फोटो – ट्विटर

” कोणतीही क्रिकेट टीम टेस्ट क्रिकेटमध्ये 350 पेक्षा जास्त विकेट्स आणि चार सेंच्युरी झळकावणाऱ्या खेळाडूचा सन्मान करेल. अश्विननं (R. Ashwin) एका मॅचमध्ये विकेट्सची रास रचली नाही तर त्याला पुढच्या मॅचमध्ये टीमच्या बाहेर केले जाते. प्रस्थापित बॅट्समन्सच्या बाबतीत मात्र असे घडत नाही. ते एखाद्या मॅचमध्ये अपयशी ठरले तरी त्यांना पुन्हा-पुन्हा संधी दिली जाते. अश्विनसाठी मात्र नियम वेगळे आहेत.’’ भारताचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी ‘स्पोर्ट्सस्टार’ या इंग्रजी वेबसाईटसाठी लिहिलेल्या लेखात व्यक्त केलेल्या मताने सध्या देशभर खळबळ उडाली आहे.

टीम इंडियाने यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात म्हणजेच 2018 साली अ‍ॅडलेड टेस्ट जिंकली होती. तेंव्हा आर. अश्विननं चेतेश्वर पुजारासोबत (Cheteshwar Pujara) महत्वाची भागिदारी केली होती. त्यानंतर त्याने संपूर्ण टेस्टमध्ये 2 पेक्षा कमी इकॉनॉमी रेटनं रन्स दिले. त्याचबरोबर तो त्या मॅचमधला टीम इंडियाचा आघाडीचा ‘विकेट टेकर बॉलर’ही होता. टीम इंडियाचा सध्याचा सर्वात जास्त विकेट घेणारा बॉलर असूनही अश्विनची या सीरिजमधील पहिल्या टेस्टसाठी टीममध्ये जागा निश्चित नव्हती. अ‍ॅडलेड टेस्टपूर्वी ‘रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) संपूर्ण फिट असता तर अश्विनला पहिली पसंती मिळली असती का?’ या प्रश्नाचं कुणीही छातीठोकपणे उत्तर ‘हो’ असं उत्तर देऊ शकत नाही.

( वाचा : पार्थिव पटेलसह भारतीय क्रिकेटमधील ‘धोनी पर्वा’चा फटका बसलेले क्रिकेटपटू )

नंबर 1 अश्विन

आर. अश्विन 2010 साली झालेल्या आयपीएल (IPL) आणि चॅम्पियनशीप लीग T20 स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळे सर्वात प्रथम प्रकाशात आला होता. त्यानं 2011 साली भारतीय टीमममध्ये पदार्पण केलं आणि थोड्याच कालावधीमध्ये तो भारताचा नंबर 1 बॉलर बनला. विशेषत: टेस्ट क्रिकेटमध्ये मॅच जिंकण्यासाठी भारताला अश्विनच्या स्पिनच्या जादूची मोठी मदत झाली. या दशकात टीम इंडियानं भारतामध्ये जिंकलेल्या टेस्ट सीरिजमध्ये अश्विनचे मोलाचे योगदान आहे. अश्विनच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच ‘विस्डेन’ ने (Wisden) निवडलेल्या या दशकाच्या टेस्ट टीममध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) बरोबरीनं अश्विनचा समावेश करण्यात आला आहे.

विराटच्या कॅप्टनीमध्ये अश्विन*

एकूणसरासरीइकॉनॉमी रेटविकेट्स
टेस्ट4723.582.8247
वन-डे2036.365.2625

महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) कॅप्टनसीमध्ये (2011-14) टेस्ट क्रिकेट सुरु करणारा अश्विन विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये 2015 पासून खेळत आहे. विराटच्या कॅप्टनसीमध्ये अश्विनननं 47 टेस्टमध्ये 23.58 ची सरासरी आणि 2.8 च्या इकॉनॉमी रेटनं 247 विकेट्स घेतल्या आहेत. टेस्टमध्ये इतका जबरदस्त रेकॉर्ड असलेल्या अश्विनला विराटच्या कॅप्टनसीमध्ये फक्त 20 वन-डे मध्ये संधी मिळाली आहे. या 20 वन-डे मध्ये त्याने 36.36 च्या सराररीनं आणि 5.26 च्या इकॉनॉमी रेटनं 25 विकेट्स घेतल्या आहेत.

( वाचा : लॉर्ड्स 1974 ते अ‍ॅडलेड 2020, दोन लज्जास्पद कामगिरीमधील अजब योगायोग! )

वन-डे साठी उपेक्षा

टीम इंडियाच्या 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून दणदणीत पराभूत झाली. भारताचे सर्व बॉलर्स फायनलमध्ये फेल गेले होते. या अपयशाचं खापर आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्यावर फुटले. दोघांचीही वन-डे टीममधून हकालपट्टी झाली. जडेजाची काही कालावधीनंतर टीम मॅनेजमेंटला आठवण झाली. अश्विनची उपेक्षा अजुनही संपलेली नाही.

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये अश्विनच्या अनुभवाचा टीम इंडियाला इंग्लंडमध्ये फायदा झाला असता तरी त्याला डावलण्यात आले. निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटचा मोठा विश्वास असलेली चहल-कुलदीप जोडी वर्ल्ड कपमध्ये अपेक्षित कामगिरी करु शकली नाही. विशेषत:  कुलदीप यादवचं अपयश मोठं होतं. वर्ल्ड कप स्पर्धेतनंतर कुलदीपचा फॉर्म कमालीचा घसरला आहे.

यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये कुलदीप बहुतेक काळ कोलकाता नाईट रायडर्सच्या बेंचवर होता. तर आर. अश्विननं दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख बॉलर होता. ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा, निकोलस पुरन यासारख्या प्रमुख बॅट्समन्सना त्यानं आऊट केलं. अयपीएल स्पर्धेत दिल्लीकडून 13 विकेट्स घेणाऱ्या अश्विनची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन-डे आणि T20 टीममध्ये निवड झाली नाही.

( वाचा : चेतेश्वर पुजाराचा ‘भक्कम’ खेळ आहे टीम इंडियाचा आधार! )

टेस्ट सीरिजमध्येही दुर्लक्ष*

देश
ऑस्ट्रेलिया8
इंग्लंड6
दक्षिण आफ्रिका3
न्यूझीलंड1
वेस्ट इंडिज4

‘आर. अश्विनचा टेस्टमधील रेकॉर्ड हा फक्त भारतामध्येच जबरदस्त आहे’, असा युक्तीवाद नेहमी केला जातो. मात्र त्याला परदेशात विशेषत: भारतीय उपखंडाच्या बाहेर नियमित संधी मिळालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. 2018-19 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अश्विन चार पैकी एकच टेस्ट खेळला. त्या टेस्ट सीरिजनंतर ‘भारताबाहेरच्या टेस्टसाठी कुलदीप यादव हा आमचा पहिल्या पसंतीचा बॉलर आहे,’ असं जाहीर वक्तव्य टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी केले होते. यावर्षीच्या सुरुवातीला झालेल्या न्यूझीलंड सीरिजमध्येही अश्विनला दोन पैकी फक्त एकाच टेस्टमध्ये संधी मिळाली होती. अश्विन त्याच्या टेस्ट करियरमध्ये ऑस्ट्रेलियात 8, इंग्लंडमध्ये 6, दक्षिण आफ्रिकेत 3 तर न्यूझीलंडमध्ये फक्त 1 टेस्ट मॅच खेळला आहे. वेस्ट इंडिजमध्येही त्याला फक्त 4 टेस्टमध्ये संधी मिळाली आहे. या देशातील टेस्ट सीरिजमध्ये त्याच्या डोक्यावर कायम टांगती तलवार असते.

एक बुद्धीमान बॉलर अशी अश्विनची ओळख आहे. त्याच्याकडे आता अनुभवाची शिदोरी देखील जमा झाली आहे. अ‍ॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन फार कमाल करु शकला नाही, पण अश्विननं पहिल्या इनिंगमध्ये चार विकेट्स घेत भारताला आघाडी मिळवून दिली होती. महेंद्रसिंह धोनीच्या रिटायरमेंटनंतर विराट कोहलीला मैदानात सल्ला देऊ शकेल अशा मोजक्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. अश्विनच्या हुशारीचा आणि अनुभवाचा विराटला मैदानात मोठा फायदा होऊ शकतो. त्याचा फायदा करुन घेण्याच्या ऐवजी गावस्कर म्हणतात तसं ‘ड्रेसिंग रुममध्ये स्पष्ट मतं मांडल्याची शिक्षा अश्विनला होत असेल’ तर प्रकरण खूप गंभीर आहे.

( वाचा : IPL 2021- CSK साठी पुढच्या वर्षीही ‘रैना है ना’! )

अ‍ॅडलेडमधील लज्जास्पद पराभवानंतर टीम इंडियासाठी सारं काही अजूनही संपलेलं नाही. मात्र मागील काही वर्षांमध्ये झालेल्या त्याच, त्याच चुकांमधून टीम मॅनेजमेंट काही शिकणार नसेल तर विराट कोहलीच्या टीमचा पाय आणखी तळाला जाऊ शकतो. गावस्कर याचा ‘अश्विनवर टीममध्ये होत असलेल्या अन्याय होत आहे,’ हा आरोप सामान्य क्रिकेट फॅन्सना पटला याचं उत्तर या सर्व इतिहासात दडले आहे.

टीम इंडियाला निर्णायक क्षणी येत असलेल्या अपयशातून बोध घेण्यासाठी बोर्ड किती गंभीर आहे हे समजण्यासाठी या आरोपनंतर बोर्ड किती लवकर आणि कशा पद्धतीनं कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. बोर्डाच्या या कारवाईवरच आगामी काळातील टीम इंडियाची दिशा ठरणार आहे.

* लेखातील चार्टमध्ये वापरलेली आकडेवारी 25/12/2020 पर्यंतची आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: