
रवीचंद्रन अश्विननं (Ravichandran Ashwin) टेस्ट क्रिकेटमधील 400 विकेट्सचा टप्पा (Ashwin 400) पूर्ण केला आहे. हा पराक्रम करणारा अश्विन हा क्रिकेट विश्वातील 16 वा तर भारताचा चौथा बॉलर आहे. 2011 साली वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्लीमध्ये पदार्पण करणाऱ्या अश्विननं 77 व्या टेस्टमध्ये हा टप्पा पूर्ण केला आहे. हा टप्पा पूर्ण करणारा अश्विन हा भारताचा सर्वात वेगवान बॉलर असून क्रिकेट विश्वात फक्त मुरलीधरननं त्याच्या पेक्षा कमी टेस्टमध्ये 400 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी टीम इंडियाच्या टेस्ट टीममधील स्थान धोक्यात असलेल्या अश्विननं जोरदार कमबॅक केलं. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये तर अश्विननं ऑल राऊंड कामगिरीच्या जोरावर ‘चेन्नई सुपर किंग’ बनला होता. या दोन दौऱ्यात क्रिकेट विश्व अश्विनच्या पुन्हा एकदा प्रेमात पडलंय. त्याला काही काळापूर्वी नावं ठेवणाऱ्या मंडळींना देखील अश्विनचा मोठेपणा मान्य करावा लागतोय.
सतत वाढणारी स्पर्धा, नव्या स्पिनरचा झालेला उदय, मर्यादीत ओव्हरमधील गमावलेलं स्थान, टेस्ट टीममधील जागेची असुरक्षितता, सतत स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान, दुखापती या सर्व आव्हानांचा सामना करत अश्विननं 400 विकेट्स (Ashwin 400) पूर्ण केल्या आहेत. त्याचा हा प्रवास कसा झाला याचं उत्तर अश्विनच्या अभ्यासू वृत्तीमध्ये आहे.
( वाचा : Explained : विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये आर. अश्विनवर खरंच अन्याय झाला आहे का? )
महान बॉलर्सचा अभ्यास
तुम्हाला 1990 चा अनिल कुंबळे (Anil Kumble) आठवतोय? 90 ते 2008 या अठरा वर्षाच्या काळात त्याच्यामधला बदल हा केवळ चष्मा आणि मिशी गायब होण्यापूरता नव्हता. तर या अठरा वर्षात त्यानं त्याची बॉलिंगची पद्धत बदलली. त्यानं स्वत:ला जाणीवपूर्वक ऑलराऊंड लेगस्पिनर बनवलं. त्यानं रन-अप कमी केला. बाऊन्स आणि अचूक टप्पा ही कुंबळेची खासियत शेवपटर्यंत कायम होती. पण त्याचबरोबर जेंव्हा पिच साथ देत नाही त्यावेळी हवेत बॉल जास्त वेळ ठेवत बॅट्समनला बिट करण्याचं टेक्निक कुंबळेनं वापरलं. गुगलीचा प्रभावी वापर करत जगातल्या टॉप बॅट्समनचा बचाव कुंबळेनं उद्धवस्त केला.
मुरलीधरनच्या (Muralidharan) बॉलिंगमध्ये सुरुवातीपासूनच वैविध्य होतं. पण समोरचा बॅट्समन ज्यावेळी वरचढ ठरलाय. आपली बॉलिंग ओळखू लागलाय. (लारा आणि गांगुलीनं सुरुवातीच्या काळात त्याची भरपूर धुलाई केलीय) त्यावेळी वापरण्याचा प्लॅन बी मुरलीकडे नव्हता. पण अनुभवानं मुरली हा प्लॅन बी देखील शिकला. करियरच्या शेवटी मुरलीकडे लाईन आणि लेंग्थमधल्या व्हेरियशन बरोबरच योजनांचंही वैविध्य होतं. ज्यामुळे तो जगातला सर्वात जास्त विकेट्स घेणारा बॉलर बनला.
शेन वॉर्नमध्ये (Shane Warne) सुरुवातीपासूनच आत्मविश्वस ठासून भरला होता. त्याच्या लेगब्रेकमध्ये प्रचंड विविधता होती. ज्यामुळे समोरचा बॅट्समन शरणागती पत्कारत असे. पण वॉर्ननही नंतरच्या काळात केवळ लेगब्रेकवर अवलंबून न राहता अचूक टप्पा, फ्लिपर आणि गुगलीच्या साह्यानं आपलं साम्राज्य वाढवलं. स्वत:ला ‘ऑल टाईम ग्रेट’ बनवलं.
या तीन ऑल टाईम ग्रेट स्पिनर्सनी स्वत:मध्ये केलेल्या बदलचा आर. अश्विननं अगदी सखोल अभ्यास केलेला आहे. आजवरच्या करियरमध्ये अश्विननं वारंवार स्वत:मध्ये बदल केलाय. समोरची टीम, पिचची परिस्थिती, क्रिकेटचा विचार या सर्वांचा विचार करुन बॉलिंग करणारा हा बॉलर आहे.
प्रयोगला तयार!
” मी नेट प्रॅक्टिक्समध्ये भरपूर प्रयोग करणारे पण मैदानावर जुन्याच फॉर्म्युल्यावर चिकटून राहणारे बॉलर्स खूप पाहिलेत. पण माझी पद्धत वेगळी आहे. प्रत्यक्ष मॅचमध्ये तुमच्यावर दबाव असतो त्यावेळी प्रयोग करायला मी घाबरत नाही. याच प्रयोगामधून तुम्ही बॉलर म्हणून किती विकसीत झाला आहात हे समजतं. तुमच्या शक्तीस्थानाचा तुम्हाला अंदाज येतो” असं अश्विननं यापूर्वी एकदा सांगितलं होतं.
अश्विनच्या याच वेगळेपणामुळे त्याची बॉलिंग ही फक्त अॅक्शनमधल्या बदलापुरती मर्यादीत राहत नाही. वेगवेगळी अस्त्र त्यानं स्वत:च्या भात्यात जमवली आहेत. अश्विननं टीम इंडियामध्ये हरभजनला (Harbhjan Singh) रिप्लेस केलं. हरभजन हा खरं तर अश्विनपेक्षा अधिक गुणवत्ता असलेला बॉलर. पण एकाच लाईन आणि लेंग्थमध्ये बॉलिंग करण्याचा एकसुरीपणा हरभजनकडे होता. त्यामुळेच मैदानाची साथ मिळाली नाही किंवा बॅट्समनं त्याच्यावर हल्ला चढवला की तो बचावत्मक होत असे. विकेट्स घेण्यापेक्षा रन्स रोखणं हेच काम अशा परिस्थितीमध्ये हरभजन करत असे.
( ‘त्याला रात्रभर त्रास होत होता,’ अश्विनच्या बायकोनं सांगितलं नवऱ्याचं सत्य! )
स्पिन बॉलर्समधला व्हिव रिचर्ड!
अश्विन प्रयोगाला आणि आव्हानाला घाबरत नाही. 2014 च्या आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेलनं त्याची भरपूर धुलाई केली. तरीही मी त्याला पुढच्या मॅचमध्ये ‘ओव्हर द विकेट’ बॉलिंग करणार हे ऑन कॅमेरा सांगायला तो कधी घाबरला नाही. बॅट्समन्सची विकेट घेण्याच्या या खेळात पराभव झाला तरी तो खांदे पाडत नाही. नव्या नव्या युक्तीनिशी तो मैदानात उतरतो.
वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन व्हिव रिचर्ड (Viv Richards) हा असाच होता. तो देखील मॅचपूर्वीच प्रतिस्पर्धी खेळाडूवर वर्चस्व गाजवायला सुरु करत असे. समोरच्या टीमला आणि टीममधल्या कितीही मोठ्या बॉलरला त्यानं स्वत:वर कधी वर्चस्व गाजवू दिलं नाही. त्यानं त्यांच्यावर राज्य केलं. रिचर्डनं बॉलर्सवर राज्य केलं कारण तो बॉलर्सचा टप्पा बिघडवून त्याला स्वत:ला हवी तशी बॉलिंग करण्यास भाग पाडत असे. बॉलर्सच्या चुकांचा फायदा रिचर्डला होतो असं म्हंटल्यापेक्षा रिचर्ड्सला पाहून बॉलर चुका करत असत.
अश्विनची देखील तीच पद्धत आहे. आयपीएलमधील मॅक्सवेलचं उदाहरण यापूर्वी दिलं आहेच. भारताच्या नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही तेच घडलं. पहिल्या टेस्टमध्ये त्यानं स्टीव्ह स्मिथला क्रिजच्या आतमध्ये ढकलत पहिल्या स्लिपमध्ये कॅच देण्यास भाग पाडलं. मेलबर्नमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये मार्नस लाबुशेनलाही त्याच पद्धतीनं परत पाठवलं.
( वाचा : अश्विनच्या जाळ्यात पुन्हा अडकला स्मिथ, अनेक रेकॉर्ड्सची झाली नोंद )
मेलबर्न टेस्टमध्ये मॅथ्यू वेडनं आक्रमक खेळत अश्विनवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरही अश्विनकडं उत्तर होतं. वेडला बॉलपर्यंत सहज पोहचता येणार नाही, अशी काळजी त्यानं घेतली. वेड रवींद्र जडेजाकडं कॅच देऊन आऊट झाला. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेनलाही अश्विननं त्याला हवी ती चूक करायला भाग पाडून आऊट केलं.
आता या सीरिजमध्ये बेन स्टोक्स या बॅट्समनवर त्यानं त्याच पद्धतीनं राज्य (Ashwin 400) केलं आहे. आयपीएल स्पर्धेत जोस बटलरला (Jos Buttler) असंच वर्चस्व गाजवून आऊट केलं. त्यामुळेच तो स्पिन बॉलिंगमधला व्हिव्ह रिचर्ड आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.