फोटो – ट्विटर

आयपीएल स्पर्धेची (IPL 2021) धूम आता सुरू झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या T20 लीग स्पर्धेकडं पुढील महिन्यात होणाऱ्या T20 वर्ल्ड कपची (T20 World Cup 2021) रंगीत तालीम म्हणून पाहिलं जात आहे. आयपीएल स्पर्धा सुरू झाली असली तर अनेक क्रिकेट फॅन्सना भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज (India vs England Series 2021) अर्धवट संपल्याची चुटपूट लागली आहे. टीम इंडियाला 2007 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याची संधी होती. त्यावेळी या सीरिजचा निर्णायक निकाल न लागता कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे पाचव्या टेस्टपूर्वी सीरिज थांबवावी लागली.

भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज (IND vs ENG 2021) अर्धवट संपली असली तरी या सीरिजमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. त्या नेहमी लक्षात राहणार आहेत. रोहित शर्माची विदेशातील पहिली टेस्ट सेंच्युरी, राहुलचं कमबॅक, भारतीय फास्ट बॉलर्सचा ‘ऑन टार्गेट’ मारा, जो रूटचा जबरदस्त फॉर्म आणि सर्वात शेवटी पाचवी टेस्ट रद्द झाल्यानं वाद यामुळे ही सीरिज गाजली. त्याचबरोबर मुंबईकर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याच्यासाठी देखील ही सीरिज महत्त्वाची ठरली.

या संपूर्ण सीरिजबद्दल क्रिकेट फॅन आणि समीक्षक चेतन एबी यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा सारांश

प्रश्न : सर, ही सीरिज अचानक थांबवावी लागली. याबद्दल सातत्यानं वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. या सर्व विषयावर तुमचं मत काय आहे?

चेतन : भारत विरुद्ध इंग्लड ही सिरीज अचानक थांबवावी लागणे, हे अस काही क्रिकेट विश्वात पहिल्यांदा घडलेलं नाही. त्यामुळे या गोष्टीचा बाऊ करणे चुकीचे आहे. पण यात चूक आपल्या कोचिंग स्टाफची हे ही मान्य करावेच लागेल

प्रश्न : IPL मुळे पाचवी टेस्ट खेळण्यास भारतीय खेळाडू आणि बीसीसीआय यांनी नकार दिला हा आरोप तुम्हाला पटतो का?

चेतन : IPL मुळे BCCI ला नुकसान होणार होत, त्यामुळे खेळायला नकार दिला जाऊ शकतो पण दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीमध्ये 10 दिवसांचा फरक होता. यामध्ये वेळ जायला नको होता. भारतीय खेळाडूंनी दिलेला नकार योग्य आहे कारण सध्या T20 वर्ल्ड कप पुढे आहे व संघात निवडल्या गेलेले बहुतांश खेळाडू हे मागील काही काळात T20 सामने कमी खेळले आहेत. यामुळे आपण IPL ला वर्ल्ड कपची रंगीत तालीम म्हणून पाहायला हवे.

प्रश्न : आपण आता प्रत्यक्ष सीरिजमधील खेळाकडं वळूया. या सीरिजमधील तुम्हाला कायम लक्षात राहणारी एक गोष्ट तुम्ही काय सांगाल?

चेतन : केएल राहुलच्या धडाकेबाज पुनरागमानासाठी ही सीरिज नेहमी लक्षात राहणार आहे.

प्रश्न : रोहित शर्मानं या सीरिजमध्ये विदेशातील पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावली. त्याचा या सीरिजमधील खेळ पाहात रोहित आता टेस्ट टीममध्ये स्थिर झाला असं म्हणता येईल का?

चेतन : हो, रोहित आता कसोटीमध्ये स्थिर झाला आहे पण हे खूप लवकर व्हायला पाहिजे होता. येत्या तीन- चार वर्षात रोहीत निवृत्त होईल मग त्याची रिप्लेसमेंट बघावीच लागेल. अर्थात गिल, शॉ आणि मयंक यांना तेवढा अनुभव नाही आपण त्यांच्यावर तेवढा वेळ वाया जाऊ देऊ शकत नाही.

टीम इंडियाला इंग्लंडमध्ये जिंकण्यासाठी बॅट्समनची कामगिरी निर्णायक ठरणार

प्रश्न : रोहितबद्दल बोलत असतानाच आणखी एक टीममधील मुंबईकर अजिंक्य रहाणेनं या सीरिजमध्ये निराशा केली. त्याला आता ब्रेक देण्याची वेळ आलीय असं वाटतं का? की तो फॉर्ममध्ये येण्यासाठी आणखी वाट पाहयला हवी?

चेतन : अजिंक्यला पुरेशी संधी मिळाली आहे. त्याला थोडा ब्रेक द्यायलाच हवा. फॉर्ममध्ये यायची वाट पाहू नये. गेल्या दोन वर्षात सतत संघाची दारे ठोठावणारा अभिमन्यू ईश्वरन त्याची रिप्लेसमेंट म्हणून आजमावला जाऊ शकतो.

प्रश्न : विराट कोहलीनं या सीरिजमध्ये एकही सेंच्युरी झळकाली नाही. पण त्याही पेक्षा तो या सीरिजमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलवर सातत्यानं बीट झाला, आऊट झाला. कॅप्टनसीचं, यशस्वी होण्याचं प्रेशर विराटवर देखील जाणवू लागलंय असं वाटतं का?

चेतन : विराटवर दबाव आहे हे खरं आहे. पण गेल्या काही वर्षात आपण त्याच्याच नेतृत्वाखाली पहिल्या क्रमांकावर होतो हे विसरू नये. त्यामुळे त्याच्यावर असलेला दबाव कर्णधार म्हणून नसून बॅट्समन विराट म्हणून अधिक आहे.

प्रश्न : विराटच्या कॅप्टनसीबद्दल थोडं बोलूया. त्याचा एक निर्णय या सीरिजमध्ये सातत्यानं चर्चिला गेला. तो म्हणजे त्यानं अश्विनला एकदाही संधी दिली नाही. विराट आणि टीम मॅनेजमेंटनं जगातील सध्याच्या सर्वात यशस्वी स्पिनरवर अन्याय केला का?

चेतन : अश्विनला संधी न देणे हा निर्णय 50-50% योग्य अयोग्य वाटतो. आपण WTC फायनल मध्ये दोन स्पिनर घेऊन खेळलो पण यश आलं नाही. इंग्लड दौऱ्यावर खेळलेल्या आपल्या संघात फक्त पंत एकटाच डावखुरा फलंदाज होता त्यामुळे सर्वांमध्ये बदल म्हणून जडेजाला बॅट्समन म्हणून खेळवण्यात आलं, असं मला वाटत. जडेजाने तितकी बॉलिंग केली नाही हे ही आपण पाहिलं आहेच.

प्रश्न : भारतीय फास्ट बॉलर्सनी सातत्यानं चांगली कामगिरी केली. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल. तुम्हाला सर्वाधिक कोणत्या बॉलरची कामगिरी आवडली?

चेतन : मला सर्वाधिक कामगिरी आवडली ती शार्दूलची. त्याला ‘लॉर्ड’ का म्हणतात हे त्याने सिद्ध केले. त्याचबरोबर शमी आणि बुमराहचा फॉर्म परत आलेला पाहून आनंद झाला.

असा घडला ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुल ठाकूर!

प्रश्न : टीम इंडियानं या सीरिजमध्ये वर्चस्व गाजवलं. चार पैकी 2 टेस्ट जिंकल्या. एका टेस्टमधील विजय पावसामुळे हुकला. संपूर्ण सीरिजमध्ये भारतीय टीम कोणत्या बाबतीत इंग्लंडपेक्षा वरचढ होती.?

चेतन : भारतीय टीम पुर्णतः वरचढ नव्हती. आपल्या गोलंदाजांनी निराशा केली नाही. इंग्लडची फलंदाजी फक्त जो रूटवर अवलंबून होती. दुसरीकडे आपल्या संघात रोहित+ राहुल या जोडीने कमाल करत धावा केल्या. आधीमधी पुजारा, रहाणे आणि कोहली यांच्या ४०-५० धावांची त्यांना साथ भेटत होती. त्याचबरोबर आपल्या गोलंदाजांनी देखील कमालीची फलंदाजी केली. जो रूटला दुसऱ्या फलंदाजांची साथ मिळाली नाही.

प्रश्न : इंग्लंडचा कॅप्टन जो रूट या सीरिजमध्ये यशस्वी ठरला. त्याच्या फॉर्मबद्दल काय सांगाल? तो भारताविरुद्ध इतका यशस्वी का ठरला असं वाटतं?

चेतन : जो रूट यशस्वी ठरला कारण त्याने स्वतःला खेळपट्टीवर टिकण्यासाठी वेळ दिला.

प्रश्न :  इंग्लंडच्या फास्ट बॉलर्सच्या कामगिरीबद्दल काय सांगाल?

चेतन : इंग्लडचे फास्ट बॉलर पुर्णतः यशस्वी झाले नाहीत असं वाटत कारण आपल्या तळाच्या फलंदाजांनी त्यांना चोप दिला. आपल्या ओपनिंग जोडीला बाद करण्यासाठी त्यांना खूप पराकाष्ठा करावी लागत होती. घरच्या मैदानात अशी कामगिरी शोभा देत नाही.

प्रश्न : टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांच्या कारकिर्दीमधील कदाचित ही शेवटची टेस्ट सीरिज ठरणार आहे. भारतीय टीमचे कोच म्हणून त्यांच्या एकूण कामगिरीचे तुम्ही विश्लेषण कसं कराल?

चेतन : भारतीय टीमचे कोच म्हणून रवी शास्त्री चांगले होते. काही गोष्टी व घटना घडायला नको होत्या. राजकारण केले गेले हा आरोप सातत्याने त्यांच्यासोबत कोहलीवर पण लागत राहिला. संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगला खेळला. रँकिंग देखील चांगलं होत. चॅम्पियन ट्रॉफी फायनल, वर्ल्ड कप सेमी फायनल आणि WTC फायनल खेळणे यासारखी कामगिरी संघाने केली.

प्रश्न : मराठी वाचकाची क्रिकेटची जाणून घेण्याची भूक मिटवण्याचा प्रयत्न ‘Cricket मराठी’ करत आहे. या साईटबद्दलचा तुमचा अभिप्राय जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.

चेतन : या साईटमूळे मलादेखील काही माहीत नसलेल्या क्रिकेट मधील घटना व खेळाडू नव्याने कळले. क्रिकेट मधील वेगवेगळ्या विषयांवर आपला अभ्यास दांडगा आहे. मराठी रसिकांची क्रिकेट जाणून घेण्याची भूक चांगल्या प्रकारे आपण भागवत आहात.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: