फोटो – ट्विटर, आयसीसी

संपूर्ण भरातील युवराज सिंहला (Yuvarj Singh) बॅटींग करताना पाहणे यासारखी क्रिकेटच्या मैदानातील सर्वोत्तम गोष्ट कोणती नसेल. तो काही क्षणातच त्याच्या सुंदर आणि निर्दोष फटकेबाजीनं मॅचचं चित्र बदलत असे. T20 क्रिकेट सुरू झाले त्यावेळी याच क्षमतेच्या जोरावर तो सर्वांच्या पुढे होता. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावले. फास्ट बॉलरच्या एका ओव्हरमध्ये 6 सिक्स आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी हे दोन्ही रेकॉर्ड आजही युवराजच्या नावावर आहेत.

युवराजचे वडील योगराज सिंह हे टीम इंडियासाठी एक टेस्ट खेळले. आंद्रे आगासीच्या आयुष्यात माईक आगासीचे जे योगदान होते ते युवराजच्या आयुष्यात त्यांचे आहे. त्यांच्याच हट्टामुळे युवराज क्रिकेटपटू बनला. त्यामुळेच भारतीय क्रिकेट श्रीमंत झाले. अंडर 16 मध्ये युवराजने एकाच इनिंगमध्ये जम्मू काश्मीरच्या दोन्ही इनिंगपेक्षा जास्त रन काढले होते. अंडर 19 वर्ल्ड कप टीम इंडियाला जिंकण्यात त्याची मोलाची कामगिरी होती. ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड क्लास अटॅकला पहिल्याच मॅचमध्ये भिरकावून देत युवराजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार एन्ट्री केली. त्यानंतरचा पुढचा इतिहास सर्वांना माहिती आहे.

‘अस्थिर कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेल्या युवराजच्या आत धगधगती आग होती, जिला मैदानात पूर्ण वाव मिळत असावा. काहीतरी सिद्ध करून दाखवण्याची जिद्द तिथून आली असावी..चंचल युवराजचा जेव्हा जेव्हा पाय घसरेल अशी शक्यता निर्माण झाली तेव्हा तेव्हा सुदैवाने खूप योग्य व्यक्ती त्याच्या आजूबाजूला होत्या. त्यांनी टॅलेंटला कसं योग्य प्रकारे वापरावं हे त्याला नीट समजावलं. गरज पडली तिथेही कानही उपटले. युवराजनेही तो सल्ला गांभिर्याने अंमलात आणला. म्हणूनच तर त्याला मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम खेळ करणं त्याला शक्य झालं.. ‘ असं मत युवराज सिंहचे फॅन प्रसाद फाटक (Prasad Phatak) यांनी व्यक्त केले आहे.

मृत्यूला चकवून क्रिकेटच्या मैदानात परतलेल्या युवराज सिंहच्या वाढदिवसानिमित्त ‘Cricket मराठी’ ने प्रसाद फाटक यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा सारांश

प्रश्न : सर्वप्रथम Cricket मराठीला मुलाखत देण्यासाठी तयार झालात, त्याबद्दल आभार. युवराज सिंहबद्दलची तुमची पहिली आठवण कोणती, युवराजची कोणती इनिंग पाहिल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा वाटलं की हा एकदम भारी प्लेयर आहे?

प्रसाद : युवराजला 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वप्रथम बघितलं आणि त्याची देखणी शैलीदार बॅटिंग मला फार आवडली. त्याचे शॉट्स अक्षरशः बंदुकीच्या गोळीसारखे सणसणत जात होते. नजाकत आणि ताकद यांचा दुर्मीळ संगम त्याच्या बॅटिंगमध्ये दिसत होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये तगडे बॉलर्स समोर होते आणि सचिनसह महत्वाचे बॅटर्स बाद झाले होते, तरीही पठ्ठ्याने न डगमगता हल्ला चढवला आणि भारताला चांगला स्कोअर गाठून दिला हे विशेष.

प्रश्न : नेटवेस्ट ट्रॉफीची फायनल हा सुरूवातीच्या कारकिर्दीमधील एक मोठा टप्पा आहे. त्या रात्री आपण सर्वांनी एक वेगळचं क्रिकेट पाहिलं. युवराजच्या त्या खेळीचं तुम्ही कसं वर्णन कराल?

प्रसाद : खरं म्हणजे मी भारत हारत असला मी सहसा शेवटपर्यंत मॅच न सोडणारा फॅन होतो. पण त्या दिवशी मात्र सचिन बाद झाल्यावर मला बघवलंच नाही. आपण त्या आधीच्या अनेक फायनल हारलो होतो, त्यामुळे पुन्हा एक पराभव बघायची इच्छाच उरली नव्हती. मी टीव्हीच बंद करून टाकला. माझे बाबा तेव्हा घरी नव्हते. त्यांनी आल्यावर उत्सुकता म्हणून टीव्ही लावला आणि मग तो टीव्ही सुरूच राहिला! अक्षरश: नजरबंदीचा खेळ चालू होता. प्रत्येक धावेगणिक देवाचा धावा वाढत होता. युवराजचं वैभव त्या दिवशी पुरेपूर दिसत होतं. पण त्या दिवशी त्याने मॅच शेवटपर्यंत नेली नाही.

कैफ मात्र स्वतःच्या एकूण क्षमतेपेक्षाही वरचढ खेळला, फार नेत्रदीपक न खेळताही तो शेवटपर्यंत टिकून विजयापर्यंत घेऊन गेला. एक मनस्वी कलाकार आणि एक मेहनती कामगार असा त्यांच्यातला फरक होता. काहीवेळा शैलीपेक्षा मेहनत तुम्हाला जास्त दूरपर्यंत घेऊन जाते. त्यामुळे त्यादिवशी कैफच जास्त लक्षात राहिला. पुढे मात्र युवराजमध्ये खूप सुधारणा झाली आणि तोही फिनिशर बनला.

मुक्तछंदात बॅटींग करणारा क्रिकेटचा आनंदयात्री!

प्रश्न : संपूर्ण भरातील युवराज सिंहची फटकेबाजी पाहण्यासारखी क्रिकेट विश्वातील मोठी गोष्ट कोणती नव्हती. युवराजचा तुम्हाला सर्वात आवडणारा शॉट कोणता?

प्रसाद : युवराजची बॅटिंग म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य! उंच बॅकलिफ्ट, सरळ बॅट यामुळे त्याच्या कुठल्याही शॉटला विलक्षण ओघ असायचा. त्याच्या बॅटमधून जसा खणखणीत ‘ट्टॉक’ असा आवाज यायचा तसा मी सेहवाग वगळता अन्य कुणाच्याही बॅटमधून आलेला ऐकलेला नाहीये. त्यामुळे त्याचा कुठला तरी एक शॉट निवडणे कठीण आहे…. तरी अगदी आग्रहच केला तर त्याच्या कव्हर ड्राइव्हला मी अंमळ जास्तच मार्क देईन.

इथे मी थोडेसे विषयांतर करून एक गोष्ट आवर्जून सांगेन. फक्त फटकेबाजी हीच काही त्याची प्रेक्षणीय गोष्ट नव्हती. मैदानावर स्प्रिंग सारखा टणाटण उडत चेंडू अडवणारा, कॅच घेणारा युवराज पाहणं म्हणजे नेत्रसुखच होतं. नॅटवेस्ट नंतर लगेच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शॉर्ट फाईन लेगला सूर मारत  ‘रॉंग हॅन्ड’मध्ये घेतलेला जॉन्टी ऱ्होड्सचा कॅच तर मी कधीही विसरू शकत नाही.

बॅटिंग असो वा फिल्डिंग, त्याचा मैदानावरचा वावर पाहताना त्याच्या वडिलांनी लहानपणी त्याला स्केटिंग सक्तीने बंद करायला लावून त्याला मारून मुटकून क्रिकेटपटू बनवलं होतं यावर कुणाचा तरी विश्वास बसेल का ?

प्रश्न : युवराजच्या करिअरमधील आणखी एक मोठा टप्पा म्हणजे 2007 साली झालेला T20 वर्ल्ड कप. तो संपूर्ण वर्ल्ड कप भरात होता. पण विशेषत: स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमधील सलग 6 सिक्स आणि सेमी फायनलमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचे 30 बॉल 70 रन हे सुपरच्याही उपर अशा क्लास इनिंग आहेत. त्या दोन इनिंगच्या तुमच्या आठवणी काय आहेत?

प्रसाद : खरंच लाजवाब खेळी होत्या त्या.. आमच्याकडे कुठल्यातरी कारणाने त्यावेळी स्पोर्ट्स चॅनेल लागतच नव्हतं, त्यामुळे ती सहा सिक्सवाली मॅच मला बघताच आली नव्हती.. मी फक्त न्यूज चॅनेल बघत होतो आणि मला बातम्यांमध्ये सहा सिक्सचा अचाट पराक्रम कळला तेव्हा मला जी काही हळहळ वाटली, तिचं वर्णन मी करू शकत नाही.. दुसऱ्या दिवशी मी कुठेतरी हायलाईट्स पाहिले तेव्हा ती मजा मला पुन्हा अनुभवता आली.

सेमी फायनलला मात्र मी आधी मित्राकडे जाऊन टीव्हीपुढची जागा पटकावली आणि मग युवराजच्या बॅटमधून येणाऱ्या धावांच्या धबधब्यात मनसोक्त भिजलो. मला स्वतःला सहा सिक्सेसच्या मॅचपेक्षा ही सेमीफायनलमधली त्याची खेळीच जास्त आवडते. ऑस्ट्रेलियावर हल्ला करणं आणि तेही नॉक आऊट मॅच मध्ये म्हणजे काही खाऊ नाही!


प्रश्न : 2007 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपनंतर युवराज आणि धोनीनं कोणतंही टार्गेट चेस करण्याचा धडका लावला होता. त्या काळी आपण याबाततचा वर्ल्ड रेकॉर्डही केला. युवराज आणि धोनीची केमेस्ट्री कोणत्या कारणामुळे इतकी छान जुळली असं तुम्हाला वाटतं?

प्रसाद : ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंची मैत्री कुठल्या कारणांमुळे होते हे तर आपल्याला इथे बसून कळणं कठीण आहे.. पण दोघेही अत्यंत फिट आणि आक्रमक बॅटिंग शैली असणारे होते, हे किमान मैदानावर तरी त्यांची केमिस्ट्री जुळण्याचं महत्वाचं कारण असावं असं मला वाटतं. दोघांची ‘रनिंग बिटवीन द विकेट’सुद्धा जबरदस्त होती.. (त्या आधी एकाच वेळी एवढी भन्नाट पळणारी जोडी बहुदा फक्त रॉबिन सिंह-अजय जडेजा यांचीच आठवते, पण ती जोडी फार काळ एकत्र खेळली नाही) ‘मॅच संपवूनच यायचं’ असा माईंडसेट हाही युवराज आणि धोनी या दोघांमधला समान दुवा असावा असं वाटतं..

‘धोनीच्या टेम्परामेन्टचा ICC फायनलमध्ये फायदा झाला’

प्रश्न : 2011 च्या वर्ल्ड कपमधील युवराज सिंहची तुमची सर्वात आवडती इनिंग कोणती आणि का?

प्रसाद : पुन्हा एकदा मला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्याच मॅचचीच निवड करावी लागेल. कारण पुन्हा एकदा तेच. प्रतिस्पर्ध्याचं वजन आणि त्याचा लौकिक आणि पुन्हा एकदा नॉक आऊट मॅच… त्यामुळे तीच जास्त महत्वाची वाटते. मॅच संपवताना चौकार ठोकल्यावर युवराजने ठोकलेली आरोळीही याबद्दल पुरेशी बोलकी होती.

प्रश्न : अंडर 19 वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप आणि वन-डे वर्ल्ड कप या तिन्ही वर्ल्ड कप विजेत्या टीमचा युवराज फक्त सदस्य नव्हता. तर तो या वर्ल्ड कप विजेतेपदाचा शिल्पकार होता. युवराजच्या कोणत्या स्वभाववैशिष्ट्यामुळे त्याला या तिन्ही सर्वोच्च स्पर्धेत बेस्ट कामगिरी करणं जमलं?

प्रसाद : उपजत टॅलेंटचा युवराजच्या बाबतीत फार मोठा वाटा आहे. त्यांच्या भात्यात सर्व फटके असणं हा तंत्राचा भाग झाला, पण त्यात एक सुखद सहजता असणं हे निव्वळ टॅलेंट म्हणावं लागेल. अर्थात महत्वाच्या स्पर्धांमध्ये तणावाखाली चांगली कामगिरी करण्यासाठी मॅच्युरिटीसोबतच योग्य मार्गदर्शनाचीही गरज असते. खरंतर युवराज हा खूप अस्थिर कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेला खेळाडू आहे. कदाचित तेव्हापासूनच त्याच्या आत धगधगती आग होती, जिला मैदानात पूर्ण वाव मिळत असावा. काहीतरी सिद्ध करून दाखवण्याची जिद्द तिथून आली असावी..

अर्थात भरगच्च टॅलेंट आणि अशी अस्थिर परिस्थिती हे खूप रिस्की कॉम्बिनेशन आहे. पण चंचल युवराजचा जेव्हा जेव्हा पाय घसरेल अशी शक्यता निर्माण झाली तेव्हा तेव्हा सुदैवाने खूप योग्य व्यक्ती त्याच्या आजूबाजूला होत्या, हेही मला महत्वाचं वाटतं. तरुण वयात योग्य प्रशिक्षक मिळणं आणि पुढे गांगुली, सचिन आणि जॉन राईट, गॅरी कर्स्टन आजूबाजूला असणं महत्वाचं ठरलं. या सर्वांनी आपल्या स्पेशल टॅलेंटला कसं योग्य प्रकारे वापरावं हे त्याला नीट समजावलं. गरज पडली तिथेही कानही उपटले. अर्थात तो सल्ला त्याने गांभीर्याने अंमलात आणला याचं क्रेडिट त्याला स्वत:लाच…  म्हणूनच तर त्याला मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम खेळ करणं त्याला शक्य झालं..  

Cricket World Cup 2011: वर्ल्ड चॅम्पियन सध्या काय करतात?

प्रश्न : 2011 च्या वर्ल्ड कपनंतर त्याला कॅन्सर झाल्याचं सर्वांना समजलं. स्वाभाविकच तुम्हालाही याचा मोठा धक्का बसला असेल. त्याला कॅन्सर झालेलं समजल्यापासून ते तो मैदानात पुन्हा परतलेलं पहिल्यांदा पाहिलं त्या सर्व काळातील युवराजचा फॅन म्हणून तुमच्या मनात आलेल्या भावना आम्हाला सांगाल का?

प्रसाद : धक्का तर मोठाच होता. पण खरं सांगू? इतक्या भयंकर आजाराविषयी ऐकल्यावर आपल्या डोक्यात जे टोकाचे विचार येतात, ते कधीच माझ्या डोक्यात आले नाहीत. युवराज बरा होणार आहे, हे मी माझ्याही नकळत गृहितच धरलं होतं… आणि झालंही तसंच! तो परत मैदानात येईल असं मात्र मला अजिबात वाटलं नव्हतं.. त्याने टेस्ट,  वनडे, ट्वेन्टी ट्वेन्टी मध्येही भारताच्या टीममध्ये पुन्हा स्थान मिळवणे ही मात्र परिकथेत शोभावी अशी गोष्ट होती.

त्याला परत भारताच्या जर्सीमध्ये पाहून जो आनंद झाला तो शब्दांत वर्णन करणे शक्य नाही.. परतल्यानंतर त्याने मारलेलं दीड शतक ही माझ्यामते त्याची सर्वोत्तम खेळी होती… आणि त्यावेळी त्याच्यासोबत धोनीच होता!! मला आठ-दहा वर्षांनी मागे गेल्यासारखं वाटलं … पाकिस्तानात या दोघांनी धावांचं मोठं आव्हान हसत खेळत पार केलं होतं त्याचीच आठवण होत होती.. It was really an emotional moment for me..

प्रश्न : युवराजसारख्या अफाट गुणवत्तेचा खेळाडू टेस्ट क्रिकेट फार खेळू शकला नाही. युवराजनंही ही खंत बोलून दाखवली आहे. युवराजला टेस्ट क्रिकेटमध्ये फार संधी मिळाली नाही की मिळालेल्या संधीचा त्याला योग्य वापर करता आला नाही म्हणून तो जास्त टेस्ट क्रिकेट खेळू शकला नाही? तुम्हाला काय वाटतं?

प्रसाद : खरंतर त्याचं टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी न होणं फ्रस्टेटिंग होतं. पाकिस्तानात दोन शतकं, चेन्नईत इंग्लंडविरुद्ध सेहवागने धडकेबाज सुरवात केल्यानंतर सचिनला योग्य साथ देत ३८६ धावांचं लक्ष्य पार करणं या गोष्टी त्याची टेस्ट क्रिकेटमधली क्षमता दाखवणाऱ्या आहेत, पण तो दुर्दैवाने फार यशस्वी झाला नाही. त्याला संधी मिळाली नाही असं मी म्हणणार नाही. त्याचा पेशन्स थोडा कमी पडला असावा असं वाटतं. शेवटी वनडेमधला पेशन्स आणि टेस्टमधला पेशन्स यात शेवटी फरक असतोच.

ICC च्या प्रश्नावर युवराज सिंगचा स्ट्रेट ड्राईव्ह, उत्तर वाचून तुम्हाला वाटेल हळहळ

प्रश्न : युवराजला 2015 चा वर्ल्ड कप खेळायला मिळाला नाही. त्यानंतरही त्याला पुढील चार वर्ष मोजकी संधी मिळाली. 2017 ते 19 ही दोन वर्ष तो टीमच्या बाहेर होता. युवराजनं निवृत्तीचा निर्णय लांबवला असं तुम्हाला वाटतं की त्याच्यावर निवड समितीनं अन्याय केला असं तुमचं मत आहे?

प्रसाद : निवड समितीने अन्याय केला असं म्हणणं मला पटत नाही. कॅन्सरनंतरचा युवराज पहिल्यासारखा नव्हता हे दिसत होतं. तरीही अधूनमधून ‘फ्लॅशेस ऑफ ब्रिलियंस’ म्हणतात ते दिसायचेच… वर उल्लेखलेली दीडशतकी खेळी त्यातलीच… पण त्याच्यात  सातत्य नव्हतं. गली आणि पॉईंट या त्याच्या फिल्डिंगच्या हक्काच्या जागाही त्याने केव्हाच गमावल्या होत्या. त्याला टीममधून काढल्यावरही तो आशेवर राहून निवृत्ती लांबवत होता. अखेर त्याने परिस्थिती स्वीकारून निवृत्ती घेतली.

अगदी मागच्या महिन्यातच तो “मी फेब्रुवारीत परत येणार” अशा अर्थाचं काहीतरी बोलला आहे, पण आता ते अनावश्यक उसनं अवसान वाटतंय..

प्रश्न : आपण गेल्या 8 वर्षात एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेलो नाही. या स्पर्धांमध्ये युवराजच्या दर्जाच्या खेळाडूची कमतरता तुम्हाला किती जाणवते. सध्याच्या काळातील कोणता खेळाडू एक ऑल राऊंडर म्हणून तुम्हाला आश्वासक वाटतो?

प्रसाद : युवराज आपलं ट्रम्प कार्ड होता. कुठे ना कुठे अस्तित्व दाखवून द्यायचाच. पण मला नेहमी वाटतं की, आपल्याला स्पिनर ऑलराउंडरपेक्षा फास्ट बॉलिंग ऑलराउंडरची फार जास्त आवश्यकता आहे. सध्याच्या काळात हार्दिक पंड्या यासाठी योग्य वाटतो. टॅलेंट भरपूर आहे. वनडेमध्ये कामचलाऊ ऑलराउंडर चालू शकतात, पण टेस्ट मॅचमध्ये मात्र पंड्यासारखा कुणीतरी असणं फार गरजेचं आहे. पण सध्या तो दुखापतींनी ग्रस्त आहे. शिवाय मैदानाबाहेरचं त्याचं एकूण वागणं बघता, नको त्या गोष्टींमध्ये वाहवत जाऊन त्याचाही विनोद कांबळी होईल, अशी भीती वाटते.

प्रश्न : युवराज सिंह सारखा मोठा खेळाडू आयपीएलमध्ये तितका यशस्वी ठरला नाही. तो एकूण 6 आयपीएल टीमकडून खेळला. कुठंही फार स्थिरावला नाही. त्याच्या आयपीएलमधील अपयशाची काय कारणं असावीत?

प्रसाद : प्रामाणिकपणे सांगायचं तर मी आयपीएल बघत नाही, त्यामुळे त्यातले बारकावेही मला माहित नाहीत. त्यामुळे मला यावर मी काही बोलणं योग्य होणार नाही.

प्रश्न : Cricket मराठी या साईटबद्दलचा तुमचा अभिप्राय जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.  

प्रसाद : मराठीमध्ये क्रिकेटबद्दल वाचायला मिळालं की मला आनंद होतो, त्यामुळे मी ‘क्रिकेट मराठी’ नियमितपणे फॉलो करतो. खेळाडूंच्या वाढदिवशी त्यांचे फारसे माहित नसलेले पैलू आवर्जून सांगितले जातात ते आवडतात. ‘फॅन कॉर्नर’ ही कल्पना तर मला विशेष आवडली. तज्ज्ञांचं म्हणणं तर आपल्याला कायम ऐकायला मिळतंच, पण ‘फॅन कॉर्नर’मुळे फॅन्सनाही त्यांच्या भावना, त्यांची निरीक्षणं, त्यांचे अनुभव मांडायला संधी मिळते. ज्यांच्या प्रेमामुळे क्रिकेटची भरभराट झाली त्या फॅन्सचीही दखल घेतली जाणं मला खरंच आवडलं. आज मलाही फॅन कॉर्नरचा भाग होता आलं याचा आनंद आहे. त्यासाठी क्रिकेट मराठीचा मी आभारी आहे..

(कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले प्रसाद फाटक यांचे आघाडीच्या मराठी वृत्तपत्रात नियमित लेख प्रकाशित होतात. अष्टपैलू वाचक आणि लेखक असलेल्या प्रसाद यांचा ब्लॉग तुम्ही इथे वाचू शकता)

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: