फोटो – X

अफगाणिस्तामच्या टीमनं क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मधील पहिला धक्कादायक निकाल नोंदवलाय. या टीमनं बलाढ्य इंग्लंडचा पराभव केलाय. या विजयानंतर अफगाण ऑल राऊंडर मोहम्मद नबीबद्दलची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झालीय. नबीनं क्रिकेट खेळाडू म्हणून 43 व्या देशावर विजय मिळवलाय, अशी माहिती त्यामध्ये आहे.

अफगाणिस्तानला वन-डे टीमचा दर्जा मिळण्याच्यापूर्वीपासून नबी खेळतोय. सध्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या नबीनं आपल्या टीमला एका नव्या उंचीवर गेलेलं पाहिलंय. मोहम्मद नबीचा क्रिकेटर म्हणून आणि अफगाणिस्तानचा क्रिकेट टीम म्हणून आजवरचा प्रवास एकत्र झालाय.

पेशावर-अफगाणिस्तान-लॉर्ड्स

अफगाणिस्तानमधील सधन कुटुंबात नबीचा जन्म झाला. सोव्हिएट रशियानं त्याच्या देशावर आक्रमण केल्यानंतर नबी कुटुंबीय पाकिस्तानातील पेशावरमध्ये स्थालंतरित झाले. पेशावरमध्ये क्रिकेट हाच लोकप्रिय खेळ होता. नबी देखील वयाच्या दहाव्या वर्षापासून क्रिकेट खेळतोय.

नबीचे कुटुंबीय अफगाणिस्तानत परतले. तालिबानी सरकारनं देशात क्रिकेट सुरू केलं. देशात क्रिकेट गियर मिळत नव्हते. त्यासाठी भारत किंवा पाकिस्तानवर अवलंबून राहावं लागत असे. भविष्याची कोणतीही शाश्वती नसलेल्या देशात नबी क्रिकेट खेळू लागला.

आफ्रिदीचं तालिबानी प्रेम समजल्यावर तुमचा होईल संताप!

मोहम्मद शहजाद, शपूर झरदान, असगर अफगाण आणि मोहम्मद नबी या चार खेळाडूंचा त्याच काळात ग्रुप झाला. या चौघांचंही अफगाणिस्तान क्रिकेटच्या विकासात मोठं योगदान आहे.

नबीनं याच कालावधीत भारत दौऱ्यात मेरिलोबन क्रिकेट क्लब (MCC)  विरुद्ध मुंबईत शतक झळकावलं. त्याच्या खेळाकडं इंग्लंडचा माजी कॅप्टन माईक गॅटिंग प्रभावित झाले. गॅटिंगच्या पुढाकारानं नबीला 2006 साली MCC ची प्रतिष्ठेची स्कॉलरशिप मिळाली.

लॉर्ड्सवरील ग्राऊंड स्टाफ

रॉस टेलर ते डॅरेन सॅमी पर्यंतच्या जगभरातील वेगवेगळ्या क्रिकेटपटूंच्या जडणघडणीत एमसीसीच्या स्कॉलरशिपचा मोठा वाटा आहे. मोहम्मद नबीचं आयुष्यही या स्कॉलरशिपमुळे बदलून गेलं. क्रिकेटमुळे आयुष्यात सर्व काही करता येऊ शकतं ही जाणीव नबीला याच कालावधीमध्ये झाली.

सकाळी आणि संध्याकाळी क्रिकेटचा सराव आणि दुपारच्या वेळी ग्राऊंड स्टाफ असं काम नबीला करावं लागत असे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना महत्त्वाच्या साम्यापूर्वी नेट बॉलर म्हणून बॉलिंग करण्याची ड्यूटीही नबीला होती.

Cricket मराठीचं व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करण्यासाठी इथं क्लिक करा

मोहम्मद नबीला त्याचा आदर्श खेळाडू केव्हिन पीटरसनला भरपूर बॉलिंग करण्याची संधी या कालावधीमध्ये मिळाली. मोठ्या स्पर्धेत कसं खेळायचं?  त्या स्पर्धेची तयारी कशी करायची? हे तो पीटरसनकडून शिकला. त्या कालावधीत इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या भारत आणि पाकिस्तानच्या टीममधील प्लेयर्सनाही नबीनं नेट बॉलर म्हणून मदत केली आहे. मोहम्मद नबी भविष्यात केव्हिन पीटरसनविरुद्ध आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये एकाच टीममध्येही खेळला.

अफगाणिस्तान क्रिकेटचा प्रवास

डिव्हिजन पाच ते आंतरराष्ट्रीय वन-डे टीम हा अफगाणिस्तानच्या प्रवासात खेळाडू म्हणून नबी सहभागी होता. क्रिकेट वर्ल्ड कप 2011 साठी पात्र होण्यात अफगाणिस्तानला अपयश आलं. पण त्यांना पात्रत्रा फेरीतील शेवटच्या मॅचपूर्वी वन-डे टीमचा दर्जा मिळाला.

अफगाणिस्ताननं पहिली आंतरराष्ट्रीय वन-डे मॅच स्कॉटलंड विरुद्ध खेळली. त्या मॅचमध्ये पदार्पणात नबीनं हाफ सेंच्युरीसह 58 रन काढले. अफगाणिस्तानच्या विजयात या खेळीचा मोठा वाटा होता. त्यामुळे नबीलाच ‘प्लेयर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार मिळाला.

अफगाणिस्तान टीम 2010 साली  T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पहिल्यांदाच पात्र झाली. या स्पर्धेतील पात्रता फेरीत नबीची कामगिरी महत्त्वाची होती. त्याचवर्षी चीनमध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये नबी अफगाणिस्तानचा कॅप्टन होता. या टीमनं स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळवण्यापूर्वी सेमी फायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत करण्याचा पराक्रम केला होता.

IND vs PAK : अतिसामान्य टीम विरुद्धचा एतकर्फी (अपेक्षित) विजय

एशियन गेम्सनंतर नबीची कॅप्टन पदावरुन हकालपट्टी झाली. 2013 साली तो पुन्हा कॅप्टन बनला. त्याच्या कॅप्टनसीमध्ये 2014 साली अफगाणिस्तान टीम पहिल्यांदाच आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र झाली. त्या स्पर्धेत अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत केलं. 2015 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतही नबी अफगाणिस्तानचा कॅप्टन होता. या स्पर्धेतील टीमच्या खराब कामगिरीनंतर त्यानं कॅप्टनसी सोडली.

मोठ्या टीमला धक्का

अफगाणिस्ताननं 2015 साली झिम्बाब्वे विरुद्धची वन-डे सीरिज 3-2 या फरकानं जिंकली. त्या विजयात नबीचा वाटा मोठा होता. याच सीरिजमध्ये नबीनं वन-डे कारकिर्दीमधील त्याची पहिली सेंच्युरी झळकावली. 2016 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्ताननं हाँगकाँग आणि झिम्बाब्वेला पराभूत करत सुपर 10 मध्ये प्रवेश केला. या दोन्ही मॅचमध्ये नबीच ‘प्लेयर ऑफ द मॅच’ होता.

इंग्लंडमध्ये 2019 साली झालेला वर्ल्ड कप अफगाणिस्तानसाठी निराशाजनक ठरला. त्यांनी सर्व मॅच गमावल्या. पण, नबीनं या स्पर्धेतील अफगाणिस्तानचा सर्वात यशस्वी बॉलर होता. त्याचबरोबर त्यानं भारताविरुद्ध बॅटींगच्या जोरावर टीमला विजयाच्या जवळ आणलं होतं.

अफगाणिस्तानला 2018 साली टेस्ट टीमचा दर्जा मिळाला. भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये नबी खेळणं स्वाभाविक होतं. त्याची टेस्ट कारकिर्द फार बहरली नाही. 2021 साली फक्त 3 टेस्टनंतर त्यानं या फॉर्मेटमधून रिटायरमेंट घेतली.

The Woolmer File : पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच कोचचा मृत्यू, ‘त्या’ रात्री काय झाले?

जगभरातील अनुभव

मोहम्मद नबी आणि राशिद खान ही दोघं अफगाण क्रिकेटचा चेहरा आहेत. ते जगभरातील क्रिकेट खेळतात. मोहम्मद नबी हा आयपीएलमध्ये पहिल्यांदा निवडला गेलेला अफगाणिस्तानचा खेळाडू आहे. 2016 साली झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये राशिद खानपूर्वी त्याचं नाव आलं होतं. सनरायझर्स हैदराबादनं त्याला खरेदी केलं.

भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान या देशातील T20 लीगमध्ये नबी खेळलाय. पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्याचाही त्याला अनुभव आहे.

अफगाणिस्तान प्रथम

जगभरात T20 लीग खेळत असला तरी नबीचं अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय टीमकडं दुर्लक्ष झालेलं नाही. अफगाणिस्तानच्या वर्ल्ड कपमधील सर्व मॅच तो खेळलाय. अफगाणिस्तानच्या 156 पैकी 150 वन-डे मॅचमध्ये त्यानं देशाचं प्रतिनिधित्व केलंय. अफगाणिस्तानच्या पहिल्या 100 पैकी 100 वन-डे मॅच खेळण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे.

या वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तान विरुद्धच्या ऐतिहासिक विजयात नबीचा मोठा वाटा होता. आशिया कपमध्ये नबीच्या आक्रमक बॅटींगमुळेच अफगाणिस्तान श्रीलंकेला पराभवाच्या उंबरठ्यापर्यंत ढकललं होतं.

इंग्लंड विरुद्धच्या अफगाणिस्तानच्या विजयातही नबीचं योगदान होतं. त्यानं 6 ओव्हर्समध्ये फक्त 16 रन देत दाविद मलान आणि सॅम करन या दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या.

विराट कोहलीला किंग बनवणाऱ्या 5 बेस्ट इनिंग

अशांततेच्या गर्तेत अडकलेल्या अफगाणिस्तानींसाठी क्रिकेट हा फक्त मनोरंजनाचा नाही तर जगण्याचा आधार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा शून्यापासून ते टेस्ट टीमचा दर्जा  आणि पुढं क्रिकेट विश्वात खेळाच्या जोरावर आदर मिळेपर्यंतचा प्रवासाचा मोहम्मद नबी साक्षीदार आहे.

अफगाणिस्तानमध्ये गेल्या दोन दशकात अनेक उलथापालथी झाल्या. क्रिकेट बोर्डात बदल झाले. कॅप्टन आले-गेले. खेळाडूंच्या पिढी बदलल्या. पण मोहम्मद नबी हा पर्मनंट सदस्य आजही तिथंच आहे. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात विश्वचषक स्पर्धेत आणखी एका बड्या टीमला धक्का देण्यासाठी नबी आजही सज्ज आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या मोबाईलवर वाचण्यासाठी आमचे व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा. चॅनेल फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा.

error: