फोटो – क्रिकेट ऑस्ट्रेलिया

वेस्ट इंडिजच्या (West Indies) फास्ट बॉलर्सचा सोनेरी कालखंड संपून आता बरीच वर्ष झाली आहेत. असं असलं तरी अजूनही क्रिकेट फॅन्सच्या मनात त्या सोनेरी कालखंडाच्या आठवणी जाग्या आहेत. ते क्रिकेटपटू खेळत असताना जन्माला न आलेल्या पिढीला देखील त्यांचे YouTube वरचे व्हिडीओ पाहून अंगावर शहारे येतात. वेस्ट इंडिजच्या या गोल्डन जनरशेनमधील महान बॉलर असलेल्या पॅट्रीक पॅटरसन (Patrick Patterson) याला दोन वेळेसचे जेवण देखील महाग झाले आहे. पॅटरसनची ही परिस्थिती पाहून टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) गहिवरला असून त्याने सर्वांना वेस्ट इंडिजच्या महान बॉलरच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केले आहे.

पॅटरसननं गाजवलं क्रिकेट

पॅट्रीक पॅटरसन (Patrick Patterson) 1986 ते 1993 अशी सात वर्ष क्रिकेट खेळला. या सात  वर्षात त्यानं फास्ट बॉलर्सच्या यादीत स्वत:चा कधीही न पुसला जाणारा ठसा निर्माण केला आहे. इंग्लंडची घरच्या मैदानात  5- 0 ने शिकार, दिल्ली आणि मुंबईत भारतीय बॅट्समनची उडवलेली भंबेरी आणि मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांची त्रेधातिरपीट या पॅटरसनच्या भेदक बॉलिंगच्या आठवणी कधीही विसरल्या जाणार नाहीत.

6 फुट उंचीच्या पॅटरसनकडे वेग आणि अचुकता दोन्ही होती. त्याच्या जोरावरच त्यानं त्या काळातील सर्व महान बॅट्समनच्या मनात आदरयुक्त दरारा निर्माण केला होता. त्याची ही कारकीर्द अचानक लोप पावली. ‘तो आला, त्यानं जिंकलं आणि तो नाहीसा झाला’ असे पॅटरसनच्या कारकीर्दीचं नेहमी वर्णन केले जाते.

क्रीडा पत्रकाराने घेतला शोध

क्रीडा पत्रकार भरत सुंदरसन (Bharat Sundaresan) यांनी हरवलेल्या पॅटरसनला पुन्हा एकदा जगासमोर आणलं. ते ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये नोकरी करत होते, त्यावेळी त्यांनी वेस्ट इंडिजचा दौरा कव्हर केला होता. या दौऱ्यात त्यांनी जमेकाच्या महान बॉलरला शोधलं. पॅटरसनवरील भरत यांचा लेख खूप गाजला होता.

जिनिअस शब्दही ज्याचं वर्णन करण्यासाठी फिका आहे असा ब्रायन लारा!

भरत यांनीच पुन्हा एकदा पॅटरसनच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीची माहिती दिली आहे. ‘पॅटरसन यांनी अवस्था रोज खराब होत आहे. त्यांच्याकडे किराणा सामान खरेदी करण्याचे देखील पैसे नाहीत. तसेच त्यांना दोन वेळेसचे जेवण देखील महाग झाले आहे,’ असं ट्विट भरत यांनी केले आहे.

अश्विनचे आवाहन

टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विनही पॅटरसन यांची परिस्थिती पाहून गहिवरला आहे. ‘पॅटरसन यांना रोजच्या गरजा भागवण्यासाठी मदतीची गरज आहे. भारतीय चलनातून त्यांना मदत करण्याचा कोणता मार्ग नाही. कुणाला मदत करणे शक्य असेल तर प्लीज करा.’ असे ट्विट अश्विनने केले आहे.

पॅटरसन यांची कारकिर्द

पॅट्रीक पॅटरसन (Patrick Patterson) सात वर्ष वेस्ट इंडिजकडून खेळले. या काळात त्यांनी 28 टेस्टमध्ये 93 तर 59 वन-डे मध्ये 90 विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना फार संधी मिळाली नाही. त्यांनी 161 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 493 तर 100 लिस्ट A मॅचमध्ये 144 विकेट्स घेतल्या आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: