
फोटो – X
वन-डे वर्ल्ड कप म्हणजे ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी गाजवण्याची हक्काची स्पर्धा. ऑस्ट्रेलियानं आत्तापर्यंत सर्वाधिक पाच वेळा ही स्पर्धा जिंकलीय. त्यामधील दोन स्पर्धांमध्ये (2003, 2007) तर एकही मॅच न गमावता विजेतेपद पटकावलंय. या स्पर्धेसाठी देखील ऑस्ट्रेलियन टीम विजेतेपदाची दावेदार आहे. पण, पहिल्या तीन मॅचमधील त्यांचा खेळ पाहून ही खरंच ऑस्ट्रेलियन टीम आहे का? असा प्रश्न क्रिकेट फॅन्सना पडलाय.
ऑस्ट्रेलियाची घसरण
ऑस्ट्रेलियन टीमला पहिला विजय मिळवण्यासाठी तिसऱ्या मॅचपर्यंत वाट पाहावी लागली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या 48 वर्षांच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच या टीमवर पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या नंबरवर राहण्याची नामुश्की आलीय.
तीन मॅचनंतर एकदाही ऑस्ट्रेलियानं 225 चा टप्पा ओलांडलेला नाही. 200 रनचा टप्पा देखील फक्त एकदा आणि तो ही तिसऱ्या मॅचमध्ये ओलांडलाय. या स्पर्धेत सर्वात दुबळ्या दिसत असलेल्या श्रीलंकेविरुद्ध हा टप्पा ओलांडण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सचं मोल द्यावं लागलं. ऑस्ट्रेलियन खेळाडूची या स्पर्धेतील पहिली हाफ सेंच्युरी देखील तिसऱ्या मॅचमध्ये आलीय.
Cricket मराठीचं व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करण्यासाठी इथं क्लिक करा
सर्वात मोठं कारण
बॅटर्सचं अपयश हे ऑस्ट्रेलियन टीमच्या घसरणीचं मुख्य कारण आहे. माजी कॅप्टन आणि प्रमुख बॅटर स्टिव्ह स्मिथला आत्तापर्यंत एकही हाफ सेंच्युरी झळकावता आलेली नाही. स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर बॅटींग करतो. स्मिथ सोडून फक्त अफगाणिस्तानचा रहमत शाह या तिसऱ्या क्रमांकावरच्या बॅटरला हाफ सेंच्युरी झळकावता आलेली नाही.
बॅटींग करताना पायांची हालचाल करण्याची विचित्र शैली हे स्मिथचं आजवरचं बलस्थान होतं. स्मिथचं हे तंत्र या वर्षात चालत नाहीय. शेवटच्या चार वन-डे पैकी तीन वेळा स्मिथ LBW झालाय. श्रीलंकेविरुद्ध तर तो शून्यावर आऊट झाला.
लेग स्पिनर म्हणून आला आणि रनमशिन बनला!
वर्ल्ड कप स्पर्धेत शून्यावर आऊट होण्याची स्मिथची ही पहिलीच वेळ होती. त्याचबरोबर एका कॅलेंडर वर्षात भारतामध्ये तीन वेळा शून्यावर होणारा पहिला ऑस्ट्रेलियन असा रेकॉर्डही स्मिथनं केलाय.
पाकिस्तानसारखी कोंडी
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे कमी स्ट्राईक रेटनं खेळणारे बॅटर पाकिस्तानकडून तीन आणि चार नंबरवर खेळतात. त्यांची संथ बॅटींग पाकिस्तानसाठी नेहमीच डोकेदुखीचा विषय ठरलाय. ऑस्ट्रेलियासमोरही या स्पर्धेत तसाच प्रश्न उभा राहिलाय.
ऑस्ट्रेलियानं या स्पर्धेत अगदी शेवटच्या क्षणी मार्नस लाबुशेनचा वर्ल्ड कप टीममध्ये समावेश केला. त्यानंतर स्मिथ नंबर तीनला तर लाबुशेन चौथ्या क्रमांकावर खेळतोय. एकसारखं खेळणारे स्मिथ- लबुशेन ही ऑस्ट्रेलियाची बाबर-रिझवान जोडी आहे.
बाबर-रिझवानची आठवण का येते?
स्मिथनं या स्पर्धेत 70.65 च्या स्ट्राईक रेटनं 65 रन केले आहेत. तर लबुशेनचे रन स्मिथपेक्षा जास्त (113) असले तरी त्याचा स्ट्राईक रेट हा कमी म्हणजे 64.57 इतका आहे. या दोघांनाही पहिल्या तीन मॅचमध्ये एकही हाफ सेंच्युरी करता आलेली नाही.
स्मिथ-लबुशेन जोडीनं भारताविरुद्धच्या मॅचमध्ये 64 बॉलमध्ये 36 रनची पार्टनरशिप केली. बॉलर्सना वरचढ होऊ दिलं. टीमचा रनरेट कमी केला. निर्णायक क्षणी आऊट झाल्यानं नंतर येणाऱ्या बॅटर्सवर दबाव वाढला. ऑस्ट्रेलियाला त्या मॅचमध्ये 200 देखील करता आले नाहीत. बाबर आणि रिझवान ही जोडी नेहमी याच पद्धतीनं खेळते. त्यांच्या खेळामुळेच भारत-पाकिस्तान मॅचही अगदीच एकतर्फी झाली.
अतिसामान्य टीमविरुद्धचा एकतर्फी (अपेक्षित) विजय
स्मिथ हा ऑस्ट्रेलियाच्या ऑल टाईम ग्रेट पैकी एक आहे. भारतीय पिचवर तसंच स्पिनर्ससमोर खेळण्याचा त्याचा अनुभव मोठा आहे. तो टीममध्ये असताना त्यासारखाच खेळणाऱ्या लबुशेनची गरज काय आहे?
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या तीन मॅच चेन्नई आणि लखनौ या स्पिनला मदत करणाऱ्या पिचवर होत्या. आता पुढील स्पर्धेतील पिच वेगळी आहेत. पहिल्या दोन मोठ्या पराभवामुळे त्यांच्या रनरेटवरही परिणाम झालाय.
हा रनरेट वाढवायचा असेल तर मॅक्सवेल, स्टॉईनिस, इंग्लिस या आक्रमक बॅटर्सना जास्त बॉल खेळण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. लबुशेनच्या जागी कॅमेरुन ग्रीन हा चांगला पर्याय ऑस्ट्रेलियाकडं आहे.
पाकिस्तानची गोष्टच वेगळी. ते बाबर-रिझवानला काढूच शकत नाही. ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानसारखं अडचणीत वारंवार पडायचं नसेल तर बाबर-रिझवान प्रवृत्तीनं खेळणारी ही जोडी त्यांना फोडावी लागेल.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या मोबाईलवर वाचण्यासाठी आमचे व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा. चॅनेल फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा.
You must be logged in to post a comment.