भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयची (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) गुरुवारी (24 डिसेंबर 2020) रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. कोरोना व्हायरसच्या नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर देशातील क्रिकेट सध्या बंद आहे. आता पुढील वर्षी देशातील क्रिकेट सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची आहे. भारतामध्ये पुढच्या वर्षी ICC T20 वर्ल्ड कप  आणि IPL स्पर्धेसह अनेक मोठे निर्णय या बैठकीत होणे अपेक्षित आहेत.

T20 वर्ल्ड कपला करामधून सूट मिळणार का?

भारतामध्ये पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ICC T20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपला करामधून सूट देण्यात यावी अशी आयसीसीआयची मागणी आहे. या मागणीवर उत्तर देण्यासाठी बीसीसीआयने आजवर अनेक डेडलाईन दिल्या होत्या. ICC च्या नियमानुसार या विषयातील शेवटची डेडलाईन 31 डिसेंबर 2020 आहे.

या डेडलाईनच्या एक आठवडा आधी होणाऱ्या बैठकीत याबाबत काय निर्णय होतो याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष असेल. भारत सरकारकडून कर माफ करण्यात बीसीसीआयला अपयश आलं तर आगामी T20 वर्ल्ड कप युएईमध्ये (UAE) होऊ शकतो. देशातील कर कायद्यानुसार ही करामध्ये सूट मिळणे अवघड आहे. त्यामुळे आता बीसीसीआयच्या बैठकीत यावर काय तोडगा निघणार हे पाहावे लागेल.

( वाचा : राहुल द्रविडच्या शिकवणीत घडत असलेला ‘हा’ खेळाडू पुढच्या वर्षी करणार धमाका! )

IPL मध्ये किती टीम खेळणार?

पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये (IPL 2021) 8, 9 की 10 टीम खेळणार याबाबत गेल्या काही महिन्यांपासून माध्यमांमध्ये सतत उलट-सुलट बातम्या येत आहेत. यामधील नेमकी कोणती बातमी खरी हे देखील या बैठकीनंतर स्पष्ट होईल.

आयपीएलच्या नव्या टीमसाठी अहमदाबाद शहराचं नाव सर्वात आघाडीवर आहे. पुणे, कानपूर, लखनौ, आणि गुवाहटी ही शहरं देखील शर्यतीमध्ये आहेत. सध्याची कोरोनाची परिस्थिती आणि त्यामुळे स्पर्धेचं बदललेलं स्वरुप हे पाहता पुढील वर्षी आठपेक्षा जास्त टीमसह आयपीएल स्पर्धा व्यवहार्य आहे का? यावर या बैठकीत मोठा खल होईल.

आयपीएल स्पर्धेत पुढील वर्षीही सध्याच्या आठ टीम खेळल्या तर मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) याचा मोठा फायदा होणार आहे. त्यांची बेस्ट टीम पुन्हा एकदा स्पर्धेत उतरेल. तर आयपीएलच्या मोठ्या ऑक्शनकडे डोळे लावून बसलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) फॅन्सची निराशा होणार आहे.

( वाचा : IPL 2020 मुंबई इंडियन्स : ‘बेस्ट टीमचे बेस्ट विजेतेपद’ )

नव्या समितींचा होणार निर्णय

बीसीसीआयच्या वेगवेगळ्या विषयातील समितींची स्थापना सध्या रखडली आहे. त्यामध्ये क्रिकेट सल्लागार समिती ही सर्वात प्रमुख आहे. या समितीची या बैठकीत स्थापना करण्यात येणार असून ही समिती निवड समितीच्या तीन नव्या सदस्यांची नेमणूक करेल.

‘या’ अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती

राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांची बीसीसीआयचे नवे उपाध्यक्ष म्हणून या बैठकीत औपचारिक घोषणा होईल. त्यांची यापूर्वीच या पदासाठी एकमतानं निवड झाली आहे. ब्रिजेश पटेल यांचा आयपीएल संचालक समितीच्या प्रमुख पदाचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता आहे.

( वाचा : पार्थिव पटेल : 17 व्या वर्षी पदार्पण, आयपीएल टीमचा प्रवासी आणि गुजरातचा गौरव! )

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट?

अमेरिकेतील लॉस एंजेलिस (Los Angeles) शहरात 2028 साली ऑलिम्पिक होणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात यावा अशी मागणी सध्या करण्यात येत आहे. या मागणीवर बीसीसीआय अधिकृत भूमिका स्पष्ट करेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: