फोटो – ट्विटर/ICC

भारतीय क्रिकेटमधील पहिले सुपरस्टार, पहिले रेकॉर्ड मास्टर आणि पहिले देव असलेल्या सुनील गावसकर यांचा आज वाढदिवस (Sunil Gavaskar Birthday) आहे. भक्कम तंत्र आणि कमालीची एकाग्रता या दोन पायावर त्यांचे क्रिकेट उभे होते. त्याच पायावर त्यांनी जगातील सर्व धोकादायक बॉलर्सचा समर्थपणे सामना केला. त्यांचा दिवस-दिवस घाम काढला. फास्ट बॉलर्सच्या ‘त्या’ सोनेरी कालखंडामध्ये त्यांची बॅटींग म्हणजे धैर्य आणि सातत्य याचे प्रतीक होती.

भारतीय बॅट्समन परदेशात सातत्याने रन करु शकतात आणि टेस्ट मॅच जिंकून देऊ शकतात हे गावसकर यांनीच जगाला दाखवून दिले. चौथ्या इनिंगमधील अनेक ऐतिहासिक पाठलागमध्ये ते सर्वात पुढे होते. वेस्ट इंडिज विरुद्ध 406 पाठलाग करताना 102, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टाय टेस्टमध्ये 347 पैकी 90, इंग्लंड विरुद्ध ओव्हलमध्ये 429 पैकी 221 या प्रत्येक इनिंगमध्ये गावसकरांनी भारतीय टीमकडून सर्वाधिक योगदान दिले. मॅच वाचवण्यासाठी खेळणं हे त्यांच्या पाचवीला पुजले होते. त्यातही त्यांनी संधी मिळेल तेव्हा काही आक्रमक खेळी देखील खेळल्या. वेस्ट इंडिज विरुद्धचे 94 बॉलमधील सेंच्युरी किंवा न्यूझीलंड विरुद्ध वन-डे मध्ये झळकावलेली 85 बॉलमधील सेंच्युरी हे याची प्रमुख उदाहरणं.

“माझ्यावर जबादारी आहे हे मनात असणं आणि तसं वागणं यात यात अंतर असतं. गावसकरकडे फटके नव्हते? हुक मारता येत नव्हता? पण स्वतःची आवड आणि संघाची गरज यात तुम्ही कशाला प्राधान्य देताय यावर ते अवलंबून असतं. संयम , फटक्यांची निवड, जबाबदारी, बिनचूक तंत्र आणि प्रचंड स्टॅमिना या जीवावर हेल्मेट न घालता, कुठेही इजा न होता हा माणूस सगळ्या दिग्गज गोलंदाजांना अंगावर घेत ठाम उभा राहिला.” असं मत सुनील गावसकरांचे फॅन आणि लेखक जयंत विद्वांस (Jayant Vidwans) यांनी व्यक्त केलं आहे.

सुनील गावसकरांच्या वाढदिवसानिमित्त ‘Cricket मराठी’ नं जयंत विद्वांस यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा सारांश

 प्रश्न : सर, सर्वप्रथम ‘Cricket मराठी’ ला मुलाखत देण्यासाठी तयार झालात त्याबद्दल आभार. सुनील गावसकर यांनी पदार्पण करण्यापूर्वीची काही वर्ष म्हणजे 1971 च्या आधीची काही वर्ष भारतीय क्रिकेट कसं होतं, याचं तुम्ही आजच्या पिढीला समजावं म्हणून थोडक्यात वर्णन कराल का?

जयंत : गावसकरच्या आधीच्या क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर तो सगळा ऐकीव इतिहास आहे, मी काही ते पाहिलेलं नाही. तेंव्हा रेडिओवर क्रिकेट ऐकलं जायचं, टीव्ही दुर्मिळ होता. मी पाहिलेली एक टेस्ट सिरीज आठवतीये. एका बाजूनेच कॅमेरा होता. ‘ओन्ली विमल’ची जाहिरात लागायची प्रत्येक ओव्हरनंतर. तेंव्हा रिमोट नव्हते. पाच दिवस ती एकच जाहिरात पण तरीही सामने बघितले जायचे, फार काही कळायचं नाही पण तरीही मजा यायची. गावसकरच्या आधीचा काळ म्हणाल तर तेंव्हा आपण अविकसित होतो. एखाद्याची चमकदार कामगिरी असायची. मुळात सामने कमी होते. आपण सामना अनिर्णित ठेवला हेच मोठं कौतुकास्पद असायचं.

कपिलनंतर काळ बदलला, एकावेळी तीन जलदगती गोलंदाज वगैरेचं तर आपण स्वप्न पण बघू शकत नव्हतो. मंदगती गोलंदाज हीच आपली पुंजी. एकेक करून मार खायचे. बापू नाडकर्णी मशीन असल्यासारखं एकाच टप्प्यावर चेंडू टाकत रहायचे आणि निर्धाव षटके टाकायचे. प्रत्येकाकडे भरपूर वेळ होता. किती चेंडूत किती धावा काढल्या वगैरे आकडेवारी फारशी महत्वाची नव्हती. सोलकर, फारूख इंजिनिअर, सीके, पतौडी वगैरेंचे किस्से मोठया माणसांकडून कानावर पडायचे. मी क्रिकेट बघितलं ते चंद्रा, बेदी, प्रसन्ना, वेंकटच्या काळातलं. गावसकर, चेतन चौहान, विश्वनाथ, वेंगसरकर, मोहिंदर, यशपाल, किरमाणी हा संघ आम्हांला पाठ होता. त्यांच्या पूर्ण नावासकट.

गावसकरने क्रेझ आणली आपल्याकडे क्रिकेटची. वर्ल्डकप जिंकल्यावर कपिलने त्यावर कळस बांधला. आजचं या खेळाला आलेलं आर्थिक रूप पाहिलं की वाटतं ज्यांनी घाम गाळला त्यांना पैसे नाही मिळाले पण त्यांनी जे रुजवलं त्याची फळं आत्ताच्या पिढीला मिळतायेत. 

प्रश्न : कोणतीही आकडेवारी आणि रेकॉर्ड एका क्लिकच्या आधारावर पाहण्याची सोय असलेल्या आजच्या जगात सुनील गावसकरांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच दौऱ्यात वेस्ट इंडिजमध्ये 774 रन काढले होते. त्यावर विश्वास बसत नाही. त्या सीरिजबद्दल तुम्ही काय सांगाल?

जयंत : अर्थात मी त्यावेळेस अवघा तीन वर्षांचा होतो त्यामुळे ते मी पाहिलेलं नाही हा एक भाग आणि जे काही आता यू ट्यूब किंवा इतर प्रिंटेड माध्यमातून वाचलं आहे तेवढीच माहिती मला त्या दौऱ्याबद्दल आहे. जुना वेस्टइंडीज हा माझा सगळ्यात आवडता संघ आहे. एकतर ते लोक दिलदारपणे खेळायचे. चेंडू लागून डोकं फुटेल पण तुम्ही चांगलं खेळलात तर ते कौतुक पण करतील. गावसकरच्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं, भारतीय वंशाचा रोहन कन्हाय त्याला कसं प्रोत्साहन द्यायचा, चुकीचा फटका खेळल्यास तो ओरडायचा. आताच्या काळात हे शक्य आहे? लगेच फिक्सिंगचे आरोप सुरु होतील.

तेंव्हाच्या संघातली नाव वाचली तरी कळतं काय ग्रेट टीम होती ती. कन्हाय, सोबर्स, रॉय फ्रेड्रिक्स, लॉईड, होल्डर, चार्ली डेव्हिस तिकडे, आपल्याकडे वेंकट, प्रसन्ना, बेदी, सोलकर, सरदेसाई, विश्वनाथ, वाडेकर आणि गावसकर. एकाच दौऱ्यात ढिगाने शतकं काढणं काही खायचं काम नाही आणि समोरचे गोलंदाज एकाहून एक आग्यावेताळ. हेल्मेट नाही, पॅड्स, ग्लोव्हज फक्त, अशा लोकांसमोर 774 धावा (दुसऱ्या टेस्टला पदार्पण म्हणजे चारच टेस्ट) काढणं हा गंमतीचा भाग नाही. (65, 67, 116, 64, 1, 117, 124, 220) हे सातत्य दुर्मिळ आहे. तेंव्हा असे कितीसे सामने होत असतील, रणजीमधून थेट विंडीज गोलंदाज अंगावर घ्यायचे आणि एवढया धावा काढायच्या हे सोपं काम नाही. काय टेम्परामेंट असेल या माणसाचं, फिटनेस काय असेल. अविश्वसनीय आहे हे सगळं.  

प्रश्न : गावसकर क्रिकेट खेळत त्या काळात ‘तो आहे ना अजून…’ मग All is Well आहे किंवा All is Well होईल, असा विश्वास संपूर्ण देशात होता. तो निर्माण होण्यासाठी त्यांच्या सुरुवातीच्या काळातील कोणत्या इनिंग कारणीभूत ठरल्या?

जयंत : त्याच्यावर एक टीका कायम होते, सामने अनिर्णित ठेवण्याकडे त्याचा कल असायचा. ‘तो आहे ना अजून…’ हे त्याच्यावर लादलं गेलं असं माझं मत आहे. चेतन चौहान सोडला तर त्याला भरभक्कम सलामीचे सहफलंदाज असे किती मिळाले? समोरून कुणीतरी बाद होणार हे आपल्याकडे गृहीत होतं. विंडीजला अंगावर घेऊन त्याने त्यांना खांद्यापलीकडे टाकल्यामुळे तो कुणाविरुद्धही आता खेळू शकतो हे ठसलं.

जलदगती काय फक्त विंडीजकडे होते? थॉम्प्सन, लिली, पास्को, अल्डरमन, विलीस, बोथम, हॅडली, इम्रान, सर्फराज, सिकंदर बख्त एकाचढ एक दर्जेदार गोलंदाज होते. गावसकर मला कायम सात-आठ मुलींचा बाप वाटत आला आहे. सतत बिचारा काळजीत. समोरून कोण नाहीसं होईल हे सांगता यायचं नाही त्यामुळे त्या बिचाऱ्याला सतत ‘मी आहे’ मनाशी घोटत खेळावं लागलं असेल. माझ्या मते तरी विंडीजविरुद्ध त्याने जे काय वर्षाचं रेशन भरून ठेवलं त्यामुळेच लोकांना वाटत राहिलं, ‘तो आहे अजून’.  

प्रश्न : गावसकर यांच्या बॅटींगच्या तंत्रामध्ये, त्यांच्या वृत्तीमध्ये अशी काय जादू होती की त्यामुळे ते अँडी रॉबर्ट्स, होल्डिंग, मार्शल, इम्रान खान, लिली, थॉमसन या जगातल्या सर्व खतरनाक फास्ट बॉलर्सवर भारी पडले?

जयंत : आता तो ज्यावेळेस कॉमेंट्री करत असतो त्यावेळेस सांगतो अधूनमधून पुढचा चेंडू कुठला असू शकेल ते. बऱ्याच वेळा त्याचं बरोबर असतं. संयम ही त्याची सगळ्यात मोठी जमेची बाजू. जबाबदारी आहे माझ्यावर हे मनात असणं आणि तसं वागणं यात अंतर असतं. गावसकरकडे फटके नव्हते? हुक मारता येत नव्हता? पण स्वतःची आवड आणि संघाची गरज यात तुम्ही कशाला प्राधान्य देताय यावर ते अवलंबून असतं.

श्रीकांत धाडसी हे म्हणायला, कौतुकाला सोपं पण चारपाच चौकार मारून आऊट व्हायचं यापेक्षा संघ सुस्थितीत न्यायची जबाबदारी कुणाची? सेहवागचं हॅन्ड आय कोऑर्डिनेशन जबरदस्त होतं त्यामुळे तो ओपनिंगला आल्यावर त्याचा फायदा खूप झाला त्याला. गावसकरकडे पेशन्स होते, मुळात सलामीचा फलंदाज ही वेगळीच जातकुळी आहे. लक्ष्मण आलेला ओपनिंगला पण सहाव्या क्रमांकावर येणार लक्ष्मण जास्त सरस होता. सनीकडे संयम, हातावरून चेंडू कुठे स्विंग होणारे, सिम गडबड करणार आहे का याचा अचूक अंदाज आणि पूढचा चेंडू काय असू शकतो याची मानसिक तयारी ठेवणे हे गुण होते. बुद्धिबळ असायचं त्याचं.

रात्री आजाराला जोर असतो म्हणतात त्याप्रमाणे पहिली काही षटकं गोलंदाजांना जोर असतो. नवीन चेंडू, वातावरण, उत्साह यात जास्त प्रयत्न केले जातात. सुनील गोलंदाजाला थकवायचा. तुम्ही घाम गाळून चेंडू टाकताय आणि समोरचा वेल लेफ्ट करतोय, उत्कृष्ट डिफेन्स करतोय आणि जरा कुठे चुकलात तर फटकावून धावाही काढतोय हे मानसिक खच्चीकरण आहे मग उरतं कुणाची चूक आधी होतीये त्याची वाट बघणं. तेंव्हा एकावेळी समोरच्या संघात सगळे उत्तम गोलंदाज असायचे. एक बाबा दमला तर त्याच्या जागी येणारा अजून आग ओकायला तयार असायचा. गोलंदाज बदली झाल्यावर त्याच्याकडे उत्साह असतोच, फलंदाज तोच असतो सकाळपासून. म्हटलं ना, संयम, फटक्यांची निवड, जबाबदारी, बिनचूक तंत्र आणि प्रचंड स्टॅमिना या जीवावर हेल्मेट न घालता, कुठेही इजा न होता हा माणूस सगळ्या दिग्गज गोलंदाजांना अंगावर घेत ठाम उभा राहिला कायम.   


प्रश्न : गावसकर यांच्या अनेक अजरामर खेळी आहेत त्यापैकी तुमची सर्वात आवडती खेळी कोणती आणि का?

उत्तर : जिंकायला फक्त 183 हव्या असताना सलग तिसरा विश्वचषक आपल्याला द्यावा लागला होता त्यांना. ते आपल्या दौऱ्यावर आले होते धुमसत. सहा कसोटी, पाच वनडे. आपल्याला त्यांनी कसोटी 3-0 आणि एकदिवसीय 5-0 तुडवलं होतं. त्याने दिल्लीला ब्रॅडमनला इक्वल केलं होतं त्या सिरीजला आणि मद्रासला ओव्हरटेक (चौथ्या क्रमांकावर आला होता आणि 236 धावा, 23 चौकार, अर्थात त्याला चौथ्या क्रमांकावर आला असं म्हणणं हे फक्त तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे. अंशुमन 1-0, वेंगसरकर 2-0 ,म्हणजे तो सलामीला आला असंच म्हणावं लागेल.). बरोबरी केलेलं एकोणतिसावं शतक मी पाहिलंय.

हेल्मेट नाही, मार्शल राउंड द विकेट यायचा. त्याने ब-याच कालावधीनंतर हूक मारत चौकार मिळवले होते. स्वत:च्या स्टाईलला काळिमा फासत 94 चेंडूत शतक काढलं होतं (त्याचं सगळ्यात जलद). समोर वेन डॅनिअल, विन्स्टन डेविस, खुनशी, फसवा मायकेल होल्डिंग आणि तिरक्या धावेचा माल्कम मार्शल. त्यांच्यासमोर जलद शतक काढणं म्हणजे खायचं काम नाही, जिगर लागते. हे वाचायला, बोलायला सोपं आहे. मार्शल आधीच टेरर माणूस त्यात तो राउंड द विकेट यायचा, इकडे बघणाऱ्याला जास्त टेन्शन. पण तंत्र अचूक असलेल्या माणसाने त्या दिवशी जे काय धुतलंय ना त्याला तोड नाही. दोन्ही कसोटी अनिर्णित होत्या त्या. त्याने शतक केल्यावर आपण जिंकत नाही हा शोध ज्याने लावला त्या माणसाला पुरस्कार द्यायला हवा. त्याने शतक काढलं म्हणून हरलो नाही असा ‘नकारात्मक’विचार कदाचित त्याच्या आवडीचा नसावा.  

प्रश्न : गावसकर वन-डे क्रिकेटसाठी योग्य बॅट्समन नव्हते असा आरोप केला जातो, 1975 च्या वर्ल्ड कपमधील त्यांच्या 36 रनच्या संथ खेळीची यासाठी हमखास साक्ष काढली जाते तुमचं या आरोपावर काय उत्तर आहे?

जयंत : कुठलीही गोष्ट नवीन असते तेंव्हा ती लगेच आत्मसात होत नाही, मनोवृत्तीत एका दिवसात जादू होत नाही. ठीक आहे, सुनीलला नाही कळलं पण बाकीच्या खेळाडूत एकही हुषार माणूस नव्हता? लंकेच्या जयसूर्या आणि कालुवितरणा आणि न्यूझीलंडच्या ग्रेटबॅचने शिकवलं पहिल्या पंधरा ओव्हर्सचा फायदा कसा घ्यायचा, फिल्डिंग रेस्ट्रिकशन्समधे धावा हव्यात, फटके कसेही मारा. याचा अर्थ हे तिघे सोडून बाकीचं यच्चयावत संघ, कोच, ओपनर्स बाळबोध होते का की ज्यांना हे लक्षात आलं नाही.

प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. आता वीस षटकात पण दोनशेच्या वर धावा होतात आणि जिंकतातही. आपण जिंकलेला विश्वचषक साठ षटकांचा होता, जिंकायला जेवढ्या धावा हव्या होत्या तेवढया आता वीस षटकात करतात फलंदाज. म्हणजे मग तेंव्हाची विंडीज टीम टुकार होती का? गावसकर ज्या काळात खेळत होता तेंव्हा हा कन्सेप्ट मुळात नवीन होता. 

कपिलने वर्ल्डकप जिंकला तशी आपण त्याच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड सिरीज जिंकली होती (पहिल्यांदाच त्याने मिशा वाढवल्या होत्या तेंव्हा). मुळात क्रिकेटमधली आक्रमकता आत्ता आली. कोच टीमच्या बाहेर काढायचे तेंव्हा बेजबाबदार फटका मारला म्हणून. आपल्याकडे क्रिकेट हा खेळण्याचा विषय कमी आणि बोलण्याचा जास्त आहे. समजा त्यावेळी गावसकर वीसेक षटकात साठ धावा काढून बाद झाला असता तरी त्याची अक्कल निघालीच असती, ‘उरलेली चाळीस षटकं कोण खेळणार, आत जायची घाई काय होती, हे सांगायला कशाला लागतं’ टाईप मुक्ताफळं उधळली गेली असतीच. बऱ्याचवेळा टीका ही पश्चातबुद्धी असते किंवा आताच्या काळाशी तुलना करत व्यक्त केलेलं मत असतं. पूर्वीच्या सिनेमात फार गाणी असायची हे मत आत्ता व्यक्त करायला काय बुद्धी लागत नाही तसंच आहे ते. त्यामुळे सुनीलने त्याला कधी उत्तर दिलं नाही तेच आपणही करायचं. त्यानेच मग पुढे न्यूझीलंड विरुद्ध त्याचं एकमेव शतक काढलं होतं पन्नास षटकात.

Fan Corner : ‘सचिनच्या सगळ्या खेळ्या म्हणजे आयुष्यातील सर्वाधिक महत्वाचे टप्पे’

प्रश्न : सुनील गावसकर यांचं एक कॅप्टन म्हणून तुम्ही काय वर्णन कराल?

जयंत : फारशा धड नसलेल्या संघाला हाताशी घेऊन तो फार जिंकला नसेल पण हरलाही नाही, तेंव्हाच्या संघाला सामना अनिर्णित ठेवणं हे सुद्धा कौतुकास्पद होतं. जलदगती गोलंदाज नाहीत आणि स्वप्न मालिका जिंकण्याची. त्यानेच म्हटलंय, ‘फलंदाज सामना वाचवतात, गोलंदाज जिंकून देतात’. तो अतिशय धूर्त कर्णधार होता पण ते सिद्ध करायला तसा संघही हवा.

मार्क टेलर काय ग्रेट कप्तान होता का पण त्याची टीम खतरा होती. गोलंदाज एकाचढ एक होते. एकच उदाहरण घेऊ. अल्विन कालिचरण विंडीजची बी टीम घेऊन आला होता. 78-79 ला सहा टेस्ट, रिझल्ट 1-0 आपल्या बाजूने. पाच टेस्ट अनिर्णित. जुन्यातला फक्त गोम्स असेल त्याच्या बरोबर, सिल्व्हेस्टर क्लार्क, व्हॅनबर्न होल्डर, फौद बाकस वगैरे टीम होती. आपले गोलंदाज कोण तर कपिल, घावरी, परसाना, वेंकट, चंद्रा, अमरनाथ. पाटा विकेट, धावांचा सुकाळ. स्वप्न मात्र समोरच्या संघाला चिरडायची. कुणीही कॅप्टन असू दे, तो काय रिझल्ट देणारे?  अतिशय शिस्तबद्ध माणूस कप्तान असणं बाकीच्यांना परवडत नाही. कपिलने बेजबाबदार फटका मारला म्हणून संघाबाहेर ठेवायची धमक त्याच्यात होती. सलग शंभर कसोटी खेळणारा माणूस आहे तो. तेंव्हा मुळात सामने किती व्हायचे? तो फार यशस्वी कप्तान नसला तरी अयशस्वी पण नव्हता. आकडेवारीने सगळंच सिद्ध करता येत नाही.

‘त्यांच्या उद्दामपणामुळे मैदान सोडलं होतं’, 1981 च्या ‘वॉक आऊट’ चं गावसकरांनी सांगितलं सत्य!

प्रश्न : सुनील गावसकर यांच्या काळात आणखी एक ग्रेट क्रिकेटपटू भारतीय टीममध्ये होते ते म्हणजे कपिल देव. गावसकर-कपिल यांच्यात मतभेद होते. असं गॉसिप तेव्हा जोरात होते. आजही त्याबाबत बोललं जातं. तुम्ही या सर्व चर्चा, गॉसिपकडं कसं बघता. या दोन खेळाडूंचे परस्परांशी असलेल्या संबंधांचं तुम्ही काय विश्लेषण कराल?

जयंत : आपल्याकडे मुळात ऐकीव माहिती, अफवा या आधारे मत व्यक्त करायला फार आवडतं. या दोघांमुळे क्रिकेट लोकांना आवडायला लागलं आपल्याकडे. आताच्या खेळाडूंसारख्या पत्रकार परिषदा, ट्विटर, सोशल मिडिया यावरून उखाळ्या पाखाळ्या काढणं तेंव्हा नव्हतं, हे प्लॅटफॉर्म्स नव्हते आणि मुळात एकमेकातली भांडणं जाहीर करण्यापेक्षा संघाचं हित बघितलं जायचं. कपिलच्या पाच हजार धावा आहेत कसोटीत आणि बळी ४३४, गावसकरच्या दहा हजार आणि बळी एक. म्हणजे आकडेवारीनुसार कपिल हा निम्मा गावसकर आहे.

एकदिवसीय धावांमधे कपिलच्या जास्त आहेत सनीपेक्षा. मग आता ग्रेटनेस कुणाचा जास्त आहे हे ठरवायचं की त्यांच्यात काय वाद झाले असतील त्यात आपल्या बुद्धीने भर घालून चघळत बसायचं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. कॉमेंट्री करताना मी सुनीलच्या तोंडी कपिलबद्दल कायम कौतुक ऐकत आलो आहे. गंमत काय आहे माहितीये का, तुम्ही ज्याच्या बाजूचे असता त्याला विरुद्ध खेळाडू नाटकी, खोटं बोलणारा वाटत असतो. पुलं सांगून गेलेत रवींद्र पिंग्यांना, ‘आपण चांगलं ते बघाव’. टीका करायला, उणिवा शोधायला इथे बरीच मोकळी माणसं आहेत. कशावर चर्चा करायची हे आपल्याकडे कोडं आहे. लफडी, वाद, कुणाचं नुकसान झालं, कुणामुळे झालं यावर आपण अपुऱ्या माहितीवर मत व्यक्त करत असतो. ज्यांच्याबद्दल आपण बोलतो ती माणसं हे सगळं वाचून मनसोक्त हसत असतील.   

‘कपिल देव का जबाब नही’ – पेन किलर घेत मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाला केले होते पराभूत!

प्रश्न : गावसकर यांच्या काळात भारत-पाकिस्तान क्रिकेट नियमित होत असे. इम्रान-सर्फराजचं नाही तर गावसकरांनी त्या काळात शकूर राणा, खिजर हयात या दोन सद्गृहस्थांनाही तोंड दिलं. पाकिस्तानतील ते दौरे किंवा अगदी शेवटच्या सीरिजमध्ये बंगळुरुमध्ये गावसकर पाकिस्तान विरुद्ध ९६ रनची लाजवाब खेळी खेळले. गावसकर विरुद्ध पाकिस्तान या लढतीच्या तुमच्या काय आठवणी आहेत?

जयंत : पाकिस्तान तेरा खेळाडू घेऊन खेळायचे. पाकिस्तानमधे शकूर राणा आणि खिजर हयात असे दोन सद्गृहस्थ होते. दोघांनाही असलेल्या शारीरिक व्यंगामुळे समोरच्या फलंदाजाच्या पायाला चेडू लागला, लागेल असं जरी त्याच्या डोळ्याला, मेंदूला दिसला तरी त्यांचं बोट आपोआप वर जायचं आणि फलंदाज आउट व्हायचा. यात खरं तर त्यांची काही चूक नव्हती. असो! तर एका टेस्टमधे (बहुतेक पहिल्याच) या व्यंगामुळे त्याला आउट दिलं. त्याने जाताना चेतन चौहानला सांगितलं, ‘पायाला लागलेला हा शेवटचा चेंडू’. उरलेल्या संपूर्ण मालिकेत त्याच्या पायाला चेंडू लागला नाही त्यामुळे त्याला एल.बी.देता आलं नाही. याला म्हणतात टेक्निक आणि स्वत:वरचा विश्वास. बाकी पाकिस्तानकडून खिलाडूवृत्तीची अपेक्षा ठेवणं हेच मुळात चूक आहे.

शेवटची इनिंग दुर्दैवी होती त्याची. जिंकायला 221 हव्या होत्या. साथीच्या रोगात माणसे पटापट जावीत तसे लोक समोर आउट होत होते. अक्रम, इम्रान, इकबाल कासिम आणि तौसिफ अहमद होते. तौसिफ त्याला त्रासदायक ठरला होता. आपण सोळा धावांनी हरलो. पीच एकदम आखाडा होतं. इम्रानने दुसऱ्या इनिंगला गोलंदाजी केलीच नाही. कासीम, तौसिफ़ प्रत्येकी चार आणि अक्रम दोन. गावसकरच्या 96 नंतर अवांतर धावा जास्त म्हणजे 27 होत्या.

कोकणात माणूस गेल्यावर माणसं उभ्या उभ्या का होईना हाक मारायला म्हणून जातात तसे आपले लोक घटकाभर पीचवर डोकावून गेले. सुनील आठवा आउट झाला. साडेपाच तास हा माणूस पीचवर उभा होता. भारतातली पाचव्या दिवशीची खेळपट्टी. चेंडू त्याच्या मनात येईल त्या गल्लीत घुसल्यासारखा वळणार पण या बाबाने हार नव्हती मानली. हल्ली पुजारा खेळतो तसं याने नुसता वेळ काढला नाही तर धावा पण केल्या होत्या. विचार करून बघा, काय ताण असेल तो, भारत पाकिस्तान सामना, जिंकायची शक्यता आणि शेवटी नशीबात हरणं. 


प्रश्न : भारतीय क्रिकेटमधील खूप कमी लोकांना गावसकर यांच्या इतकं रिटायरमेंटचं अचूक टायमिंग जमलं आहे. संपूर्ण भरात असताना रिटायर होण्याचा निर्णय सोपा नाही तो त्यांनी घेतला यामागे त्यांची काय स्वभाव वैशिष्ट्ये आहेत?

जयंत : विजय मर्चंटने तो आदर्श घालून दिला. इंग्लिश क्रिकेटर हेंड्रेन म्हणाला होता ‘One should retire when he’s good enough to play on. Why now, people should ask, and not why not now’. मर्चटने आदर्श घालून दिला पण तो अंमलात आणायला जिगर हवी. लता, कपिल, सेहवागपासून अगदी स्टीव्ह वॉ पर्यंत ते कुणाला जमलं नाही, सांगावं लागलं.

इंग्लंडचा अँड्र्यू स्ट्रास जसा तडकाफडकी निवृत्त झाला तसं कुणी झाल्याचं आठवत नाही. प्रसिद्धी, आपण करतोय त्याच्यावर असणारं प्रेम या गोष्टी मोह घालणारच. एखादीच सुचित्रा सेन असते एकदा ठरवलं पब्लिकमधे नाही जायचं मग फाळके पुरस्कार पण तिने नाकारला. मुळात शिस्तप्रियता, आत्मसन्मान, संयम हे गुण त्या माणसात आहेत त्यामुळे हा निर्णय घेणं फार अवघड नसेल गेलं.

गुंडप्पा विश्वनाथ यांच्याबद्दलच्या ‘या’ 7 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

प्रश्न : आजच्या पिढीला गावसकर एक टीव्ही समालोचक, स्तंभलेखक म्हणून माहिती आहेत. ते रिटायर होऊन आता 34 वर्ष झाली. अजूनही ते तितकेच अपडेट आहेत. गावसकरांच्या या सदाबहार सेकंड इनिंगची खासियत काय आहे?

जयंत : एकतर या माणसाचं भाषेवर प्रभुत्व आहे. अ अ करत बोलत नाही, मोजकं, मार्मिक बोलतो, अतिशय हजरजबाबी बुद्धी आहे. टोमणे मारायला याचा हात कुणी धरणार नाही. इतकी वर्ष जगभरच्या खेळाडूंबरोबर खेळलाय, वावरलाय त्यामुळे ऐकीव किस्से सांगायची वेळ त्याच्यावर येत नाही. स्वतः उत्तम खेळाडू असल्यामुळे काय चुकलंय, काय करायला हवं यावर मत व्यक्त होतं त्याला किंमत आहे. उगाचच पाल्हाळिक कौतुक, दर्जा सोडून टीका हा माणूस करत नाही, वैयक्तिक राग लोभ, कुठला संघ आहे याच्याशी देणंघेणं नसतं. हल्लीचे बरेच कॉमेंट्रेटर गंमतीशीर आहेत आपले. तुम्हांला भारताची बाजू मांडायला बसवलं आहे का तिथे की जे घडतंय ते सांगायला. ज्यावेळेस रेडिओ कॉमेंट्री होती तेंव्हा गोष्ट वेगळी होती. आता चित्र आम्हांला दिसतंय की, तुमचं काम बारकावे सांगणं आहे. तटस्थ वृत्तीने बोलणं हे सोपं काम नाही. या माणसाच्या फिटनेसचं मला कायम कौतुक वाटत आलंय. आयपीएल, इतर दौरे यासाठी करावा लागणारा प्रवास, सतत बोलत राहणं, स्वतःला अपडेट ठेवत राहणं हे खायचं काम नाहीये या वयात. 

सचिनला द्विशतक केलंस वनडेत तर पाय धरेन हे बोलल्यावर ते कृतीत आणताना त्याला त्याचं  मोठेपण आड आलं नाही. मी इतिहासात अमुक तमुक आहे हे ओझं मुळात त्याच्या खांद्यावर नाही. इनमिन टेस्ट्स खेळलेली माणसं जेंव्हा त्याच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि ज्ञानवाटप करत असतात त्यावेळेस तो ‘तुला काय शष्प कळतंय, तुझ्या जेवढ्या एकूण धावा आहेत टेस्टच्या त्याच्या काही पट मी रणजी’त काढल्यात’ वगैरे भाव त्याच्या चेहऱ्यावर नसतो, समोरच्याला आदर देत तो सगळं ऐकत असतो. आमच्याकाळी असं नव्हतं, आम्ही किती कमी पैशात खेळलोय वगैरे रडारड हा माणूस करत नाही. तोंडभरून कौतुक आणि अचूक मोजकी टीका हे त्याचे दोन गुण  समालोचन करणाऱ्यांनी घ्यायला हवेत.

 

प्रश्न : गावसकर यांच्या क्रिकेट कारकीर्दीला (खेळाडू, समालोचक आणि स्तंभलेखक म्हणून) यावर्षी 50 वर्ष पूर्ण झाली. त्यांच्या या एकूण कारकिर्दीमधील कोणत्या गोष्टी आहेत ज्या आणखी 50 वर्षांनी क्रिकेट पाहणं सुरु करणाऱ्या पिढीला दंतकथा वाटतील?

जयंत : काळ झपाट्याने बदलतोय, बदलत रहाणार. आकडे तज्ज्ञ कुठलं रेकॉर्ड कुणी मोडलं हे सांगेल तेव्हा या लोकांचे उल्लेख निघतील. आपल्या पिढीतल्या लोकांनी विनू मंकड, विजय मर्चंट, पतौडी, नायडू असे कितीसे पाहिलेत? कितीवेळा त्यांचं नाव निघतं. खेळणाऱ्या किती लोकांनी ब्रॅडमनच्या इंनिंग्ज पाहिल्या असतील अभ्यासासाठी? प्रत्येक काळाचे एक आदर्श असतात, काळ बदलला की ते लोक इतिहास होतात. मुळात आपल्याकडे थोर असणाऱ्या माणसाची जपणूक आपण कितीशी करतो? इंग्रज लोकांचा तो गुण आपल्याकडे नाही. त्यांच्याकडे डब्ल्यू.जी. ग्रेसची माहिती विचाराल तर ते खंड पुढे ठेवतील आणि ब्रॅडमनची विचाराल तर तो ही ठेवतील कारण तो आपला आहे परका आहे हा आपला स्वभाव आहे. इतिहास तटस्थपणे लिहून ठेवणं हे त्यांना जमतं.

गावसकर, त्याच्या आधीचे ते आत्तापर्यंतचे अशी काही माहिती, रेकॉर्डस् आपल्याकडे मिळतील एकरकमी? आपण आज जी माहिती घेतो ती गुगल, विकिपीडियावरून. त्यामुळे पुढच्या पिढीला काही वाटेल या लोकांविषयी यासाठी या पिढीने काहीतरी करून ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. 

वाढदिवस स्पेशल : राहुल द्रविडच्या 48 अद्भुत गोष्टी!

प्रश्न : मराठी वाचकाची क्रिकेटबद्दल जाणून घेण्याची भूक मिटवण्यासाठी ‘Cricket मराठी’ ही वेबसाईट सुरु झाली आहे. या साईटबद्दलचा तुमचा अभिप्राय जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.

जयंत : ‘हे कारण ऐकून व्हाल थक्क’, ‘या खेळाडूने घेतला असा बदला’ या टाईपची हेडिंग्ज या वेबसाईटवर फार आढळली नाहीत त्याबद्दल अभिनंदन. विचित्र कॅप्शन टाकून तुम्ही काही काळ वाचक खेचू शकता पण कंटेन्ट वाचनीय असेल तर हेडिंग्ज काय आहेत याकडे कुणी बघत नाही. चांगली गोष्ट उशिरा समजली तरी चालेल लोकांना पण सवंग जाहीरात करून वाचकवर्ग तुम्ही वाढवत नाही हे सातत्य ठेवाल  अशी खात्री आहे. तुमची वेबसाईट अनेक मराठी भाषिक वाचकांनी वाचावी ही शुभेच्छा आणि मला इथे चार शब्द लिहू दिलेत याबद्दल धन्यवाद. 

(जयंत विद्वांस यांचा परिचय : अजूनही गल्ली क्रिकेट खेळू शकणारा, क्रिकेट, सिनेमा आणि थ्रिलर्स यावर प्रेम करणारा माणूस. ‘अभद्र’ आणि ‘सत्तर एमएमचे आप्त’ ही दोन पुस्तके प्रकाशित. तुम्ही त्यांच्याशी jayvidwans[at] gmail [dot] com या मेलवर संपर्क करू शकता. )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: