फोटो सौजन्य : X

भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन देशांच्या परिस्थितीमध्ये सध्या जितका फरक आहे, तितकाच फरक क्रिकेट टीममधील गुणवत्तेत आहे. या मॅचसाठी जगभरातून नेहमीप्रमाणे वातावरण निर्मिती करण्यात आली होती. ही  मॅच पाहण्यासाठी प्रत्येक क्रिकेट फॅन्स धडपडत होता. जगातली सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गच्च भरलं. विशेष रेल्वे सुटली. अहमदाबादमधील हॉटेलच नाही तर हॉस्पिटलही भरली होती अशा बातम्या होत्या. बीसीसीआयनं मॅचपूर्वी नाचगाण्याची मैफील भरवली. या सर्व रंगरोटीमुळे ही जणू ‘शतकातील बेस्ट मॅच’ असा माहोल होता. प्रत्यक्षात टीम भारतानं एका अतिसामान्य टीमवर मिळवलेला एकतर्फी विजय म्हणूनच ही मॅच लक्षात राहणार आहे.

2023 आणि 1990 !

अहमदाबादमध्ये झालेल्या मॅचमध्ये भारतीय टीम 2023 तर पाकिस्तानची टीम ही 1990 सालात आहे असं वाटत होतं.  जगातली कोणतीही क्रिकेट टीम फ्लॅट पिचवर सावध सुरूवात करत नाही. जगातली कोणतीही टीम मीडल ओव्हर्समध्ये संथ खेळून खुश होत नाही. जगातली कोणतीही टीम खेळातील कोणत्याही टप्प्यात एखाद्या बॉलरला ठरवून टार्गेट करण्याचा सामान्य क्रिकेट सेन्सही वापरू शकत नाही.

वाढदिवस स्पेशल : ऑटोवाल्याचा मुलगा ते BMW चा मालक

पाकिस्तानला 1992 ते 2023 या कालावधीमध्ये एकदाही वन-डे विश्वचषकात विजय मिळवता आलेला नाही. याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानची टीम आजही 1992 मध्येच अडकलीय. कदाचित त्यांचे फॅन्स प्रत्येक वर्ल्ड कपची तुलना 1992 साली झालेल्या वर्ल्ड कपशी करतात. ही तुलना वाचत-ऐकतच सध्याच्या टीममधले खेळाडू मोठे झाले आहेत. त्याच गोष्टीचा हा परिणाम असावा.

बाबर आणि रिझवान या पाकिस्तानच्या आन-बान-शान असलेल्या जोडीनं 103 बॉलमध्ये 82 रनची पार्टनरशिप केली. या पार्टनरशिपमध्ये एकही आक्रमक फटका लगावला नाही. पाकिस्तानच्या या अतिसामान्य खेळाचा फायदा रोहित शर्मानं उचलला. त्यानं बुमराहच्या ओव्हर्स शिल्लक ठेवल्या. ज्या बॉलर्सना शेवटच्या टप्प्यात मार बसू शकतो त्यांच्या ओव्हर्स लवकरच संपवल्या.

अतिसामान्य टीम

बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान भोवती पाकिस्तानची बॅटींग फिरते. त्यांना आक्रमक खेळ करत येत नाही. ते नेहमी स्वत:चे रन काढतात. त्यामुळे त्यांचा रेकॉर्ड चांगला होता. पाकिस्तानचा बिघडतो. हा या जोडीवरचा नेहमीचा आरोप आहे. हा आरोप खोडण्याची त्यांना मोठी संधी अहमदाबादमध्ये होती.

वाढदिवस स्पेशल : मॅकग्राची उंची, ब्रेट लीचा वेग आणि अक्रमचा स्विंग

 मोठे खेळाडू हे नेहमी  खेळातील सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मवर सर्वोत्तम खेळ करतात. यश मिळालं नाही तरी चालेल पण तसा प्रयत्न करतात.. बाबर आणि रिझवान यांनी त्यांचा नेहमीचा खेळ केला. सीनियर खेळाडूंचाच असा आदर्श असेल तर अन्य टीम काय करणार?  बाबरची विकेट पडली आणि पुढे त्यांची इनिंग घरंगळत केली.

फरक स्वच्छ आहे

टीम इंडिया बॅटींगसाठी उतरल्यानंतर दोन्ही टीममधील फरक आणखी गडद झाला. रोहित शर्मानं पहिल्याच बॉलला फोर लगावत आपण लवकर मॅच संपवणार असल्याचं जाहीर केलं. रोहितला पाहून शुभमन गिललाही हुरूप चढला. ‘मी डेंग्यूतून नुकताच बाहेर पडलोय. मला पूरेशी मॅच प्रॅक्टीस नाही. वर्ल्ड कपमधील पहिलीच मॅच खेळतोय.’ असली कोणतीही कारण त्यानं दिली नाहीत. हसन अलीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये त्यानं 3 फोर लगावले. गिलची इनिंग छोटी होती. पण ती सकारात्मक होती. सावधगिरीच्या नावाखाली तो रडकी इनिंग खेळला नाही.

टीमनं फास्ट खेळायचं असेल तर ती जबाबदारी मी इतरांवर टाकणार नाही. स्वत: उचलणार. मी खेळणार आणि माझ्या खेळातून इतरांनाही फास्ट खेळण्याची शिकवण देणार हे तत्व रोहित शर्मानं गेल्या काही काळापासून अंगिकारलं आहे. पाकिस्तानच्या संपूर्ण टीमला भारताविरुद्ध एकही सिक्स मारता आला नाही. रोहित शर्मानं एकट्यानं 6  सिक्स मारले.

इम्रान-जावेद, अक्रम-वकारचा काळ केव्हाच संपला. ते होते तेव्हाही वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला कधी भारताला हरवता आला नाही. त्यांच्यानंतरची टीममधील पिढी ही तर आणखी अतिसामान्य आहे. या टीमला पीआर प्रेशरमध्ये कुणी वर्ल्ड कपचा दावेदार म्हणतही असेल. पण ती प्रत्यक्षात अतिसामान्य टीम आहे.

ती अतिसामान्य टीम का आहे ?  हे अहमदाबादमध्ये वारंवार दिसले. या अतिसामान्य टीमवर वर्ल्ड कपच्या प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय टीमनं एकतर्फीच विजय मिळवायला हवा होता. त्यांनी तो तसा विजय मिळवला. वर्ल्ड कपमध्ये हक्काचे 2 पॉईंट्स घेण्याची औपचारिकता पूर्ण झाली.

व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या मोबाईलवर वाचण्यासाठी आमचे व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा. चॅनेल फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा.

error: