फोटो – ट्विटर/ICC

संपूर्ण देश सध्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना पाठिंबा देत आहे. त्याचवेळी टीम इंडिया इंग्लंडविरुद्धची पाच टेस्ट मॅचची सीरिज खेळण्यासाठी उतरणार आहे. भारताने यापूर्वी 2007 साली इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली आहे. त्यानंतरच्या तीन दौऱ्यात टीमला मोठे पराभव सहन करावे लागले. विराट कोहलीला (Virat Kohli) बॅट्समन आणि कॅप्टन म्हणून हा दौरा खूप महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियतील विजयानंतर इंग्लंडमध्येही सीरिज जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विराटसह सर्व टीमला या मोठा घाम गाळावा लागेल. त्याचबरोबर टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या भवितव्यासाठी देखील ही सीरिज महत्त्वाची आहे.

‘टीम इंडियाला इंग्लंड विरुद्धची सीरिज जिंकायची असेल तर भारतीय बॅट्समन्सना मोठी कामगिरी कारावी लागेल,’ असं मत क्रिकेट फॅन, लेखक आणि उपप्राचार्य विद्याधर जोशी यांनी व्यक्त केलं आहे. जोशी सरांना गेली पाच दशकं इंग्लंडमधील सीरिज जवळून पाहण्याचा अनुभव आहे. रोहित शर्मासोबत ओपनिंगला कोण यावं? चेतेश्वर पुजाराचं भवितव्य काय? या सीरिजसाठी क्रिकेट पिच कसे असेल? कोणत्या तीन फास्ट बॉलर्सना या टेस्टमध्ये पहिले प्राधान्य हवे? या सर्व विषयांवर त्यांनी ‘Cricket मराठी’ मनमोकळा संवाद साधला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजच्या निमित्तानं विद्याधर जोशी (Vidadhar Joshi) यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा सारांश

प्रश्न : सर्वप्रथम ‘Cricket मराठी’ ला तयार झालात त्याबद्दल आभार. सर, तुम्ही भारतीय क्रिकेटचा मोठा काळ अनुभवला आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्याबद्दलची तुमची पहिली ठळक आठवण काय आहे?

विद्याधर : भारतीय संघाचा 1970-71 च्या ऐतिहासिक दौऱ्याच्या निकालाव्यतिरिक्त आठवणी नाहीत कारण तेव्हा मी लहान होतो. अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडच्या भूमीवर प्रथमच विजय मिळवला होता. त्यानंतर वाडेकरच्याच नेतृत्वाखाली १९७४ चा दौरा ही माझी पहिली ठळक आठवण. मात्र ही आठवण विसरावी अशी. इंग्लंडमधील क्रिकेट मोसमाच्या पूर्वार्धात आपण तिकडे गेलो होतो आणि तीन कसोटींच्या मालिकेत सपाटून मार खाल्ला. सर्वबाद 42 हा अनेक वर्षे टिकलेला नीचांक त्याच दौऱ्यातला, तसेच सलामीचा फलंदाज सुधीर नाईक याच्यावर एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मोजे चोरल्याचा झालेला आरोपही.

प्रश्न: अजित वाडेकरांच्या टीमनं सीरिज जिंकल्यापासून ते अगदी मागील दौऱ्यात विराट कोहलीनं अँडरसनचा निर्धारानं सामना करण्यापर्यत भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील अनेक अविस्मरणीय आठवणी आहेत. या सर्वांमधील तुमची आवडती आठवण आम्हाला सांगाल का?

विद्याधर : 1983 मधील विश्वचषक विजय ही आठवण आहेच. पण मी कसोटी क्रिकेटचा खूप जास्त चाहता असल्याने माझ्या दोन अविस्मरणीय आठवणी आहेत.

पहिली 1979 च्या दौऱ्यात ओव्हल टेस्टमध्ये शेवटच्या म्हणजे चौथ्या डावात विजयासाठी 400 हून अधिक धावांचं आव्हान मिळालं असताना सामना अनिर्णित राखण्यासाठी प्रयत्न करणं एवढं एकच हातात होतं. पण सुनील गावसकरांच्या 221 धावांनी भारताला विजयाच्या उंबरठ्यावर  आणून ठेवलं होतं. तो सामना अखेर अनिर्णित राहिला. सुनील गावसकरांचा तो डाव कसोटी क्रिकेटमधल्या सर्वोत्तम खेळींपैकी एक होता.

‘सुनील गावसकरने नेहमी स्वत:ची आवड नाही तर टीमचे हित जपले’

दुसरी आठवण कपिलदेवच्या नेतृत्वाखाली 1986 चा दौरा. 1970-71 नंतर प्रथमच भारताने इंग्लंडच्या भूमीवर 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा विजय मिळवला. पहिल्या दोन्ही विजयी सामन्यांत दिलीप वेंगसरकरने शतकं ठोकली. त्याला कौतुकाने Lord of Lords ही म्हटलं गेलं. त्यानंतरही भारताने इंग्लंडमध्ये विजय मिळवले. पण हा विजय अनपेक्षित पण निर्विवाद म्हणून खास.

प्रश्न : शुभमन गिल जखमी झाल्यानं भारताला ओपनिंग कॉम्बिनेशन बदलावं लागणार आहे. इंग्लंडमधील वातावरण, पिच आणि इंग्लिश बॉलर्स यांचा विचार करता गिलच्या जागी कुणाला खेळवावं असं वाटतं?

 विद्याधर : कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माला जबरदस्तीने सलामीचा फलंदाज बनवणं मला मान्य नव्हतं. इंग्लंडमध्ये तर ते अजून आव्हानात्मक. पण व्यवस्थापनाचा विचार वेगळा असावा त्यामुळे तो असेलच. आता गिल नसताना, मयांक अगरवालही जखमी असताना आणि पृथ्वी शॉ पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसताना मला के.एल्.राहुलशिवाय पर्याय दिसत नाही. राहुलला सलामीचा फलंदाज म्हणून खेळवून दोघेही जबरदस्तीने बनवलेले सलामीचे फलंदाज इंग्लंडमध्ये परवडणार नाहीत असं मला वाटत होतं. पण अभिमन्यू ईश्वरन हा नवा खेळाडू किंवा हनुमा विहारी याला सलामीचा फारसा अनुभव नसताना निदान ज्या काही कसोटी राहुल खेळला आहे त्यात बहुतेक वेळा सलामीला खेळला असल्याने निदान पहिल्या कसोटीत मोठा धोका पत्करू नये असं वाटतं.

प्रश्न: रोहित शर्माची परदेशात टेस्टमध्ये एकही सेंच्युरी नाही. या सीरिजमध्ये रोहितच्या खेळाकडं तुम्ही कसं पाहता?

विद्याधर :रोहित शर्माकडे नैसर्गिक गुणवत्ता प्रचंड आहे. कदाचित या भारतीय संघातील सर्वोत्तम. पण त्याचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील रेकॉर्ड अधिक चांगला आहे. कसोटीत स्विंगपुढे तो थोडा गडबडतो असं मला वाटतं. पण मोठ्या खेळाडूंकडे परिस्थितीशी जुळवून घ्यायची कला असते. तो आता भारताच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे याची जाणीव त्यालाही असणार. त्यामुळे तो मेहनत घेईल असं वाटतं. शिवाय आपला दौरा मोसमाच्या उत्तरार्धात असल्याने स्विंग फॅक्टर कमी त्रासदायक असेल. एकूण रोहित यशस्वी होईल असं मानायला जागा आहे

प्रश्न : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलमधील पराभवानंतर विराटनं ‘बॅट्समननं रन काढले पाहिजेत’ असं सांगत चेतेश्वर पुजाराला मोठा इशारा दिलाय असं मानलं जातंय. त्याचा फॉर्म देखील फारसा बरा नाही, या मालिकेत पुजाराला ड्रॉप केलं जाईल असं वाटतं का? तसं झालं तर पुजाराच्या जागेवर कोण खेळेल?

विद्याधर : चेतेश्वर पुजाराशी व्यवस्थापनाने स्पष्ट शब्दांत बोलणं गरजेचं आहे. सामन्यात बचावाबरोबर धावाही गरजेच्या असतात. शिवाय वाईट चेंडूनाही आदर दाखवल्यास गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास वाढतो. परंतु या सर्व गोष्टी लक्षात घेऊनही पुजाराला या दौऱ्यात वगळतील असं मला वाटत नाही आणि ते योग्यही असेल. त्याला वगळायची वेळ आल्यास माझी पसंती रहाणेला तिसऱ्या क्रमांकावर पाठवून राहुलला संघात घेणं ही असेल.

प्रश्न : विराट कोहलीच्या सेंच्युरीची प्रतीक्षा बरीच लांबली आहे. एक बॅट्समन म्हणून आणि कॅप्टन म्हणून त्याच्यासाठी ही सीरिज किती महत्त्वाची आहे?

विद्याधर : विराट कोहलीसाठी फलंदाज म्हणून हा दौरा खूप महत्त्वाचा आहे. गेला काही काळ त्याने त्याच्या दर्जाला साजेसा खेळ केलेला नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर तो वारंवार गडबडतोय. कसोटीतील सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक अशी गणना होण्यासाठी या दौऱ्यावर त्याचं फलंदाज म्हणून यशस्वी होणं गरजेचं आहे. ही जाणीव त्याला नक्की असेल. तो खूप मोठा खेळाडू आहे त्यामुळे याकडे लक्ष देईल असा विश्वास आहे.

कर्णधार विराट मात्र मला कधीच फारसा भावला नाही. तो कल्पक कर्णधार आहे असं मला प्रामाणिकपणे वाटत नाही. मात्र स्वतःच्या खेळाने इतरांपुढे आदर्श ठेवणं आणि संघ सहकाऱ्यांना भक्कम पाठिंबा देणं या गोष्टींमुळे संघ सदस्य त्याच्यापाठी भक्कमपणे उभे राहतात. निव्वळ कसोटीचा विचार केला तर कर्णधार म्हणून माझ्यासाठी सौरव गांगुली नेहमीच सर्वोत्तम राहिला आहे.

IND vs ENG: कुणाची आकडेवारी आहे सरस, विराट कोहली की जो रुट?

प्रश्न : इंग्लंडचा काही महिन्यांपूर्वीच भारतामध्ये मोठा पराभव झालाय. भारतामधील स्पिन पिचचा बदला घेण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्ड फास्ट पिच तयार करेल असं मानलं जातं आहे.  पण, भारताकडेही चांगले फास्ट बॉलर्स आहेत हे इंग्लंडसाठी किती रिस्की आहे?

विद्याधर : इंग्लंडचा संघ मुद्दाम फास्ट पिचेस तयार करेल असं मला वाटत नाही. पण तिथल्या वातावरणात जलद गोलंदाजांना एक नैसर्गिक फायदा असतोच. मुद्दाम अशी पिचेस तयार करणं त्यांच्यावरही उलटू शकतं. फक्त काही वेळा भारतीय गोलंदाज इंग्लंडमधील त्यांना पोषक वातावरण बघून भरकटतात आणि दिशा, टप्पा चुकवतात. ही गोष्ट सांभाळली तर भारतीय गोलंदाजांना खेळणं इंग्लंडलाही कठीण जाईल.

प्रश्न : टीम इंडियानं कोणते तीन किंवा चार फास्ट बॉलर्स अंतिम 11 मध्ये खेळवावे आणि का?

विद्याधर : तीनच जलदगती गोलंदाज खेळवायचे असतील तर माझी पसंती बुमराह, शमी आणि सिराज ही असेल. परिस्थितीनुसार चौथा गोलंदाज खेळवायचा झाल्यास इशांत शर्मा किंवा उमेश यादव ठीक राहील. उमेश यादव कसोटीत इतर फॉरमॅटपेक्षा चांगला गोलंदाज आहे.

प्रश्न : इंग्लंडच्या टीममध्ये जेम्स अँडरसन हा त्यांचा सर्वात यशस्वी बॉलर आहे तो कदाचित या सीरिजमध्ये भारताविरुद्ध शेवटचं खेळताना दिसेल. त्याच्या आजवरच्या कामगिरीबद्दल काय सांगाल?

विद्याधर : जेम्स अँडरसन हा सर्वकालीन महान गोलंदाजांपैकी एक आहे. माझा अतिशय लाडका खेळाडू आहे. त्याच्या गोलंदाजीच्या ऍक्शनचा मी खूप मोठा चाहता आहे. तो आक्रमकता तोंडापेक्षा गोलंदाजीतून दाखवतो आणि ही गोष्टही मला भावते. कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावरही तो भारतासाठी धोकादायक आहे. त्याची आजवरची कामगिरी त्याच्या महानतेची साक्ष देते.

प्रश्न : या सीरिजमध्ये दोन्ही टीमची बॉलिंग समान आहे, त्यामुळे जो बॅटींग चांगली करेल तो जिंकेल असं अनेकांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही इंग्लंडच्या बॅट्समनबद्दल काय सांगाल?

विद्याधर : इंग्लंडच्या फलंदाजांना तिथल्या वातावरणात खेळण्याचा सराव आहे आणि हा एक फायदा त्यांना नक्की मिळेल. शिवाय त्यांचे सर्व खेळाडू काऊंटी क्रिकेट नियमित खेळत असल्याने टेस्ट फॉरमॅटला सरावलेले असतात. या उलट भारतीय संघातील फलंदाज हल्ली मर्यादित षटकांचे सामने अधिक खेळतात, भारतीय संघात प्रवेश झाल्यावर रणजी खेळतच नाहीत कारण वेळच नसतो. या फॉरमॅटसाठीच्या सरावाचा अभाव ही एक चिंतेची बाब नक्की आहे. गेले महिनाभर तिथे असूनही फक्त एक सराव सामना ही कल्पना ज्या कुणाची आहे ती वाईट आहे. तो सामना खेळणं विराटने टाळलं हे देखील मला पसंत नाही.

WTC Final नंतर टीम इंडिया सुट्टीवर, माजी कॅप्टन नाराज,’वेळापत्रक कसं तयार झालं?,’ विचारला प्रश्न

प्रश्न : या सीरिजमध्ये दोन्ही टीमच्या कोणत्या खेळाडूंच्या कामगिरीकडं तुमचं विशेष लक्ष असेल?

विद्याधर : भारतीय संघांपैकी रोहित, विराट, पंत, बुमराह, शमी आणि सिराज यांच्यावर माझं विशेष लक्ष असेल. इंग्लंडच्या संघांपैकी रूट, अँडरसन, सॅम करन आणि मार्क वूडवर माझं विशेष लक्ष असेल.

प्रश्न : पाच टेस्टच्या या सीरिजचा निकाल काय लागेल, याबाबत तुमचा अंदाज काय आहे?

विद्याधर : माझ्या मते ही मालिका इंग्लंडचा संघ जिंकेल. माझं मत खोटं ठरलं तर मला अतिशय आनंद होईल. पण असं होण्यासाठी भारतीय फलंदाजांना मोठी कामगिरी करावी लागेल.

प्रश्न : मराठी वाचकाची क्रिकेटबद्दल जाणून घेण्याची भूक मिटवण्याचा प्रयत्न ‘Cricket मराठी’ करत आहे. या साईटबद्दलचा तुमचा अभिप्राय जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.

विद्याधर : मराठीतून क्रिकेटवर लेखन आवश्यक आहे. क्रिकेट भारतीयांचा श्वास आहे. तुम्ही गेला काही काळ यासाठी जे काम करत आहात ते मौल्यवान आहे. तुमचा हा प्रयत्न अभिनंदनास पात्र आहे. आगामी वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा.

( विद्याधर जोशी हे सनदी लेखापाल आणि मुंबईतील प्रतिथयश महाविद्यालयात उपप्राचार्य आहेत. क्रिकेट आणि संगीताचे फॅन तसंच अभ्यासक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. तुम्ही त्यांच्याशी vidyadhar {dot} joshi1964 {at} gmail {dot} com या ईमेलवर संपर्क साधू शकता . )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: