
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG ) यांच्यातील संपूर्ण टेस्ट सीरिजमध्ये पिच हा कळीचा मुद्दा होता. ‘या सीरिजमध्ये खेळपट्टी दोघांनाही सारखीच होती, पण त्यात भारताचे खेळाडू उजवे ठरले’, असं मत क्रिकेट फॅन स्वाती तांबडे (Swati Tambade) यांनी व्यक्त केले आहे.
क्रिकेट फॅनच्या भावना जाणून घेण्यासाठी असलेल्या Fan Corner या कॉलम अंतर्गत ‘Cricket मराठी’ ने स्वाती यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी ‘भारत विदेशी दौऱ्यावर जातो तेंव्हा काय होतं? यावर कुणीच बोलत नाही. विदेशात वेगवान गोलंदाजांना प्रभावी ठरण्यासाठी खेळपट्टी तयार केली जाते. तिथंही आपले क्रिकेटपटू चांगली कामगिरी करतात. मला वाटतं की, इथे गुणवत्तेचा प्रश्न आहे. तुमच्याकडे गुणवत्ता आणि समज असेल तर तुम्ही कोणत्याही खेळपट्टीवर टिकून राहू शकता. ‘ असे मत व्यक्त केले.
स्वाती तांबडे यांच्याशी ‘Cricket मराठी’ ने साधलेल्या संवादाचा हा सारांश
प्रश्न : स्वाती, क्रिकेट या खेळाबद्दलची तुमची पहिली आठवण काय?, तुम्हाला हा खेळ कधीपासून आवडू लागला?
स्वाती तांबडे : नमस्कार. भारतात जेवढी लोकं क्रिकेट पाहतात, त्याच्यावर प्रेम करतात त्यातलीच मी एक आहे. माझ्या घरात वडिलांना क्रिकेटचं प्रचंड वेड आहे. त्यांच्या तरुणपणात ते खेळत होते. पण, आजही ते तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने जर्सी, कीट, सनग्लासेस घालून नियमित क्रिकेट खेळतात. त्यांच्या त्या ‘ऑरा’मुळे मलाही क्रिकेटचं वेड लागलं.
आधी फक्त आवड म्हणून क्रिकेट पाहत असे. पण आता खेळातील बारकावे, त्यातील गमती-जमती कळायला लागल्यामुळे त्याच्यावरील प्रेम हे दिवसोंदिवस वाढत चाललंय.
प्रश्न : भारत – इंग्लंड सीरिजच्या निमित्तानं भारतात कोरोना नंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट झालं. तर कोरोना नंतरच्या काळातील या पहिल्याच सीरिजमध्ये तुम्हाला जाणवलेले बदल कोणते?
स्वाती तांबडे : भारत आणि क्रिकेट यांच्यातील संबंध प्रेमवीरांसारखा आहे. मला वाटत नाही की, या दोन गोष्टी कधीच विभक्त होतील. कोरोनानं क्रिकेटवर परिणाम केला. पण, या संकटामधूनही मार्ग काढून ते भारतामध्ये परतलं. सर्वात महत्तवाचा बदल म्हणजे प्रेक्षकांशिवाय खेळवलं जाणारं क्रिकेट. आपल्याला बहुतेकांना क्रिकेट आवडतं. पण त्याला स्टेडियममधील प्रेक्षकांच्या आवाजाची जोड असेल तर ते जास्त आवडतं. नाहीतर, ते म्यूट केल्यासारखं वाटतं.
दुसरी गोष्ट म्हणजे सेलिब्रेशनवर मर्यादा. कोरोनानंतर क्रिकेट परतलं तेंव्हा एकमेकांना अलिंगन देणही अवघड होतं. हाताचा कोपरा किंवा बंद मुठी एकमेकांच्या समोर कराव्या लागत होत्या. मला वाटतं की नैसर्गिक पद्धतीनं ज्या गोष्टी होत होत्या, त्याला कुठेतरी आळा बसला.
प्रश्न : चेन्नईत झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये जो रुटनं एक अविस्मरणीय डबल सेंच्युरी केली त्या इनिंगबद्दल काय सांगाल?
स्वाती तांबडे : इंग्लंडचा संघ भारतामध्ये येण्यापूर्वी लंकादहन करण्यात व्यस्त होता. या लंकादहनामध्ये रुट हनुमानाचं काम करत होता. भारतातही त्यानं हाच फॉर्म कायम राखत शतकांची हॅट्ट्रीक केली. जो रुट आणि भारतातील खेळपट्टी यांचं नात मस्त आहे. त्यानं शतक झळकावलं तेंव्हाच तो द्विशतकाकडे कूच करणार असे वाटत होते आणि तसचं घडलं.
रुटची ती खेळी फार जबरदस्त होती. पहिला विजय पाहुण्या संघाला मिळाला ते माझ्या मते बरं झालं. त्यानंतर विराटसेना पेटून उठली आणि त्यांनी इतिहास घडवत जगातिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत एन्ट्री केली.
प्रश्न: दुसऱ्या टेस्टपासून या सीरिजमध्ये पिचचा मुद्द्यावर खूप चर्चा झाली. या विषयावर दोन्ही बाजूंनी टोकाची मत आहेत. तर या सीरिजमधील पिचच्या दर्जाबाबत तुमचं मत काय आहे?
स्वाती तांबडे : पहिले दोन कसोटी सामने चेन्नईत खेळवले गेले. ज्यानं खेळपट्टी तयार केली त्याला दुसऱ्या सामन्यात डच्चू देऊन विजय हजारे ट्रॉफीसाठी धाडण्यात आले. मी सुद्धा कसोटी क्रिकेट अमर रहावे या मताची आहे. मलाही वाटतं की दोन दिवसांत कसोटी क्रिकेट संपू नये. खेळपट्टी दोघांनाही सारखीच होती, पण त्यात भारताचे खेळाडू उजवे ठरले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाणेफक किती महत्त्वाची असते ते उर्वरित मॅचमध्ये दिसले.
अनेक क्रिकेटपडिंतांनी भारतावर हल्लाबोल केला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी अशा खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या, असंही काही जण म्हणाले. भारत विदेशी दौऱ्यावर जातो तेंव्हा काय होतं? यावर कुणीच बोलत नाही. विदेशात वेगवान गोलंदाजांना प्रभावी ठरण्यासाठी खेळपट्टी तयार केली जाते. तिथंही आपले क्रिकेटपटू चांगली कामगिरी करतात. मला वाटतं की, इथे गुणवत्तेचा प्रश्न आहे. तुमच्याकडे गुणवत्ता आणि समज असेल तर तुम्ही कोणत्याही खेळपट्टीवर टिकून राहू शकता.
( वाचा : खेळता येईना पिच वाकडे : जरा ‘या’ महान पिचवरील रेकॉर्ड्सही पाहा )
प्रश्न : भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विनसाठी ही सीरिज खूप यशस्वी ठरली. त्यानं 32 विकेट्स घेतल्या. एक सेंच्युरी झळकावली आणि तसंच तो ‘मॅन ऑफ द सीरिज’ देखील ठरला तर त्याच्या खेळाबद्दल काय सांगाल?
स्वाती तांबडे : कुंबळे आणि हरभजन संघाबाहेर पडल्यानंतर भारतासाठी अश्विन मुख्य फिरकीपटू म्हणून उभा राहिला. ज्या प्रमाणे झहीर खाननं दहा वर्षे भारताच्या वेगवान माऱ्याचं नेतृत्व केलं तसंच अश्विन आता स्पिन डिपार्टमेंटचं करतोय. एकदिवसीय आणि टी-20 प्रकारात त्याला चहल-कुलदीप यांनी रिप्लेस केलंय. पण इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीनंतर त्याला पुन्हा भारताच्या मर्यादीत षटकांच्या सदस्यांमध्ये स्थान मिळू शकते हा विश्वास वाटतोय.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी फिरकीपटू ब्रँड हॉगनही अश्विनला एकदिवसीय संघात स्थान मिळायला हवं असं म्हंटलं होतं. अश्विन ज्या सुवर्ण कामगिरीच्या शोधात होता, ती त्याला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध करता आली.
ऑस्ट्रेलियात तर सिडनी कसोटी वाचवण्यात त्याने फलंदाजीत योगदान गिलं. आपल्या क्रिकेटपटूंना भारतापेक्षा विदेशात चांगली कामगिरी करण्याचा टोमणा मारला जातो. तो देखील अश्विननं पुसून टाकला. कसोटी सामना पाचव्या दिवसापर्यंत गेला तर, आपण अश्विनकडं फार आशेनं पाहतो. तो सुद्धा हातभर चेंडू वळवत आपला विश्वास सार्थ ठरवतो.
त्यामुळे इंग्लंड विरुद्धची अश्विनची कामगिरी खरंच भारी होती. त्याच्याकडे आता ऑफ स्पिन, कॅरम बॉल, कधीकधी लेग स्पिन फ्लाईटेड स्लोअर वन अशी अनेक अस्त्र आहेत.
( वाचा : Explained: रवीचंद्रन अश्विन का आहे स्पिन बॉलर्समधील व्हिव रिचर्ड? )
प्रश्न : भारताचा आणखी अनुभवी फास्ट बॉलर इशांत शर्मानं या सीरिजमध्ये 100 टेस्ट खेळल्या. त्याला या सीरिजमध्ये फार संधी मिळाली नाही. पण एकूणच इशांतची कारकीर्द पाहिली तर त्याला जितकं मिळायला हवं तितकं क्रेडिट मिळालं नाही असं वाटतं का?
स्वाती तांबडे : वेगवान गोलंदाजांना दुखापतीचा शाप असतो. या मालिकेत त्याने 100 कसोटी पूर्ण केल्या. दुखापतींचा ससेमिरा त्याच्या पाठी नसता तर त्याने सव्वाशे कसोटी पार केल्या असत्या. त्याला पाहिल्यावर मला आजही रिकी पॉन्टिंग आठवतो. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीत त्याने पॉन्टिंगला अक्षरश: रडवलं होतं. त्याच्याकडं उंची आहे, वेग आहे. कधीकधी तो खूप महागडा ठरतो. त्यावर आवर घालता आला पाहिजे. आज बुमराह ज्या स्थानावर आहे त्या स्थानावर इशांत शर्मा असू शकला असता.
प्रश्न : अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या नवोदीतांनी या सीरिजमध्ये चांगली कामगिरी केली. अक्षरसाठी तर हा ड्रीम डेब्यू होता. या दोघांना टेस्ट क्रिकेटमध्ये मोठं भविष्य आहे असं मानता येईल का?
स्वाती तांबडे : अक्षर आणि वॉशिंग्टन यांनी खरंच प्रभावित केलं. भारतात चेंडू वळतात त्यामुळे हे दोघे खूप चालणार हे प्रत्येकाला माहिती होतं, पण ते इतकं यश मिळवतील हे कुणी ‘डंके की चोट’ पर बोललं नसेल.
अक्षरनं त्याच्या घरच्या मैदानावर स्वप्नवत कामगिरी केली. डावखुरा फिरकीपटू म्हणून त्याला खूप संधी आहे. आता विदेशात तो कितपत यश मिळवतो यावर त्याची पुढची परीक्षा होईल. वॉशिंग्टन तर फलंदाज म्हणूनही उदयास येत आहे. आयपीएलमध्ये त्याला सलामीला पाठवलं तर कोणी आश्चर्य व्यक्त करायला नको.
( वाचा : IND vs ENG : निवड समितीचा रुटला नाही तर मॉर्गनला पाठिंबा, इंग्लंडच्या माजी कॅप्टनचा दावा )
प्रश्न : विराट कोहलीसाठी एक बॅट्समन म्हणून ही सीरिज चांगली गेली नाही. त्यानं आता सेंच्युरी झळकावूनही खूप काळ गेला आहे. विराटच्या करियरमध्ये हा जो टप्पा सध्या सुरु आहे, त्याचं तुम्ही विश्लेषण कसं कराल?
स्वाती तांबडे : माझ्या मते पंधरा महिन्यांहून अधिक काळ विराटनं शतक झळकावलेलं नाही. त्यात अर्धा वेळ कोरोनाशी लढण्यात नंतर मानसिक गोष्टींशी दोन हात करण्यात गेला. विराट शतक ठोकतो तेंव्हा आपण नॉर्मल रिअॅक्ट होतो. कारण आपल्याला त्याच्या चांगल्या कामगिरीची आता सवय झालीय.
तो एक वर्ल्ड क्लास क्रिकेटर आहे. त्याची ही वेळ सुद्धा निघून जाईल, माझ्या मते त्याचा हा पॅच टी-20 वर्ल्ड कपपूर्वी आला आहे ते बरं झालं. कारण अपयशानंतर तो सर्वांना एकटा भिडतो तेंव्हा इतरांची कामगिरी पुसली जाते. कोरोनाच्या काळात कोणत्याही क्रिकेटपटूने सराव केलेला नाही. त्यात विराटही आलाच. माझ्या मते त्याच्यावर सर्वात जास्त दबाव असेल, कारण तो क्रिकेटची महासत्ता असलेल्या भारताचा कर्णधार आहे. त्यामुळे तो वर्ल्ड कपपूर्वी नक्की फॉर्मात येईल असा मला विश्वास आहे.
प्रश्न : भारताच्या विराटसाठी ही सीरिज फारशी चांगली गेली नाही, पण इंग्लंडचे सर्वच बॅट्समन दुसऱ्या टेस्टपासून कुठंच स्पर्धेत नव्हते. त्यांनी ज्या पद्धतीनं शरणागती पत्कारली ते कितपत धक्कादायक होतं असं तुम्हाला वाटतं आणि त्यांच्या या खराब कामगिरीचं काय कारण तुम्ही सांगू शकाल?
स्वाती तांबडे : कोरोनामुळे संघाच्या व्यवस्थापनामध्ये बदल झाले. रोटेशन पॉलिसीनुसार खेळाडू खेळवले गेले. त्यामुळे त्यांना सातत्य राखणे कठीण झालं. क्वारंटाईन कालावधीचाही परिणाम झाला. त्यांना सरावाला पुरेसा वेळ न मिळणं ही आलंच. भारतीय हवामानाचा थोडाफार का होईना त्रास झाला असेल. जो रुट, बेन स्टोक्स वगळता इतरांना भारतामध्ये खेळण्याचा फार अनुभव नव्हता. त्यामुळे नवख्या पाहुण्या खेळाडूंना बाद करण्यात भारताला फार वेळ लागला नाही.
प्रश्न : भारतीय बॅटींगमध्ये रोहित, पुजारा आणि रहाणे हे तीन जण फार काही कामगिरी करत नसताना रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी जो खेळ केला त्यामुळे आपली लाज झाकली गेली असं वाटतं का?
स्वाती तांबडे : मला असं नाही वाटत. प्रत्येकाचा फॉर्म असतो. पुजारा आणि रहाणेने ऑस्ट्रेलियात भारताची लाज राखली. हो पण या सर्वांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचं आहे. ऋषभ पंतवर खूप दबाव होता. महेंद्र सिंह धोनीचा पर्याय म्हणून तुम्ही स्वत:ला पाहता तेंव्हा तुम्हाला दबावाच अंदाज येऊ शकतो. त्याची बिनधास्त फलंदाजी हेच त्याच्या यशाचं गमक आहे.
अनेकांचं मत आहे की, त्याने शॉट्स सिलेक्शनवर लक्ष दिलं पाहिजे. पण मला वाटतं त्यानं नैसर्गिक पद्धतीनंच पुढं जावं. पंतच्या फलदांजीत मला सेहवाग दिसतो. ज्या प्रमाणे तो बिनधास्त होता, तसाच पंत ही आहे. 99 वर बाद झाला तरी खूश असणाऱ्या सेहवागची झलक मी पंतमध्ये पाहते.
( वाचा : पंतच्या खेळात कशी सुधारणा झाली, कोच शास्त्रींनी सांगितले रहस्य )
प्रश्न : आता भारतानं वर्ल्ड टेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या फायनलची तुम्हाला किती उत्सुकता आहे?
स्वाती तांबडे : केन विल्यमसनमुळे न्यूझीलंडचा संघही माझी फेव्हरिट आहे. विल्यमसनच्या नेतृत्वात अनेक मोठी जेतेपद न्यूझीलंडला मिळता मिळता राहिली. त्यामुळे ही स्पर्धा कोणीही जिंकू देत मला आनंदच वाटेल. हा कसोटी सामना दोन दिवसांमध्ये न संपता संस्मरणीय व्हावा, एवढंच मला वाटतं
प्रश्न : मराठी वाचकांची क्रिकेटबद्दल जाणून घेण्याची भूक मिटवण्यासाठी ‘Cricket मराठी’ ही फक्त क्रिकेटवरील वेबसाईट सुरु झाली आहे. या साईटबद्दलचा तुमचा अभिप्राय जाणून घ्यायला आम्हाला आवडेल
स्वाती तांबडे : आजकाल बहुतेक मीडियात राजकीय, आंतरराष्ट्रीय विषयावर बोललं, ऐकलं जातं. क्रीडाविश्व, मनोरंजन विश्व यासुद्धा एखाद्या वृत्तसंस्थेसाठी तितक्यातच महत्त्वाच्या आहेत असं मी मानते.
मी काही क्रीडा पंडित नाही. क्रिकेटची आवड असल्याने हा विषय मला आवडतो. मराठीत फार कमी जण चांगलं लिहितात. ‘Cricket मराठी’ ने सुरु केलेला हा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. जे कोणालाही माहिती नाही, पण इंटरेस्टींग आहे, ते ‘Cricket मराठी’ ने लोकांसमोर आणावं एवढीच इच्छा.
( स्वाती तांबडे या उत्तम क्रिकेट लेखक आहेत. तुम्ही त्यांना swatitambade05@gmail.com या ईमेलवर संपर्क करु शकता. तसेच त्यांना ट्विटरवर इथे फॉलो करु शकता )
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.