
डेल स्टेन (Dale Steyn Special) हा फक्त दक्षिण आफ्रिकेचा नाही तर 21 व्या शतकातील सर्वात भेदक फास्ट बॉलर होता. इंग्लंडचा जेम्स अँडरसन (James Abderson) हा सर्वाधिक यशस्वी बॉलर आहे. पण स्टेनला कधीही अँडरसनप्रमाणे मायदेशातील अनुकूल पिच आणि ढगाळ वातावरण यावर अवलंबून राहवं लागलं नाही. भेगा पडलेल्या पिचवर देखील आग निर्माण करण्याचे सामर्थ्य त्याच्या बॉलिंगमध्ये होते. त्यामुळेच तो आशिया खंडातही यशस्वी होऊ शकला. 2010 ते 2015 या कालखंडात क्रिकेट विश्वावर स्टेनचं राज्य होतं. तो आता रिटायर झाल्यानं बॉलच्या साह्यानं क्रिकेटच्या पिचवर समोरच्या टीममध्ये घबराहट करु शकणाऱ्या महान परंपरेचा अस्त झाला आहे.
स्टेनची जडणघडण
दक्षिण आफ्रिकेतील खाणींचा भाग असलेल्या फलाबोरवा (Phalaborwa) या भागात डेल स्टेनचं लहानपण गेलं. या भागात तापमान हे 47 अंश सेल्सियसपर्यंत असते. इतक्या तप्त वातावरणात क्रिकेट विश्वात आग ओकणारा बॉलर निर्माण होईल, असं कुणालाही वाटलं नसेल. पण स्टेननं ते सिद्ध केलं.
फलाबोरवातील तप्त वातावरणाची पर्वा न करत स्टेननं जास्तीत जास्त वेगानं अचूक बॉलिंग करण्याची, बॉल जास्तीत जास्त फास्ट टाकत असतानाच तो स्विंग करण्याची कला विकसित केली. त्यामुळेच आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि फास्ट बॉलर्ससाठी सर्वाधिक आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या आशिया खंडातही तो तितकाच यशस्वी (Dale Steyn Special) होऊ शकला.
अवघ्या सात फर्स्ट क्लास मॅचच्या अनुभवानंतर 2004 साली त्यानं इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पोर्ट एलिजाबेथमध्ये झालेल्या त्या टेस्टमध्ये स्टेननं तब्बल 16 नो बॉल टाकले होते. त्याची सुरुवातीची वाटचाल साधारण होती. त्यामुळे त्याला आफ्रिकेच्या टीममधून वगळण्यात आले. इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये खेळून स्टेननं त्याची बॉलिंग घोटीव केली. त्यानंतर 2006 साली त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केले. त्यानंतर स्टेननं मागं वळून पाहिलं नाही.
‘स्टेन गन’ थंडावली, बॅट्समनची झोप उडवणाऱ्या बॉलरची ‘ती’ इच्छा अपूर्ण
बॅट्समनची चाळण करणारी ‘स्टेन गन’
न्यूझीलंड विरुद्ध 2006 साली मायदेशात झालेल्या सीरिजमध्ये स्टेन टीममध्ये परतला. त्या टेस्टमध्ये त्यानं पहिल्यांदा एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या. तीन टेस्टच्या सीरिजमध्ये 18 विकेट्स घेत त्यानं क्रिकेट विश्वाला त्याची दखल घेण्यास भाग पाडले. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये झालेली सीरिज देखील स्टेननं वेगानं गाजवली.
पाकिस्तानहून परतल्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या सलग दोन टेस्टमध्ये स्टेननं 10 विकेट्स घेतल्या. याच सीरिजमध्ये त्यानं टाकलेला बाऊन्सर न्यूझीलंडचा ओपनर क्रेग कमिन्सचं हॅल्मेट तोडून तोंडाला लागला त्यामुळे कमिन्सला हॉस्पिटल गाठावं लागलं. प्रतिस्पर्धी टीमची चाळण करण्यास ‘स्टेन गन’ सज्ज (Dale Steyn Special) झाली होती.
भारताविरुद्ध दाहकता
डेल स्टेनकडं प्रचंड वेग आणि त्या वेगाला नियंत्रित करणारी अचूकता होती. त्यामुळेच त्याला कधी अनुकूल वातावरणाची वाट पाहवी लागली नाही. त्याच्या वेगामुळेच 2008 साली अहमदबाद टेस्टमध्ये भारतीय टीम लंच पूर्वीच 76 रनवर ऑल आऊट झाली होती. भारतीय पिचवर हे अगदी अपवादात्मक दिसणारं दृश्य होतं.
डेल स्टेननं दोन वर्षांनी नागपूरमध्येही भारतीय बॅट्समनमध्ये अशीच घबराहट निर्माण केली होती. त्यानं टीम इंडियाच्या पहिल्या इनिंगमध्ये स्विंगवर 2 तर जुन्या बॉलनं 5 अशा 7 विकेट्स घेतल्या. तिसऱ्या दिवशी टी सेशननंतर सेहवागच्या सेंच्युरीनंतर सावरलेल्या टीम इंडियाला स्टेननं भगदाड पाडलं. वासिम अक्रम आणि वकार युनूस यांनाही हेवा वाटावा असा स्पेल त्यानं जुन्या बॉलनं टाकला. अवघ्या 22 बॉलमध्ये टीम इंडियाच्या 5 बॅट्समन्सना त्यानं परत पाठवलं. कोणत्याही फास्ट बॉलरसाठी भारतीय पिचवरील तो ड्रीम स्पेल (Dale Steyn Special) होता.
स्टेनचं सातत्य
कर्टनी वॉल्श, ग्लेन मॅकग्रा, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन या फास्ट बॉलर्सनी टेस्ट क्रिकेटमध्ये डेल स्टेनपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. जेम्स अँडरसनचा विकेट घेण्याचा स्ट्राईक रेट हा 56. 3 आहे. ब्रॉडचा त्याच्या पेक्षा थोडा जास्त 56.9, तर वॉल्शचा स्ट्राईक रेट आणखी जास्त 57.8 इतका आहे.
अचूकतेचं दुसरं नाव असलेल्या ग्लेन मॅकग्रानं या तिघांपेक्षा चांगल्या 51.9 च्या स्ट्राईक रेट्सनं विकेट घेतल्या आहेत. तर डेल स्टेनचा स्ट्राईक रेट हा सर्वांपेक्षा कमी 42.3 इतका आहे. हेच आणखी वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर प्रत्येक 7 ओव्हर्सनंतर स्टेननं टेस्ट क्रिकेटमध्ये एक विकेट घेतली आहे.
एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याची आकडेवारी काढली तर स्टुअर्ट ब्रॉडचं हे प्रमाण त्यानं खेळलेल्या एकूण इनिंगच्या 6.56 टक्के आहे. वॉल्श 9.09, अँडरसनचं त्याच्यापेक्षा बरोबर एक टक्का अधिक म्हणजेच 10.09 तर मॅकग्राचं 11.93 टक्के आहे. स्टेन या आकडेवारीतही टॉप 4 बॉलर्सपेक्षा पुढं असून त्याचं हे प्रमाण 15.03 टक्के इतकं आहे. फिनलँडर आणि मॉर्ने मॉर्केल सारखे भक्कम सहकारी असूनही स्टेननं हे सातत्य कायम राखलं (Dale Steyn Special) हे विशेष.
आशिया खंडात सर्वाधिक यशस्वी
डेल स्टेन हा आशिया खंडामध्ये सर्वाधिक विकेट्स (92) घेणारा भारतीय उपखंडाच्या बाहेरील बॉलर आहे. तसेट टेस्टमधील प्रत्येक इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी त्यानं किमान 5 वेळा तरी केलीय. डेल स्टेननं एकूण 26 वेळा एका इनिंगमध्ये 5 पेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यापैकी 22 वेळा दक्षिण आफ्रिकेनं ती टेस्ट मॅच जिंकली तर अवघी 1 टेस्ट गमावली. त्यावरुन दक्षिण आफ्रिकेच्या विजयात स्टेनचं असलेलं महत्त्व (Dale Steyn Special) लक्षात येतं.
डेल स्टेन याच सातत्यामुळे एकूण 2043 दिवस टेस्ट क्रिकेटमधील नंबर 1 बॉलर होता. जो एक रेकॉर्ड आहे. ‘स्टेन गन’मुळेच आफ्रिकेला ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेत टेस्ट सीरिज जिंकता आली. त्याची टीम टेस्ट क्रिकेटमधील नंबर 1 टीम बनली.
अचूकतेचं दुसरं नाव, ग्लेन मॅकग्रा!
सिक्स, दुखापत आणि उतार…
डेल स्टेनच्या या वैभवशाली कारकिर्दीमध्ये त्याच्या नावावर एकही वर्ल्ड कप विजेतेपद नाही. इतकचं नाही तर त्याची आयसीसीच्या स्पर्धेतील कामगिरी देखील त्याच्या लौकिकाला साजेशी नाही. इम्रान ताहीर आणि मॉर्ने मॉर्केल या आफ्रिकन बॉलर्सनी स्टेनपेक्षा या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
न्यूझीलंड विरुद्ध 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2015) शेवटच्या ओव्हरमध्ये 12 रन वाचवण्याची जबाबदारी स्टेनच्या खांद्यावर होती. त्यावेळी मॅथ्यू इलियटनं त्याला सिक्स लगावत न्यूझीलंडला मॅच जिंकून दिली. आफ्रिकेला वर्ल्ड कप फायनल गाठण्याची आजवरची सर्वात चांगली संधी त्यांच्या सर्वाधिक यशस्वी बॉलरला साधता आली नाही.
मॅथ्यू इलियटनं लगावलेल्या या सिक्सनंतर स्टेनचं करिअर बदललं. त्याच्या करिअरमध्ये उतार सुरू झाला. 2015 च्या शेवटी भारताविरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये स्टेननं दुखापतीमुळे पहिल्या टेस्टनंतर माघार घेतली. आफ्रिकेनं ती सीरिज 0-3 नं गमावली. त्यानंतर तो दुखापतीमुळेच टीमच्या आत-बाहेर होता.
क्रिकेटच्या मैदानातील बॉन्डला दुखापतींचा वेढा
स्टेनला दुखापतीमुळेच 2019 च्या क्रिकेट वर्ल्ड कपमधूनही बाहेर पडावं लागलं. ज्या स्पीड आणि अचूकतेसाठी स्टेन ओळखला जात असे त्यावरही त्याचा परिणाम झाला. आयपीएल स्पर्धेत अगदी नवोदीत बॅट्समनही त्याची धुलाई केली.
दक्षिण आफ्रिकेनं कराराच्या यादीतूनही त्याचं नाव वगळलं. तरीही T20 वर्ल्ड कप खेळण्याची त्याची इच्छा होती. त्यामुळेच तो थांबला होता. पण सध्या टचमध्ये नसल्यानं आपली या टीममध्ये निवड होणार नाही, याची जाणीव स्टेनला झाली असावी म्हणूनच त्यानं या वर्ल्ड कपच्या ऐन तोंडावर रिटायर होत असल्याचं जाहीर केलं. त्याच्या रिटायरमेंटनं (Dale Steyn Special) आफ्रिकेच्या गोल्डन जनरेशनमधील शेवटच्या खेळाडूनंही आता क्रिकेटला अलविदा केला आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.