फोटो – इंग्लंड क्रिकेट बोर्ड

इंग्लंडचा प्रमुख ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं (Ben Stokes)  वर्क लोडचं कारण देत वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ‘आपण आता तीन्ही प्रकारचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकत नाही’ असं कारण देत स्टोक्सनं वन-डे क्रिकेट यापुढं न खेळण्याचा निर्णय जाहीर (Ben Stokes ODI Retirement) केला आहे.  वन-डे क्रिकेटच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू असतानाच स्टोक्सनं हा प्रकार सोडत याचं महत्त्व कमी झाल्याचे संकेत क्रिकेट विश्वाला दिले आहेत का? हे आता तपासले पाहिजे.

वन-डे प्रकार का?

दुखापतींचा इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि T20 लीगचं वर्षभरातील व्यस्त वेळापत्रक तसंच इंग्लंड टीमच्या टेस्ट टीमची अतिरिक्त जबाबदारी याचा विचार करता स्टोक्सनं वर्कलोडचं कारण देणं हे स्वाभाविक आहे. पण, त्यानं निवृत्ती घेण्यासाठी वन-डे प्रकाराची निवड करण्यास विशेष महत्त्व आहे.

स्टोक्स त्याच्या आजवरच्या 11 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये फक्त 34 T20 इंटरनॅशनल खेळलाय. मागील 18 महिन्यांमध्ये तर फक्त 6 इंटरनॅशनल T20 खेळण्यासाठी तो मैदानात उतरलाय. इंग्लंडचाच नाही तर जगातील बेस्ट ऑल राऊंडर समजल्या जाणाऱ्या स्टोक्सला T20 प्रकारात सर्वाधिक झगडावं लागलं आहे, हे त्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

स्टोक्सच्या कारकिर्दीचा विचार केला तर त्यानं T20 क्रिकेट सोडणे हे अधिक नैसर्गिक ठरले असते. त्यामधून त्याला पुरेशी विश्रांती मिळाली असतीच. त्याचबरोबर इंग्लंड टेस्ट टीमच्या कॅप्टनला आयपीएलच्या काळात इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये रेड बॉल क्रिकेटचा सराव करणे शक्य होते त्यानंतरही त्यानं वन-डे प्रकारातून निवृत्ती (Ben Stokes ODI Retirement)  जाहीर केली आहे.

सर्वोत्तम ‘टेस्ट’

T20 क्रिकेटच्या उदयापासून उपस्थित होणारा हा प्रश्न आगामी काळात आणखी गंभीर होणार आहे. स्टोक्सची या प्रकारातील निवृत्ती त्याचीच नांदी आहे. आजही जगातील कोणत्याही क्रिकेटपटूसाठी त्याचा खेळ दाखवण्याचे सर्वोच्च व्यासपीठ हे टेस्ट क्रिकेट आहे.

इंग्लंडचा माजी कॅप्टन जो रूटची (Joe Root) 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपपूर्वी वन-डे क्रिकेटमधील सरासरी ही 51 होती. त्यानंतरही त्याला श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मागील काही वर्षांमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये रनमशिन व्हावं लागलं. इंग्लंडकडूनच वन-डे क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतरही जॉनी बेअरस्टोच्या नावाचा दबदबा हा त्यानं मागील काही टेस्टमध्ये केलेल्या खेळीनंतर झाला आहे.

Ben Stokes: बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय, वयाच्या 31 व्या वर्षीच केली निवृत्ती जाहीर

पैसा कुणाला नकोय?

तत्वज्ञान आणि सुविचारांच्या पुस्तकात काहीही लिहलं असलं आणि लिहलं जाणार असलं तरी जगातील कोणत्याही व्यक्तीला कमी कष्टात भरपूर पैसा मिळाला तर तो हवा असतो. हे शाश्वत सत्य आहे.जगभरातील क्रिकेटपटू आयपीएलसह अन्य T20 लीग खेळण्याची धडपड का करतात याचं कारण, या शाश्वत सत्यामध्ये दडलंय.

वन-डे क्रिकेटला दोन्ही मार्गानं मार (Ben Stokes ODI Retirement)  बसतोय. ते टेस्ट क्रिकेटसारखं प्रतिष्ठेचं नाही. त्याचबरोबर 100 ओव्हर्स मैदानात घाम गाळल्यानंतर त्यामध्ये मिळणारा पैसा हा T20 लीग पेक्षा कमी  आहे. वाढती स्पर्धा, दुखापतींचा सेटबॅक, व्यस्त वेळापत्रक या सर्वांमध्ये क्रिकेटपटू वन-डे क्रिकेटला कमी महत्त्व देणार हे स्वाभाविक आहे.

वन-डे समोर गंभीर धोका

वन-डे क्रिकेटला सर्वात गंभीर धोका हा सध्याच्या फ्लॅट पिचचा आहे. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना सिक्स-फोरची मेजवानी चाखायला मिळेल,.याची काळजी घेतली जाते. त्यामुळे वन-डे क्रिकेटमध्ये आता बॉलर होणं हा सर्वात नकोसा जॉब आहे.

वर्ल्ड कप विजेतेपद मिळवण्याच्या जिद्दीनं यापूर्वी क्रिकेटपटू वन-डे क्रिकेट खेळत असतं. त्यामधील इनिंग लांबवत. आता बदलत्या काळात खेळाडू देखील प्रॅक्टीकल झालेत. त्यांना खेळण्यासाठी आणि जिंकण्यासाठी अन्य स्पर्धा आहेत. सर्वच टीमनं रोटेशन पॉलिसी राबण्यास सुरूवात केलीय. त्यामधून प्रत्येक टीमची दुसरी फळी उदयाला येत आहे.

नव्या खेळाडूंना संधी देण्यासाठी वन-डे क्रिकेटचा वापर हा निवड समितीकडून अधिक होईल. तो त्यांनी करावा म्हणून बेन स्टोक्ससारखे खेळाडू (Ben Stokes ODI Retirement)  या प्रकरातून स्वत:हून निवृत्ती घेतील. काहींना निवृत्ती घेण्याचे निरोपही दिले जाऊ शकतात. अन्यथा त्यांना कोणतंही कारण पुढं करून बाहेर बसवण्याचा मार्ग बोर्डाकडं आहेच. एकंदरितच वन-डे क्रिकेटचं महत्त्वं आता कमी झालं आहेच पण त्याच्या अस्तित्वासाठी देखील हा गंभीर काळ आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: