फोटो – सोशल मीडिया

क्रिकेटच्या वार्षिक कॅलेंडरमधील महत्त्वाची घटना असलेले आयपीएल ऑक्शन या महिन्यात पार पडले. आगामी आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) 2 नव्या टीम खेळणार आहेत. तसंच यंदा मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होते. त्यामुळे या ऑक्शनची क्रिकेट फॅन्समध्ये मोठी उत्सुकता होती. या मेगा ऑक्शननंतर 10 टीमची नव्यानं रचना झाली आहे. त्यामुळे अनेक समीकरणं तयार झाली असून एक वेगळ्या प्रकारचे क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल.

आयपीएल स्पर्धेच्या मेगा ऑक्शनबाबत अगदी पहिल्या ऑक्शनपासून (IPL 2008 Mega Auction) या सर्व प्रक्रियेचा सखोल अभ्यास करणारे क्रिकेट फॅन आणि लेखक आदित्य जोशी (Aditya Joshi) यांनी ‘Cricket मराठी’ शी केलेल्या चर्चेचा हा सारांश

प्रश्न : आदित्य, सर्वप्रथम ‘Cricket मराठी’ ला मुलाखत देण्यासाठी तयार झाल्याबद्दल धन्यवाद. चार वर्षांनी यंदा आयपीएलचे मेगा ऑक्शन झाले. या चार वर्षांमध्ये जग बदललं तसं क्रिकेटही बदललंय. IPL मध्ये आता 8 ऐवजी 10 टीम झाल्या आहेत. आजवरची सर्व आयपीएल ऑक्शन्स आणि यंदाचे मेगा ऑक्शन यामध्ये तुम्हाला कोणता फरक जाणवला?

आदित्य : 10 टीम झाल्यामुळे ऑक्शनमध्ये बरीच चढाओढ बघायला मिळाली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही टीमकडे RTM (एक किंवा दोन खेळाडू आपल्या टीममध्ये सर्वाधिक  बोली संपल्यावर कार्ड वापरून परत आणता येतात) चा पर्याय नव्हता. कोणत्याही खेळाडूसाठी बोली लावण्ययाशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळेच यावेळी बहुतांश टीम एखादा अपवाद वगळता समतोल वाटत आहेत. 10 टीम झाल्यानं अधिक युवा खेळाडूंना संधी मिळाली. जेव्हा ऑक्शन छोटं म्हणजे प्रत्येक टीमला 2-3 खेळाडूच हवे असतात तेव्हा काही जणांवर अव्वाच्या सव्वा बोली लागते. पण यावेळी पूर्ण टीम करायची असल्यामुळे काही अपवाद वगळले तर खूप अनाकलनीय बोली लागल्या नाहीत.

प्रश्न : सर्वप्रथम आपण मुंबई इंडियन्सबद्दल बोलू. त्यांच्या ऑक्शनमधील डावपेचांवर बरीच चर्चा सुरू आहे. इशान किशन आणि जोफ्रा आर्चरसाठी त्यांनी बराच पैसा राखून ठेवला. त्याचा परिणाम टीम संतुलनावर झाला असं वाटतं का? मुंबई इंडियन्सनं निवडलेल्या टीमबद्दल तुमचं काय मत आहे?

आदित्य : मुंबई इंडियन्सने पूर्ण विचार करून मगच बोल्ट, डी कॉक यांच्यावर बोली लावली नाही. त्यांनी पुढच्या पाच-सात वर्षांचा विचार करून इशान किशनसाठी (Ishan Kishan) थांबण्याचं पूर्ण ठरवलं होतं. कदाचित 2023 च्या हंगामामध्ये त्याला उपकर्णधारही करतील. इशान किशानला घेतल्यानंतरही मुंबईने जोफ्रा आर्चर येईपर्यंत कोणावरही बोली लावली नाही. त्या बोलीपर्यंत मुंबई पैसे का खर्च करत नाही हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण ऑक्शनचा नंतर विचार केला तर असं लक्षात येतं की आर्चरला पुढच्या वर्षी टीममध्ये घ्यायचं असेल कमीत कमी 15 कोटी मोजावे लागतील. तो जेव्हा आयपीएल खेळला आहे तेव्हा सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे, त्यामुळे मुंबईने त्याच्यासाठी एक मोसम थांबायची तयारी ठेवली.

मुंबईचे टॅलेंट स्काऊट वर्षभर जगभर खेळाडू शोधत हिंडत असतात. मयांक मर्कंडेय हा मुंबईनेच शोधलेला होता. त्याला परत आणलयं. तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेविस या युवा पण आश्वासक मुलांना घेतलंय. त्यांच्यावर मुंबई नक्कीच चांगलं काम करेल. एखादा भारतीय फलंदाज अजून असता तर त्यांना नक्कीच आवडलं असतं. पण ती कमतरता ते 2023 सालच्या आधी ट्रान्सफरमध्ये भरून काढू शकतात.

बोल्ट आणि डी कॉकला मुंबईने दिल्ली आणि आरसीबीकडून आणलं होतं. पण ब्रेविस, तिलक वर्मा या युवा खेळाडूंना संधी नक्की मिळणार असल्याने यावेळी ‘नवी मुंबई’ बघायला मिळेल. टीम डेव्हिडवर मुंबईने मोठी बोली लावली. मुळचा सिंगापूरचा पण आता ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक असलेल्या डेव्हिडने आयपीएलमध्ये छाप पाडली तर वर्ल्ड कपसाठी त्याचा विचार होऊ शकतो.

प्रश्न : महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडंही सर्वांचं लक्ष असतं. यंदा रैनाशिवाय सीएसके पहिल्यांदाच आपण पाहणार आहोत त्याबद्दल काय प्रतिक्रिया आणि अनुभवी खेळाडू आणि अगदी नवोदीत खेळाडू यांना एकत्र करणाऱ्या सीएसके टीमबद्दल काय सांगाल?

आदित्य : चेन्नई आणि धोनी हे समीकरण 2008 पासून आजही कायम आहे. त्याचा शब्द अंतिम असतो. रैनाला न घेण्याची कारणं ही नक्कीच मैदानाबाहेरची आहेत, कारण चेन्नईने ज्याला आपलं म्हटलं त्यांना कधीच बाजूला केलेलं नाही. ऋतुराज गायकवाडला धोनीच्या नंतरचा कर्णधार करतील अशी शक्यता आहे. ज्या नवोदित खेळाडूंना चेन्नईने घेतलं आहे त्यामध्ये हंगरगेकर आणि मुकेश चौधरी महाराष्ट्राचे आहेत, आणि तुषार देशपांडे, प्रशांत सोलंकी हे मुंबईचे. यापैकी काही निवडींमध्ये ऋतुराजचा वाटा असण्याची शक्यता आहे.

रायडू, उथ्थप्पा, दीपक चहार, ब्राव्हो, सॅंटनर, जगदीशन यांना परत आणून त्यांनी अनुभवी खेळाडूंवर विश्वास कायम ठेवला आहे. पण या आयपीएलमध्ये धोनी निवृत्तीची घोषणा करेल असा अंदाज आहे. तेव्हा ती जबाबदारी कोणाकडे याची थोडी शक्यता ऋतुराजच्या नावाची दिसू लागली आहे. उथ्थप्पा, रायडू हे रणजीमध्येही फारसे सक्रिय नाहीत, अशा वेळी आयपीएलमध्ये ते कसे जुळवून घेतता ते बघावं लागेल. त्याच्या टीममधील थोडा कच्चा दुवा हा मधल्या फळीची फलंदाजी हा वाटतो आहे.  

CSK Squad Analysis: कशी आहे IPL 2022 ची चेन्नई सुपर किंग्स? कुठे सरस, कुठे फेल?

प्रश्न : आरसीबीनं विराट कोहलीच्या जागी कॅप्टन म्हणून कुणाची निवड करावी आणि का? या मेगा ऑक्शनमधील टीम आरसीबीचं विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण करू शकेल असं वाटतं का?

आदित्य : आरसीबी मॅक्सवेलला कॅप्टन करेल हे जवळपास नक्की आहे. त्याने बिग बॅशमध्ये आणि ऑस्ट्रेलियासाठी सुद्धा कॅप्टनसी केली आहे. कॅप्टनसीचा विचार करूनच मॅक्सवेलला रिटेन केलं होतं. मेगा ऑक्शनमधून त्यांनी हसरंगा ला १०.७५ कोटी देऊन परत खरेदी केलं. जर एवढी पैसे त्याच्यासठी  द्यायची तयारी होती, तर त्याला ऑक्शनमध्ये जाऊनच द्यायचं नव्हतं. गेल्या वर्षी त्यांनी हसरंगाला एखाद दुस-या खराब मॅचनंतर पूर्ण संधीही दिली नाही. हर्षल पटेल पण त्यांच्यांकडेच होता. पण त्यालाही ऑक्शनमध्ये पाठवून त्यांनी गेल्या वेळेपेक्षा अधिक रक्कम दिली.

फाफ डु प्लेसिसला त्यांनी चेन्नईकडून पळवून आणला आहे. फाफला चेन्नईमध्ये हवं तसं खेळायची पूर्ण मुभा होती. तिथे त्याने जीव तोडून मॅचेस खेळवून आणि जिंकून दिल्या आहेत. आरसीबीमध्ये त्याला तसं वातावरण मिळायला हवं. कोहलीला पुन्हा लय सापडणं तितकंच आवश्यक आहे. कागदावर आरसीबीची टीम शेवटच्या चारमध्ये येण्याएवढी नक्कीच चांगली वाटते. पण आयपीएल जिंकायला त्यांना मोक्याच्या क्षणी चांगलं खेळावं लागेल. ते थोडं अवघडच आहे.

प्रश्न : सनरायझर्स हैदराबादनं यंदाही अनेक देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंवर भर दिला आहे. वॉर्नर, राशिद खान सारख्या विदेशी सुपरस्टारची जागा घेणारा कोणता क्रिकेटपटूही त्यांच्याकडे दिसत नाही. मागच्या अनुभवातून हैदराबाद मॅनेजमेंटनं कोणता धडा घेतला आहे की नाही?

आदित्य : हैद्राबादने ऑक्शनमधून फार काही साध्य केलेलं नाही. राशिद खानला पर्याय शोधणं शक्य नसताना त्यांनी त्याला गुजरातला जाऊ दिलं. निकोलस पूरानला बेअरस्टोच्याजागी 10 कोटीपेक्षा जास्त किंमत देऊन घेतलं. 5-6 भारतीय वेगवान गोलंदाज घेतले, पण स्पिनर चांगला कोणीही घेतला नाही. विलियम्सनचा फिटनेसही पूर्ण नाही.

अभिषेक शर्मा हा मुळचा पंजाबचा सलामीचा फलंदाज टॅलेंटेड आहे. गेल्या आयपीएलला सुद्धा तो हैद्राबादकडेच होता. त्याला नीट संधी दिली नाही आणि यावेळी परत टीममध्ये 6 कोटी मोजून आणला आहे. त्यांनी बोली लावून घेतलेला परदेशी खेळाडूदेखील एकहाती मॅच जिंकून देतील असे नाहीत. त्यामुळे हैद्राबाद यावर्षी देखील खूप काही करू शकेल असं वाटत नाही.

प्रश्न : हैदराबादच्या टीमचं स्वरूप बदललेलं नाही. कोलकातानं बराच बदल केला आहे. त्यांनी श्रेयस अय्यरला घेतलंय. मागील चार वर्षांमध्ये त्यांचे संतुलन बिघडले होते ते यंदा त्यांनी साधलंय का?

आदित्य : केकेआरने आधीची दोनं आयपीएल गौतम गंभीर कॅप्टन असताना जिंकली होती. त्यामुळे त्यांनी यावेळी चांगल्या कॅप्टनची निवड आधीच केली होती. श्रेयस अय्यरने कोणत्याही नवीन टीमकडे न जाता ऑक्शनमध्ये जाणं पसंत केलं तेव्हाच हे नक्की झालं होतं की अय्यरसाठी फिल्डिंग केकेआरने आधीच लावलेली आहे. रसेल किती फिट आहे यावर केकेआर स्पर्धेत कुठपर्यंत जाणार हे ठरेल.

इंग्लंडला गेली काही वर्ष नको झालेला अ‍ॅलेक्स हेल्स आयपीएलमध्येही नव्हता. केकेआरने यावेळी त्याला घेतलं आहे. त्याला संधी मिळाली तर तो धमाका उडवू शकतो. अजिंक्य राहणेला पण स्वतःला सिद्ध करायचंय आणि शुभमन गिल गुजरातकडे गेल्याने सलामीला संधी देखील आहे. विकेटकिपरची थोडी गडबड झाल्यासारखी वाटते. सॅम बिलिंग्सला खेळवायचं ठरवलं तर त्यांना हेल्स, साऊदी, नाबी कोणलाच खेळवता येणार नाही. शेल्डन जॅक्सनवर त्यांनी विश्वास दाखवून त्याला संधी दिली तर उत्तम होईल. रमेश कुमार या अजून एका स्पिनरला त्यांनी घेतलं आहे. त्याला यावेळी संधी मिळायची शक्यता कमी आहे. यावेळी केकेआरची टीम नक्कीच चांगली आहे. मुख्य म्हणजे निर्णय घेऊ शकणारा आणि त्यावर ठाम असणारा कॅप्टन त्यांच्याकडे आहे.

IPL 2022 Mega Auction: KKR ने निवडलेला टेनिस बॉल सुपरस्टार रमेश कुमार कोण आहे?

प्रश्न : लखनौ सुपर जायंट्स ही टीम यंदा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहे. स्वाभाविकच ही टीम पहिल्यांदाच ऑक्शनमध्ये सहभागी झाली होती. पण तो नवखेपणा ऑक्शनमध्ये दिसला नाही, याचे श्रेय तुम्ही कुणाला द्याल? लखनौची टीम विजेतेपदाची ‘गंभीर’ दावेदार आहे का?

आदित्य : ऑक्शनमध्ये नवखे असून गंभीर आणि कंपनीने टीम खरंच चांगली बांधली आहे. उत्तर प्रदेशच्या खेळाडूंना घेऊन लोकल कनेक्टही जाणीवपूर्वक ठेवला आहे. केएल राहूल आता कॅप्टनसी कशी करतो यावर टीम काय करते हे अवलंबून आहे. कृणाल पांड्या आणि दीपक हुडा या दोन ‘खास दोस्तां’ना लखनौने एकत्र आणलं आहे. त्याशिवाय राहूलला दुखापत झाली तर जेसन होल्डर कॅप्टनसीला पर्याय म्हणूनही त्यांच्याकडे आहे.

फास्ट बॉलिंगमध्ये आवेश खानवर मोठी जबाबदारी आहे. त्याला दुखापत झाली तर त्यांच्याकडे सक्षम पर्याय फारसे दिसत नाहीत. रवी बिश्नोईला लखनौने केवळ 4 कोटीमध्ये ऑक्शनआधीच घेतलं होतं. तो हुकमी एक्का आहे. गोलंदाजीची घडी ते कसे बसवतात यावर त्यांची कामगिरी अवलंबून आहे. राहुलला पंजाबमध्ये तरी ते जमलं नव्हतं. इथे परिस्थीती फारशी वेगळी नाही. सीझन चांगला जाईल पण सेमी फायनलला जाऊ शकतील असं वाटत नाही.

प्रश्न : गुजरात टायटन्स या दुसऱ्या नव्या टीमबद्दल आपल्याला लखनौसारखं म्हणता येणार नाही. या टीमची ऑक्शनमधील रणनिती काही समजली नाही. या टीममध्ये काय कमतरता आहेत?

आदित्य : हार्दिक पांड्या कॅप्टन म्हणून अजूनही फिट वाटत नाही, ना नेहरा टेबलवरचा म्होरक्या म्हणून. ऑक्शनच्या शेवटच्या दहा मिनीटांपूर्वीपर्यंत त्यांच्याकडे एकही विकेटकीपर नव्हता. टीम पूर्णपणे संतुलित वाटत नाही. ना त्यांच्याकडे डावाला आकार देणारे फलंदाज आहेत ना राशिद खान सोडला तर अजून हुकमी गोलंदाज आहेत.

राशिद खान असताना राहुल तेवातियाच्या फक्त बॅटिंगसाठी त्यांनी 9 कोटी मोजले. जेसन रॉय मात्र त्यांना आश्चर्यकाररित्या मुळ किमतीला मिळाला. त्यांच्या टीमकडे बघितलं तर ते एखादी मॅच 125 धावांनी जिंकू शकतात आणि त्याच्यानंतरच्या तेवढ्याच फरकाने हरू शकतात. हार्दिक पांड्या कॅप्टन म्हणून टीमला कसं सांभाळतो की गुजरातला पुढच्या सीझनला नवा कॅप्टन लागतो ते लवकरच कळेल.

Gujrat Titans Squad Analysis: कशी आहे IPL 2022 मधील गुजरातची टीम? नव्याची नवलाई की गोंधळाचा गरबा?  

प्रश्न : विदेशातील काही मोठ्या खेळाडूंच्या मागे धावणारी टीम अशी राजस्थान रॉयल्सची ओळख होती. ती ओळख यंदा बदललीय. राजस्थान रॉयल्सची टीम अधिक संतुलित झालीय का?

आदित्य : यावेळी राजस्थानने चिकार मेहनत आणि अभ्यास केलेला दिसत होता. त्यांना कोणता खेळडू हवा किंवा कोणता नको याबद्द्ल अनिश्चितता नव्हती. बटलर, सॅसमन, जयस्वाल या मंडळींबरोबर पड्डीकल, हेटमायर, क्रिश्ना, चहल, अश्विन, बोल्ट अशी समतोल टीम आहे. कुमार संगकारा हा राजस्थानच्या टीमचा प्रमुख आहे. गेल्यावर्षी त्याला तयारीला अगदीच कमी वेळ मिळाला होता. पण या ऑक्शनमध्ये त्यांनी आधीच्या ब-याच चुका सुधारायचा प्रयत्न केलेला दिसतो.

ट्रेंट बोल्ट, चहाल, प्रसिध क्रिश्ना आणि अश्विन असा समतोल मारा त्यांच्याकडे आहे. बॅटिंगलमध्ये बटलर, पड्डिकल, जयस्वाल, हेटमायेर आणि रियान पराग आहेत. संजू सॅमसन एक-दोन धमाकेदार खेळींपेक्षा सातत्याने धावा करू शकला तर राजस्थान नक्कीच दावेदार राहतील.  

प्रश्न : पंजाब किंग्जसाठी त्यांच्या परंपरेपेक्षा हे चांगले  ऑक्शन ठरले. पंजाबची नवी टीम चांगली कामगिरी करेल का?

आदित्य : पंजाबकडे ऑक्शनमध्ये सगळ्यात जास्त रक्कम होती. त्यामुळे लिविंगस्टोन, शहारूख खान,शिखर धवन, रबाडा, ओडियन स्मिथ अशा चांगल्या खेळाडूंना घेता आलं. पण त्यांचा कॅप्टन अजून नक्की नाही. गेल्यावर्षी पण त्यांच्याकडे चांगले खेळाडू होतेच. पण टीम म्हणून नव्याने घेतलेले सगळे काय करतात यावर त्यांचं कामगिरी सुधारणं अवलंबून आहे. अनिल कुंबळेला पंजाबकडून चांगली कामगिरी करून घ्यायची शेवटची संधी असेल.

शिखर धवन किंवा मयांक अगरवाल या दोघांपैकी एकावर कॅप्टनसीची जबाबदारी असेल. लिविंगस्टोनला भारतातील खेळपट्यांवर अजून फारसं यश मिळालेलं नाही. त्याच्यावर 11 कोटीची बोली लावून पंजाबने मोठा विश्वास दाखवला आहे. त्याचा लेगस्पिनही उपयुक्त आहे. राहुल चहरचं पण टीम इंडियामध्ये आत-बाहेर चालू आहे आणि आता त्याच्याकडे मुंबई इंडियन्ससारखी टीमही नाही. पंजाबसाठी त्याने विकेट्स घेतल्या तरच त्याला वर्ल्ड कपसाठी थोडी संधी आहे.

प्रश्न : दिल्ली कॅपिटल्स ही सर्वात संतुलित टीम आहे, असं अनेकांचं मत आहे. स्वाभाविकच ही टीम विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. या टीमची खासियत काय? तसंच विजेतेपद पटकावण्यासाठी त्यांना काय अडचणी येऊ शकतात?

आदित्य : दिल्लीसाठी सर्वोत्तम ऑक्शन असं सगळे म्हणत असले तरी रबाडा आणि आवेश खान हे दोन सगळ्यात महत्त्वाचे खेळाडू त्यांनी गमावले आहेत. रविचंद्रन अश्विनही राजस्थानकडे गेला आहे. सकारिया, मिस्तफिझुर रेहमान, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर त्यांची जागा कशी भरून काढतात यावर त्यांची गोलंदाजी अवलंबून आहे. अक्षर पटेल आणि नॉर्खिया त्यांनी रिटेन केले होते. पण गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत गोलंदाजी कमकुवत वाटते.

डेव्हिड वार्नर आणि मिचेल मार्श दिल्लीला खूपच कमी किमतीत मिळाले. पण मार्श आणि दुखापती बघितल्या तर तो दोन महिन्यात 15 मॅच खेळणं म्हणजे चमत्कार असेल. ते दोघं या मोसमात चांगले खेळले आणि गोलंदाजांची घडी नीट बसवता आली तर दिल्ली नक्कीच दावेदार आहेत. 

टीम इंडियाच्या Next Generation चा सुपरस्टार, भविष्यातील कॅप्टन

प्रश्न :  IPL 2022 साठी सर्व टीम आता कागदावर तयार आहेत. या टीम पाहून स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोणत्या 4 टीम ‘प्ले ऑफ’ मध्ये जातील असं वाटतं?

आदित्य : चेन्नई, राजस्थान, पंजाब आणि मुंबई.

प्रश्न : ‘Cricket मराठी’ या साईटबद्दल तुमचा अभिप्राय जाणून घ्यायला मला आवडेल?

आदित्य : खूपच माहितीपूर्ण साईट आहे. क्रिकेटबद्दलच्या सर्व अपडेट इथे अतिशय चांगल्या मिळतात. क्रिकेट जगतात काय चालू आहे याची पूर्ण माहिती साईटला गेलं की मिळते. ‘Cricket मराठी’ साईटच्या टीमला हार्दिक शुभेच्छा

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: