फोटो – सोशल मीडिया

क्रिकेटमधील महत्त्वाची वार्षिक स्पर्धा म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (IPL). संपूर्ण देशावर कोरोनाचं मळभ पसरलेलं आहे. असं असूनही आयपीएल स्पर्धा यंदा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे. ही क्रिकेट फॅन्ससाठी मोठी दिलासादायक गोष्ट आहे. या आयपीएलमध्ये कोणती टीम क्लिक करणार? आपल्या आवडीच्या टीममध्ये यंदा काय बदल झालाय? नव्या सिझनमध्ये कोणते नवे खेळाडू चालणार? जुन्या खेळाडूंची कामगिरी कशी होणार? याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आयपीएल स्पर्धेबाबत आम्ही क्रिकेट फॅन वरद सहस्रबुद्धे (Varad Sahasrabudhe) यांच्याशी चर्चा केली.

वरद यांनी ‘Cricket मराठी’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या आयपीएलमधील प्रत्येक टीमचं विस्तृत विश्लेषण केलं आहे. “या आयपीएलला नवा विजेता मिळायला हवा असेल तर दिल्लीसारखी दुसरी टीम नाही. दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) आयपीएल 2021 चं विजेतेपद पटकावलं तर क्षण त्यांचा या सिझनचा कॅप्टन ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारकिर्दीतील महत्वाचा क्षण ठरेल. भविष्यात भारताचा (Team India) कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ शकेल.” असं भाकित वरद यांनी व्यक्त केलं आहे. थोडक्यात ही स्पर्धा ऋषभ पंतला टीम इंडियाच्या कॅप्टनसीच्या जवळ नेणारी असेल असा वरद यांचा अंदाज आहे.

आयपीएल स्पर्धेच्यापूर्वी (IPL 2021) वरद सहस्रबुद्धे यांच्याशी ‘Cricket मराठी’ ने साधलेल्या संवादाचा हा सारांश

प्रश्न: वरद, सर्व प्रथम मुलाखत देण्यासाठी तुम्ही तयार झालात त्यासाठी धन्यवाद. आयपीएल स्पर्धेचा हा 14 वा सिझन आहे. आयपीएल बाबतची तुमची सर्वात पहिली आठवण काय आहे?

वरद : Cricket मराठीने मुलाखतीसाठी विचारणा केली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. तसं पाहायला गेलं तर एक आठवण सांगणे नक्कीच कठीण आहे. खरंतर आयपीएलचा पहिला सिझनच माझ्यासाठी एक आठवण आहे. नुकतीच त्यावेळी आपल्या संघाने (Team India) ऑस्ट्रेलियात सीबी सिरीज जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. कोहलीनेही (Virat Kohli) अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता. हे संगळं संपतं ना तोच एका नवीन फॉर्मेटची जाहिरात ‘सोनी मॅक्स’ वाहिनीवर सुरू झाली होती.

‘करबो लडबो जीतबो’ ‘दुनिया हिला देंगे हम’असो वेगवेगळ्या संघाचे थीम सॉंग, जर्सीचं अनावरण यामुळे हळूहळू आयपीएलची वातावरण निर्मिती होत होती. आम्ही आयपीएलचे बरेचसे सामने गल्लीतल्या प्रेसच्या बाजुला असलेल्या खोलीत बघायचो. दोन वेगळे गट, समर्थक आसायचे. प्रत्येक जण आपापलं प्रेडिक्शन द्यायचा. तुफान राडा चालायचा.

प्रश्न: आयपीएल फ्रँचायझी टीममधील खेळाडूंची निवड करताना होम ग्राऊंडचा विचार करतात.कारण प्रत्येक फ्रँचायझीच्या अर्ध्या मॅचेस या त्यांच्या होम ग्राऊंडवर होतात. यंदा त्यांना तो फायदा मिळणार नाही. याचा आयपीएल टीमच्या एकूण कामगिरीवर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं?

वरद : संघमालक खेळाडूंची निवड करताना मैदानाची लांबी रुंदी, एखादं स्पेसिफिक मैदान फलंदाजीसाठी योग्य आहे की गोलंदाजीसाठी मग त्यातही फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे की वेगवान गोलंदाजीसाठी या सर्व मुद्यांचा विचार करतात. .आधीच्या वर्षाच्या संघातल्या कच्च्या दुव्यांचा सुध्दा जरूर विचार करत असतात. चेन्नईकडे मागच्या वर्षी चांगला ऑफ स्पिनर नव्हता तर यावेळी त्यांनी एक सोडून दोन-दोन ऑफ स्पिनर संघात घेतले. पण फिरकीला अनुकूल चेन्नईच्या मैदानावर सामनेच होणार नाही. हैदराबादला मिडल ऑर्डरमध्ये अनुभवी फलंदाजाची कमी होती त्यांनी केदार जाधव ला संघात स्थान दिले. माझ्या मते तरी कुठल्याही संघाला केवळ फायदाच होईल किंवा फक्त तोटाच होईल असं काही नाही. आंतरराष्ट्रीय तसेच विविध प्रथम श्रेणी सामने खेळल्यामुळे भारत तसेच विदेशी खेळाडूंना भारतीय पिचेसचा बऱ्यापैकी अनुभव आहे.

दुसऱ्या बाजुने या गोष्टींचा विचार केला तर कलकत्ता आणि पंजाब यांचे सर्वाधिक सामने बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर खेळवले जाणार आहेत. लहान बाऊंड्रीमुळे स्टोक्सपासून बटलरपर्यंत आणि राहुलपासून रसेलपर्यंत सगळेच षटकार लगावण्याची आतुरतेने वाट पाहतील. इंग्लंडचे अनेक खेळाडू अहमदाबादच्या मैदानावर T 20 खेळले पण राजस्थान(ज्या संघात अनेक इंग्लिश खेळाडू आहेत) त्यांचा एकही सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार नाही. काही तोटे जरूर आहेत पण फायद्यांकडे लक्ष द्यावे कारण कोणतीच टीम होम ग्राऊंडवर सामने खेळणार नाही.

( वाचा : Fan Corner : पिच दोघांनाही सारखे होते, त्यात भारतीय खेळाडू उजवे ठरले – स्वाती तांबडे )

प्रश्न: मुंबई इंडियन्सला यंदा विजेतेपदाची हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. रोहित शर्माची ही टीम कोणत्या कारणांमुळे इतरांपेक्षा वेगळी आणि जास्त मजबूत वाटते?

वरद: खरं तर याच नाही तर आधीच्या लिलावाआधीच ही टीम परिपूर्ण वाटते. फलंदाजी आणि गोलंदाजी यात चांगली डेप्थ आहे. चांगले बॅक अप तयार आहेत. कृणाल, हार्दिक, पोलार्ड (आता या त्रयीला नीशम देखील जॉईन झालाय) अशी दणकट मिडल ऑर्डर तुफानी फटकेबाजी करून संघाच्या धावसंख्येत अधिक 25 ते 30 धावा वाढवण्याची क्षमता राखतातच शिवाय वर नमूद केलेले एकंदर चार एकाच प्लेईंग११ मध्ये खेळले तर टीमच्या किमान दहा ओव्हर्सची तजवीज नक्की करतात.

प्रश्न: चेन्नई सुपर किंग्सच्या कामगिरीकडं देखील अनेकांचं लक्ष असतं. त्यांनी यंदा टीममध्ये काही बदल केले आहेत. पण टीममधील बहुतेक खेळाडूंना पुरेशी मॅच प्रॅक्टीस नाही. त्याचा चेन्नईच्या कामगिरीवर काय परिणाम होईल?

वरद : चेन्नई सुपर किंग्स (CSK) ही आयपीएल इतिहासातील एक यशस्वी टीम आहे. 2020 अनेकांना चांगलं गेलं नाही चेन्नईची टीम देखील याला अपवाद नव्हती. दहा-बारा वर्षांत इतर संघाचे कर्णधार सिझन दर सिझन बदलत राहिले पण एम. एस. धोनी चेन्नईचा कर्णधार म्हणून राहिला. हेच कुठेतरी त्यांच्या यशाचं गमक आहे. अनेक भारतीय खेळाडुंना (विशेषतः धोनी, रैना, जाडेजा) यांना पुरेसा सराव मिळाला नाही हे खरं असून त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्यांना थोडा संघर्ष करावा लागू शकेल.

बाकीच्या युवा आणि उदयोन्मुख खेळाडूंना विजय हजारे, सय्यद मुश्ताक अली स्पर्धा किंवा नुकतीच पार पडलेली भारत-इंग्लंड द्विपक्षीय मालिका यामुळे पुरेसा सराव मिळाला आहे. गेल्यावर्षीचं अपयश या संघाने धूवून काढावं अशी एक सीएसके फॅन या नात्याने शुभेच्छा देतो

प्रश्न: सनरायझर्स हैदरबादची बॉलिंग तर मजबूत आहे. पण त्यांच्या मीडल ऑर्डरमध्ये अनुभवी खेळाडूची कमतरता आहे. ती टीम यंदाही ‘टॉप हेवी’ टीम आहे. या अडचणीवर हैदराबाद मात करेल असं वाटतं का?

वरद: जेसन रॉयच्या समावेशामुळे आता ही टॉप हेवी टीम ‘हेवियर'(Heavier) झाली आहे. रॉय किंवा बेअरस्टो यापैकी एक जरी संघात असेल तर दोन चांगल्या विदेशी फलंदाजाना संघाबाहेर रहावं लागेल. टीम निवडतांना तारांबळ उडणार आहे. कदाचित रॉय/विलियम्सन यांच्यात रोटेशन पॉलिसी देखील निवड समिती अंमलात आणू शकेल.

सगळ्यात कमी खेळाडू(३) हैदराबाद संघाने या लिलावात घेतले. मुजीब उर रहमान, जगदीश सुचित आणि केदार जाधव. मुजीबचा अंतिम ११च्या संघात समावेश झाला तर अफगाणी फिरकीचं त्रिकुट पाहायला मिळू शकते. नबी हा सनरायझर्ससाठी फिरकीत योगदान करेलच पण त्याहीपेक्षा वेगवेगळ्या फ्रेंचाईझ सामन्यातून त्याची तडाखेबंद फटकेबाजी देखील पाहिली आहे. गर्ग, जाधव, होल्डर सोबत नबी देखील उपयुक्त ठरू शकतो. नबी सनरायझर्सच्या इतर विदेशी खेळाडूंच्या तुलनेत कमी सामने खेळलाय यावर्षी चित्र बदलेल अशी इच्छा आहे.

( वाचा : IPL 2021 SRH : ‘आहे’ बॉलिंग भक्कम तरीही…काही प्रश्न कायम! )

प्रश्न: विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यांची नेहमी प्रमाणे स्पर्धेच्या पूर्वी मोठी चर्चा आहे. आरसीबी फँन्सचं विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आरसीबीला आजवर केलेल्या कोणत्या चुका टाळण्याची गरज आहे?

वरद: आरसीबी संघाने फक्त कोहली, डिव्हीलयर्स, चहल यांच्यावर अवलंबून न राहता एकसंध टीम म्हणून खेळले पाहिजे. तसं पाहायला गेलं तर याची सुरुवात मागच्या वर्षीच झाली आहे. देवदत्त पडिक्कल हे त्याचं उत्तम उदाहरण.

आरसीबीची टीम गेल्यावर्षीपेक्षा या सीझनला (कागदावर नक्कीच) चांगली टीम वाटतेय. ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, फिन एलन, डॅनियल क्रिस्तियन आणि कायले जेमिसन असे गुणी विदेशी खेळाडू आहेत. जेमिसन फक्त आत्तापर्यंत न्यूझीलंडमध्ये खेळलाय भारतात तो किती प्रभाव पाडू शकतो हे आयपीएलमधून नक्की कळेल. तसेच अनेक चांगल्या पण साजेशी कामगिरी न करणाऱ्या खेळाडूना रिटेन न करणं असो मॉक ऑक्शन असो, त्यांची या वर्षी सामन्याआधीची तयारी कौतुकास्पद आहे. ते ‘प्ले ऑफ’पर्यंत पोहोचले तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

प्रश्न: दिल्ली कॅपिटल्सचा नवीन कॅप्टन ऋषभ पंतच्या करियरसाठी हे आयपीएल खूप महत्त्वाचं आहे. अनेक सीनियर खेळाडू आणि पॉन्टिंगसारखा आक्रमक कोच सोबत असल्यानं पंत कॅप्टनसीचा दबाव यशस्वीपणे पार करेल असं वाटतं का?

वरद: दिल्ली गेल्या दोन-तीन वर्षांपासून चांगली कामगिरी करते आहे. यात श्रेयस अय्यर चा एक कर्णधार आणि फलंदाज म्हणून महत्वाचा वाटा आहे. दुर्दैवाने श्रेयस जायबंदी झाल्याने आता ती जबाबदारी पंत चांगल्या पद्धतीने पार पाडेल अशी आशा आहे. वर्ल्ड कप विजेता कर्णधार रिकी पॉंटिंग आणि अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप विजेता मोहम्मद कैफ प्रशिक्षक म्हणून तर शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, आर अश्विन आणि अजिंक्य रहाणे सारखी सीनियर मंडळी पंतला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतील. आयपीएलला नवा विजेता मिळायला हवा असेल तर दिल्ली सारखी दुसरी टीम नाही. दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएल 2021 चा विजेता झाला तर तो क्षण किंवा ते विजेतेपद पंतच्या कारकिर्दीतील महत्वाचा क्षण ठरेल. आणि भविष्यात भारताचा कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ शकेल.

प्रश्न: पंजाबनं ग्लेन मेरिडेथ या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेल्या बॉलर्ससाठी मोठा पैसा ओतला. मागच्या वर्षी शेल्डन कोट्रेलला घेऊन ते फसले होते. यंदाही तशीच चूक केली आहे की मागची चूक सुधारली आहे?

वरद : कधीकधी नवखा खेळाडू, अनुभवाची कमी असलेला खेळाडू स्पर्धा गाजवतो हे आपण जोफ्रा आर्चर, केविन कूपर, जेम्स फॉंकनर, मोहित शर्माच्या रुपाने पाहिले आहेच. बहुतेक वेळा नव्या खेळाडुंचा प्रतिस्पर्धी संघाकडून अभ्यास झालेला नसतो किंवा त्या खेळाडूचे स्ट्रेंग्थ/वीकनेस एका विशिष्ट मर्यादेत समोर येतात. थोडक्यात आयपीएलला अनेक नवे चेहरे चमकले तसाच मेरिडेथ चमकावा फक्त त्या खेळाडुंसारखा लवकर गायब होऊ नये.

( वाचा : दिनेश कार्तिकला चॅम्पियन करणाऱ्या खेळाडूबद्दल कुंबळे म्हणतो, ‘हा तर आमचा पोलार्ड‘)

प्रश्न : राजस्थान रॉयल्सनं देखील ख्रिस मॉरीससाठी बराच पैसा ओतलाय. तितकी गरज राजस्थानला का निर्माण झाली? राजस्थानमध्ये यंदा स्मिथ नाही. सॅमसन-संगकारा ही नवी जोडी आहे. या नव्या जोडीकडून तुम्ही किती आशावादी आहात?

वरद : राजस्थान या टीमबद्दल खरंच भरभरून बोलण्यासारखं आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमात विजेती झालेली ही टीम. इतक्या वर्षात अजूनही त्यांना पुन्हा एकदा जेतेपद मिळवता आले नाही. याचा नवनिर्वाचित कर्णधार संजू सॅमसन आणि मार्गदर्शक संगकाराने जरूर विचार करावा. संगकाराच्या या भुमिकेबाबत कमालीची उत्सुकता आहे. राजस्थानची आधीची टीम सॅमसन, स्टोक्स, आर्चर, स्मिथ यांवर अवलंबून होती. त्यात स्टोक्स जवळपास अर्धे सामने झाल्यावर संघात दाखल झाला. बटलर व सॅमसन यांच्या कामगिरीत म्हणावे तितके सातत्य नव्हते. संगकारा आणि सॅमसन या द्वयीने जर सातत्याबात सराव केला, नियोजन केले तर चित्र नक्कीच आशावादी आहे.

आरसीबी प्रमाणे टॉप ऑर्डरवर ही सुध्दा टीम जास्त अवलंबून होती. त्यामुळे दोन तीन सामन्याचा अपवाद वगळता बहुतेक वेळा मिडल ऑर्डरवर दडपण यायचे आणि सामना गमावयची देखील वेळ आली.

मॉरिस हा लोअर मिडल ऑर्डरमध्ये एक उत्तम पर्याय ठरेल. दहा बॉल ३० धावा वगैरे काढण्याची पात्रता त्याच्याकडे आहे. शिवाय डेथ ओवर स्पेशलिस्ट गोलंदाज इ. गुणवैशिष्ट्ये असूनही आपल्याला इतकी किंमत मिळेल हे मॉरिसला तरी वाटलं असेल का सवाल आहे. त्यातच जोफ्रा आर्चर नसल्याने त्याच्यावर गोलंदाजीची थोडी अधिकच जबाबदारी असणार आहे.

प्रश्न : कोलकाता नाईट रायडर्सनं शाकीब, बेन कटींग, हरभजन सारखे खेळाडू घेऊन त्यांच्या प्रमुख खेळाडूंना उत्तम बॅक अप निवडले आहेत असं वाटतं का? केकेआरच्या या स्पर्धेतील एकूण कामगिरीबाबत तुमचा अंदाज काय?

वरद : Auctionच्या वेळी स्मार्ट बाय(Smart Buy) ही टर्म आपण नेहमी ऐकतो. कोलकत्ता नाईट रायडर्सच्या बाबतीत ही टर्म चपखल बसते. कारण माझ्या मते निवडलेले बॅकअप प्लेयर्स योग्य आणि उत्तम आहेत. शाकिब अल हसन तर जवळपास सहा वर्ष केकेआर संघाचा सदस्य होता. २०१२ आणि २०१४ विजयात मोलाची कामगिरी देखील त्याने बजावली आहे. तो किती चांगला अष्टपैलू खेळाडू आहे हे त्याच्या बांगलादेश क्रिकेटच्या कारकिर्दी वरून समजू शकेल. क्रमांक तीन ते सहा मध्ये कुठलेही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. मागच्या आयपीएलला सुनील नारायण आणि कुलदीप यादव दोघेही फॉर्मशी झगडताना दिसले त्यामुळे कलकत्त्याची फिरकी गोलंदाजी कमकुवत वाटत होती शाकिब तसेच हरभजन सिंग यांच्या समावेशामुळे फिरकी अधिक सक्षम होईल.

बेन कटिंग हा आयपीएल मधला Underutilized Player आहे असं मला वाटतं. 2016 साली कटिंगने आयपीएलच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. ब्रेक थ्रू देऊ शकणारा गोलंदाज आणि २०० प्लस स्ट्राईक रेटने धावा काढणाऱ्या रसेलसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. पण त्याचा एक पर्यायी खेळाडू विचार होऊ नये आणि जास्तीत जास्त सामने त्याला by choice खेळवावेत. एकंदरीत ही टिम अनेकांचं प्लेऑफ इक्वेवन बिघडवेल असा माझा अंदाज आहे

प्रश्न : या आयपीएलमध्ये कोणत्या चार टीम ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करतील आणि त्यापैकी कोणती टीम विजेतेपद पटकावेल असा तुमचा अंदाज आहे.

वरद : स्पर्धा अजूनही सुरु झालेली नाही. खेळपट्टी काय रंग दाखवेल(विशेषतः अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम) अशा अनेक गोष्टी असताना चार टीम सांगणं कठीण आहे. माझ्या मते ज्या टीम प्लेऑफ मध्ये प्रवेश करतील त्या म्हणजे मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स. तर कलकत्ता आणि हैदराबाद या टीम्स प्लेऑफ च्या रस्त्यात अडथळे निर्माण करू शकतात. मुंबईला हॅट्ट्रिक साधण्याची संधी असली तरी एखादा नवा विजेता आयपीएलला मिळावा अशी एक प्रेक्षक म्हणून माझी मनापासून इच्छा आहे.

( वाचा : पंतच्या खेळात सुधारणा कशी झाली, कोच शास्त्रींनी सांगितले रहस्य )

प्रश्न : मराठी वाचकांची क्रिकेटबद्दल जाणून घेण्याची भूक मिटवण्यासाठी ‘Cricket मराठी’ ही फक्त क्रिकेटवरील वेबसाईट सुरु झाली आहे. या साईटबद्दलचा तुमचा अभिप्राय जाणून घ्यायला आम्हाला आवडेल

वरद : उत्तम प्रकारे आणि सोप्या भाषेत लिहलेले अभ्यासपूर्ण शीर्षक, लेखाची मांडणी आणि सातत्यपूर्ण लेख प्रदर्शित होत असतात या काही वेबसाईटच्या जमेच्या बाजू आहेत. Cricket मराठी ही क्रिकेट या विषयाशी संबंधित सुरू झालेली वेबसाईट सध्या नवीन असली तरी जास्तीत जास्त वाचक या वेबसाईटला भेट देतील असा एक वाचक म्हणून मला विश्वास आहे.आगामी नवनवीन उपक्रमांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.

( वरद सहस्रबुध्दे हे क्रिकेट फॅन तसेच उत्तम क्रिकेट लेखक आहेत. तुम्ही त्यांना varad9721{at} gmail {dot}com या ईमेलवर संपर्क साधू शकता. तसेच त्यांच्या फेसबुक प्रोफाईलशी कनेक्ट होण्यासाठी इथे क्लिक करा)

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: