फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात झालेली टी-20 सीरिज भारतानं 2-1 अशी जिंकली. हार्दिक पंड्याचा (Hardik Pandya) दमदार खेळ हे या सीरिजमधील भारताच्या विजयाचं मुख्य वैशिष्ट्य होतं. T20 सीरिजमधील या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल हार्दिक पांड्याचा ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हार्दिकने हा पुरस्कार क्षणाचाही विचार न करता टी. नटराजन (T. Natarajan) या नवोदीत खेळाडूला देऊन टाकला.

( वाचा : उथळपणाचा शिक्का बसलेला हार्दिक पांड्या ठरला ‘बडा दिलवाला’! )

हार्दिक पांड्याच्या या दिलदार वृत्तीचं सोशल मीडियावर अनेकांकडून कौतुक होत आहे. या कौतुक करणाऱ्यांच्या यादीत आता पाकिस्तानचा माजी स्पिनर दानिश कनेरियाची (Danish Kaneria) देखील भर पडली आहे. पांड्याचं कौतुक करतानाच कनेरियानं पाकिस्तानी क्रिकेटमधलं एक सत्य देखील जगाच्या वेशीवर टांगलं आहे.

काय म्हणाला कानेरिया?

हार्दिक पांड्यानं नटराजनला ‘मॅन ऑफ द सीरिज’ची ट्रॉफी देतानाचा फोटो कानेरियानं ट्विट केलाय. तो फोटो ट्विट करत कानेरिया म्हणतो, “हा खूप चांगला फोटो आहे. हार्दिकनं नटराजनला ‘मॅन ऑफ द सीरिज’चा पुरस्कार देऊन सर्वांचं मन जिंकलं आहे. या गोष्टीमुळे नवे खेळाडूंना खूप आनंद होतो आणि त्यांना प्रोत्साहन मिळते. आमच्यात (पाकिस्तानच्या टीममध्ये) कोणत्याही खेळाडूनं असं कधीही केलेलं नाही, सर्वजण फक्त स्वत:चा विचार करतात.”

कोण आहे कानेरिया?

दानिश कानेरिया हा पाकिस्तानच्या टीममधील हिंदू खेळाडू होता. लेगस्पिनर म्हणून तो दहा वर्ष पाकिस्तानच्या राष्ट्रीय टीमकडून खेळला. वासिम अक्रम, वकार युनूस आणि इम्रान खान यांच्यानंतरचा तो पाकिस्तानचा सर्वात यशस्वी टेस्ट बॉलर आहे. याचा दुसरा अर्थ म्हणजे पाकिस्तानच्या कोणत्याही स्पिनरने आजवर कानेरियापेक्षा जास्त टेस्ट विकेट्स घेतलेल्या नाहीत. ‘पाकिस्तानच्या टीममध्ये आपल्याबाबत भेदभाव होत असे’, असा आरोप कानेरियानं यापूर्वीच केला आहे.

नटराजनला पुरस्कार का दिला होता?

टी नटराजननं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानं तीन मॅचच्या टी-20  सीरिजमध्ये 8 विकेट्स घेत स्वत:चा ठसा उमटवला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दिग्गज बॉलर्सच्या अनुपस्थितीमध्ये नवोदित नटराजननं भारतीय बॉलिंगची धूरा सांभाळली होती. त्याच्या या कामगिरीची दखल घेत हार्दिक पांड्यानं स्वत:चा पुरस्कार त्याला देण्याचा मोठेपणा दाखवला होता.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: