९३ साली इंग्लंड ३ टेस्ट मॅचेस खेळायला भारतात आले होते. त्या सिरीजपासून मी क्रिकेट फॅन बनलो असं म्हणू शकतोस.

प्रश्न : केदार, तुझं बालपण आणि कॉलेज ज्या काळात झालं त्या काळात झालं त्या काळात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अनेक चांगल्या लढती झाल्या आहेत, शारजातील डेझर्ट स्ट्रॉममधील सचिनची इनिंग, 2001 ची सीरिज, 2003-04 चा भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा तर या सर्व काळातील तुझी आवडती एखादी मॅच किंवा त्यामधील इनिंग कोणती?

केदार : भारत ऑस्ट्रेलियामधलं द्वंद्व आता चांगलंच रंगात आलं आहे. गेली अनेक वर्षं ही सिरीज नेहमीच ब्लॉकबस्टर ठरली आहे. मी शाळेत असताना झालेल्या सिरीजबद्दल बोलायचं झालं तर १९९८ साल विसरता येणार नाही. त्यावर्षी आपण ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातत्याने खेळत होतो. डेझर्ट स्टॉर्मची तिरंगी स्पर्धा भन्नाटच होती पण केवळ टेस्ट मॅचबद्दल बोलायचं झालं तर त्या काळातली मला सर्वात आवडणारी मॅच म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातली चेन्नई टेस्ट मॅच. त्या सिरीजची आणि विशेषतः सचिन वॉर्न द्वंद्वाची तेव्हा खूप हवा होती. त्यातच सचिनने केलेल्या नाबाद १५५ धावांची इनिंग माझी प्रचंड लाडकी आहे.

प्रश्न : ऑस्ट्रेलियानं 1990 च्या दशकात आणि त्यानंतरही अनेक ग्रेट क्रिकेटपटू दिले, त्यामधील तुझा एक सर्वात आवडता क्रिकेटपटू कोणता आणि का?

केदार : नव्वदीपासून ऑस्ट्रेलियाने चिकार ग्रेट खेळाडू दिले आहेत. नव्वदीतला माझा सर्वात आवडता खेळाडू मार्क वॉ. त्याची बॅटिंग फारच नेत्रसुखद होती.

प्रश्न : सौरव गांगुलीच्या कॅप्टनसीच्या काळात आपण ऑस्ट्रेलियात सीरिज ड्रॉ केली होती, विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये 2018-19 मध्ये आपण पहिल्यांदा सीरिज जिंकलो या दोन कॅप्टनच्या टीममधील फरक तुला काय वाटतो?

केदार : 2003-04 साली आपण सिरीज जिंकण्याच्या खूपच जवळ आलो होतो. 2003-04च्या दौऱ्यात दोन्ही संघांची बॅटिंग खूपच तगडी होती आणि बॉलिंग तुलनेने कमकुवत. ऑस्ट्रेलियाकडे वॉर्न आणि मॅकग्रा नव्हते. भारताच्या दोन संघांमधला मुख्य फरक सांगायचा तर वेगवान गोलंदाजांचा चांगला फॉर्म आणि मुख्य म्हणजे एकत्रित चांगली कामगिरी करणं. 03-04 च्या दौऱ्यातही आपल्याकडे झहीर, आगरकर, नेहरा, इरफान, कुंबळे असे गोलंदाज होते. काहींना यश मिळालंही पण एकेकट्याने. सगळे जण एकत्र शिकार करायला लागले तर त्याचा परिणाम जास्त चांगला होतो. 2018-19 साली तशी जथ्याने शिकार झाली. अर्थात भारताच्या पथ्यावर पडलेली अजून एक चांगली गोष्ट म्हणजे सरत्या दशकात ऑस्ट्रेलियन बॅटिंगमधला पूर्णपणे नाहीसा झालेला दबदबा. दोन्ही बाजूने समीकरण जुळून आलं आणि आपल्याला सलग दोन वेळा ऑस्ट्रेलियाला पराभूत करता आलं.

( वाचा : IND vs AUS: होय, आपण (तरीही) पुन्हा जिंकलो! )

प्रश्न : भारत – ऑस्ट्रेलिया सीरिज सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियासमोर अनेक अडचणी होत्या. नुकतंच संपलेलं आयपीएल, कोरोनामुळे बदललेले नियम, विराट कोहली एक टेस्ट नंतर परत जाणार, स्मिथ-वॉर्नरसह संपूर्ण ऑस्ट्रेलियन टीमचा सामना या सर्व पार्श्वभूमीवर तुला ही सीरिज सुरु होण्यापूर्वी याचा काय निकाल लागेल असं वाटलं होतं?

केदार : आता जिंकून झाल्यानंतर असं मत व्यक्त करणं खोटं वाटेल पण खरंच मला आपण ही मालिका जिंकणार किंवा बरोबरीत तरी नक्की सोडवणार असा विश्वास होता, जो इतक्या अडचणी आल्यावरही डळमळीत झाला नाही. ह्यामागे दोन कारणं आहेत. ऑस्ट्रेलियन बॅटिंग चालणार नाही असं मला वाटत होतं. अडचणी आल्या की उलट टीम अधिक भक्कम होते. एखादा ‘स्पिरीटेड परफॉर्मन्स’ संपूर्ण टीमचं मनोबल उंचावतो. सिडनीमध्ये नेमकं हेच झालं आणि ब्रिस्बेन टेस्टमध्ये आपला संघ पूर्ण आत्मविश्वासाने उतरला.

प्रश्न : अ‍ॅडलेड टेस्टमधील दुसऱ्या इनिंगमध्ये आपली इनिंग अगदी 36 रन्सवर संपुष्टात आली, या धक्कादायक नामुष्कीचं काय कारण असावं?

केदार : असे प्रसंग क्वचित कधीतरी घडतात ज्याचं काही ठोस असं कारण देता येत नाही. आपल्या बॅट्समननी हाराकीरी केली नाही पण नामुष्की ओढवलीच. होतं कधीतरी.

( वाचा : लॉर्ड्स 1974 ते अ‍ॅडलेड 2020, दोन लज्जास्पद कामगिरीमधील अजब योगायोग! )

प्रश्न : अजिंक्य रहाणेची कॅप्टनसी हा या सीरिजमधली एक चर्चेचा मुद्दा होता, तू गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट फॉलो करत आहेस. त्यावर सातत्याने लिहित असतोस, अजिंक्यच्या कॅप्टनसीमधील तुला जाणवलेली खास गोष्ट सांगशील का?

केदार : विराट नाही, संघ अडचणीत आहे, आता माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे अशी परिस्थिती असताना अचानक खूप काही करण्याच्या नादात अजिंक्यने स्वतःच्या नैसर्गिक स्वभावाला बगल दिली नाही हे विशेष. कर्णधारपद पदरी पडल्यावर पहिल्याच सामन्यात केलेली शतकी खेळीही त्याच्या कर्णधारपदाला पूरकच ठरली. अजिंक्यच्या शांत तरीही खंबीर स्वभावाचा त्या कठीण काळात नक्कीच चांगला परिणाम झालेला दिसला. खेळाडूही नवीन होते. त्यांचा काहीतरी करून दाखवण्याचा जोश आणि जिद्द, अजिंक्यमुळे त्यांना मिळालेली मुभा ह्या दोन गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन खेळाडूंची कामगिरी अव्वल दर्जाची झाली.

प्रश्न : आर. अश्विन आणि चेतेश्वर पुजारा या दोघांवरही अजिंक्य इतकाच ही मालिका सुरु होण्यापूर्वी दबाव होता. या सीरिजनंतर त्यांच्या टीकाकरांना नावं ठेवायच्या गोष्टी कमी झाल्या आहेत, असं वाटतं का?  

केदार : पुजारावर दबाव होता असं मला वाटत नाही.  बाकी, पुजाराच्या बॅटिंगची पद्धत बघता कारकीर्द संपेपर्यंत त्याला अधूनमधून टीकेचा सामना करावा लागेलच. जोपर्यंत टीम मॅनेजमेंटला त्याच्यावर विश्वास आहे आणि तो संघाला पूरक कामगिरी करत आहे तोपर्यंत तो जगाचा विचार करणार नाही. अश्विनवर नक्कीच दबाव होता पण त्याने खूपच चांगली कामगिरी करून अनेक टीकाकार प्रशंसकांमध्ये बदलले असतील. फक्त आशिया खंडात विकेट्स घेणारा गोलंदाज अशी त्याची ओळख निर्माण होत होती. त्याला कारणंही तशीच होती. यंदा मात्र त्याने भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला.

( वाचा : ‘त्याला रात्रभर त्रास होत होता,’ अश्विनच्या बायकोनं सांगितलं नवऱ्याचं सत्य! )

प्रश्न :  ऋषभ पंत, शुभमन गिल, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर या सारख्या तरुण आणि टेस्ट क्रिकेटमध्ये नव्या असलेल्या खेळाडूंनी ही सीरिज गाजवली त्यांच्या खेळाबद्दल काय सांगशील?

केदार : अविश्वसनीय. पंतने तर कमालच केली. त्याची टेस्ट क्रिकेटमधली कामगिरी ह्यापूर्वीही चांगलीच होती पण सातत्याने होणाऱ्या वनडे आणि T20, त्यात येणारं अपयश, धोनीशी होणाऱ्या तुलनेने मिळणारं मीडिया कव्हरेज आणि टीका ह्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स अगदीच रसातळाला गेला होता. अशा पार्श्वभूमीवर पंतची कामगिरी खूपच जबरदस्त. शुभमन गिलला पृथ्वी शॉ अपयशी झाल्यामुळे अनायसे संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोनं केलं. शुभमनला भारतीय क्रिकेटचं भवितव्य मानलं जात होतं आणि त्याला खेळायला मिळालेल्या तीन टेस्टसमध्ये त्याने हा विश्वास सार्थ करून दाखवला आहे.

सिराजवर तर वैयक्तिक दुःखाचा डोंगर कोसळला होता पण त्याने बऱ्याच जणांना आश्चर्यचकित करणारी कामगिरी करून दाखवली. जिद्द असली की माणूस त्याच्या क्षमतेला पूर्ण न्याय देऊ शकतो. सिराजच्या बाबतीत आपल्याला हेच बघायला मिळालं. सगळे सिनियर फास्ट बॉलर्स जखमी झाले असताना अचानक आलेल्या जबाबदारीला तो निर्धाराने सामोरा गेला.

शार्दुललाही रणजी क्रिकेटमध्ये बॉलिंग करण्याचा प्रचंड अनुभव आहे. मुंबईकर क्रिकेटचा खडूसपणा त्याच्यात पूरेपूर उतरला आहे. खालच्या क्रमांकावर बॅटिंग करून सुंदरबरोबर त्याने केलेली भागीदारी गेमचेंजर ठरली. पुन्हा एकदा तेच म्हणेन की ज्या खेळाडूंना अचानक संधी मिळाली, ज्या खेळाडूंना आपल्याला पुन्हा कधी खेळायला मिळेल ह्याची शाश्वती नव्हती, ज्यांना हे माहीत होतं की आपल्याला मिळालेल्या लिमिटेड संधीचा फायदा उठवायचा आहे आणि संघाला विजयी करायचं आहे, असे खेळाडू खूप परिणामकारक ठरू शकतात. त्यांच्यासाठी हरण्यासारखं काही नसतंच त्यामुळे सर्वस्व झोकून देऊन कामगिरी होण्याची शक्यता असते. भारताला अनपेक्षितरित्या असे अनेक खेळाडू मिळाले आणि मालिका विजय शक्य झाला.

( वाचा : Brisbane Test: शुभमन गिलची सेंच्युरी हुकली पण गावस्करांचा 50 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला! )

प्रश्न :  ऑस्ट्रेलिया सीरिज जिंकल्यानंतर क्रिकेट विश्वात टीम इंडियाची प्रतिष्ठा आणखी वाढली आहे. आणखी कोणत्या गोष्टी टीम इंडियानं सुधारल्या तर ही टीम 1970 आणि 80 च्या दशकातील वेस्ट इंडिज किंवा या शतकाच्या पहिल्या दशकातील ऑस्ट्रेलियन टीम सारखी होईल?

केदार :  एक फॅन म्हणून काय सुधारायला हवं हे सांगणं अवघड आहे. ते एक्सपर्ट लोकांवर सोडायला हवं. आता तर आपली बेंच स्ट्रेंथही समोर आली आहे त्यामुळे भारत अजून काही वर्षं आपला दबदबा कायम ठेवेल असा विश्वास वाटतो.

प्रश्न :  तू लॉर्ड्स ते वानखेडे व्हाया डेझर्ट स्ट्रॉम हे पुस्तर लिहलं आहेस. या पुस्तकाबद्दल Cricket मराठीच्या वाचकांना थोडक्यात सांग आणि या पुस्तकाच्या पुढील आवृत्तीमध्ये तू या सीरिजमधील कोणत्या भागावर लिहीशील?

केदार : ‘लॉर्ड्स ते वानखेडे’ पुस्तकात मी १९७१ ते २०१७ मधल्या काळात भारताने खेळलेल्या काही भन्नाट मॅचेसचा आढावा घेतला आहे. हे फक्त मॅचचं धावतं वर्णन नाही तर मॅचच्या आधीचे नंतरचे किस्से, काही मजेदार गोष्टी, खेळाडूंची स्वभाववैशिष्ट्ये आणि माझी खेळाविषयीची मतंही मॅचच्या वर्णनाच्या ओघात येतात. पुढेमागे पुस्तकाची पुढली आवृत्ती काढली तर नुकत्याच संपलेल्या संपूर्ण सिरीजवरच एक मोठा लेख लिहायला लागेल. सिरीजमधल्या सर्वच टेस्ट खूप भारी झाल्या आहेत.

प्रश्न :  मराठी वाचकांची क्रिकेटबद्दल जाणून घेण्याची भूक मिटवण्यासाठी ‘Cricket मराठी’ ही फक्त क्रिकेटवरील वेबसाईट सुरु झाली आहे. या साईटबद्दलचा तुझा अभिप्राय जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.

केदार : आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपल्या भाषेत वाचायला मिळाल्या तर जास्तच छान वाटतं. क्रिकेटविषयी वाचण्याजोगं भरपूर लिखाण इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे पण मराठीमध्ये तितकंसं नाही. हल्ली अनेक वेबपोर्टल चालू होतात पण त्यावर दिशाभूल करणाऱ्या हेडलाइन देऊन आणि आतमध्ये गोलगोल लिखाण असणाऱ्या बातम्या छापून खोटी वाचकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न दिसतो. ‘Cricket मराठी’ वेबसाईट तसं काही नं करता केवळ चांगल्या लिखाणाद्वारे क्रिकेट लोकांपर्यंत पोचवायचं काम करत आहे ही गोष्ट खूप चांगली आहे. माझ्याकडून ‘Cricket मराठी’ टीमला भरपूर शुभेच्छा!

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: